रेल्वेफॅनिंग किंवा बसफॅनिंग म्हणजे नुसते बसेस आणि रेल्वेगाड्यांचे फोटो जमा करणे नव्हे. नाही, सुरूवातीच्या काळात फोटो जमविणे, ते विविध सोशल मिडीयांवर टाकणे इथपासून सुरूवात होते पण नंतर नंतर रेल्वे आणि बसेसविषयी विविध अंगानी वेगवेगळी माहिती मिळवणे, त्यांचे मनात विश्लेषण करणे, त्या माहितीची तर्कसंगत मांडणी करून काही निष्कर्षाप्रत पोहोचणे असा प्रवास प्रत्येक रेल्वे आणि बसफॅनचा असतो, किंबहुना तो प्रवास तसा झाला पाहिजे ही अपेक्षा.
या प्रवासात रेल्वे आणि बसविषयी वृत्तपत्रांमध्ये, इतर सोशल मिडियात छापून आलेली प्रत्येक छोट्या मोठ्या माहितीची मेंदूत निश्चित अशी नोंद ठेवणे आणि त्या माहितीची शेरलाॅक होम्ससारखी तर्कसंगत जुळणी करणे हा प्रकार येतोच.
परवाचीच गोष्ट. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दिनांक ३/१०/२३ रोजी रात्री ००.२० वाजता एक १८ डब्यांची वन वे स्पेशल नागपूरकडे निघाल्याची छोटीशी सूचना वाचली. त्याच्या दुसर्याच दिवशी ४/१०/२३ ला मुंबईच्याच लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ल्यावरून अशीच एक १८ डब्यांची विशेष वन वे स्पेशल रेल्वेगाडी नागपूरकडे रवाना झाल्याची बातमीही वाचनात आली. मुंबईच्या वाडीबंदर कोचिंग डेपोमधून हे कोचेस नागपूर कोचिंग डेपोकडे पाठविण्यात आल्याचे कळले. पण कशासाठी ? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्याची शोधाशोध सुरू झाली आणि आज अचानक हा शोध संपला.
नागपूरवरून नव्यानेच झालेल्या छिंदवाडा - नैनपूर - जबलपूर या मार्गाने मध्य प्रदेशातल्या शाहडोलपर्यंत आत्तापर्यंत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची 08287 डाऊन / 08288 अप अशी हाॅलिडे स्पेशल सेवा आठवड्यातून २ दिवस सुरू होती.
येत्या आठवड्यात ही सेवा दररोज सुरू होणार असल्याची दुसरी एक बातमी कळाली. ही गाडी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडे हस्तांतरित होणार असून या गाडीचा नवा नंबर 11203 डाऊन / 11204 अप (जुना नागपूर - जयपूर एक्सप्रेसचा नंबर) मिळणार असल्याचीही एक बातमी अशीच कुठेतरी वाचायला मिळाली.
हे दोन हस्तांतरित रेक्स या गाडीसाठी वापरणार हा निष्कर्ष काढून हा रेल्वेफॅन अंशतः तृप्त झाला.
अंशतः तृप्त अशासाठी की असेच दोन रेक याचदरम्यान कोल्हापूर आणि सोलापूरसाठी रवाना झाल्याचीही बातमी वाचली होती. त्या रेक्सचे नक्की काय होणार ? ही उत्सुकता आणखी बाकी आहे.
- A forensic Railfan प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.