टाटा नॅनो आणि माझे नाते असे कसे विचित्र आहे नकळे. २००९ मध्ये जेव्हा घरी चारचाकी गाडी असावी असा विचार सुरू झाला तेव्हा खिशाला परवडणारी गाडी म्हणून नॅनोलाच मी पसंती दिली. आम्ही टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये दाखल झालोत. तिथे ठेवलेल्या नॅनोत बसून वगैरे बघितले तेव्हा एंजिनचा वगैरे विचारच केलेला नव्हता. गाडी तशी आतून आवडली. पण.....
तिथल्या सेल्समनने सांगितले की साहेब २०१२ पर्यंत गाडीचे बुकींग फ़ुल्ल आहे. त्यावेळी टाटा मोटर्सचा तो सिंगूर प्लॅंटचा प्रश्न त्यांना फ़ार भेडसावत होता. त्यामुळे नवीन गाड्या अगदी कमी कमी बाजारात येत होत्या. २०१२ पर्यंत आम्हाला थांबणे शक्यच नव्हते म्हणून मग इतर पर्यायांचा शोध नव्याने सुरू झाला.
आताही दरवेळी नवी नॅनो दिसली की बाह्य रूपावरून आवडतेच. विशेषतं नवी ट्वीस्ट मॉडेल तर छानच वाटते. पण त्याचदिवशी थोड्या वेळाने एखादी नॅनो शेजारून जाते आणि मागल्या एंजिनाचा रिक्षासारखा एव्हढा भयंकर आवाज येतो. आपण या वाहन खरेदीच्या फ़ार मागे न लागून चूक केली असे वाटत नाही.
चित्रे : आंतरजालावरून साभार.