Showing posts with label MH - 40 series. Show all posts
Showing posts with label MH - 40 series. Show all posts

Saturday, February 3, 2024

एस. टी. च्या बाबतीत नागपूर आर. टी. ओ. आणि डेपोंचे वैशिष्ट्य

मागे मी पुणे आर. टी. ओ. च्या एका जगावेगळ्या वैशिष्ट्याबद्दल इथे लिहीले होते. नागपूर आर. टी. ओ. पण एस. टी. च्या बाबतीत असा जगावेगळेपणा करत आलेले आहेत. त्याबद्दलच थोडेसे इथे.


पूर्वी नागपूर आणि पुणे आर. टी. ओ. आपल्या एखाद्या सिरीजमधले काही हजार नंबर्स एस. टी. च्या कार्यशाळेतून निघणा-या गाड्यांच्या पासिंगसाठी राखीव ठेवायचे. छत्रपती संभाजीनगर इथल्या आर. टी. ओ. ने तर MH - 20 / D आणि MH - 20 / BL या दोन अख्ख्या सिरीज राखीव ठेवल्या होत्या. MH - 20 / D 0001 ते MH - 20 / D 9999 हे सगळे नंबर्स फ़क्त एस. टी. बसेसनाच गेलेले आहेत. आजकाल असे नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळ्या सिरीज आर. टी. ओ. राखून ठेवतात. त्या सिरीजमध्ये रॅंडमली नंबर्स गाड्यांना आजकाल देतात. उदाहरणार्थ MH - 40 / CM 6011 जर एस. टी. ला दिलेला असेल आणि त्याच दिवशी दुसरी एखादी खाजगी बस पासिंगसाठी आलेली असेल तर तिला MH - 40 / CM 6012 नंबर दिला जाऊ शकतो.


मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने आपल्या काही गाड्या नागपूर आर. टी. ओ. कडून पास करून घेतल्या. MH - 31 / AP 9601  ते MH - 31 / AP 9999 पर्यंत पासिंग झाल्यानंतर नागपूर कार्यशाळेने आपल्या बसेस नवीनच सुरू झालेल्या नागपूर ग्रामीण आर. टी. ओ. कडून पासिंग करून घ्यायला सुरूवात केली. पण नागपूर ग्रामीण आर. टी. ओ. ने सुरूवातीलाच एक गंमत केली. त्यांनी मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेल्या गाड्यांना MH - 40 / 9601 या नंबर्सपासून सुरूवात केली. MH - 40 / 9999 पर्यंत नंबर्स संपल्यानंतर नवीन सिरीजमधले नंबर्स देण्याऐवजी त्यांनी MH - 40 / 8001 पासून नंबर्स सुरूवात केली.





या फ़ोटोत दिसणारी MH - 40 / 8215 ही गाडी शेजारच्या MH - 40 / 9882 या गाडीपेक्षा नवीन गाडी आहे. जवळपास वर्षभर उशीरा पास झालेली. पण हा प्रकार आपल्या लक्षात नसेल तर आपल्याला MH - 40 / 9882 ही तुलनेने नवीन गाडी वाटू शकते. माझ्या मागच्या लेखात लिहील्याप्रमाणे MH - 40 / 8215  ही गाडी MH - 40 / 9882  या गाडीची धाकटी बहीण आहे. पण नंबर्समुळे थोरली बहीण वाटू शकते.


या दोन्हीही गाड्या तेव्हाच्या नागपूर -१ डेपोच्या आहेत. आता नागपूर - १  डेपोचे घाटरोड डेपो असे नामकरण झालेले आहे. 


नाग. नागपूर -१ डेपोचे नाग. घाटरोड, नाग. नागपूर -२ डेपोचे नाग. गणेशपेठ, नाग. सी.बी. एस. १ डेपोचे नाग. इमामवाडा आणि नाग. सी.बी. एस. २ डेपोचे नाग. वर्धमाननगर असे बदल झालेले आहेत.


त्यातही गणेशपेठ डेपो, इमामवाडा डेपो आणि घाटरोड डेपो हे एकमेकांपासून फ़क्त ५०० मीटर्स अंतरावर आहेत. एकाच शहरात चार एस. टी. डेपो असण्याचा आणि त्या चारमधले तीन डेपो एकमेकांपासून इतक्या जवळ असण्याचा महाराष्ट्र एस. टी. तला हा एक वेगळाच विक्रम.


- एस. टी. प्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.