काही काही हिंदी शब्दांचा उगम कसा झाला असावा याबाबत मला जाम म्हणजे जामच कुतुहल आहे. विमानप्रवासात ऐकू येणारा "कुर्सी की पेटी" हा शब्द त्यापैकीच एक. सीट बेल्ट ला कुर्सी की "पेटी" म्हणण्याचे काय कारण ? मला कळतच नाही. हल्ली सगळ्याच भारतीय व्यक्तींची प्रकृती सुदृढतेकडे वाटचाल करू लागल्याने "कुर्सी की पेटी बांध लीजिये" ऐवजी हवाई प्रवासात "कुर्सी को पेटी" बांध लीजिये असे म्हटले तर योग्य होईल असे मला कायम वाटत आले आहे.
या वेळी मुंबईचा प्रवास जाताना विमानाने आणि येताना दुरांतो एक्सप्रेस ने करण्याचे ठरले होते. पण भारतीय रेल्वे ने ऐनवेळी मुंबईतल्या मेगाब्लॉकचे निमित्त करून आमची दुरांतो इगतपुरीवरूनच सुटणार असल्याचे "शुभ" वर्तमान आदल्या दिवशीच कळवल्याने आमचा बेत रद्द करून परतीचेही विमानाचे तिकीट काढावे लागले. जाणे अत्यावश्यक होते. एका दिवसात मुंबईला जाऊन परतण्याचा हा माझा पहिलाच अनुभव.
आतापर्यंत विमानप्रवासाला तसा मी सरावलो होतो त्यामुळे पहिल्या विमानप्रवासात आले तसे प्रश्न येण्याची शक्यता नव्हती. मग सकाळी जाऊन दुपारी परतायचय तर माझ्या तिथल्या अभ्यासाला उपयुक्त अशी एक वही हातात पुरे असा प्रस्ताव मी मांडला. अर्थातच आमच्या घरी दोन विरूद्ध एक मतांनी तो फ़ेटाळला गेला. हातात वही फ़िरवत कॉलेजकुमारासारखे जाणे हे तितकेसे चांगले दिसणार नाही हे आमच्या कन्यारत्नाचे आणि तिच्या आईसाहेबांचे म्हणणे पडले. ( तरी मी विद्यार्थी म्हणून माझ्या आचार्य पदाच्या मार्गदर्शकांनाच भेटायला निघालो होतो हा भाग वेगळा. पण आमच्या घरात कोण माझे ऐकेल तर ना ?) शेवटी भवती न भवती करता करता एक हॅवरसॅक आमच्या पाठीवर आलीच. त्यात इतर आवश्यक गोष्टी म्हणून फ़ोनची पॉवरबॅंक, एक छोटा नॅपकीन, एक औषधांचा पाऊच आदि गोष्टी आल्यातच.
वेब चेक इन आणि बोर्डिंग पास अगोदरच घेतला असल्याने साधारण एक तास आधी विमानतळावर पोहोचलो. नागपूर विमानतळावर झालेले बदल आणि प्रवाशांची वाढलेली गर्दी नजरेत भरत होती. पूर्वी तळ मजल्यावरूनच सरळ टारमॅकवर आणि नंतर शिडीने विमानात बसण्याची सोय होती आता आधुनिक एरोब्रिज आलेत त्यामुळे पहिल्या मजल्यावर जाऊन तिथल्या प्रतिक्षागृहात थांबणे वगैरे क्रमप्राप्त होते.
तिथे अगदी महूद, औसा, माणगाव, पारोळा किंवा राजुरा बसस्टॅण्डची कळा होती. धूम्रपानाला मनाई असतानाही बाथरूममध्ये सिगरेट पिऊन सर्वत्र तो वास पसरेल याची काळजी घेणे, प्रवाशांना वाचनासाठी म्हणून मोफ़त ठेवलेल्या वर्तमानपत्रांमधली ५-५ वर्त्मानपत्रे उचलून "माझा दृष्टीकोन किती व्यापक आहे, बघा. मी सर्व मतांची वर्तमानपत्रे वाचतो." हे सहप्रवाशांना दाखवून देणे, स्वतःच्या मोबाईलमधल्य व्हॉटसऍपमध्ये आलेले व्हिडीओज जोरजोरात सर्वांना ऐकवण्याचे सामाजिन कार्य करणे असले सगळे प्रकार तिथे होतेच. फ़क्त कांबळ अंथरून काठी बाजुला आणि वाडग समोर असणारा एखादा भिकारी तिथे नव्हता. बाकी डिट्टो उपरोल्लेखित (बरेच दिवसांनी हा शब्द कामी आला) स्टॅण्डच. मोबाईल चार्जिंग पॉइंटससाठी प्रवाशांची चाललेली तगमग आणि लगबग पाहून १० वर्षांपूर्वी चेन्नई एग्मोर स्टेशनवर बघितलेल्या अशाच एका दृश्याची आठवण झाली. रात्रभर मोबाईल चार्ज न करता सकाळी सकाळी अर्धातास तर अर्धातास म्हणत विमानतळावर चार्ज करण्यात तेव्हढीच घरची वीज वाचवून विमानकंपन्यांचा वीजेचा खर्च वाढवण्याचा विचार असतो की काय ?
आता अस्मादिकही एक रिकामी जागा वगैरे बघून स्थानापन्न झालेत. बाहेर अजूनही मिट्ट काळोख असल्याने आणि आमच्यात आणि विमाने थांबण्याच्या जागेत एक काळ्या काचेचा भिंतवजा पडदा असल्याने विमानतळावर काय घडतय ते पहाण्याच्या आमच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नाहीये. एक अगदीच चित्रविचित्र केस रंगवलेला "मधु मलुष्टे" उसनी बेफ़िकीरी मिरवत प्रवेश करतोय. वय १५ ते ८५ पर्यंत केस रंगवलेले पाहण्याची सवय झालीय पण हा मामला थोडा आगळावेगळा आहे हे विमानतळावर सगळ्यांच्याच लक्षात येतय. केसांवर बर्फ़ाचा शुभ्र रंग, लाल रंग, तांब्याचा रंग आणि जांभळ्यातली एक छटा घेऊन हा नटरंग उभा झाला इंदोरला जाण्या-या विमानाच्या रांगेत.
पाठोपाठ एक सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी म्हणावी अशी ललना हातात कोकचा कॅन घेऊन, चेह-यावर मुळात नसलेला शिष्टपणा घेऊन, प्रवेशकर्ती झाली. माणस विमानप्रवासाला उगाचच बुजत, आपण फ़ार शिष्ट आहोत असा आविर्भाव दाखवत सामोरे जातात हे मला कळल. ही सुबक ठेंगणी आमच्याच विमानाच्या फ़लाटावर बसली त्यामुळे तिलाही मुंबईला जायचय हे कळल. आता आणखी एक सुट आणि त्याच्या अगदी मागोमाग अगदी झोपेतून उठून आल्यासारखा एक टी शर्ट आणि ट्रॅकसूट आला. विमानप्रवासासाठी मुद्दाम सूट घालून मिरवणे जेव्हढे निरर्थक तेव्हढेच ट्रॅकसूट नाहीतरी नुसतीच मोगली चड्डी (बर्म्युडा) घालून उसनी बेफ़िकीरी दाखवत फ़िरणेही तेव्हढेच निरर्थक हा विचार माझ्या मनाला चाटून गेला एव्हढच.
मघापासून अगम्य घोषणा सुरू आहेत. हिंदीकरणाच्या नादात ज्या माणसाने "फ़्लाइट नंबर अमुक अमुक" चे "ऊडान संख्या अमुक अमुक" करणा-या माणसानेच सगळ्या तामिळ गाण्यांच "कुची कुची रखमा" सारखी गाणी निर्र्थक हिंदीत भाषांतरीत केली असावीत अशी मला खात्रीच आहे.
आता उजाडू लागल्यामुळे आमच्याआधी इंदोरमार्गे दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान दिसू लागलेय. पाठोपाठ आमचेही एअर इंडियाचे एअर बस ए ३१९ जातीचे विमान फ़लाटावर लागतेय. दरम्यान एका पॅसेंजरच्या नावाची उदघोषणा इंडिगोकडून दोनतीनदा होतेय आणि आमच्या मागच्याच रांगेत असलेला एक ऍबसेंट माइंडेड तरूण धावतपळत विमानात बसण्यासाठी जातोय. सगळ्यांची तेव्हढीच करमणूक.
दरम्यान एअर इंडियाचीही विमानात बसण्यासाठी उदघोषणा होतेय. सुखद बाब अशी की सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरीक यांना प्राधान्याने बसू देण्याची विनंती आणि व्यवस्था होतेय. अगदी छान बाब. यासाठीतरी एअर इंडिय़ा टिकली पाहिजे, राव.
विमानात बसताना मुद्दाम उजवीकडल्या खिडकीची जागा मागून घेतली होती. मुंबईत उतरल्यानंतर पूर्ण विमानतळाचे दर्शन उजवीकडूनच होते हा माझा अनुभव. हल्ली देशांतर्गत विमानप्रवासासाठी विमानात बसल्यानंतर पेपरमिंटस, चॉकलेटस वगैरे देणे बंद केलय हे माहिती होत. लक्षमणराव देशपांडेंच "व-हाड" आठवल. "मला अकरा मिळाले" आठवल आणि हसू आले. विमान सुटण्याची वेळ झाली आणि हवाईसुंद-यांची "कुर्सी की पेटी" बांधून दाखवण्याची, पाण्यावर विमान उतरले तर काय करायचे याची नित्य नैमित्तिक प्रात्यक्षिके सुरू झाली. इतके विमानप्रवास झालेत पण दरवेळी हा कार्यक्रम सुरू झाला की माझ्या डोळ्यांसमोरून वर पाहिलेल्या National Geographic च्या "Air Crash Investigations" डॉक्युमेंटरीज क्षणात तरळून जातात. एखादेवेळी आपल्या सीटच्या खाली ते लाइफ़जॅकेट आहे की नाही हे पाहण्याचा मोहही होतो. पण दोन रांगांमधल्या इतक्या कमी जागेत डोक खाली जाऊन ते बघता येईल याची खात्री नाही हो.
विमानाने झेप घेतली. मी मात्र न लाजता काचेला नाक आणि कॅमेरा लावून बसलो होतो. मधल्या काळात खाण्यासाठी पदार्थ आलेत. जितपत ठीक असावेत तितपतच ठीक होते. ते आटोपून मी पुन्हा बाहेर बघायला लागलो. दुरून शहरे, जलाशये, कालवे नद्या दिसत होते. कुठे ओळखीच्या खुणा दिसतायत की काय ? ते बघत होतो. वरून बघताना सगळी शहरे अनोळखीच दिसतात. मग विमानाच्या दिशेवरून आणि आत्तापर्यंत झालेल्या वेळावरून शहरांचा अंदाज बांधणे सुरू होते. १० मिनीटांनी लागलेले बहुतेक अमरावती, अर्ध्या तासाने लागलेले बहुतेक जालना किंवा औरंगाबाद. मनात सगळे तर्क सुरू. विमान हळूहळू सुंदर सह्याद्रीच्या रांगा ओलांडू लागले. अमेरिकेत जसे सगळ्या प्रसिद्ध राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमा डोंगरात कोरून ठेवल्यात तसे असलेले डोंगर. आणि हळूहळू उतरण्याची तयारी सुरू झाली. पनवेल, वाशीचा पूल आणि घाटकोपरचा इस्टर्न एक्सप्रेसवे वगैरे ओळखीच्या खुणा दिसत मुंबईच्या विमानतळावर आम्ही उतरलो. एअर इंडियाची विमाने आता टी-३ टर्मीनलला नेतात. आजवर खूप ऐकलेल्या, खूप मित्रांच्या फ़ेसबुकवर बघितलेल्या टर्मिनलवर उतरलो आणि जाणवल की हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. खूप छान आहे. विमानतळावर उतरल्यावर टॅक्सीच केली पाहिजे या भीडेला मी आता मुरलो होतो. सरळ खाली येऊन बेस्टची बस पकडली आणि पुढल्या १५ मिनीटांत आमच्या महाविद्यालयात अभ्यासासाठी हजर.
मुंबईतले माझे पी. एच. डी चे काम आटोपले. मित्रमंडळी, नातेवाईक अगदी ठाण्याला, नवी मुंबईत वगैरे राहतात. त्यांच्याकडे जाऊन परतणे शक्य नव्हते. इतरही काही उद्योग नव्हते मग पुन्हा विमानतळाचा रस्ता (पक्षी : बेस्टची बस) पकडला. तब्बल दोन तास आधी विमानतळावर येऊन बसलो. बोर्डिंग पास वगैरे आधीच घेतलेला होती आणि पाठीवर हॅवरसॅकशिवाय काहीच नव्हते. म्हटल आजवर बस आणि रेल्वे फ़ॅनिंग केलेय आता फ़्लाईट फ़ॅनिंग करूयात.
आता संध्याकाळची फ़्लाईट टी-१ वरून होती. इथून सध्या देशांतर्गत उड्डाणांपैकी गो एअर, स्पाईसजेट आणि इंडिगोची विमाने उडतात आणि उतरतात. ह्या टर्मीनलचा अवतार महाराष्ट्रातल्या कुठल्याही बसस्टॅण्डला लाजवेल असा आहे. प्रवाशांनीच केलाय. विमानकंपन्या तरी काय काय करणार ना ? मी पुन्हा वरच्या मजल्यावरच्या कॅफ़ेत गेलो. खाद्यपदार्थांच्या किंमती डोळे फ़िरवणा-या होत्या आणि दुपारच्या जेवणामुळे भूकही नव्हती. कोकचा एक कॅन घेऊन काचेजवळच्या टेबलावर बसलो. पुढले दीड तास तोच कोक पुरवून पुरवून पीत मुंबईत उतरणारी, आमच्या समोरील फ़लाटांवर लागणारी विमाने निरखून बघत होतो. एव्हढ्या वेळात एअरबस आणि बोईंग विमानांमधला फ़रक निरीक्षणाने जाणून घेतला. एअरबसमध्येही ३१९ जातीची कुठली आणि ३२० जातीची कुठली यातला फ़रक ओळखायला शिकलो.
संध्याकाळचे जसे साडेसहा वाजायला आले तसे माझ्या फ़लाटावर गेलो. तिथे बरीच गर्दी विमानाची वाट बघत. दरम्यान "गो एअर" चे मेसेजेस सुरू झाले. १५ मिनीटांत प्रत्येकाला २५ मेसेजेस आल्याने माझ्यासकट बरीच प्रवासी मंडळी वैतागली. तिथल्या काऊंटरवर असलेल्या तरूणाला विचारपूस कम खडसावणे सुरू झाले. विमानाचा मात्र पत्ताच नव्हता. हे विमान म्हणे बंगलोरवरून येत आणि लगेच नागपूरसाठी निघत. मुंबईच्या आकाशात आणि धावपट्टीवर विमांनाची गर्दी असल्याने त्या विमानाला उशीर होत होता.
शेवटी संध्याकाळी ६.५० ला उडणारे विमान रात्री ८ वाजता आले. चढण्यासाठी आडगावच्या स्टॅण्डावर एस. टी. त चढायला जेव्हढी गर्दी होते तेव्हढीच आणि तशीच गर्दी झाली. फ़क्त विमानकंपनीने उतरणा-या माणसांना पहिले उतरू दिल्याने नेहमीचे डॉयलॉग्ज "अरे, अरे अरे... उतरणा-याला उतरू दे, उतरणा-याला उतरू दे." " उतरू दे काय ? जागा मिळत नाही मग. चला हो आत. ओ, मास्तर, रिझवेशन आहे का ?" हे सगळे संवाद टाळत त्याच ष्टाईलने सगळी मंडळी विमानात चढली. हे एअरबस ए-३२० विमान होते. आत १८० जागा. अगदी अडचणीच्या. खिडकीजवळ बसणारा माणूस एकदा आत गेला की "गेलाय तर खरा, निघू शकतो की नाही कुणास ठाऊक ?" अशा अवस्थेतल्या सीटस.
पुन्हा एकदा निघण्याच्या आधीच्या कवायती सुरू झाल्यात. पुन्हा एकदा मी खिडकीपाशी आणि काचेला नाक लावून. मुंबईच्या विमानतळावरील मार्गिकांमधून वाट काढत विमान धावपट्टीवर यायला तब्बल ४० मिनीटे लागली. मुंबापुरी दिव्यांनी लुकलुकताना खूप छान दिसते. पुन्हा मग खालचे लुकलुकणारे दिवे बघून खाली कुठले शहर गाव असेल याचा अंदाज सुरू झाला. विरारची जीवदानी देवी मी नक्की ओळखली. विमानात सुरूवातीला विमान कर्मचा-यांनी खाण्यापिण्याचे पदार्थ विकायला सुरूवात केली. गगनाला भिडलेल्या किंमती पाहून त्यांना फ़ारसा प्रतिसाद नव्हताच. मग "मर्कंटाइल" या गोंडस नावाखाली पॉवर बॅंक्स, गॉगल्स इत्यांदींची विक्री त्यांनी सुरू केली. मला एकदम डेक्कन क्वीन, पुणे इंटरसिटी इत्यादी प्रवासात विकायला येणारे फ़ेरीवाले आठवलेत. इथे जमिनीपासून ३६००० फ़ुटांवर या फ़ेरीवाल्यांना मिळणा-या प्रतिष्ठेत आणि जमिनीवरच्या फ़ेरीवाल्यांना मिळणा-या प्रतिष्ठेत जमीन अस्मानाचा फ़रक असणारच ना.
नागपूर आल्यावर जाणवल की रात्री आपल नागपूरपण मुंबापुरीइतकच किंबहुना काकणभर सरसच सुंदर दिसतय.विमान कंपनीने उशीर झाल्याबद्दल व्यक्त केलेली दिलगिरी सहर्ष स्वीकारत तब्बल रात्री दहा वाजता नागपूर विमानतळावर उतरलो तेव्हा आजच्या अनुभवांच खूप गाठोड जमा झाल होत. शरीराने थकलो होतो पण मन प्रफ़ुल्लित होते.
No comments:
Post a Comment