करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे I
कळावे त्यासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साचा अंगी I
अतिशया अंती लाभ किंवा घात, फ़ळ देते चित्त बीजा ऐसे I
तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार लावी I
श्रीतुकोबांसारख्या संतांनी परमेश्वराच्या भक्तीमधल्या अवडंबराचा कायम विरोध केला आहे. कामेष्णा, वित्तेष्णा आणि लोकेष्णा (कामाविषयी अती आवड, धनाविषयी अती आवड आणि लोकांच्या मान्यतेविषयी अती आवड हे तीन ताप म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. मनुष्यमात्राला मुक्त होण्यापासून या तीन गोष्टी अडथळा करतात अशी मान्यता आहे.) या गोष्टी टाळून साधकांनी पुढे मार्गक्रमण करावे ही श्रीतुकोबांची तळमळ आहे. म्हणून ते म्हणताहेत की आपण किती पूजा, उपासना करतो, कशी करतो याचे प्रमाण आपल्या मनातच ठेवावे. लौकिक मानासाठी तिचे प्रदर्शन करू नये.
शास्त्रांमध्ये तर मानसपूजेचेच महत्व वर्णिलेले आहे. शरीराच्या कसल्याही अवस्थेत, कसलेही बाह्य उपचार न लागणारी साग्रसंगीत पूजा, मानसपूजेच्या माध्यमातूनच पूर्ण होत असते. पण आजकाल आम्ही कशी मानसपूजा करतो हे सुद्धा दाखवण्याची फ़ॅशन येऊ पाहतेय. त्याकाळात हा श्रीतुकोबांचा उपदेश किती आवश्यक आहे बघा.
श्रीतुकोबा साधकांना सांगताहेत की आपल्या वैयक्तिक पूजेसंबंधी, वैयक्तिक साधनेसंबंधी गोष्टी लोकांसमोर उघड करणे आवश्यक नाही याचे कारण म्हणजे ज्या परमेश्वराला ते कळायचे आहे त्याला ते कळलेले आहे. ज्याच्यासाठी आपण ही सगळी आटाआटी, हे सगळे उपचार करतो आहोत, त्याला आपल्या अंतरीचा भाव लक्षात आला आहे आणि ते कळले आहे. सच्चा भाव एक सच्च्या परमेश्वराशिवाय कोण बरे ओळखू शकणार ?
"अती सर्वत्र वर्जयेत", एखाद्या गोष्टीचा अतिरेक करू नये हे आपल्या शास्त्रांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहेच. श्रीतुकोबाही आपल्याला आपल्या उपासनेसंदर्भात हेच बजावून सांगताहेत. अती, किंवा खूप हट्टाने केलेल्या उपासनेची जशी चांगली फ़ळे असतात तशीच तीव्र स्वरूपाची घातकच फ़ळे मिळू शकतात कारण आपले चित्तात जर उपासनेचे बीज लावताना त्यामध्ये अपसंकल्पांची, बीजे लावल्या गेलीत तर फ़ळही त्याच स्वरूपाचे घातक मिळेल.
म्ह्णून श्रीतुकोबा आपल्या सर्व साधक मंडळींना ही लोकेषणा सोडून कळवळ्याने उपदेश करताहेत की बाबांनो ज्या साधनेने, उपासनेने समाधानी चित्त राहील ते साधन, ती उपासना दृढ करा. तीच तुम्हाला जीवनात उद्धरून नेईल आणि पैलतीराला लावून देईल.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.
प्रा. राम प्रकाश किन्हीकर (११०२२०१८)
No comments:
Post a Comment