शुक सनकादिकी उभारिला बाहो , परिक्षिती लाहो दिसा साता II
उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर II
त्वरा झाली गरूड टाकियला मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे II
तुका म्हणे करी बहुच तातडी , प्रेमाची आवडी लोभा फ़ार II
जगात अध्यात्ममार्गाचे अत्यंत अधिकारी पुरूष शुकमुनी, सनत्कुमार आदिंनी बाहू परमेश्वराकडे पसरून त्याच्या कृपेची याचना केली, प्रार्थना केली आणि त्यांच्य़ा मनीचा प्रेमभाव पाहून तो त्यांना प्रसन्न झाला. त्यांना तो मिळाला. परिक्षिती राजाने शुकमुनींकडून केवळ सात दिवस शुध्द आणि प्रेमळ मनाने श्रीमदभागवतकथा श्रवण केली आणि त्याला तो भगवंत सात दिवसातच प्राप्त झाला. त्याला जन्ममरणाचे शुद्ध आत्मज्ञान सात दिवसातच प्राप्त झाले आणि तो मुक्त झाला. नामदेव महाराजांनी "विठ्ठल आवडी प्रेमभावो" जे लिहीलेले आहे त्याचे प्रत्यंतर देणारी ही उदाहरणे.
भगवंत हा भक्तहृदयातल्या ख-या भावाचा भुकेला असतो. त्याला इतर उपचारांची गरज फ़ारशी भासत नाही. आणि त्या सर्वेश्वराला आपला पैसा, संपत्ती आदि आपण काय देणार ? "काय मागावे परी म्या ? आणि तू ही कैसे काय द्यावे ? तूच देणारा जिथे अन, तूच घेणारा स्वभावे." ही भक्ताची भावना आहे. ही भावना या कलियुगात दुर्मिळ झालेली आहे आणि भगवंत तर त्याचाच भुकेलेला आहे.
श्री तुकाराम महाराज म्हणतात की द्रौपदीच्या आर्त हाकेला उत्तर देताना भगवंत एव्हढे उतावीळ झाले की गरूड वाहनावरून तिच्या हाकेला जाण्याच्या वेळापेक्षा ते स्वतःच तडक तिथे रवाना झालेत. गरूडाच्या वेगालाही त्यांनी भक्तहाकेसाठी मागे टाकले. भगवंत हा भक्तहृदयीच्या अंतरीचा भावाचा फ़ार लोभी आहे. त्याला आपले खरे प्रेम दिले तर आपण त्याच्यासाठी एक पाऊल टाकले तर तो हजार पावले धावत येतो हा भक्ताचा अनुभव आहे. आणि आपला अनुभव असा आहे की या युगात आपण सगळ्या भौतिक गोष्टी परमेश्वराला अर्पण करू पण शुद्ध मन त्याला अर्पण करणे ही दुर्मीळ गोष्ट आहे.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.
प्रा. राम प्रकाश किन्हीकर (१४०१२०१८)
No comments:
Post a Comment