Showing posts with label Mangesh Padgaonkar. Show all posts
Showing posts with label Mangesh Padgaonkar. Show all posts

Friday, March 10, 2023

कवी आणि कविता.

आयुष्यात काव्य खूप उशीरा सामील झाले. बालपणी कविता होत्या पण त्या अभ्यासापुरत्याच. गद्य आणि पद्य म्हणून. पुलं नी लिहील्याप्रमाणे शाळेत "गद्य नाही ते पद्य आणि पद्य नाही ते गद्य." असेच आम्ही गद्य पद्य शिकलो. अभ्यासक्रमातल्या कवितेचा अभ्यास म्हणजे या कवितेवर नेमका कुठला प्रश्न परीक्षेत येईल. कुठले "संदर्भासह स्पष्टीकरण" या कवितेवर येईल ? याचाच सतत विचार. एखाद्या कवितेच्या रसग्रहणापेक्षाही तिच्यावर किती मार्क्स मिळतील ? हाच विचार आम्ही सगळे "मार्क्सवादी" विद्यार्थी कायम करीत आलो. 


अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्यानंतर कवितांचा अभ्यास नव्हता म्हणूनच मग नवनवीन कविता गाण्यांच्या रूपात कानावर पडू लागल्यात. त्यातल्या सुंदर सुरावटींइतकेच शब्दही आवडू लागलेत. इतके सुंदर शब्द कुठल्या कवीने लिहीलेत ? या उत्सुकतेपोटी त्या कवितेचा, कवीचा आणि त्या कविच्या इतरही रचनांचा शोध सुरू झाला. त्यात महाविद्यालयातली समविचारी मित्रमंडळी मिळालीत. चांगल्या कविता ऐकायला, वाचायला मिळू लागल्यात. आपसूकच त्यांचे रसग्रहण होत गेले. कविता कळायला लागली.


याच प्रक्रियेद्वारे मंगेश पाडगावकर मनात ठसलेत. २० - २१ वर्षांचे स्वप्नाळू वय. सकाळी हाॅस्टेलमधून काॅलेजबाहेरच्या टपरीवर चहा पिताना चाललेलो असताना हाॅस्टेलच्या एका खोलीत लागलेल्या सांगली आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रमात


"लाजून हासणे अन

हासून हे पहाणे

मी ओळखून आहे

सारे तुझे बहाणे" 


हे गाणे कानी पडताच आमची पावले तिथेच थबकलीत. पाडगावकरांच्या इतर कवितांचा शोध सुरू झाला. त्यात आमच्या मैत्रिणीच्या (शारदा गाडगीळ - आता शारदा तानवडे) वडिलांचे कोल्हापूरात पुस्तकांचे साक्षात दुकान. पाडगावकरांच्याच "बोलगाणी" सह नवनवीन कवितासंग्रह प्रकाशित झाल्याझाल्या (कधीकधी प्रकाशनपूर्वही) आम्हाला वाचायला मिळू लागलेत.  आम्ही काव्यात रमलोत.


चांगली कविता म्हणजे तरी काय ? माझ्या मते वाचकाला त्याच्या आसपास घडणार्‍या अनंत घटना कवीच्या कल्पनेतून आलेल्या नव्या शब्दांच्या अनुभूतीद्वारे भेटायला येतात. "अरे, ही तर आपलीच अनुभूती. कवीने किती सुंदर शब्दांद्वारे आपल्यापुढे मांडलीय." ही  सर्वसामान्य वाचकांची भावना झाली की कवी जिंकला. असाच माझा एक अनुभव.


असाच एकदा मुंबईवरून कोल्हापूरकडे निघालो होतो. ठाण्यावरून सकाळची कोयना एक्सप्रेस पकडलेली होती. पावसाळी दिवस. एसी चेअर कार. खिडकीची जागा. माझ्यासारख्या एका प्रवासी पक्षाला अजून काय पाहिजे ?


कर्जतनंतर गाडीने बोरघाट चढायला सुरूवात केली. दरी डोंगरांच्या रांगेतून, बोगद्याबोगद्यातून गाडी लोणावळ्याकडे धावत होती. कर्जतपासूनच मी खिडकीला नाक आणि कॅमेरा लावून सरसावून बसलो होतो.


एका बोगद्यातून गाडी बाहेर पडली आणि समोरचे दृश्य पाहून पाडगावकरांचीच एक ओळ अनुभूतीला आली. ठाण्यापासून कर्जतपर्यंत येताना डोक्यावर असलेले ढग आता पायाशी आलेले होते. ढगांच्या छायेतला आमचा आत्तापर्यंतचा प्रवास त्याच ढगांना भेदून आता ढगांवर आरूढ होण्यापर्यंत येऊन पोहोचला होता.  पुढ्यातल्या हिरव्यागार दरीत मस्त पिवळेधम्म ऊन पसरले होते. 



"पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले." या ओळींची याहून उत्तम अनुभूती आणखी कुठे आली असती ? पाडगावकरांना, त्यांच्या अभिव्यक्तीला ताबडतोब सलाम केला.


आता अशीच अनुभूती एखाद्या निळ्याशार तळ्याकाठी, नदीच्या संथ प्रवाहात पावसाच्या हलक्या शिरव्याचे थेंब तळ्याच्या, नदीच्या पाण्यात नाचत असताना 

"निळ्या रेशमी पानांवरती थेंबबावरी नक्षी" या ओळींची घ्यायला मिळेल अशी आस आहे.


तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसांच्या मनांना आपल्या अत्यंत प्रभावी अभिव्यक्तिद्वारे साद घालण्याचे आणि स्तिमित करण्याचे सामर्थ्य ज्याच्या कवितेत असते तोच खरा उत्तम कवी, नाही का ?


- उत्तमोत्तम कवींना आदर्श मानणारा एक सर्वसामान्य वाचक, आस्वादक वैभवीराम किन्हीकर.


{शालेय जीवनात विडंबन म्हणून केलेल्या काही (च्या) काही कविता इथे.}