Thursday, March 3, 2016

मनाचे श्लोक - ८



मना सज्जना हीत माझे करावे
रघूनायका दृढ चित्ती धरावे
महाराज तो स्वामी वायूसुताचा
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा II २२ II



प्रभू रामचंद्रांचे आयुष्य हे सर्वसामान्य मनुष्यमात्रांसाठी आदर्श जीवनाचा वस्तूपाठ आहे, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा, आदर्श मित्र आदर्श पिता आणि आदर्श शत्रूही. या सगळ्या भूमिकांबाबतचा मानदंड म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यामुळे आपल्या जीवनात आपले हित पहायला हवे असेल तर ह्या जीवनाचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला हवा आहे. या प्रसंगी प्रभू श्रीराम कसे वागले असते ? या विचाराने मार्ग आखला म्हणजे अवघ्या जीवनाचे सोने नाही का होणार ? 
 
बुद्धीमतां वरीष्ठम आणि शक्तीवंतांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रत्यक्ष वायुसूत हनुमंताने ज्यांना आपला स्वामी मानलय त्यांचा ध्यास आपण किंचीत मानवांनी धरायलाच हवा. त्यांच्या आदर्शांवर चालून आपण आपले जीवन व्यतीत केले तर या भवसागरातून उद्धरून जायला आपल्याला वेळ लागणार नाही.

न बोले मना राघवेवीण काही
जनी वाउगे बोलता सौख्य नाही
घडीने घडी काळ आयुष्य नेतो
देहांती तुला कोण सोडू पहातो II २३ II 



मनुष्यमात्राची स्वाभाविक वृत्ती फ़ार बहिर्मुख असते. रोजच्या संसाराचा रामरगाडा आवरताना, सावरताना आपण दिवसभर अनंत गोष्टींमध्ये चित्त गुंतवतो. आणि नंतर सवयीने त्याच गोष्टी नश्वर असल्या तरी शाश्वत मानून त्यांच्याच आराधनेत, उपासनेत आपला सर्व काळ व्यर्थ घालवतो. श्री समर्थ आपल्याला हे टाळण्याचा उपदेश करत आहेत. काळ आजवर कुणालाही चुकला नाही. त्या काळाच्या रेट्यामुळे भल्या भल्या मोठ्या विद्वान नास्तिकांनाही त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी शाश्वत काय नश्वर काय याचा विवेक होऊन ते भक्तीमार्गाकडे वळल्याचे आपण नुकतेच बघितलेले आहे. प्रत्येक क्षणी आपले इथले आयुष्य उणे होत असताना ज्या एका रघूकुळाच्या नायकामुळे, प्रभू श्रीरामांमुळे, आपल्याला शाश्वत समाधान मिळणार आहे, त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्याचा श्री समर्थ आपल्याला उपदेश करत आहेत.

प्रभू श्रीरामांचे जीवन सर्व भारतीयांसाठी अगदी आदर्श असे आहे. त्या आदर्शांवर आपण जगत गेलो, त्यांच्या विवेकानुसार आपण जगव्यवहाराचे आचरण केले तर आयुष्याच्या अंतकाळात मुक्ती मिळवावी असे काही उरणारच नाही. आपण आधीपासूनच या जगाच्या सर्व भौतिक गोष्टींच्या आणि बंधनांच्या पाशापासून मुक्त झालेले असू. " देहांती तुला कोण सोडू पहातो ?" या समर्थ उक्तीचा अर्थ आजच्या युगात असाही घ्यावा लागेल.


रघूनायकावीण वाया सिणावे
जनांसारिखे व्यर्थ का वोसणावे
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे
अहंता मनी पापिणी ते नसो देII २४ II 

अशा त्या रघूनायकावाचून आपल्याला तारणारा कुणी असेल ही कल्पनाही आपण करू नये. आज या कलियुगात जगात विविध प्रकारच्या प्रलोभनांनी, विभ्रमांनी आणि बुद्धीभेदांनी ठाण मांडले असताना त्यांच्या कडे साक्षेपी दृष्टीने पाहून इतर कुठली गोष्ट आपल्याला मुक्तीच्या पथावर नेणार नाही याचा अगदी दृढ विश्वास बाळगावा. कलियुगात नामस्मरण हेच श्रेष्ठ प्रकारची भक्ती आहे आणि तिचा अंगीकार प्रत्येक साधकाने केला पाहिजे. 

पण अनेक संत मंडळी सांगतात त्याप्रमाणे नामस्मरण करीत असताना " मी नामस्मरण करतो आहे " ही सुद्धा भावना मनात उरू देऊ नये. करणारा आणि करवून घेणारा तो प्रभू श्रीरामच आहे ही भावना स्थिरावली की अहंतेचा वारा मनाला शिवणार नाही. मोठमोठ्या साधकांची, योग्यांची अनंत वर्षांची साधना हा अहंतेमुळे वाया गेलेली श्री समर्थांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे ते अहंतेला " पापिणी " असे संबोधतात. तिला आपल्या मनात थारा देऊ नये असा कळकळीचा उपदेश आपल्याला करतात.

II जय जय रघुवीर समर्थ II

No comments:

Post a Comment