"मनुष्य हा प्रयोगशील प्राणी आहे" असे कुणीतरी म्हटले नसून मीच म्हटले आहे. "आपल्यावरून जग ओळखावे" हे ज्योतिबांचे वचन आम्ही आमच्या शालेय पाठ्यक्रमात अभ्यासलानंतर त्याचा अनुभव सतत घेणे सुरू आहे. मी स्वतः अत्यंत प्रयोगशील असल्याने मला समस्त मनुष्यमात्र प्रयोगशील असल्याचे वाटले तर नवल नाही. शालेय भौतिक आणि रसायनशास्त्रांच्या प्रयोगांपासून सुरू झालेली ही मालिका नुकतेच मिसरूड फ़ुटू लागल्यानंतर वडीलांच्या दाढीच्या डब्यातून सगळे साहित्य काढून त्याचा प्रयोग स्वतःच्या दाढीमिशांवर करण्यापासून सुरूवात झाली. (दाढी मिशा घोटून केल्याने वाढ लवकर होते असे कुणीतरी अत्रंगी मित्राने सांगितल्याचे आता ३० वर्षांनंतरही चांगलेच स्मरते)
शाळकरी वयात मिसरूड फ़ुटण्याआधीचा असा मी असामी.
कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात वसतीगृहात असताना मग काय माझ्या स्वतःच्या मिशांवरील प्रयोगांना मोकळे रान मिळाले. महाविद्यालयीन स्नेहसंमेलनातील सादर होणा-या तीन अंकी नाटकादिवशी (प्रेमाच्या गावा जावे) स्वतःच्या मिशीवरचा प्रयोग फ़सल्याने आमच्या दिग्दर्शक सरांची चांगलीच बोलणी खावी लागल्याचेही स्मरते. मग ऐनवेळी सगळ्या मिशा सफ़ाचट करून नाटकाच्या वेळी कृत्रिम मिशी चिकटवावी लागली होती. ती पडेल या भीतीमुळे तोंड उघडून बोलायची चोरी झाल्याने माझे डॉयलॉग्ज सगळे पडले होते. सबब, मी प्रथमपासूनच प्रयोगशीलतेकडे झुकणारा माणूस आहे.
चार्ली चॅप्लीन मिशी
कृत्रिम मिशी पडण्याच्या भीतीने पडलेले डॉयलॉग्ज.
(आजोबांच्या भूमिकेत आजचा आघाडीचा निर्माता दिग्दर्शक संदेश कुळकर्णी.)
ब-याच विचारवंतांकडून मौनाचे महत्व ऐकल्याने आपणही मौन पाळावे असे मला फ़ार वाटे. मूलतः बालपणापासूनच स्वभाव हा जास्त बडबडा आणि बहिर्मुख. थोड अंतर्मुख होऊन स्वतःच्या जीवनाविषयी गांभीर्याने वगैरे विचार करावा असे वाटण्याचे प्रसंग विरळाच. पण सध्या गेले दोन तीन आठवडे व्हॉटसऍप वरून "सकाळी किमान एकदोन तास तरी मौन पाळा. आठवडा, पंधरवाड्यात एक दिवस तरी मौन पाळले पाहिजे." अशा स्वरूपाचे निरोप दोनतीन वेळा आले. अनायासे पौष अमावास्या ही मौनी अमावास्या असल्याने त्या दिवशी मौन पाळावे का ? हा विचार मनात चमकून गेला. पण यंदा ही अमावास्या नेमकी मंगळवारी आलेली आहे. बर नोकरी म्हणावी तीच बोलण्याची. न बोललो तर पगार मिळणार नाही. मग कसले मौन पाळता ? नाही, दोनतीन वर्षांपूर्वी सांगोल्यात असताना ही अमावास्या रविवारी आली होती तेव्हा आयुष्यातले पहिले ऐच्छिक मौन पाळता आले असते. पण ते सुद्धा कुटुंबाच्या विरोधामुळे वाटाघाटी होऊन सूर्योदय ते सूर्यास्त एव्हढेच चालले होते.
मौनाबिनात जाण्याइतके आध्यात्मिक होण्याच्या प्रयत्नात आम्ही.
आज मात्र अगदी कडकडीत मौन पाळायचे ठरवले. हे मौन पाळणे म्हणजे एखादे वात्रट माकड पाळण्याएव्हढे कठीण असते हे माहिती नव्हते. आज रविवारी छान कटिंग वगैरे करण्याचे ठरले होते पण मौनात न्हाव्याला सूचना कशा देणार ? या विचाराने तो बेत पुढल्या रविवारवर ढकलला आणि दिवसभर घरातच काढायचे ठरवले.
मौनात असताना सोबत काही सल्ला मसलतीची वगैरे वेळ आलीच असो म्हणून अगदी डायरी आणि पेन वगैरे घेऊन जय्यत तयारीत बसलो होतो. कसच काय. यावेळेसचे माझे मौन सुपत्नी आणि सुकन्येने फ़ारच गांभीर्याने घ्यायचे ठरवले होते. मला एका शब्दानेही न विचारता घरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. रविवार म्हणजे माझा अत्यंत लाडका वार. खाण्यापिण्याची यादिवशी फ़र्माईशी चंगळ असते. आज नेमका घरी वडाभाताचा बेत होता. पण मौनात असल्याने फ़ार तारीफ़ करता आली नाही. बायकोचा गैरसमज झाला की यावेळेसचा वडाभात जमला नाही. तिनेही फ़ार आग्रह केला नाही. बोलण्यावर ताबा हवा म्हणजे जिव्हालौल्यावरही ताबा हवाच ह्या माझ्या समजूतीमुळे मी ही जेवणाचा बेत मस्त असूनही अर्धवट उठलो.
दुपारच्या वेळी आपले आवडते टीव्ही चॅनेल्स लावून बसावे म्हटले तर सुकन्येच्या हातात रिमोट. बोलता येईना आणि ती बघत असलेले श्रद्धा कपूर आणि वरूण धवन सारख्या मथ्थडांचे सिनेमे बघताही येईना. (एकवेळ मी तो सुजीत कुमार, विश्वजीत किंवा गेलाबाजार मनोजकुमारचा चित्रपट बघेन पण हे धवन, श्रद्धा कपूर वगैरे डोक्यात जातात.)
रविवारी मला फ़ारसे कुणाचे फ़ोन्स येण्याइतका मी अजून व्हीआयपी झालेलो नाही पण या रविवारी मात्र कॉलेजच्या कार्ट्यांनी उच्छाद मांडला होता. बर सगळ्यांना सुपत्नीने "सर मौनात आहेत" हे सांगितले असते तरी त्यांच्यापैकी किती जणांना कळले असते याबाबत मला आणि तिलाही शंकाच होती. आज सगळीच कार्टी अगदी ठरवून फ़ोन्स करत होती की काय नकळे.
आत्ता संध्याकाळचा नित्य कार्यक्रम म्हणजे घराजवळील रविवार बाजारात जाऊन आठवड्याची भाजी खरेदी करणे. मी मौनात असल्याने सुपत्नीने एकटीने जाण्याची तयारी केली खरी पण हा कार्यक्रम म्हणजे माझ्याही आनंदाचा गाभा असल्याने मी स्वतःच तिच्यासोबत मुद्दाम गेलो. तसही दिवसभर घरात राहून वैताग आला होता. पण मग बाजारात सगळ्यांना मुकाटपणे पिशव्या घेऊन चालणारा नवरा आणि कर्तबगारीने भाजी खरेदी करणारी बायको असे दृश्य दिसत होते. पण मग विचार केला की हे दृश्य तर अगदी सर्रास सगळीकडे दिसत असते. पण तरीही सगळे भाजीवाले आपापला कामधंदा सोडून माझ्याचकडे बघत असल्याचा मला केवळ भास होत असावा.
आता संध्याकाळी एकदम "युरेका" क्षण आला. (मौन असल्यामुळे मी ओरडू बिरडू शकलो नाही म्हणा.) आपण आपल्या स्वतःलाच सापडल्याचा क्षण. आपण फ़ारच धडपडत असतो तसे आपल्यावाचून फ़ारसे कुणाचे काहीही अडत नसते हे शिकवणारा एक दिवस. मौनामुळे आत्मिक सामर्थ्यात वाढ होते की नाही ते मला माहिती नाही पण हे छोटे छोटे साक्षात्कार स्वतःचे स्वतःलाच होतात हे ही नसे थोडके. मध्ये मध्ये असे मौन पाळून आपण अंतर्मुख होण्याचा, आपल्या आयुष्याविषयी "उद्धरेत आत्मनात आत्मानम" चा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा दिवस म्हणजे मौनाचा दिवस. मग हा दिवस नियमीतपणे जमेल तसा पाळण्याचा आणि त्याही पुढे जाऊन मौन सप्ताह आणि मौन महिना पाळण्याचाही प्रयत्न करण्याचा विचार पक्का झाला.
No comments:
Post a Comment