Showing posts with label Indain trucks and rikshaws. Show all posts
Showing posts with label Indain trucks and rikshaws. Show all posts

Saturday, June 9, 2012

पर्यावरणाच्या बैलाला ......


५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. सर्वत्र बरेच लेख, जाहिराती, फ़ेसबूकवर ब-याच मित्रांच्या पोस्टस वगैरे वाचून जरा जागृतच होतो. आम्ही ६ जून ला माहूर, कारंजा प्रवासाला गाडीने निघलोत. वाटेतल्या काही दृष्यांनी कळवळलोच.



महाराष्ट्रात किंबहुना सगळ्या भारतातल्याच निम शहरी भागात सर्रास दिसणारे हे दृश्य. या सगळ्या आटो रिक्षांमध्ये पेट्रोल भरतात ते केवळ तो सुरू होण्यापुरताच. बाकी सगळे घासलेट तेल. 


हा ट्र्क निव्वळ आणि शुद्ध डिझेलवर चालतोय असे कोण म्हणेल ? आमच्याच मार्गाने आमच्या पुढे जाणारा हा ट्रक धुराचा प्रचंड लोट उडवत बिनदिक्कतपणे जात होता की नक्की ट्रक कुठे आहे आणि समोरून एखादे वाहन येत आहे की नाही हे कळायला अंदाजेच काम करावं लागलं.

आर. टी. ओ., वाहतूक पोलीस बिचारे अशा वेळेला काळ्या गडद काचांचे चष्मे लावून असतात. त्यांना हे असलं काही दिसतच नाही आणि मी खात्रीने सांगतो या दोन्ही वाहनांजवळ पी.यू.सी. (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) असणारच.

माहूरगडावरही सगळ्या उतारांवर प्लॆस्टिकच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. बहुतेक पर्यटक बाटलीबंद पाणीच पितात आणि त्यामुळे सगळ्या तालुक्यांमध्ये एक तरी बाटलीबंद पाण्याचा कारखाना असतोच आणि प्रत्येक ठिकाणी विविधरंगी बाटल्या बघायला मिळतात. त्या प्रत्येक बाटलीवर "वापरल्यावर फ़ेकून देणे"  (Dispose after use) अशी सूचना असते आणि ब-याच बाटल्या एकदा वापरल्यावर फ़ेकण्याच्याच लायकीच्या असतात. (पाणी पाउच जे येतात त्याच दर्जाच्या प्लॆस्टिकमध्ये आजकाल या बाटल्या बनवितात की काय अशी शंका मला यायला लागलेली आहे.)

हा भस्मासूर आपल्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही हा विचार मनात आला आणि वाटून गेलं की एक दोनदा वापरल्यावर फ़ेकून देण्यापेक्षा त्या बाटल्यांचा पुनर्वापर केला तर ? त्यासाठी त्या बाटल्या पेट क्वालिटीच्या बनवाव्या लागतील. (सध्या टप्परवेअरच्या असतात तश्या दर्जाच्या). पण मग त्यांची किंमत सुरूवातीलाच खूप होइल आणि घेणा-यांना ती एका लीटर पाण्यासाठी परवडणार नाही. (चेन्नईला स्पेन्सर प्लाझामध्ये एका अशाच खाद्य भ्रमंतीत एका अशाच छान बाटलीची मी जरा आगाऊपणेच किंमत विचारली होती. तेव्हा त्या विक्रेत्याने मला स्पष्ट शब्दात ती बाटली फ़क्त परदेशी पर्यटकांसाठीच असल्याची माहिती दिली. त्या एक लीटर बाटलीची किंमत तब्बल ८५ रू. होती.)

त्यावर उपाय म्हणून सगळ्या मोठमोठ्या ब्रॆण्डस ना आपापली आउट्लेटस सगळ्या अश्या पर्यटन स्थळी, बस स्थानकांवर, रेल्वे स्थानकांवर उघडावी लागतील आणि पूर्वी विकत घेतलेल्या बाटल्या घेऊन जर ग्राहक आलेत तर १ रू. किंवा २ रू. प्रती लीटर अशा नाममात्र किंमतीत त्या बाटल्या भरून द्याव्या लागतील. (नागपूर रेल्वे स्थानकावर हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे). यामुळे हा वापरा आणि फ़ेका या वृत्तीतून निर्माण झालेला प्लॆस्टिकचा भस्मासूर थोडातरी आटोक्यात यायला मदत होईल.

फ़क्त या पाण्यासाठी उपसा केलेल्या पाण्याच्या दीडपट किंवा पावणेदोनपट पाणी त्या कंपनीने भूगर्भात पुनर्भरण केले की नाही हे जरा जागरूकतेने बघावे लागेल.