Saturday, March 5, 2016

आत्मनो मुख दोषेण..... : संस्कृत सुभाषिते - ६

वाचा : संस्कृत सुभाषिते - १
          संस्कृत सुभाषिते - २
          संस्कृत सुभाषिते -३  
          संस्कृत सुभाषिते - ४
          संस्कृत सुभाषिते - ५


                                                  " आत्मनो मुख दोषेण, बध्यन्ते शुक सारिकाः
                                                     बकास्तत्र न बध्यन्ते, मौनं सर्वार्थ साधनम "


अर्थ : आपल्या मुख दोषांमुळे (गोड गळ्यामुळे) पोपटाला आणि कोकिळेला बंधनांमध्ये (पिंज-यात) रहावे लागते. (कोकिळ पक्षी हल्ली कुणी पाळत नसले तरी पूर्वी पाळत असावेत.) पण बगळा मात्र त्याच्या मौनसाधनेमुळे बंधनात अडकत नाही. तस्मात मौन हे सर्व गोष्टी साधून देणारे साधन आहे. आजच्या युगातले " येडा बनके पेडा खाना" प्रकारचे.

याच आशयाचे एक बोधचित्र सोशल मेडीयावर फ़िरत होते म्हणून या संस्कृत सुभाषिताची आठवण झाली.



पण आजकाल मात्र जोराने ओरडून विकणा-यांचे पेरूही विकले जातात आणि न ओरडता शांत बसून विकणा-यांचे (हापूस) आंबेही न विकल्या जाता पडून रहातात अशी परिस्थिती आहे. खरेच आहे ते. आजचा जमानाच मुळी जाहिरातबाजीचा आहे. जाहिरात ही पासष्ठावी कला म्हणून विकसित झालेली आहे आणि मान्यताही पावलेली आहे. आमच्या पूर्वजांचा फ़ार बोल बच्चनपणावर विश्वास नव्हता किंवा त्याकाळी एखादी गोष्ट पटवून सांगायची असेल तर वारंवार ओरडण्याची गरज नसावी. शब्दांवर विश्वास ठेवण्याचा तो काळ होता.

हा बदललेल्या काळाचा महिमा की आपणा सगळ्यांनाच कशाचे ना कशाचे बंधन अगदी मनापासून आवडायला लागले आहे ? न कळे. हो, नक्कीच आपणा सगळ्यांनाच पैसा, मान, मरातब, लौकिक इत्यादी भौतिक गोष्टींमध्ये रमायला आवडायला लागलेले आहे. म्हणून मग मुख दोष हा मुख दोष नसून जाहिरातीची कला बनते. अर्थात मूर्ख माणसांनी तोंड उघडले की त्यांच्या विद्वत्तेचे पितळ उघडे पडतेच. तो भाग अलहिदा. पण आजकाल आपण फ़ार वाचाळ झालोय हे खरे. एखाद्या दिवसभराचे मौनही आपल्याला सोसवत नाही. (बाकी, माझ्या स्वतःच्या मौनाच्या प्रयोगांवर लिहीण्यासाठी मी माझा पुढला लेख राखून ठेवतोय.)

जरा अंतर्मुख होऊन विचार केलात तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी असतील की जी आपला माल ओरडून विकत नाहीत पण ती मंडळी अनंत गुणांनी युक्त अशी गुणी मंडळी आहेत. त्यांचा शोध घेणे अवघड नाही. जरा नजर उघडी ठेवली आणि साक्षेपी दृष्टीने आजूबाजूला पाहिले की अशी मंडळी आपल्या दृष्टीला पडतीलच. त्यांचा मान ठेवूयात. त्यांची खरी किंमत ओळखून त्यांना आदर देवूयात.

1 comment:

  1. पोस्ट खूप चांगली.... आपणास स्मार्टदोस्तच्या शुभेच्छा. मराठी अफलातून लेख वाचावे वाटले तर जरूर www.smartdost.in ला भेट द्या.

    ReplyDelete