Showing posts with label श्रीरामरक्षास्तोत्र. Show all posts
Showing posts with label श्रीरामरक्षास्तोत्र. Show all posts

Tuesday, June 23, 2020

किती भार घालू रघूनायकाला ?

शास्त्रकार म्हणतात,
"मांजर आडवे गेल्यावर आपले काम होत नाही या विश्वासापेक्षा,
श्रीरामनाम जपामुळे माझे काम नक्की होईल हा विश्वास मोठा वाटायला लागला की आपण भक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली म्हणून समजावे."
"एकांतात असताना कदाचित आपल्याला भूत दिसेल या भीतीपेक्षा,
माझ्या साधनेच्या योगाने माझ्या सदगुरूंचे दर्शन नक्की होईल याची खात्री मोठी झाली की आपण भक्तीमार्गावर चालायला लागलोय हे पक्के समजावे."
"आपण मांजराचे, भुताचे भक्त आहोत की श्रीरामांचे, सदगुरूंचे भक्त आहोत ? हे प्रत्येकाने ज्याचे त्याचे ठरवायचे आहे."
हे विचार आज आठवण्याचे कारण म्हणजे दररोज संध्याकाळी उपासनेत श्रीसमर्थांचा
"किती भार घालू रघूनायकाला ?
मजकारणे शीण होईल त्याला."
हा श्लोक म्हणतोय खरा पण लक्षातच येत नव्हते की त्या सर्वशक्तीमान रघुनंदनाला आपण असा कुठला शीण देणारा भार वहायला लावतोय ते ?
त्या प्रश्नाचे उत्तरही आज संध्याकाळच्या श्रीरामरक्षेत मिळाले.
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षयाशुगनिषंग सङ्गिनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम ।
"प्रभू श्रीराम आणि त्यांचे भ्राता लक्ष्मण या दोघांनीही माझ्या समवेत सदैव असून माझे रक्षण करावे" ही एका भक्ताची अपेक्षा आपण रोजच प्रभू श्रीरामांकडे व्यक्त करतो. सदैव आपल्यासोबत, आपल्या रक्षणासाठी, सज्ज अवस्थेत रहाण्याचा हा एकप्रकारचा शीणच आपण प्रभूंना देतोय हे आपल्या लक्षात येतय का ?
म्हणून एक अपराधीपणाची बोचणी आपण
"किती भार घालू रघूनायकाला..."
म्हणून व्यक्त करतोय असे नाही वाटत ?
।। जय श्रीराम ।।
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर