माहूरला गेलो की रेणुका शिखर सोबत श्री दत्त शिखर आणि अनुसया शिखर येथेही नेहमी जाणे व्हायचेच. गेल्या दोन तीन वर्षात श्री दत्त शिखर आणि अनुसया शिखर कडे जाणा-या रस्त्याचे काम सुरू असलेले दिसल्याने तिकडे जाण्याचा विचार टाळून रेणुका शिखरावरूनच दोन्ही पीठांना नमस्कार करून येत होतो.
यावेळी मात्र रस्ता ब-यापैकी झालेला दिसला आणि आम्ही या दोन्ही ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. दत्त शिखरवर आम्ही बालपणी जायचो ती माहूर-रेणुका-अनुसया शिखर-दत्त शिखर-माहूर ही लोकल फ़ेरी दत्त शिखरला उभी दिसणे हा एक आनंदाचा गाभा असतो. आमच्या बालपणी ’टाटा’च्या राज्यात वाढलेल्या आम्हा भावंडांना लेलॅंण्डच्या गाड्यांचे आणि त्यांच्या एंजिन फ़ायरिंगच्या आवाजाचे विशेष आकर्षण असायचे.
बालपणी नेहेमी माहूर गावातून गडावर आणि दत्त व अनुसया शिखरपर्य़ंत सोडणारी ही गाडी आमची लाडकी होती. त्यावेळी या गाडीच्या सतत फ़े-या सुरू असायच्यात. एका फ़ेरीने रेणुका शिखरपर्य़ंत येऊन पुढल्या फ़ेरीपर्य़ंत तिथेले दर्शन आटोपून आम्ही पुढल्या दोन्ही ठिकाणांसाठी रवाना होत असू. गाडीपण अनुसया शिखरला भाविक चढून उतरून परतेपर्य़ंत खाली वाट बघत उभी असायची. दत्त शिखरलाही भाविकांचे दर्शन होईपर्य़ंत ड्रायव्हर काकांचा तिथे नाश्ता (बहुतेक कढी-आलुबोंडा किंवा फ़ोडणीची खिचडी) होऊन जायचा.
या वेळेसही ही गाडी तिथे उभी दिसली आणि आमचा आनंद गगनात मावेना. गाडी थांबवून, कुटुंब गाडीतल्या वस्तू (पाण्याची बाटली वगैरे) बाहेर काढेपर्यंत, अक्षरशः बसकडे धावलो आणि वेगवेगळ्या ऍंगलने फ़ोटो काढलेत. नागपूर कार्यशाळेत बनलेल्या थोड्या लेलॅण्ड गाड्यांपैकी ही एक गाडी. नांदेड विभागाचे व्यवच्छेदक लक्षण असलेले पिवळे ग्रील घेऊन भर उन्हात चमकत उभी होती. जुनी असली तरी व्यवस्थित निगा राखलेली ही गाडी आहे ही गोष्ट तिच्याकडे पाहूनच लक्षात येत होती.
पुलंना जसा प्रश्न पडला होता की "सगळे कल्हईवाले जाकीट का घालतात ? किंवा सगळ्या पानवाल्यांकडच्या कात्र्यांची टोके मोडकीच का असतात ?" तसा मलाही प्रश्न पडलाय की महाराष्ट्र एस. टी. तल्या सगळ्या लेलॅण्ड गाड्यांचे एक इंडिकेटर फ़ुटकेच का असते ?
बालपणी पुसद - दत्तशिखर - माहूर अशी टाटाची फ़ेरी असल्याचे आणि त्यात प्रवास केल्याचेही स्मरते.
परतताना आर्वी - लातूर या, मी कधीही न पाहिलेल्या, रूटवरची (बहुधा हंगामी गाडी असावी) गाडी दिसली. आर्वी - पुलगाव - यवतमाळ - आर्णी - महागाव - उमरखेड - हदगाव - नांदेड - औसा - हमदपूर - लातूर या मार्गावरची ही गाडी. जशा नागपूर कार्यशाळेने फ़ार थोड्या लेलॅण्ड बांधल्यात तशा औरंगाबाद कार्यशाळेने फ़ार थोड्या टाटा गाड्या बांधल्यात. त्यातलीच ही एक. या (एम. एच. २० - बी. एल. ४२XX) सिरीजच्या बहुतांशी गाड्या विदर्भात भंडारा विभागात मिळाल्यात. आर्वी आगाराला मिळालेली ही एक दुर्मीळ गाडी.
आणखी एक दुर्मीळ गाडी. दारव्हा - आर्णी - माहूर हा कमी पल्ल्याचा मार्ग. या मार्गावर साधी गाडी न दिसता जलद गाडी दिसणे दुर्मीळच. त्यातही या सिरीजची (एम. एच. ४० - ८७XX) ३ बाय २ आसनी व्यवस्थेची जुनी गाडी म्हणजे दुर्मीळच. ही सिरीज माझ्या आवडत्या सिरीजपैकी एक. ८६XX आणि ८७XX सिरीजमधल्या गाड्यांची बांधणी मजबूत होती. दिसायलाही या देखण्या होत्या.
य. दारव्हा आगाराची जुनी पण तरीही देखणी गाडी.
आणखी एक नवीनच रूट बघायला मिळाला. हा सुद्धा हंगामी असावा. गडचिरोली - पुलगाव ही पुलगाव आगाराची गाडी. मार्गे चंद्रपूर - भद्रावती - वरोरा - जांब - हिंगणघाट - वर्धा - देवळी असावी. बोर्ड नीट वाचता आला नाही. हिंगणघाट - वायगाव - देवळी असा वर्धेला बायपास करणारा सरळ रस्ता असताना वर्धेला जाणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे असावे.
हा रूट मात्र अगदी आमच्या बालपणापासून आम्ही बघतोय. जवळपास ४० वर्षांपासून. राजुरा - पुसद.
राजुरा डेपोची ब-यापैकी गाडी या रूटवर असते. राजुरा - बलारपूर - चंद्रपूर - भद्रावती - वरोरा - वणी - उमरी - यवतमाळ - दारव्हा - पुसद. टिपीकल चंद्रपूर विभागाचा बोर्ड आणि चंद्रपूर विभागाची सिग्नेचर असलेली आकाशी ग्रील आणि आकाशी बंपर.
दिल खुश हो गया रे.
MAST!!! SIR, KEEP WRITING...!
ReplyDeleteThank you for your encouragement.
DeleteExcellent!!!!
ReplyDeleteThank you, Sir.
Delete