एकूणच मी भटक्या प्राणी आहे. भारतात तर भटकलोच आहे महाराष्ट्रातही मी फार भटकलेलो आहे. स्वतः ची गाडी घेतल्यानंतर तर या भटकंतीत आणखी भर पडत गेली. गाडी चालवताना मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे रस्त्यावर असलेला चालत्या बोलत्या मृत्युदूतांचा अनिर्बंध वावर.
रस्ता अपघात ही आजकाल आपणा सर्वांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट झालेली आहे. खरतर हे आपल दुर्दैव आहे. रोजच्या रोज वर्तमानपत्रात यासंबम्धी बातम्या आपण केवळ वाचून सोडून देतो. या अपघातांच्या कारणांचा आपण खोलवर शोध घेतला तर आपल्या लक्षात येईल की ९५ % वेळा अपघात हे मानवी कारणांमुळे होतात. यंत्रांचा दोष फक्त ५ % एव्हढाच असतो.
पण मला राहून राहून अस वाटतंय की यातले बरेच अपघात टळू शकतात. आपल्याकडे कायदे चांगले आहेत पण रस्त्यावरचा कायदा राबवणारी यंत्रणा जर पुरेश्या शक्तीने आणि प्रामाणिक हेतूने आपले काम करील तर यातले बरेच अपघात टळू शकतात. अनेक निरपराध प्राण वाचू शकतात. वानगीदाखल ही काही उदाहरणे.
वाहनांना मागल्या बाजूला टेल लाईट्स हवे असा कायदा आहेच. पण या ट्रक सारखे अनंत ट्रक आज महाराष्ट्रात सर्वत्र फिरताहेत. एकतर यांना टेल लाईटस नसतातच किंवा असलेच तर ते बंद करून रात्री ट्रक चालवले जातात. (मागल्या बाजूचे दिवे बंद ठेवल्याने यांच्या किती बेटरीची बचत होते हे यांनाच माहित. यांचेच काही भाउबंद रात्री समोरच्या दोन दिव्यांपैकी केवळ एकाच दिव्यावर ट्रक चालवण्याचे दिव्य करतात. आणि समोरचा वाहन चालक जवळ आला की त्याचे डोळे दिपावण्यासाठी दुसरा दिवा सुरू करतात. दुरून ही चारचाकी आहे की दुचाकी असा संभ्रम निर्माण होता असतानाच अचानक हा डोळे दिपवणारा प्रकाश हा अपघातांना निमंत्रण देणारा असतो.)
मधल्या काही काळात आर टी ओ ने वाहनांवर चमकत्या रिफ्लेक्टर पट्ट्या सक्तीच्या केलेल्या होत्या. (आजही आहेत.) पण किती जण हा नियम पाळताहेत ? हे पाहणारी यंत्रणा झोपी गेलेली आहे. त्या रिफ्लेक्टर पट्ट्या कायम स्वछ्च ठेवल्या पाहिजेत याबद्दल वाहन मालक आणि चालकां मध्ये जागृती कोण करणार ?
रात्रीच्या वेळेला असला हा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला असेल तर मागून येणाऱ्या वाहनाला न दिसण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी धडक अपरिहार्य आहे.
आजकाल आपले वाहन घेऊन किंवा भाड्याने वाहन घेऊन प्रवासाला निघणारी बरीच मंडळी आहेत. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रात्रभर वाहनाचा प्रवास करून दिवस वाचवू म्हणणारी ही मंडळी पाहिली म्हणजे त्यांच्या धाडसाच कौतुक वाटत की मूर्खपणाची कीव येते हे सांगण अवघड आहे. रात्रभर अवघडलेला प्रवास करून सकाळी आंबलेल्या अंगाने दिवसभर काम कसे होईल ? पर्यटनाचा आनंद कसा मिळेल ? याचा विचार ही मंडळी करत नसावीशी वाटतात. रात्रभर प्रवास करण्यात आपण किती धोका पत्करतोय याची जाणीवच यांना नसते. कितीही चांगला ड्रायव्हर असला तरी शरीर धर्मानुसार त्याला पहाटे झोप येणारच हे गृहीत धरायलाच हवे. ड्रायव्हर ची अपुरी झोप ही सुध्दा बऱ्याच अपघातांचे कारण होत चाललेली आहे.
आता हा ट्रक बघा.
सिमेंट वाहून नेणाऱ्या या ट्रकला मागल्या एका एक्सलला दोन चाकेच नाहीयेत. हा ट्रक चांगला वर्दळीच्या मार्गावरून जात होता. कुठल्याही क्षणी अपघाताला कारण होऊ शकणारा हा ट्रक यंत्रणेला दिसला नाही असे समजणे नुसताच भाबडेपणा नाही तर चक्क मूर्खपणा ठरेल.
या ट्रक ला ना नंबरप्लेट , ना रिफ्लेक्टर, ना टेल लाईटस. तरीपण हा हमरस्त्यावर आहे हे यंत्रणेचे अपयश नाही का ?
आजकाल ट्रक मध्ये त्याच्या क्षमते एव्हढाच माल भरला जावा ही अपेक्षा अत्यंत चुकीची आणि अवास्तव समजली जायला लागलीये. १२ आणि १५ टन क्षमतेच्या ट्रक्स मध्ये कमीतकमी २० टन आणि २० टन क्षमतेच्या ट्रकमध्ये कमीतकमी ३५ टन माल भरलेले हे ट्रक्स आर. टी .ओ. ला दिसत नसतील तर या राष्ट्रात पुरेश्या प्रमाणात नेत्रतज्ञ निर्माण होण्यासाठी देशव्यापी चळवळ उभारली जायला हवी. आकारमाना चाही विचार करता महामार्गावरून जाणाऱ्यां इतर वाहनांसाठी हे ट्रक्स खूप धोका निर्माण करत आहेत.
एकेकाळी "रस्ता तेथे एस.टी ." हे एस. टी . चे ब्रीदवाक्य होते. आता "रस्ता तेथे (आणि रस्ता नसेल तेथेही) खाजगी वाहतूक हे ग्रामीण भागातील नेत्यांचे आणि त्यांच्या चाहते कम चमच्यांचे बोधवाक्य झालेले आहे.
काळी पिवळी, अधिकृत, अनधिकृत जीप्स यांच्यातून त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांची वाहतूक होताना तुम्हा आम्हाला दिसते. फक्त नियंत्रण करणारया यंत्रणेला ती दिसत नाही. यात अनेक आर्थिक हितसंबंध आहेतच आणि खूपश्या ठिकाणी अश्या जीप्स ची मालकी स्थानिक पुढारी / फौजदार यांचीच असते हे भीषण वास्तव आहे.
kharach sir chaan lihilay pan mala as personally watatay ki asach ek mail banawun aapale dalanwalan mantri aani rajyaache mukhya police niyantrak yaana pathawane garajeche aahe....
ReplyDeleteरस्त्यावरील विशेषतः महामार्गावर होणारे अपघात व मृत्यू ह्यात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. तरीही कोणी काहीही ह्याबाबतीत करत नाही.
ReplyDelete