Saturday, September 22, 2012

ज्यादिवशी........त्यादिवशी


ज्यादिवशी....
पोटभर आणि मनभर जेवल्यावर
तुला अनेक अर्धपोटी, उपाशी आतड्यांचे पीळ जाणवणार नाहीत,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

ज्यादिवशी....
अंगभर प्रावरणं ल्यायल्यानंतर
तुला फ़ाटक्या वस्त्रांमधले दुःख काय असते ते जाणवणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.


ज्यादिवशी....
आनंदांच्या लहरींवर विहार करताना
दुःखाच्या गर्तेत लोटल्या गेलेल्यांची आठवण,
तुझे डोळे पाणावणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

ज्यादिवशी....
स्वतःच्या नवजात बाळाचा
वात्सल्याने मुका घेत असताना,
तुला तुझ्याच दिवंगत आजोबांची आठवण येणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

ज्यादिवशी....
तुला स्वतःच्या हृदयात
बुध्दाची करुणा, ख्रिस्ताची दया आणि
शंकराच्या ज्ञानाचा साक्षात्कार होणार नाही,
त्यादिवशी....
तू मेलास असे समज.

कारण त्यानंतर जगेल फ़क्त देह
ज्यात चैतन्य नसेल.
कारण चैतन्य म्हणजेच
उपाशी पोटांची आठवण,
फ़ाटक्या कपड्यातले दुःख निवारण्याची तळमळ,
दुःखितांविषयीचा कळवळा,
पूर्वजांचे स्मरण.

चैतन्य म्हणजे बुध्द,
चैतन्य म्हणजे ख्रिस्त,
चैतन्य म्हणजे शंकर.

म्हणूनच हे चैतन्य जर,
तुझ्या देहात नसेल.
तर तू जगलास काय ?
किंवा मेलास काय ?
फ़रक पडत नाही.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(ही कविता दै. तरूण भारत, नागपूरच्या दि. २२/०६/२००८ रोजीच्या आसमंत पुरवणीत प्रकाशित झालेली आहे.)








5 comments:

  1. Very nice - Touches heart. No words to say about the composition.. just incredible!

    ReplyDelete
  2. sir mastach ahe......tumchya kavita vachlya ki ek zuroop yeto.ashech lihit raha ani amche gyan vadhvat raha

    ReplyDelete
  3. The last 8 lines beautifully convey the message of the entire poem. Insightful and thought provoking!

    ReplyDelete