Showing posts with label Prasanna Travels. Show all posts
Showing posts with label Prasanna Travels. Show all posts

Wednesday, June 25, 2025

प्रसन्न "गोल्ड लाईन" घाडगे पाटील "Snooooozer" आणि लक्झरी बसेस बद्दल माझ्या अपेक्षा

 माझ्या कुंडलीत प्रवासाचे भरपूर योग असावेत आणि त्यातही प्रवास आरामदायकच व्हावेत असेही योग असावेत. तूळ किंवा वृषभ राशीचा उच्चीचा शुक्र असला की आयुष्यात असे लक्झरीचे योग येतात असे म्हणतात. माझ्या कुंडलीत हा बेटा शुक्र कुठे बसला आहे, कोण जाणे ! पण आरामदायक प्रवासाचे भरपूर योग आलेत हे मात्र नक्की. अर्थात काही काही प्रवास दगदगीचेही ठरलेत म्हणा. त्यांच्यावर एक स्वतंत्र ब्लॉगपोस्ट येऊ शकते. कदाचित तेव्हा तो गोचरीचा शुक्र नेमका वक्री असावा. बाकी शुक्र मार्गी असावा असेच योग जास्त.


मागील एका लेखात वर्णन केल्याप्रमाणे प्रसन्न ट्रॅव्हल्सने साधारण १९९३ मध्ये नागपूर - पुणे प्रवासासाठी त्यांची "गोल्डलाईन" ही लक्झरी बस सुरू केली होती. त्यातल्या ब-याचशा सोयीसुविधा त्या काळाच्या पुढे होत्या आणि काहीकाही सोयीसुविधा तर आजही ब-याचशा आराम गाड्यांमध्ये दिसत नाहीत. 


प्रसन्न ची "गोल्डलाईन" बस नागपूरवरून प्रसन्नच्याच "विदर्भ क्वीन" च्या पाटोपाठ दुपारी ३.३० च्या सुमारास निघत असे. अकोल्याला रात्री ८.३० ला पोचून पुढे पुण्याला सकाळी ७ पर्यंत पोचत असे. या वातानुकूल गाडीचे काहीकाही खास फ़ीचर्स असे होते.


अ) या गाडीमध्ये आसनांच्या ६ च रांगा होत्या. त्याकाळी "विदर्भ क्वीन" आणि इतरही गाड्यांमध्ये आसनांच्या १० रांगा असायच्यात. म्हणजे दोन रांगांमधले अंतर "गोल्डलाईन" मध्ये इतर बसेसच्या तुलनेने १६६ % जास्त होते.


आ) या "गोल्डलाईन" बसमध्ये आसनांची व्यवस्था २ बाय १ अशी होती. इतर सर्व बसेसमध्ये ती २ बाय २ अशी असायची. म्हणजे प्रत्येक आसनाची रूंदी १३३ % जास्त असू शकत होती. म्हणजे अधिकचा आराम.


इ) "गोल्डलाईन" बस इतर बससारखी १०.५ मीटर लांब असूनही फ़क्त १८ प्रवाशांना घेऊन प्रवास करीत होती. त्याकाळच्या इतर बसेस मात्र ३५ आसनी होत्या. याचाच अर्थ या "गोल्डलाईन" बस मधल्या सगळ्या प्रवाशांना मधल्या थांब्यांवर चढण्या उतरण्यासाठी कमी वेळ, कमी गर्दी लागत असणार. ही बस प्रवाशांना एखाद्या मोठ्या कारसारखीच वाटत असणार.


ई) "गोल्डलाईन" ही बस सेमी स्लीपर बस होती. दोन रांगांमध्ये अंतर जास्त असल्याने प्रत्येक प्रवाशाला भरपूर पुशबॅक करता येत होता आणि त्यासोबतच पायांच्या पोट-यांना अधिकचा आधार या गाडीतल्या विशेष आसनांमुळे मिळत होता. त्याकाळी स्लीपर बसेसचे प्रस्थ नागपूर - पुणे मार्गावर फ़ारसे नव्हते, किंबहुना एक सुद्धा स्लीपर कोच बस या मार्गावर नव्हती. तेव्हा त्याकाळी ही "गोल्डलाईन" सेमी स्लीपर बस आरामाच्या दृष्टीने या मार्गावर सर्वोत्त्तम होती हे नक्की.


उ) त्याकाळी बसमध्ये टी व्ही. असणे आणि एव्हढ्या लांबच्या प्रवासात मनोरंजन म्हणून एक दोन सिनेमे बघणे हे त्या काळी सगळ्यांसाठी एक आवश्यक गोष्ट होती. बरे, रात्री एका विशिष्ट वेळेनंतर काही काही प्रवाशांना झोप घ्यायची असायची तर इतर काही प्रवाशांसाठी टी. व्ही. सुरूच असायचा त्यामुळे काही प्रवाशांची अकारण झोपमोड होत असे. प्रसन्न कडून प्रत्येक प्रवाशाला स्वहेडफ़ोन्स दिले जात होते. त्यामुळे ज्यांना टी. व्ही. बघायचा नाही ते प्रवासी निवांत हेडफ़ोन्स काढून झोपेची आराधना करू शकायचेत. या बसच्या सीटस मध्ये चॅनेल म्युझिक ऐकण्यासाठी जॅक्स होते. त्यामुळे ज्याला उत्त्तम संगीताचा आनंद घ्यायचाय असे प्रवासी संगीतसुद्धा ऐकू शकायचेत. अर्थात प्रसन्न मध्ये लागणारे सिनेमे सुद्धा दर्जेदार असायचेत.


ऊ)  या "गोल्डलाईन" बसमध्ये प्रवाशांचे स्वागत एका वेलकम ड्रिंकने होत असे. सोबतच एक पाण्याची बॉटल आणि एक वेट वाईप टिश्यू पेपर दिला जात असे. 


प्रसन्न "गोल्डलाईनची" जाहिरात. आसनव्यवस्था त्या काळाच्या मानाने भरपूर पुढचा विचार केलेली होती.

बाकी इतर तर प्रसन्न चे सिग्नेचर फ़ीचर्स सोबत असायचेत. चांगल्या ठिकाणी जेवायला थांबणे, वेळेवर निघणे आणि पोचणे, मधल्या थांब्यांवरून अनधिकृत प्रवासी न घेणे वगैरे. त्यामुळे त्या काळी ही "गोल्डलाईन" बस नागपूर पुणे प्रवासाच्या सोयींमधली लक्झरीचा सर्वोच्च आदर्श होती. अर्थात या बसचे तिकीटही इतर बसेसच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग होते. पण प्रवाशांच्या सोयीचा, आरामाचा विचार करून, इतर स्पर्धक काय देऊ शकत नाहीत ते आपण देऊयात या भावनेने सोयी सुविधा पुरवलेली नागपूर - पुणे प्रवासासाठीची ही पहिली बस होती. हिची बस बांधणीपण "विदर्भ क्वीन" प्रमाणेच पुण्यातल्या ऑटो बॉडी या कंपनीनेच केलेली होती.


बाकी अशीच एक अतिशय उत्त्तम सेवा बरीच वर्षे कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर कोल्हापूरचे घाडगे पाटील ट्रॅव्हल्स (मोहन ट्रॅव्हल्स) चालवीत असे. ही बस वातानुकूल शयनयान होती पण शयन आसनांची रचना इतर गाड्यांप्रमाणे २ बाय १  नसून १ बाय १  असायची. म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला एक एकच बर्थस. या गाडीत अशा ५ बर्थसच्या रांगांमध्ये २० बर्थस ची सोय होऊ शकत होती पण घाडगे पाटलांनी पहिले रांगेतले उजवीकडले पहिले दोन बर्थस काढून तिथे प्रवाशांच्या हॅंडबॅग्जसाठी जागा केलेली होती. बर्थसवर झोपताना जवळ आपली बॅग घेऊन अवघडून झोपण्यापेक्षा ती बॅग त्या रॅकमध्ये आपल्या नजरेसमोर ठेऊन सगळे प्रवासी निवांत झोपण्याचा आनंद घेऊ शकत होते. मोठे जड सामानसुमान ठेवायला बसच्या पोटात डिक्की होतीच पण तरीही जवळच्या छोट्या छोट्या सामानासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसमध्ये फ़क्त १८ च बर्थस होते. आणि त्याकाळी कोल्हापूर - मुंबई धावणा-या इतर गाड्यांच्या तुलनेने हिचे तिकीट थोडेसेच महाग होते. म्हणजे दीडपट वगैरे. अत्यंत आरामदायक प्रवासासाठी एअर सस्पेन्शन असणा-या या गाडीवर दोन्हीही बाजूला "Snooooozer" असे लिहीले असायचे. त्यातही मधल्या दोन "oo" त दोन अत्यंत झोपाळू असे डोळे काढलेले असायचे आणि शेवटल्या "r" नंतर घोरण्याचे प्रतिक म्हणून z z z असायचेत. या गाडीत बसतानाच आपण इथे निवांत झोपणार आहोत अगदी घोरेपर्यंत निवांत ही भावना व्हायची. बस तशी खरोखर खूप आरामदायक होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक शायिकेखाली प्रवाशांची पादत्राणे एकाच जागी आणि व्यवस्थित राहतील अशी उत्त्तम शू रॅक पण त्या बसमध्ये होती.  


घाडगे पाटील मधला आमचा कोल्हापूर ते वाशी प्रवास. तसा आरामदायक बसप्रवास पुन्हा झाला नाही.


नंतर घाडगे पाटलांनी ही सेवा बंद केली. नवी सेवा "Snooooozer" होती खरी पण ती इतर ट्रॅव्हल्सप्रमाणे २ बाय १  केलेली होती. घाडगे पाटलांची बस, त्यांच्या बसचे मेण्टेनन्स वगैरे इतर कुणापेक्षाही उजवे असले तरी या बसचे वैशिष्ट्यपूर्ण फ़ीचर १ बाय १  शयनव्यवस्था होते ते हरवले होते.


आजच्या ट्रॅव्हल कंपन्यांनी जर २० वर्षांपूर्वीसारखा, प्रसन्न आणि घाडगे पाटील ट्रॅव्हल्स सारखा प्रवाशांच्या सुखसोयींचा आणि नेमकी त्यांची मागणी काय आहे ? याचा विचार केला तर आजही लांब पल्ल्याच्या बससेवेत खालील बदल घडू शकतील.


१) बसप्रवासासाठी आजकाल प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मुख्य अडचण म्हणजे बसेसमध्ये चांगली स्वच्छतागृहे नसणे. प्रवासात निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी दरवेळी बस थांबवावी लागणे. यात बसचालकांचाही 

ब-याचदा नाईलाज असतो. रात्री बेरात्री निर्जन स्थळी अशी बस थांबवून प्रवाशांना उतरण्यासाठी मुभा देणे धोक्याचे असू शकते. ज्या थांब्यांवर बस जेवण, नाश्यासाठी थांबते तिथली स्वच्छतागृहे चांगली आहेत की नाहीत यावर ट्रॅव्हल कंपनीचे कुठलेच नियंत्रण नसते. अशा कारणासाठी एखादा थांबा वगळून दुस-या थांब्यावर बस थांबवली तर तिथेही पहिले पाढे पंचावन्नच असतात.


यावर उपाय म्हणजे बसमधली मागची एक पूर्ण रांग काढून तिथे विमानाच्या धर्तीवरची दोन व्हॅक्युम स्वच्छतागृहे तयार करणे. आताशा अशी टेक्नॉलॉजी वापरणे म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे आणि या दर्जाची स्वच्छतागृहे आता उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीनेही तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे मागच्या शयन रांगेच्या ऐवजी अशी दोन स्वच्छतागृहे प्रवाशांचा खूप मोठा त्रास वाचवू शकतील.


२) सरसकट सगळी आसने १ बाय १  च असावीत आणि त्यातही आसनांची व्यवस्था पॉडसारखी असावी. आजकाल सगळी माणसे घरीसुद्धा एकमेकांशी सर्वच बाबतीत अंतर ठेऊन असतात आणि अतिशय वैयक्तिक रित्या घरीही वावरत असतात त्यामुळे प्रवासात सहप्रवाशांशी गप्पा, त्यांच्यासह सुखदुःख वाटून घेणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यात आपला बर्थ हा कुणासोबत शेअर करायचा म्हटल्यावर बहुतेकांना खूप अवघडल्यासारखे होते. त्यामुळे पॉड सारखे बर्थस असलेली बस लगेचच लोकप्रिय होईल यात शंका नाही. जपानमध्ये अशा पॉड बसेस आधीपासून वापरात आहेत.


३) आज प्रवाशांची सोय बघून विशेषतः जे प्रवासी एका दिवसाच्या कामासाठी नागपूर ते पुणे ते नागपूर असा प्रवास करत असतात त्यांच्या सोयीसाठी शेवटल्या रांगेतल्या काढलेल्या शायिकांऐवजी दोन स्वच्छतागृहांसोबत आणखी दोन क्युबिकल्समध्ये अत्यंत मॉड्युलर असे शॉवर्स उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे रात्रभर प्रवास करून पुण्यात सकाळी पोचून दिवसभराची कामे करून रात्री परत नागपूरला परतणारी अशी जी मंडळी असतील त्यांना हे शॉवर्स म्हणजे वरदान ठरतील. रात्रभर प्रवास करून सकाळी पुण्यात पोचण्याआधी असे स्वच्छ अंघोळ वगैरे करूनच बसबाहेर पडणे त्यांच्यासाठी एका दिवसाच्या हॉटेलचा खर्च वाचविणारे ठरू शकते. असे शॉवर्स सुद्धा उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीने आजकाल शक्य आहेत. फ़ार खर्चिक नाहीत. पण जर अशा प्रवाशांची सोय बघितली तर या बसला थोडे जास्त तिकीट द्यायला अशा प्रवाशांची ना असणार नाही. आज पुण्यासारख्या शहरात एखाद्या हॉटेलची रूम फ़क्त अंघोळीसाठी आणि कपडे वगैरे बदलण्यासाठी घेणे यात प्रवाशांचे किमान १००० रूपये तरी जातात. त्याऐवजी या बसेसचे थोडे महाग तिकीट प्रवाशांना परवडेलच.


४) आता अशी बस ट्रॅव्हल्सवाल्यांना आणि प्रवाशांनाही परवडण्याच्या अर्थशास्त्राचा विचार करू. साध्या २ बाय १  शायिका असलेल्या बहुतांशी बसमध्ये आजकाल ६ रांगांमध्ये ३६ शायिका असतात. प्रत्येक आसना / शायिकेसाठी नागपूर ते पुणे तिकीट १५०० रूपये धरले तर एका पूर्ण बसमधून एका ट्रीपमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांना ५४००० रूपयांचा महसूल मिळतो.


आपण शेवटली रांग काढून तिथे दोन स्वच्छतागृहे आणि दोन शॉवर्स ठेवण्याचे नियोजन करतोय. त्यामुळे आपल्या बसमध्ये शायिकांच्या ५ च रांगांची व्यवस्था असेल. प्रत्येक रांगेत उजव्या बाजूला २ पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) आणि डाव्या बाजूला सुद्धा २ च पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) अशा ४ शायिका येतील. म्हणजे एकूण प्रवासीसंख्या २० होईल.


आता एकूण मिळणा-या महसूलाला (५४००० रूपये) २० ने भागले तर प्रत्येक प्रवाशाला २७०० रूपये प्रवासखर्च येईल. म्हणजे साधारण बसच्या जवळपास पावणेदोन पट. पण त्या वाढीव तिकीटात ज्या सोयीसुविधा मिळत आहेत त्या हव्या असणारे २० प्रवासी तर रोज दोन्हीबाजूने अशा बसला मिळतीलच. 


काय म्हणताय ? पोचवताय आमचे म्हणणे संबंधितांपर्यंत ? "गोल्डलाईन" किंवा "Snooooozer" सारखी अशी उत्कृष्ट सोयीसुविधायुक्त, आरामदायक बस सुरू झाली तर थोडे जास्त पैसे खर्चून प्रवास कराल ?



- स्वतः एस. टी. च्या साध्या बसने कोल्हापूर ते पुणे ते अकोला ते नागपूर असा सलग २५ तास प्रवास केलेला आणि "Snooooozer"  ने सुद्धा प्रवास केलेला, सर्वत्र असा आरामदायक प्रवास आवडणारा, सगळ्यांच्या आरामाचा विचार करणारा एक प्रवासी पक्षी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, २५ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Sunday, June 15, 2025

"प्रसन्न" चा प्रसन्न प्रवास - विदर्भ क्वीन

गेल्या पंधरवाड्यातच कृत्रिम बुद्धीमत्त्ता वापरून तयार केले्ले ॲनिमेशन व्हिडीयो आणि त्याद्वारे प्रसन्न ट्रॅव्हल्सची केलेली जाहिरात बघितली. त्या जाहिरातीत प्रसन्न च्या "विदर्भ क्वीन" आणि "गोल्ड लाइन" या लाडक्या गाड्या दिसल्यात. मन एकदम ३० - ३५ वर्षे भूतकालात गेले. त्या काळी या गाड्या नागपूर - पुणे मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांच्याही अत्यंत लाडक्या गाड्या होत्या.


१९९० चे दशक जागतिकीकरण - उदारीकरणाचे वारे घेऊन आले. आणि महाराष्ट्रात खाजगी आराम बसेसचे अक्षरशः पेव फ़ुटलेत. नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती, नागपूर ते यवतमाळ, नागपूर ते छत्रपती संभाजीनगर, नागपूर ते पुणे अशा अनेक मार्गांवर खाजगी आराम बसेस धावू लागल्यात. त्यातला नागपूर ते पुणे हा मार्ग अनेक खाजगी बससेवा चालकांना विशेष खुणावू लागला होता. आजही शहरातल्या महत्वाच्या ७ - ८ मोठ्या खाजगी बससेवा मालकांच्या प्रत्येकी ५ अशा सेवा या मार्गावर निरंतर सेवा देत आहेत. म्हणजे नागपूर ते पुणे या मार्गावर दररोज एकाबाजूने जवळपास ५० खाजगी आराम बसेस धावत आहेत.


१९९० च्या दशकाच्या उत्त्तरार्धात जागतिकीकरण - उदारीकरणामुळे संगणक क्रांतीचे वारे वाहू लागलेले होते. त्यापूर्वीही पुणे आणि पिंपरी चिंचवड हा परिसर झपाट्याने औद्योगिकीकरणाकडे झेपावत होता. त्यामुळे नागपूर वरून पुण्याकडे नोकरीधंद्यासाठी 

जाणा-यांची संख्या प्रचंड वाढलेली होती. आणि त्यादरम्यान रेल्वे आणि एस. टी. चे जे पर्याय या दोन शहरांदरम्यान प्रवासासाठी होते ते अत्यंत तुटपुंजे आणि मुख्य म्हणजे गैरसोयीचे होते.


सकाळी १० वाजता नागपूरवरून निघून दुस-या दिवशी सकाळी ६ वाजता पुण्याला पोहोचवणारी महाराष्ट्र एक्सप्रेस या ८९० किलोमीटर प्रवासासाठी जवळपास २० तास घेत असे. रेल्वेने भुसावळ - मनमाड - अहिल्यानगर मार्गे अंतर सुद्धा लांब पडायचे. त्यामानाने रस्तामार्गे हे अंतर फ़क्त ७२० किलोमीटर पडायचे पण त्याकाळातल्या रस्त्यांची, त्यांच्या देखरेखीची एकूण अवस्था बघितली तर हे अंतर कापायला एस. टी. ला सुद्धा जवळपास १८ तास लागीत असत. दुपारी १:४५ ला निघणारी नागपूर - पुणे ही एशियाड (निम आराम सेवा आताचे ब्रॅंडनेम हिरकणी) दुस-या दिवशी सकाळी ७:३० ला पुण्यात पोचत असे. आणि दुपारी ४:४५ ला निघणारी नागपूर - पुणे ही जलद सेवा दुस-या दिवशी सकाळी १० च्या आसपास पुण्यात पोचत असे. परतीच्या प्रवासातही तसेच टायमिंग्ज.


ही सगळी गरज ओळखून प्रसन्न ट्रॅव्हल्स ने नागपूर ते पुणे अशी वातानुकूल आराम बससेवा सुरू केली आणि तिला "विदर्भ क्वीन" असे नाव दिले. ही बस तेव्हाच्या प्रसन्न ट्रॅव्हल्सच्य नागपूर हेडऑफ़िसवरून, धरमपेठेतल्या बोले पेट्रोल पंपाजवळून दुपारी ३:३० ला निघत असे. आणि दुस-या दिवशी सकाळी ७:३० ला पुण्यात बालगंधर्व जवळील देवी हाईटस ला पोचून आपला प्रवास संपवीत असे. एस. टी. प्रवासापेक्षा या प्रवासाला तब्बल दोन तास कमी लागत असत आणि या प्रवासाचे इतर फ़ायदेही भरपूर होते. आज तीन दशकांनंतरही एस. टी. ला (किंवा ब-याचशा खाजगी बससेवा पुरवठादारांना सुद्धा) या मुद्यांवर योजना करून तशी सेवा देणे जमत नाही यावरून ही सेवा काळाच्या किती पुढे होती हे लक्षात येते. 


अ) वक्तशीरपणा - प्रसन्न ट्रॅव्हल्स ने हा गुण अगदी पहिल्यापासून पाळलेला आहे. प्रवासी कितीही असोत "विदर्भ क्वीन" असलेल्या संख्येतल्या प्रवाशांना घेऊन आपल्या प्रवासाला सुरूवात करायची. इतर खाजगी ऑपरेटर्स पुरेशा प्रवासी संख्येसाठी बस थोडी थांबवून ठेव, एका बसला पुरेसे प्रवासी नसले तर दोन टायमिंग्जच्या बसेस एकत्र करून पाठव (म्हणजे दुपारी ४:०० च्या बसला पुरेसे प्रवासी नसलेत तर त्या बसमध्ये प्रवासी वगैरे बसलेले असतानाही ती बस नागपूरवरून सुटायचीच नाही. काहीतर कारण सांगून ती बस ताटकळत रहात असे. दुपारी ५:००, ५:३० च्या त्याच बस ऑपरेटर्स किंवा इतर ऑपरेटर्स च्या बसेसच्या बुकिंगमधले प्रवासी घेऊन ती ४:०० ची बस कधीकधी संध्याकाळी ६.०० वाजता सुद्धा रवाना होत असे.) असे प्रकार करीत असत. त्यामुळे त्याम्ची विश्वासार्हता शून्य होती. अगदी चार प्रवाशांनिशी सुद्धा प्रसन्नची "विदर्भ क्वीन" मार्गस्थ होईल हा विश्वास प्रवाशांच्या मनात असल्याने "विदर्भ क्वीन" ला प्रवाशांचा कायम उदंड प्रतिसाद लाभत असे.


आ) न रेंगाळता प्रवास - या मुद्यावर तर प्रसन्न ट्रॅव्हल्स ने एस. टी. महामंडळासकट आपल्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना मात दिलेली होती. नागपूरवरून निघालेल्या बसचा पहिला थांबा हा अमरावतीच्या इर्विन चौकातल्या प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या बुकिंग ऑफ़िसमध्येच असायचा. तिथून अमरावती - पुणे प्रवासासाठी अधिकृत प्रवाशांना घेतले की पुढला थांबा टॉवर चौक, अकोला येथले प्रसन्न ट्रॅव्हल्सचे बुकिंग ऑफ़िसच. प्रवासात मध्ये मध्ये नागपूर - कोंढाळी, कोंढाळी- तळेगाव, तळेगाव -अमरावती असे अनधिकृत प्रवासी घे. त्या प्रवाशांच्या प्रवासाच्या पैशात ड्रायव्हर - कंडक्टर्सने वाटा घे. काहीकाही तर खाजगी ऑपरेटर्स या अधल्या मधल्या प्रवाशांसाठी कुख्यात होते. त्यांच्या ड्रायव्हर्स - क्लीनर्सचा भत्त्ता अशा या अधल्या मधल्या अनधिकृत प्रवाशांच्या तिकीटांमधूनच निघायचा. परिणामी प्रवासाला उशीर व्हायचा.


एस. टी. महामंडळ तर अजूनही नागपूर ते पुणे हा प्रवास कोंढाळी - कारंजा - तळेगाव - अमरावती - मूर्तिजापूर - अकोला - खामगाव - चिखली - देऊळगाव राजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर अशा थांब्यांनिशी पूर्ण करते. त्यात या मधल्या स्थानकांवरून थेट पुणे - अहिल्यानगर ला जाणारे प्रवासी किती ? याचे विश्लेषण कधीतरी झाले आहे का ? याविषयी मला शंका आहे. बरे, थेट प्रवासी नसतील आणि मधल्या प्रवाशांसाठी ही नागपूर - पुणे सेवा सुरू असेल (उदाहरणार्थ कोंढाळी ते अमरावती, तळेगाव ते अकोला वगैरे) तर त्यांना या बससेवेशिवाय दिवसभरात इतर पर्याय उपलब्ध आहेत की नाहीत ? याचेही  विश्लेषण कधी होत नाही. म्हणजे या बस आधी अर्धा तास सुटणारी आर्वी - शेगाव बस तळेगाव ते अकोला प्रवाशांसाठी उत्त्तम पर्याय ठरू शकते. कोंढाळी ते अमरावती प्रवासासाठी दिवसभर दर अर्ध्या तासाने पर्याय उपलब्ध आहेत पण नागपूर - पुणे सेवेच्या या अनेक मधल्या थांब्यांमुळे वैतागून, थेट जाणारे प्रवासी आपली सेवा नाकारताहेत का ? याचा विचार एस. टी. प्रशासनाने केलेलाच नाही.


इ) वातानुकूल आरामदायक प्रवास - त्या काळी स्लीपर बसेसची आज एव्हढी चलती नव्हती. किंबहुना नागपूरवरून कुठल्याही मार्गावर स्लीपर बसेस नव्हत्याच. त्यामुळे प्रसन्न ची "विदर्भ क्वीन" सुद्धा २ बाय २ या आसनव्यवस्थेतली सीटर बसच होती. पण अत्यंत आरामदायक आसने, बसमधली एकूणच स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण त्याचबरोबर व्यवस्थित राखलेले वातानुकूलन यामुळे नागपूर ते पुणे हा  "विदर्भ क्वीन" चा प्रवास त्याकाळच्या अभिजन वर्गाच्या (Elite Class) प्रवासाचा मानबिंदू होता. "आम्ही काल विदर्भ क्वीन ने आलो हं" हे सांगण्यात प्रवाशांना आपण एका वेगळ्या वर्गात बसणारे आहोत अशी थोडीशी प्रौढीची भावना येत असे. यामागे प्रसन्न ट्रॅव्हल्स ने आपला हा ब्रॅंड तयार करण्यामागले आणि त्याला जपण्यामागचे विचार आणि श्रम होते हे नक्की. विदर्भ क्वीन या बसेस पुण्याच्या "ऑटो बॉडी" ने बांधलेल्या असत. त्यापूर्वी ही बस बांधणी कंपनी मुंबईच्या "बेस्ट" उपक्रमासाठी, पुणे महापालिका परिवहन, पिंपरी चिंचवड महापालिका परिवहन साठी शहर बसेस आणि पुण्यातल्या खाजगी उद्योगांच्या कर्मचारी वर्गाला ने आण करण्यासाठी ऑफ़िस बसेस बांधत असे. अजूनही "ऑटो बॉडी" प्रामुख्याने अशाच बसेस बांधतात. आराम बस फ़ारशा बांधत नाहीत. पण त्यांनी केलेली "विदर्भ क्वीन" ची बांधणी मजबूत आणि त्याचबरोबर आरामदायक होती हे नक्की.


ई) जेवणाच्या थांब्यांसाठी निवडलेली नेमकी वेळ व नेमके स्थान - नागपूरवरून दुपारी ३:३० ला निघालेली "विदर्भ क्वीन" अमरावती आणि अकोला इथल्या थांब्यावरून अधिकृत प्रवासी घेऊन बाळापूरनंतर खामगावपाशी असलेल्या राजपथ धाब्यावर रात्री ८:०० ते ८:३० या वेळात प्रवाशांच्या जेवणासाठी थांबत असे. परतीच्या प्रवासात सुरूरजवळच्या "स्माईल स्टोन" या ठिकाणी प्रसन्न ची "विदर्भ क्वीन" जेवण्यासाठी थांबायची. ही वेळ प्रवाशांना जेवण घेण्यासाठी अत्यंत आदर्श वेळ आहे आणि ही दोन्हीही ठिकाणे स्वच्छ, जलद आणि चांगले जेवण पुरविण्यासाठी प्रसिद्ध होती. 



आज मात्र प्रसन्न ने हा वसा टाकून दिल्याचे दिसते. इतर सगळ्या ट्रॅव्हल्स प्रमाणेच प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या बसेस सुद्धा अमरावती नंतर एका अत्यंत गचाळ, महाग आणि उर्मट सेवा असणा-या ढाब्यावर रात्री ११ च्या नंतर जेवणासाठी थांबतात. त्या थांबल्या की बसला लॉक करायचेय म्हणून सर्व प्रवाशांना त्यांची इच्छा असो किंवा नसो खाली उतरायला सांगितले जाते. अशा अवेळी न जेवणारे आणि रात्री लवकर झोपणारे आमच्यासारखे प्रवासी प्रवास करीत असले की त्यांची झोपमोड आणि खाली उतरावे लागल्यामुळे वैताग असे दोन्हीही एकत्र होतात. शिवाय जेवणासाठी थांबलेल्या या ठिकाणांमधले पाणी सुद्धा प्यावेसे वाटत नाही अशी तिथली अवस्था असते. महाग आणि गचाळ. सुरूवातीच्या काळातला "विदर्भ क्वीन" च्या जमान्यातला हा ॲडव्हान्टेज प्रसन्न ट्रॅव्हल्स सारख्या विचारवंत आणि लोकाभिमुख ऑपरेटर ने का गमावला ? असेल यावर माझे दर प्रवासात चिंतन चालते.


असो, त्यादिवशी त्या ॲनिमेशनमधली "विदर्भ क्वीन" दिसली आणि अगदी दिलाची राणी दिसल्यासारखी आम्हा बसफ़ॅन्सच्या  हृदयाची धडधड वाढली. तिच्या सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्यात आणि व्यक्त झाल्यात.


आपल्याकडेही या "विदर्भ क्वीन" राणीच्या आठवणी असतील तर नक्की कॉमेंटसमध्ये लिहा. पुन्हा तो सुवर्णकाळ आपण सगळेच जगू.


- एखादी सुंदर मुलगी बाजूने गेल्यानंतर कदाचित वळून न पाहणारा पण एखादी सुंदर, देखणी बस बाजूने गेल्यावर आवर्जून वळून तिच्या सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेणारा, बसवर (आणि रेल्वेवरही) एखाद्या प्रेयसीसारखे प्रेम करणारा बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


रविवार, १५ जून २०२५


शेगाव


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





Wednesday, August 10, 2022

भारतीय शयनयान बसेसबद्दल

१९९० च्या दशकात महाराष्ट्रात खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचा सुळसुळाट सुरू झाला आणि त्यानंतर साधारण दशकभराने ट्रॅव्हल्स कंपन्यांना १० - १० , १५ - १५ तास प्रवास करणा-या प्रवाशांसाठी शयनयान बसेस आणण्याचे सुचले. त्यापूर्वी नागपूर ते पुणे  किंवा नागपूर ते कोल्हापूर (तळटीप १) हे १७ तास (तळटीप २) , २३ तासांचे प्रवास आसनांवर बसूनच होत होते. कितीही आरामदायक आसने असलीत तरी झोपेसाठी जे शरीराचे एकंदर पोश्चर लागते ते त्यातून मिळत नव्हतेच. मधल्या काळात साध्या आसनांऐवजी पायालाही आधार देणारे आणि सीटसचे रिक्लाइन जास्त होणारे सेमी - स्लीपर कोचेस सुद्धा काही ट्रॅव्हल्स वाल्यांनी आणलेले होते पण स्लीपर तो स्लीपर. सेमी स्लीपरला त्याची सर थोडीच येणार ?

२००० च्या आसपास स्लीपर बसेस दिसू लागल्यात. पहिल्या पहिल्यांदा या बसेस २ बाय २ अशा शयन व्यवस्थेच्या होत्या. एका बे मध्ये खाली ४ शायिका (बर्थस) (उजवीकडे दोन आणि डावीकडे दोन) तर वर ४ शायिका (बर्थस) (तसेच उजवीकडे दोन आणि डावीकडे दोन) असे ८ बर्थस असायचेत. एकूण ५ बे मध्ये ४० प्रवाशांची दाटी असे. त्या बसेसमध्ये प्रवाशांना ये जा करण्यासाठीची मार्गिका अरूंद असे. शायिकांवर झोपलेल्या आणि ये जा करणा-या प्रवाशांनाही प्रवाशांना गैरसोय होत असे. शिवाय प्रत्येकच शायिका ही दोन व्यक्तींची असल्याने एकट्यादुकट्या प्रवास करणा-या व्यक्तीसाठी तितकीशी सोयीची नव्हती. शिवाय प्रत्येक शायिका अरूंद असल्याने आजकालच्या वाढलेल्या सुखवस्तू घरातील ब-याच आकारमानांना त्यावर नीट झोपताही येत नसे. 

मग साधारण २००८ -०९ च्या सुमासास सध्याचा २ बाय १ शायिकांचा पॅटर्न आला आणि लोकप्रिय झाला. पण त्या ही काळात कोल्हापूरचे घाडगे पाटील यांची मोहन ट्रॅव्हल्स, हैद्राबादची केसीनेनी ट्रॅव्हल्स आणि खुद्द आंध्र प्रद्रेश मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूल शयनयान बस यांनी १ बाय १ शायिकांचा पॅटर्न राबविला होता. आणि तो लोकप्रियही होता. त्यातही केसीनेनी आणि आंध्र प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची शयन व्यवस्था थोडी वेगळी होती. त्यांच्या शायिका प्रवासाच्या दिशेच्या perpendicular होत्या तर घाडगे पाटील यांच्या स्नूझर बसच्या शायिका महाराष्ट्रातल्या इतर गाड्यांप्रमाणे प्रवासाच्या दिशेला parallel होत्या.

 Kesineni Bus cross section. 4 berths - 6 bay Berths perpendicular to travel direction.



Kesineni's Travels berths. Perpendicular to travel direction. Perpendicular to windows.



Other travels seating plan. Berths parallel to travel direction.




Other Travels berths. Parallel to travel direction. Parallel to windows.

मला कायम आश्चर्य वाटत आलेले आहे की यावर अधिक संशोधन का झाले नाही ? प्रवास केलेल्या प्रवाशांच्या मुलाखती घेऊन, डिझाईन क्ष्रेत्रातल्या दिग्गजांचा सल्ला घेऊन, ergonomy चा विचार करून यावर अधिक संशोधन होऊन त्यानुसार बसगाड्या बांधणा-या कंपन्यांना आणि प्रवाशांनाही हे संशोधन उपलब्ध व्हायला हवे होते. सध्याच्या प्रवासाच्या दिशेच्या parallel शायिकांच्या रचनेत, बसने वेग घेताना किंवा ब्रेक दाबल्यानंतर आपले संपूर्ण शरीर वर खाली होते असा माझ्यासकट सगळ्यांचाच अनुभव आहे आणि प्रवासाच्या दिशेच्या perpendicular शायिका रचनेत बस वेग घेताना किंवा ब्रेक दाबल्यानंतर शरीराची कड उजवी डावी कडे होत असावी. (मी कधी या प्रकारच्या शयनयान बसेसमधून अजूनतरी प्रवास केलेला नाही. केसीनेनीच्या बसने नागपूर ते हैद्राबाद हा प्रवास करण्याचे आम्ही योजिले होते पण तोवर ती बससेवाच त्या कंपनीने बंद केली.) या दोघांमध्ये मानव शरीरासाठी, सुखद झोपेसाठी नक्की काय चांगले ? यावरही वैद्यकीय संशोधन व्हायला हवे.

 

तळटीप १ : नागपूर ते कोल्हापूर जाणा-या सगळ्या गाड्या आज वर्धा - यवतमाळ - नांदेड - लातूर - सोलापूर -सांगली मार्गे ९३० किमी अंतर पार करून जात असल्यात तरी १९९० च्या दशकात नागपूरच्या रॉयल - राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सने या मार्गावर नागपूर - अमरावती - अकोला - चिखली - जालना - औरंगाबाद - पुणे - सातारा - कराड - कोल्हापूर अशी जाणारी आणि एकूण ९९० किमी धावणारी साधी आसनी लक्झरी बस आणलेली होती. त्या काळी नांदेड ते लातूर हा रस्ता अतिशय खराब असण्याची शक्यता आहे आणि या मार्गावर पुरेसे प्रवासी मिळण्याचीही शक्यता पुणे मार्गापेक्षा कमी होती. नागपूर ते कोल्हापूर थेट प्रवासी नसतील तरीही नागपूर - ते पुणे, अमरावती ते पुणे, अकोला ते पुणे असे प्रवासी भरपूर होते आणि पुने ते कोल्हापूर या मार्गावर प्रवाशांचा कधीच तुटवडा पडत नाही हे व्यावसायिक गणित लक्षात घेऊन ही गाडी पुणे मार्गे धाडत असण्याची शक्यता आहे.

 

तळटीप २ : त्याकाळी प्रवासाचा वेळ साधारण असा होता.

 

अ) नागपूर ते अकोला - २५० किमी - ५ तास ते ५ तास ३० मिनीटे. (प्रसन्न ट्रॅव्हल्सची विदर्भ क्वीन नावाची बस हा प्रवास विनाथांबा ४ तास ३० मिनीटात करीत असे. प्रसन्न ट्रॅव्हल्स आणि नागपूर - पुणे प्रवासाचा सांगोपांग इतिहास हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. आता इथे विस्तार नको.)

 

आ) अकोला ते औरंगाबाद - २५० किमी - ६ तास ते ६ तास ३० मिनीटे (मध्ये चिखलीचा जेवणाचा आणि ड्रायव्हर बदलीचा थांबा धरून)

 

इ) औरंगाबाद ते पुणे - २४० किमी - ४ तास ३० मिनीटे ते ५ तास (पुण्यात बस किती वाजता पोहोचतेय यावर हा वेळ कमी जास्त व्हायचा. सकाळी ७ च्या आसपास पोहोचत असेल तर वेळ कमी पण सकाळी ९ नंतर हा वेळ पुण्यातल्या वाहतुकीमुळे जास्त लागायचा.)

 

तर नागपूर ते पुणे प्रवासाला सर्वसाधारण १६ तास ३० मिनीटे ते १७ तास वेळ लागायचा. तर पुणे ते कोल्हापूर प्रवासासाठी ४ तास ३० मिनीटे ते ५ तास लागायचेत.

 

- सर्व खाजगी आणि सरकारी गाड्यांमधून प्रवासाचा दांडगा अनुभव असलेला प्रवासी पक्षी राम प्रकाश किन्हीकर.

 

 

Tuesday, December 27, 2016

प्रसन्न पर्पल : पहिल्याच घासाला खडा

यापूर्वी दोन तीन वेळा "प्रसन्न" प्रवासाचा योग हुकला होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये सांगोला - नागपूर प्रवासासाठी कोल्हापूर - नागपूर मार्गावर धावणा-या प्रसन्न पर्पल प्लसने जाण्याचे ठरविले आणि तिकीटही काढले पण ऐनवेळी प्रसन्नने ही सेवाच रद्द केली. (अर्थात आमची सोय दुस-या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये केली पण पर्पल हुकलीच. त्यापूर्वी इतर बसेसच्या तुलनेत प्रसन्नचे भाडे जास्त म्हणून दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार बरीच वर्षे केला.) म्हणूनच शिरपूरवरून इंदूरमार्गे नागपूरला जाताना प्रसन्न पर्पलची इंदूर - नागपूर "पर्पल ग्रॅण्ड" सेवा सुरू झाल्याचे वाचून मी कसलाही विचार न करता थोडे जास्त भाडे भरूनही याच बसचे बुकिंग केले. प्रसन्न सोबतचे "अटल इंदोर सिटी बस सेवेचे" जोडवाक्य मनात शंका निर्माण करीत होतेच. ही नक्की प्रसन्न पर्पलच आहे ? की अटल इंदोर सिटी बस सेवेची एखादी बस ? हा प्रश्न मनात घोळत असतानाच फ़ार विचार न करता तिकीट बुक केले आणि सुप्तपणे प्रार्थना करीत बसलो. प्रवासाच्या दिवशी सकाळी गाडी नंबरचा एसेमेस आल्यानंतर मध्यप्रदेशची गाडी म्हटल्यावर प्रार्थना आणखी वाढवली कारण आजवर मध्यप्रदेश पासिंगची प्रसन्नची बस मी तरी बघितली नव्हती. 

ठरलेल्या वेळेच्या १५ मिनीटे आधीच विजयनगर थांब्यावर पोहोचलो. आमच्या कन्यारत्नाला पर्पल ग्रॅण्ड मधल्या सोयी सुविधा (वैयक्तिक मनोरंजन सुविधा वगैरे) सांगितल्यावर ती कमालीची उत्साहात होती. तिच्या उत्साहाकडे पाहिल्यावरच आपले पैसे वसूल झाल्याचा मला फ़ील येत होता. ठरलेल्या वेळी बस थांब्यावर हजर झाली. मार्च २०१६ मधे वीरा कोच बंगलोर ने बांधलेली अशोक लेलॅण्ड बस होती.








दिनांक : ०४/१२/२०१६ आणि ०५/१२/२०१६
प्रवास: इंदूर ते नागपूर
बस क्र. : एम. पी. १३ / पी १४१०. 
आसने क्र. : ७,८ आणि ९ (पुढून दुस-या रांगेतली खालची तिन्ही आसने.)



बस ऑपरेटर : इथे खरी गोची झाली. प्रसन्न पर्पल ग्रॅण्ड जरी जाहिरातीत होते तरी खरी बस ही अटल इंदोर सिटी परिवहन सेवेची होती. बाजूला आणि मागे फ़क्त प्रसन्न पर्पल ग्रॅण्डचे स्टीकर्स चिटकवलेले होते. त्यामुळे ख-या प्रसन्न सारखी सेवा मिळणार नाही हे तर अटल होते.








बस बॉडी बांधणी : वीरा कोच, बंगलोर. व्ही - ६ मॉडेल. मार्च २०१६ ची बांधणी.

प्रवासाचा वेळ : ८ तास ३० मिनीटे. (०४/१२/२०१६ रात्री २१.०० वाजता ते ०५/१२/२०१६ पहाटे ०५.३० वाजता. जरी विजयनगर थांब्यावरून गाडी १९.३० ला निघाली तरी जवळपास पाव इंदूर शहराला वळसा घालत, अटल इंदूर शहर परिवहन सेवेच्या मुख्यालयात १५ ते २० मिनीटे घालवत इंदूरमधून बाहेर निघायला २१.०० झालेच. मी २००५ पासून इंदूर शहरात भटकतोय पण एव्हढे इंदूर मी या वेळीच बघितले.)

अंतर : ४७५ किमी. (अंदाजे) मार्गे हर्दा, बैतूल, मुलताई, सावनेर. (या संपूर्ण नवीनच मार्गाने यावेळी प्रवास केला. )

गाडी बाहेरून आणि आतून स्वच्छ होती.  आसने आणि त्यावरील चादरी स्वच्छ होत्या. पण प्रसन्न ची सेवा नव्हती. गाडी सुरू झाल्यानंतर आजकाल सर्वांना जो प्रश्न भेडसावतो तो आम्हाला भेडसावू लागला. मोबाइल फोन्सचे चार्जिंग. दिवसभराच्या इंदूरच्या वापराने आमचे फोन्स मान टाकण्याच्या बेतात होते. त्यांना तातडीने चार्जिंगची नवसंजीवनी हवी होती. पण चार्जिंग पॉइंटस बंद. मग ड्रायव्हरकडे सांगितल्यावर तो म्हणाला की ते पॉइंटस इंदूर शहराबाहेर बस गेली की तो सुरू करणार आहे. याचे लॉजिकच कळेना. शेवटी आमच्या विनंतीला मान देवून त्यांनी ते सुरू केले.

जी गत चार्जिंग पॉइंटसची तीच प्रत्येक प्रवाशासमोरील टी. व्ही.ची. अरे, जेव्हा तुम्ही प्रत्येकाला वेगळा टीव्ही आणि त्यात आधीपासूनच असलेले चित्रपट , गाणी वगैरे करमणूक त्याच्या त्याच्या आवडत्या वेळात बघण्याची मुभा दिलीय ना ? मग टीव्ही सुरू करण्यासाठी बस इंदूरबाहेर पडण्याचा अट्टाहास कशाला ? या सर्व घोळात ही करमणूक रात्री साडेनऊला सुरू झाली आणि बहुतेकांनी झोपण्यासाठी अर्ध्या एक तासात बंद करून टाकली.

बर ह्या करमणुकीचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्याकडे तुमचे इयरफ़ोन्स असणे आवश्यक आहेत. आम्हा तिघांत मिळून एकच इयरफ़ोन होता मग काय त्या बसच्या कंडक्टरकडून चिनी बनावटीचे दोन इयरफ़ोन्स प्रत्येकी २० रूपयांना आम्हाला विकत घ्यावे लागलेत. ही एक नवीनच अडवणूक.

बसमधल्या चादरी तर पांढ-या शुभ्र होत्या पण होत्या टेरेली्न सदृश कृत्रीम पदार्थाच्या. आजवर एव्हढ्या स्लीपर कोचेसने प्रवास झालेत पण असल्या सुळसुळीत कापडाच्या बेडशीटस, वाइटातल्या वाइट प्रवासात नव्हत्या. यावेळी रात्री झोपेत त्यांचा फ़ार त्रास झाला. सुळसुळीत चादर थोडी जरी सरकली तरी खालच्या बेडच्या थंड झालेल्या रेक्ज़ीनचा स्पर्श अंगाला व्हायचा आणि झोप चाळवली जायची. रात्री २, ३ वेळा उठून आंथरूण नीट करावे लागले. प्रसन्न कडून असल्या हलक्या दर्जाची अपेक्षा नव्हती.

चापडा गावात एका ब-यापैकी ढाब्यावर गाडी थांबवली होती. अर्थात माळवा प्रांतात खाण्यापिण्याची तशी रेलचेलच असते म्हणा पण ढाबा तसा स्वच्छ होता आणि खाण्यापिण्याचे पदार्थही मुबलक आणि परवडणा-या दरात होते. (बाबा ट्रॅव्हल्सच्या नागपूर ते धुळे प्रवासात बडने-यानंतर एका अत्यंत गचाळ ढाब्यावर दालफ़्रायसाठी १२० रूपये आणि रोटीसाठी ४० रूपये मी मोजले आहेत.)

रात्री ३, ३.३० च्या सुमाराला आम्हाला अचानक गुदमरल्यासारखे वाटू लागले. उठून बघितले तर ए.सी. बंद केलेला होता. काचा संपूर्ण बंद असलेली बस असताना ए.सी. बंद करण्याचा नतद्रष्टपणा करण्याचे कारण काय ? ड्रायव्हरकडे पुन्हा जावे लागले आणि ए.सी. सुरू करून घ्यावा लागला.

दुस-या कुठल्या ट्रॅव्हल्समध्ये हा अनुभव आला असता तर वाइट वाटले नसते पण प्रसन्न कडून अशा दर्जाची सेवा अनपेक्षित होती. कदाचित "प्रसन्न" नावाने "अटल इंदोर" वालेच ही सेवा चालवत असल्याचे हे परिणाम असतील. मग प्रसन्न ने आपले नाव त्यांना वापरू देण्याआधी आपला दर्जा सांभाळण्याची अट घालायला हवी होती असे राहून राहून वाटते.

थोडक्यात काय ? दीडपट भाडे देवून जाण्याइतकी चांगली बस आणि चांगली सेवा नव्हती. "प्रसन्न" नावाची नुसतीच क्रेझ आहे की काय ? हे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रवास. सर्वसाधारणतः असे नसेल तर मला सगळ्यात जास्त आनंद होइल.














Ratings and reviews


Legend:  5- Excellent          4-very good           3-average              2-below average
1- poor

1.   Seat or berth comfort: 
(The seats were average with sleepery rexin type material. Bed sheets are of terelyne type material and were not at all comfortable to feel.)
2.  Air conditioning: 
(Switched off the air conditioning en route and had to request the driver to swich it ON again. Not acceptable in a coach with the fixed glass windows.)
3.    Suspension:   
(Excellent. Though this bus was new still the suspensions were good by any standards.)
4.    Cleanliness: 

(Excellent. The coach was sparkling clean from outside as well as inside.)





5.     Staff behavior with passengers4

6.     Driving: 5
     (Excellent driving. Avoided overspeeding and unnecessary braking.)
  
7.    Punctuality in timings: 5
(Started right time and reached right time at Nagpur.)

8. Essential amenities inside bus: 3
(Charger points were in non working condition. Now a days, looking at the smart phone users and their usage throughout the day, charging point is an essential commodity. Good quality blankets were  provided. Personal entertainment system switched on late in the night when hardly a few passengers could have enjoyed it.)


9. Inside ambiance of the coach4

10.   Selection of Places to stop for dinner / morning tea etc4

 (Reasonably good place for dinner halt, though it was a bit late for it. )

Overall ratings: 41 /50 (82 %)

Commenets: Good experience. Big disappointment since "Prasanna" was expected to fare better. Good is not good when better is expected.
 

Monday, May 21, 2012

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३

पूर्वपिठीका :

१९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अखेरीला दिवाळी आली. सुट्ट्या अगदी ४-५ दिवसांच्याच मिळाल्यात आणि त्यासुद्धा अगदी आठवडाभर आधीच जाहीर झाल्यात. मुंबई ते नागपूर रेल्वे आरक्षण मिळणे शक्यच नव्हते. (तेव्हा ती "तत्काळ" योजना सुद्धा नव्हती.) 


अगदी महिना दीड महिन्यापूर्वीच मुंबई-पुणे नागपूर असा बसचा प्रवास केलेला असल्यामुळे आपण पुणे मार्गे सहज नागपूरला जाउ शकू असा एक अनाठायी आत्मविश्वास आला. माझ्यासोबतच मुंबईला नागपूरचाच संजय भोयर पण रुजू झाला होता. आम्ही एकत्रच रहायचो. तो आणि मी, दोघांनीही ,हा प्रवास करण्याचे ठरले.


आमचे प्रवासाच्या व्यवस्थापनाचे गृहीतक असे की ठाण्यावरून दुपारी एक दीड वाजता निघावे. पुण्याला सहज आपण पाच पर्यंत (गेला बाजार संध्याकाळी सहा साडेसहा पर्यंत) पोहोचतोय. तेव्हाचा मुंबई - पुणे प्रवास काय सांगता महाराजा ! राष्ट्रीय महामार्ग ४ वरून बोरघाटातून पुण्याला जाताना वाहनांची ती कसरत आणि खोपोली बस स्थानकानंतरची ती वाहतूक कोंडी ! हरहर. 

मग पुण्यावरून आपल्याला एखादी तरी खाजगी ट्रॆव्हल कंपनीची आरामबस मिळेल. फ़ारफ़ारतर मागली आसने मिळतील पण आपण दुस-या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत नागपूरला असू हे नक्की. रेल्वेत जागा नसताना उभे राहून धक्के खातखात (किंवा दुस-या कुणाच्या आसनावर बसल्यावर शिव्या खात) नागपूरपर्यंत जाण्यापेक्षा आपल्या हक्काच्या जागेवर आरामशीर बसून जाऊ. फ़ारफ़ारतर मागे बसल्या मुळे थोडा हवाई प्रवासाचा आनंद मिळेल पण आम्ही दोघेही तरूण गब्रू जवान होतो.


बेत तर मोठा नामी आखला होता पण आमची अजून मुंबई-नागपूर प्रवासाची पुरती तोंडओळख व्हायची होती हे आम्हाला प्रवासानंतर कळले.

आम्ही ठाण्याला वंदना थियेटर स्थानकावर जावून ठाणे-पुणे निमाआराम एशियाड गाडीची दोन तिकीटे पण आरक्षीत केलीत आणि निर्धास्त झालोत.

ठरलेला दिवस उजाडला. मी खूप खुशीत. नागपूरला आपल्या सर्व नातेवाइक, मित्रमंडळींमध्ये दिवाळीला जायला मिळणार म्हणून. दुपारी सव्वा वाजताची बस होती. आम्ही सकाळी अकरा साडे अकरालाच घर सोडले. ऐरोली, सेक्टर ३ मधल्या साई-प्रकाश मधे जेवलो. साधारणत: दुपारी साडेबारा पाउण वाजता आम्ही वंदना (ठाणे) बस स्थानकावर आलोत. 

सुरूवातीचा अर्धा तास हा नेहमीच्या गप्पांमध्ये पसार जाला पण जवळपास सव्वा वाजत आले तरी आमच्या बसचा ठाणे स्थानकावर पत्ता नव्हता. मग पावलं "चौकशी" कडे वळलीत. तिथे कळले की ही बस पुण्यावरून येते आणि लगेच परत फ़िरते. पुण्यावरून येणारी बस नक्की कधी येइल हे सांगता येणं कुणालाही अवघडच होतं.

हळूहळू गर्दी वाढतच होती. दरम्यान पुण्याकडे जाणा-या दोनतीन बसेस आल्या आणि निघून गेल्यासुद्धा. (ठाणे-करमाळा, बोरीवली-कोल्हापूर वगैरे) थोडक्यात आमच्या लक्षात आलं की बहुतेक सर्व मंडळींनी याच एशियाडच आगाऊ आरक्षण केलेलं आहे. गाडी अगदी फ़ुल्ल होती. 

सुरूवातीच्या उत्सुकतेची जागा आता थोड्या काळजीने घेतली. आपण पुण्याला, नागपूरला जाणारी शेवटची बस निघून जाण्यापूर्वी, नक्की पोहोचू नां ? हा नकोसा प्रश्न मनात नकळत रुंजी घालायला लागला. आमच्या सारख्या इतरही प्रवाशी मंडळींच्या त्यांच्या त्यांच्या चिंता असाव्यात. हळूहळू सार्वत्रिक अस्वस्थता वाढायला लागली. कुण्याच्या ना कुणाच्या स्थानक प्रमुखांकडे चकरा वाढायला लागल्या.

एस.टी. ची अधिकारी मंडळीही वैतागली. त्यांच्या हातात काहीच नव्हते. येणा-या बस ऐवजी दुसरी बस सोडण्यासाठी आगारात बसही नव्हती.

शेवटी वाट पाहून थकलेल्या मंडळींना दूरून एशियाड चे पांढरे-हिरवे धूड येताना दिसले. पु. लं. च्याच भाषेत सांगायचे तर "कोलंबसाच्या जहाजावर जमिनीवरचे पक्षी दिसल्यावर खलाशांना जो आनंद झाला" तसा आनंद सर्वांना झाला.

गाडी आली. प्रवाशी भराभर आत चढलेत आणि आता अपेक्षा अशी की गाडी त्वरीत सुटावी. आधीच जवळपास तासभर उशीर झाला होता. पण  चालक महाशय निवांत होते. समोरच्याच एका पान टपरीवर ते निवांतपणे मावा (नागपुरी भाषेत खर्रा) घोटत होते. सर्व प्रवाशी स्थानापन्न झालेत. वाहक साहेब आत आलेत. (जवळपास पूर्णच प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलेले असल्यामुळे त्यांना नवीन तिकीटे देण्याचे कामच नव्हते. फ़क्त आरक्षणे तपासायची होती. ते काम त्यांनी सुरूही केले.) पण चालक महाशय निवांत होते. 

साधारणतः अडीचच्या सुमाराला चालकाच्या केबीनचे दार उघडण्याचा आवाज आला आणि हे महाशय आत बसलेत. प्रवाशी एव्हाना वैतागले होते. त्यातच कुणीतरी चालकाला उद्देशून काही तरी म्हणाले. झाले. त्या डायवर साहेबांनी आपली जागा सोडली, प्रवाशांच्या भागात ते आले आणि प्रवाशांना उद्देशून ते म्हणाले की आज ते रजा टाकणार आहेत. आणि उतरून गेलेत.

झालं. पुन्हा गोंधळ. मग वाहक आणि इतर काही उतारू मंडळी त्यांच्या मागे धावलीत आणि इतर काही प्रवाशी स्थानक प्रमुखांकडे धावलीत. तक्रारी करिता आणि पर्यायी व्यवस्थेकरिता. कशीबशी त्या साहेबांची पब्लिकने समजूत घातली आणि बसच्या एंजिनाचा आवाज दुपारी पावणे तीन वाजता सुरू झाला. (एकदाचा)

दि. २१/१०/१९९५
ठाणे (वंदना) ते पुणे : आसन क्र. १६, १७ (संजय भोयर)
ठाण्यावरून प्रयाण: दुपारी १४.४५ वाजता.
मार्गावरील थांबे: ठाणे रेल्वे स्टेशन, पनवेल, खोपोली (एम. टी. डी. सी. उपहार गृह), चिंचवड बस स्थानक.
बस: ठाणे निम आराम पुणे.
बस क्र.: MH-12 / Q 8073, म.का.दा. न. ले. १९९३-९४.
आगार: ठा. ठाणे-१ आगार.
चेसिस क्र.: २६५७०
मॊडेल : ASHOK LEYLAND, CHEETAH
आसन व्यवस्था: ३ x २.
पुणे आगमन: रात्री २०.१५ वाजता
एकूण अंतर: १६५ किमी.
सरासरी वेग: ३० किमी प्रतीतास.

पुन्हा एकदा बोरघाटाची मजा लुटत प्रवास केला. तसा थोडासा टेन्शनमध्येच होतो पण पुन्हा मजा आली.

पुण्यात शिवाजीनगर ला उतरलो. तिथूनच नागपूरकडे जाणा-या खाजगी ट्रॆव्हल्स सुटायच्यात. या ऒफ़िसातून त्या ऒफ़िसात. या ट्रॆव्हल कडून त्या ट्रॆव्हलकडे आम्ही फ़िरलो. बहुतेक सगळ्या नागपूरकडे जाणा-या गाड्या निघून गेलेल्या होत्या. एक दोन होत्या पण त्यांच्यात फ़क्त ड्रायव्हर केबीन मध्येच बसायला जागा होती आणि तिकीटेपण भन्नाट होती (४५० रू. मागत होते. तेव्हा नागपूर-पुणे खाजगी गाड्यांचे प्रवासभाडे रू. २०० - २५० होते. "प्रसन्न" ची फ़क्त १८ आसनांची असलेली आरामशीर अशी गोल्ड लाइन बस ५०० रू. घ्यायची.) (त्या बस मध्ये आपण बसायचच हे माझं स्वप्न होतं. पण तसे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत प्रसन्नने ती गाडीच बंद केली.)



मी जपून ठेवलेली प्रसन्न गोल्ड लाईन ची जाहिरात. हे स्वप्न पूर्ण झालंच नाही.

मग आम्ही आमचा मोर्चा शिवाजीनगरच्या एस.टी. स्थानकाकडे वळवला. तिथेही तुफ़ान गर्दी. पण आशेची गोष्ट एव्हढीच होती की दर पंधरा मिनिटांनी पुणे-अकोला अशी विशेष बसफ़ेरी सोडण्यात येत होती. कुठल्याही डेपोची (अगदी सोलापूर, सातारा, कोल्हापूर विभागातली सुद्धा) बस आली की लगेच ती अकोल्याकडे जादा बस म्हणून रवाना करायचे.

अशीच एक बस फ़लाटावर येताना दिसली आणि गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकावेत तसे त्या बसला चिटकणा-या इतर प्रवाशांमध्ये आम्ही सामील झालो.

दि. २१/१०/१९९५ व २२/१०/१९९५

पुणे ते औरंगाबाद : आसने मिळाली नाहीत.
पुण्यावरून प्रयाण: २१/१० रोजी रात्री २०.४५ वाजता.
मार्गावरील थांबे: सुपे ढाबा, अहमदनगर, नेवासे फ़ाटा.
बस: पुणे जादा अकोला.
बस क्र.:  MH-12 / Q 8950, म.का.दा. न. टा. १९९४-९५.
आगार : सो. पंढरपूर आगार.
चेसिस क्र.: GVQ ७१६७३५.
मॊडेल: TATA 1510 Air Brakes
आसन व्यवस्था: ३ x २
औरंगाबाद आगमन: २२/१० रोजी पहाटे ०३.१५ वाजता.
एकूण अंतर: २६० किमी.
सरासरी वेग: ४० किमी. प्रतीतास.




(Special Thanks to Vishal Joshi, Ratnagiri for this wonderful sketch.)


बसमध्ये आम्ही घुसलोत खरे पण थोड्याच वेळात आमचा भ्रमनिरास झाला. सगळी बस आरक्षित होती. जादा बस असूनही पूर्णपणे आरक्षण होते. आम्हाला बसायला तर सोडाच पण आमच्या बॆगा ठेवायलाही जागा नव्हती. प्रत्येकच जण दिवाळीला आपापल्या गावाला, विदर्भात चालला होता. मधल्या मार्गिकेमध्येही सगळ्यांचे सामान. आम्हाला कसेबसे पाउल ठेवण्यापुरती जागा उरलेली. मग त्या बसने अकोल्यापर्यंत जाण्याचा विचार सोडावा लागला. आता निघालोच आहोत तर औरंगाबाद पर्यंत तरी जाउ. रात्री तिथे अण्णाकाकांकडे थांबून उद्या अण्णाकाकांकडून नागपूरला जाण्याची व्यवस्था करू असे ठरले.


पहाटे पहाटे औरंगाबादला उतरलो. रात्रभर उभ्याने प्रवास झाला होता. सुप्याच्या ढाब्यानंतर आम्ही आमच्या हातातले सामान ड्रायव्हर केबीनमध्ये ठेवायची परवानगी ड्रायव्हर साहेबांना मागितली होती त्यामुळे नीट उभे तरी राहता आले होते. पण प्रचंड थकलेलो होतो. तसेच अण्णाकाकडे गेलोत आणि थोडे आडवे झालोत.

दि. २२/१०/२०१२

तास दोन तासांच्याच झोपेनंतर आम्ही उठलो. घरी चर्चा करताना लक्षात आलं की औरंगाबाद ते नागपूर जाणा-या खाजगी ट्रेव्हल्सच्या बसेस पण सगळ्या फ़ुल्ल आहेत. एस. टी. नेच जावे लागणार. सकाळी ९.३० ची औरंगाबाद-साकोली गाडी तेव्हा नुकतीच सुरू झालेली होती. त्या गाडीत जर जागा मिळाली असती तर आम्ही रात्री १०, १०.३० पर्यंत सहज नागपूरला पोहोचू शकत होतो. आरक्षण मिळाले तर पहावे आणि न जाणो, दिवाळीच्या वेळेला आरक्षणासाठी इथेही गर्दी असली तर ? म्हणून आम्ही साधारणतः सकाळी सहा साडेसहाच्याच सुमाराला औरंगाबाद बस स्थानकावर गेलो.

सकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत. स्थानक नुकतेच झोपेतून जागे झाल्यासारखे आळोखेपिळोखे देत होते. रात्री उशीरा आलेल्या गाड्या मस्त झोपल्या होत्या तर पहाटपक्षी गाड्यांची लगबग सुरू झालेली होती. आत प्रवेश केल्यावर बाजुलाच काल रात्री आलेली साकोली-औरंगाबाद निवांत झोपून होती. आता सकाळी हीच गाडी आम्हाला नागपूरला नेणार या भावनेने बरे वाटले आणि आरक्षणासाठी रांग लावायला आम्ही तिकडे निघालोत.

तिथे शुकशुकाट होता. पण आरक्षण काउंटर सुरू झालेली होती. आश्चर्याचा मोठा धक्का आम्हाला बसला. दिवाळी म्हणून की काय सगळी काउंटर्स सकाळी सहा वाजताच सुरू झालेली होती. आणि आम्ही दोघे सोडून त्या केंद्रावर आत्तातरी कुणीही नव्हते.

आम्ही आत गेलो आणि तिथल्या कर्मचा-याला औरंगाबाद-नागपूर आरक्षण मागितले. त्याने चार्ट पाहिला आणि सांगितले की संध्याकाळी साडेसहाची गाडी फ़ुल्ल आहे. आम्ही म्हटले की आम्हाला ती संध्याकाळची गाडी नकोच आहे. आत्ता साडेनवाला सुटणा-या साकोली बसचे आरक्षण द्या. त्याने सरळ नकार दिला. म्हणाला अशी गाडीच नाहीय. मी म्हटलं की अहो, गाडी सुरू होउन सहा आठ महिने झालेले आहेत आणि आत्ता ती गाडी तुमच्या मागल्या बाजुला उभी आहे.

काय कोण जाणे ? तो एकदमच भडकला. आणि कारण नसताना तो भडकल्याचे पाहून आम्ही दोघेही भडकलो. आमची वादावादी "तू बाहेर ये, तुला दाखवतो" इथपर्यंत येऊन पोहोचली. (तसा संजय पहिल्यापासून बॊडी बिल्डर आणि आम्हा दोघांमध्येही तारुण्याचा जोश. त्यातच कुणीतरी चुकीच्या कारणांसाठी अकारण भडकतोय म्हटल्यावर अन्यायाविरुद्धची चीडही उफ़ाळून आली होती.)

आमचे चढलेले आवाज ऐकून एक वरिष्ठ अधिकारी तेथे आलेत. त्यांनी पहिल्यांदा त्या कर्मचा-याला तिथून जायला सांगितले. आम्हाला तो विषय सोडून द्यायला सांगितले आणि स्वतः त्या काउंटरवर बसून आम्हाला विचारले की नक्की आमचे काम काय ? आम्ही आमचा साकोली गाडीचा विषय मांडल्यावर त्यांनी सांगितले की गाडी असेलही, पण त्याचे आरक्षण करण्याची मुभा औरंगाबाद केंद्राला नाही. 

मग आम्ही विचारात पडलो. सकाळी आत्ता पटकन घरी जाउन ही गाडी पकडायला यावे तर समजा ऐनवेळी ही गाडीही कालच्या गाड्यांसारखीच भरून गेली तर उभ्याने एव्हढा लांबचा प्रवास करण्याची आमची ताकद नव्हती. शिवाय रात्रभरच्या जागरणामुळे झोपेची खूप आवश्यकता वाटत होती.

आम्ही असे विचारात पडल्याचे पाहून ते म्हणाले अहो असला विचार कसला करताय ? नवीन गाडी सोडूयात आज नागपूरला आणि त्यांनी लगेचच त्या आरक्षण रजिस्टरवर नव्या गाडीची वेळ संध्याकाळी सात अशी लिहून आमची नावे आसन क्र. १ आणि २ वर टाकलीही. (ही आसने महाराष्ट्र एस.टी. त आमदार खासदारांसाठी राखीव असतात.) आता हा सगळा एव्हढा घोळ झाल्यानंतर ही गाडी खरंच जाणार की ही आमची वचपा काढण्यासाठी केलेली फ़सगत आहे ? हा मोठ्ठा प्रश्न आम्हाला पडलेला होता. हा प्रश्न त्यांनी मनकवड्यासारखा वाचला असावा. ते म्हणाले "घाबरू नका. तुमच्या दोघांसाठीच ही गाडी सोडत नाहीये. इतकी गर्दी आहे की आत्ता बाहेर घोषणा करायचीच खोटी की गाडी दुपारपर्यंत फ़ुल्ल होतेय बघा." आणि खरोखरच आम्ही आरक्षण करून बाहेर येइस्तोवर बाहेर जादा गाडी बाबतच्या घोषणेचा बोर्डही टांगला गेला होता.

मग काय ? आम्ही अण्णाकाकांकडे परतून रात्रीच्या झोपेची थकबाकी गोळा करायला सुरूवात केली. औरंगाबादमध्ये तसाही आमचा दिवस आरामशीरच असतो. आज मस्त झोप आणि थोडी भटकंती करून आम्ही थोड्या साशंक मनानेच सायंकाळी बस स्थानकावर गेलोत.

संध्याकाळी साडेसहाची बस साडेसहाला फ़लाटावर लागली आणि पावणेसात पर्यंत सुटलीही. बस गच्च भरून गेली पण आमचा जीव भांड्यात टाकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे आमच्या गाडीला भरपूर प्रवासी मिळालेले होते आणि आम्ही सगळेच बस फ़लाटावर लागण्याची वाट बघत होतो.

सातचे साडेसात वाजले तरी बसचा पत्ताच नाही मग आमच्यापैकी काही उत्साही आणि उतावीळ मंडळींनी औरंगाबाद स्थानकाला लागूनच असलेल्या औरंगाबाद आगाराच्या दारापाशी धाव घेतली आणि आमच्या विशेष गाडीसाठी कुठली बस पाठवणार याचे अंदाज आणि बेताबेताने खाकी कपडेवाल्या मंडळींना विचारणा सुरू केली. आणि मग कळले की गाडी पाठवायला आगारात आत्ता वेगळी अशी गाडीच नाहीये.

मग आमचे सर्वांचेच धाबे दणाणले. संध्याकाळ अधिकच निराश वाटायला लागली. आता आजची रात्रही औरंगाबादमध्येच काढावी लागतेय की काय ? अशी शंका मनात येवू लागली. त्याचा प्रश्न नव्हता पण उद्यातरी नागपूरला जायला मिळणार की नाही याबद्दल खात्री नव्हती.

रात्र अधिकच गडद वाटायला लागली होती. आठ साडेआठ वाजत आलेले होते. आणि अचानक अक्षरशः एक आशेचा किरण चमकला. एक नवीन कोरी लेलॆण्ड बस दापोडी कार्यशाळेतून औरंगाबाद आगारात सामील व्हायला औरंगाबाद आगाराजवळ आली. साधारण ५० च्या गणसंख्येच्या आसपास डेपोपाशी उभ्या असलेल्या पासिंजरांची त्या डेपो मॆनेजरला दया आली असावी त्याने त्या बसलाच औरंगाबाद-नागपूर विशेष बस म्हणून पाठवण्याचे ठरविले. ज्या चालकाने ती बस कार्यशाळेतून औरंगाबादपर्यंत आणलेली होती त्याच चालकाला विनंती केली आणि त्या भल्या माणसाने ती मान्यही केली.

दि. २२/१०/१९९५ व २३/१०/१९९५
औरंगाबाद ते नागपूर : आसन क्र. १ व २.
औरंगाबादवरून प्रयाण: २२/१० रोजी रात्री २१.३० वाजता.
मार्गावरील थांबे: जालना, देउळगावराजा, चिखली ढाबा, चिखली,अकोला, अमरावती, तळेगाव, कारंजा (घाडगे).
बस: औरंगाबाद जादा नागपूर.
बस क्र.: MH-12/ R 1950,  म.का.दा. न. ले. १९९५-९६.
आगार : औ. औरंगाबाद-२ आगार.
चेसिस क्र.: HVQ ३४५१९७
मॊडेल: ASHOK LEYLAND, CHEETAH model.
आसन व्यवस्था: ३ x २
नागपूर आगमन: २३/१० रोजी सकाळी ०८.०० वाजता.
एकूण अंतर: ५०० किमी.
सरासरी वेग: ४६.१५ किमी. प्रतीतास.

(पुन्हा एकदा विशाल जोशींचे आभार. ह्या स्केचेस त्यांनी खूप मेहेनतीने आणि कल्पकतेने काढल्या आहेत पण त्या उदार मनाने मला माझ्या लिखाणासाठी वापरू दिल्यात.)


ऐन दिवाळीत मी आणि संजय भोयर नागपूरला आलो. त्या ड्रायव्हरविषयी कृतज्ञता आजही माझ्या मनात दाटून आहे. त्या भल्या माणसाने दिवस आणि रात्रभर ती गाडी पुणे ते नागपूरपर्यंत चालवली होती ती फ़क्त "प्रवाशांच्या सेवेसाठी" आणि एस.टी. चे ब्रीद सार्थ केले होते.