Wednesday, February 3, 2016

करा मनाचा विचार

"हुश्श ! येऊन पोहोचलो ब्वॉ वेळेवर. म्हटल लोकलमध्ये जागा मिळते की नाही ? दोन तीन लोकल्स सोडल्यात पार्ल्याला तेव्हा कुठे जागा मिळाली आत घुसायला."

"पण आता तर सगळा ट्रॅफ़िक उलट्या साईडचा असायला हवाय. मग तरीही इतकी गर्दी ? किती माणस दरवर्षी मुंबईत घुसतात आणि इथलेच होऊन जातात."

"आपलं तरी दुसरं काय आहे ? आपणही इथे परकेच. पण या शहराने १२ वर्षे पालनपोषण केल की नाही ? आपल्याला लळा लावला की नाही ?"

"किती जुनं आहे नाही व्हीटी स्टेशन ? आपण इथे पहिल्यांदा कधी आलेलोत ? १९९५ मध्ये ? छे, पहिल्यांदा १९९१ मध्येच. पण तेव्हा आपण पहाटे पहाटे मद्रास मेल मधून उतरून बाजूच्याच फ़लाटावरच्या गीतांजलीत जाऊन बसलो होतो. व्हीटी स्टेशन तर खरं १९९५ ला च पाहिल."

"किती वेगवेगळी माणस ? आणि प्रत्येकाच्या इथल्या प्रवासाचा हेतू वेगळा, मनःस्थितीही किती निराळी असेल नाही ?" 

"इंडिकेटरवरून पार रात्री १२ पर्यंत इथे येणा-या आणि सुटणा-या गाड्यांची पोझिशन लावलीय. काय उपयोग ? ज्याला रात्री जायचय तो कशाला मरायला इथे दुपारी साडेपाचलाच येतोय ?"

" मरण्यावरून आठवलं. कसाबने गोळीबार केला होता ती जागा या इंडीकेटरच्या आसपासच नाही का ? त्याला फ़ाशी झाली पण ती जखम अजून विसरल्या जात नाहीये."

" गाडी १६ नंबरवर उभी दिसतेय. अरे ! १८ नंबरवरून डेक्कन ओडिसी निघालीय. आयुष्यात एकदा तरी या गाडीतून प्रवास करायचाच आहे."

"उगाचच पैसे वाचतील म्हणून साध्या सेकंड क्लासचे रिझर्वेशन केलेय. चांगल ए.सी. चेअर कार ने गेलो असतो. किती धूळ आहे या डब्यात. ! आमच्या कडून स्वच्छता अभियानाचा सरचार्ज घेतात आणि गुणात्मक फ़रक तर काही नाही." 

"जेटलींची निवड चुकलीच. अनायासे लोकसभेत हरलेलेच होते. चांगलं निमित्त होतं मंत्रीमंडळातून अडवाणी, सिन्हा, जोशींसारख दूर ठेवायला. तस तर मग स्मृती इराणीपण हरली होती. तिचीही निवड चुकलीच."

"महत्वाची सगळी मंत्रीमंडळ राज्यसभेतल्या लोकांच्या हातात ? रेल्वे सुरेश प्रभू ? उच्च आणि तंत्र शिक्षण स्मृती इराणी ? अर्थ अरूण जेटली ? अरे, लोकांनी थेट निवडून दिलेल्या ३२२ पैकी एकही तुम्हाला लायक वाटला नाही ? की आजूबाजूला थेट जनाधार नसलेली मंडळी असली की मोदींना सेफ़ वाटत असेल ? मन की बात मध्ये उलगडा करतील का ? आपण तर एक पण ऐकलेल नाहीये. मन की बात हाच कित्ती जुनाट विचार ! भाबडेपणाचा !अगदी पंडीत नेहरूंच्या काळातला."

"गाडीत गर्दी वाढतेय. गाडीत रात्रीच जेवण मिळेल न ? मनमाडला रात्री पावणेअकरा वाजतील आणि तिथून लगेच बस गाठायची आहे तेव्हा जेवणासाठी नंतर वेळच नाही."

"परळ, चिंचपोकळीची स्कायलाईन कित्ती बदलली नाही ? बापरे ३० - ४० - ५० मजली टॉवर्स ? पण मग रेल्वेमार्गाच्या बाजूला झोपड्या कमी होताना दिसत नाही त्या ? बकालपणा एका ठिकाणी संपवला तर दुस-या ठिकाणी वाढत चाललाय ? मघाशी माहिमवरून आलो. माहिमच्या आसपासचा परिसर गेल्या २५ वर्षांपासून तसाच आहे. त्याचा कोणी वाली नाही ?"

"दादर स्टेशनचे ५ आणि ६ नंबरचे प्लॅटफ़ॉर्म्स चकाचक दिसताहेत. स्वच्छ भारत अभियान सुरू आहे तर. चला, मागल्या वर्षीचे माझे टॅक्समधून कापलेले ३५२ (किंवा तत्सम) रूपये सत्कारणी लागले म्हणायचेत."

"कित्ती वेळेला प्रवास केलाय आपण या स्टेशनवरून, नाही ! आणि कित्ती वेळेला इथे उतरून प्रवास संपवलाय पण. विदर्भ एक्सप्रेस जेव्हा ठाण्याला थांबत नव्हती तेव्हा उशीर झालेला असला की कल्याणला उतरून लोकलमध्ये गर्दीत प्रवास नको वाटायचा तेव्हा थेट इथे येवून उलट प्रवास करत ठाणे गाठायचोत."

"या शहराचे अनेक अवगुण असतील पण हे शहर आपल्याला आवडायचे बुवा. संपूर्ण व्यावसायिक वृत्ती. सगळे आपल्या आपल्या व्यापात दंग. या शहराच्या वेळापत्रकाशी आपले वेळापत्रक जोडले की आपण लगेच आतले होऊन जातो. उदार शहर आहे. लगेच आपलस करत. उगाच नाही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडवरून गाड्याच्या गाड्या इथे रिकाम्या होत."

बापरे ! ठाणे पूर्व पण किती बदललय नं ?"

"ठाण्याची खाडी, मुंब्रा, पारसिकजवळचा परिसर मात्र आहे तस्साच आहे गेल्या २० वर्षांत. ऐरोली मात्र जवळ आलीय ठाण्याच्या. खाडीपुलावरून थेट तिथल्या बिल्डींग्ज दिसताहेत."

"सहप्रवाशांपैकी सगळे आपआपल्या कानात इअरफ़ोन खुपसून फ़ोनवरून गाणी ऐकताहेत. आत्ताच तो इअरफ़ोन विकणारा गेला नाही का ?" काय ऐकत असतील सगळे ? सिनेमाची गाणी ? किती लवकर शिळी होतात आताशा ? दोन महिन्यांपूर्वीच हिट गाण आता आठवत नाही. मुळातच कसदार नसतात की अतिपरिचयादवज्ञा ?" 

अरे ! निघताना मी पण माझा एम.पी.थ्री प्लेयर घेतलाय की ! चला ऐकूयात छान गाणी. आज पौर्णिमा. कदाचित चतुर्दशीही असेल. पूर्ण चंद्र दिसतोय. चला मालिनीताईंच मालकंसमधल "नभ निकस गयो चंद्रमा" ऐकूयात. वातावरण मालकंससाठी योग्य आहे."



"अरे ! गाण ऐकता ऐकता कल्याण कधी गेलं ? कळलच नाही. मालिनीताईंच्या सुरातली जादूच अशी आहे. प्ले लिस्टमध्ये याच्यानंतरच बिलासखानी तोडी आहे. वा ! काय मस्त वातावरण. पूर्ण चंद्र खिडकीतून प्रवासभर सोबत करतोय. सुंदर गार वारा. टिटवाळा आणि खडावलीच्या मधले मोकळे माळरान. कानात बिलासखानी तोडीतली मालिनीताईंची " वही जाओ जाओ, जाओ सनम, जिन युवतीसंग किनी रंगरलीया " सुरू आहे. हे गाण मुंबई शहर आपल्याला तर उद्देशून म्हणत नसेल ?"

"नाही, मुंबई चांगलच होतं. आपली नाळही छान जुळली होती. पण नागपूर ते नागपूर. आपली नाळ जरी अनंत शहरांशी जुळत गेली तरी जिथे पुरली गेलेली आहे त्या ठिकाणाची ओढ वेगळीच."



साधारण २ - ३ वर्षांपूर्वी अशा ढंगाचा एक मराठी ब्लॉग वाचला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन हे लिखाण. दरवेळी प्रवासवर्णन करताना गाडी आणि प्रवासाचेच वर्णन जास्त होत असते. या दरम्यान माझ्या मनातली स्पंदने कागदावर उतरवता येतच नाहीत.

5 comments:

  1. मस्तच...
    "आपली नाळ जरी अनंत शहरांशी जुळत गेली तरी जिथे पुरली गेलेली आहे त्या ठिकाणाची ओढ वेगळीच." हे चपखल आहे सगळ्यांसाठी..
    गावाची आठवण आली...

    ReplyDelete