Tuesday, July 30, 2019

चिंतनीय काही - २ (समाज जीवनातले आणि समाज मनातले बदल)

२०१२ ते २०१७ ही पाच वर्षे महाराष्ट्रातच, पण निम शहरी भागात गेली. सांगोला आणि शिरपूर ही अनुक्रमे सोलापूर आणि धुळे जिल्ह्यातली तालुक्याची गावे होती. आणि त्यातही दोन्ही ठिकाणी आमचा मुक्काम हा त्या त्या महाविद्यालयांनी दिलेल्या रहिवासात व मुख्य म्हणजे महाविद्यालयाच्या परिसरातच असल्याने नागर जीवनाशी रोजचा संपर्क जवळपास नव्हताच. आठवडा पंधरवाड्याला खरेदी / सिनेमा बघण्यासाठी सांगली, सोलापूर, धुळे, नाशिक किंवा इंदूर इत्यादी शहरांच्या फ़े-या व्हायच्यात, नाही अस नाही पण त्या भेटी फ़ार चुटपुटत्या असायच्यात. समाजजीवनात काय चाललय याचा फ़क्त काठावरून अंदाज यायचा, त्याचे परिणाम फ़ारसे भोगावे लागले नव्हते.

२०१७ मध्ये नागपूर महानगरात पुन्हा एकदा प्रवेशकर्ते झालोत आणि नागर जीवन पुन्हा सुरू झाले. सभा, समारंभ, धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे सुरू झाले आणि जाणवले की गेली साडेचार पाच वर्षे आपण या जीवनापासून बाहेर होतो आणि यात एव्हढे झपाट्याने बदल झालेले आपल्याला दिसले मात्र नाहीत. आश्चर्य, उव्देग, हतबलता या सर्वांचे मिश्रण आमच्या भावनांमध्ये झाले. दहा लोकांमध्ये या गोष्टी बोलाव्या का बोलू नयेत असा प्रश्न बराच काळ पडला होता. कारण ज्या समाजात, मंडळींमध्ये वावरायच आहे, त्यांच्याच मधल्या उणीवांवर बोट ठेवणे माझ्यासारख्या नेमस्त स्वभावाच्या माणसाला जरा अवघड होते. "लोकाचारे वर्तावे, अलौकिक नोहावे" या समर्थ वचनांना जागणारे आम्ही. कशाला उगाच लोकांच्या फ़ाटक्यात पाय घाला ? या विचाराने गप्प बसत होतो. बर पुलंच्या असा मी असामी तले भिकाजीपंत जोशी आपल्या मुलाला धोंडोपंताला उपदेश करतात तो ही आम्हाला अगदी तोंडपाठ. " बेंबट्या, शिंच्या, चार लोक वागतील तसे वागावे. तीर्थात मुंडण आणि कोर्टात भांडण न लाजता करावे." 

पण मग हळूहळू या प्रथा समाजजीवनाचे अभिन्न अंग बनून जायला लागलेल्या पाहिल्यात. आणि हीच जणू आपली संस्कृती असली पाहिजे ही नव्या पिढीची धारणा बघितली आणि श्रीतुकोबा आठवले. 
"सत्य असत्याशी, मन केले ग्वाही, मानियेले नाही, बहुमता" 
आणि मग या प्रकारांना वाचा फ़ोडायची ठरवली. उद्या ही प्रथा समाजात रूढ जरी झाली तरी याविषयी एका व्यक्तीने कधीकाळी क्षीण आवाज उठवला होता याची नोंद होईल. न जाणो, आपल्यासारखे समानधर्मीही अनेक असतील. या वाचा फ़ोडण्यामुळे ते एकत्र येतील आणि हे समाजजीवनाचे चक्र आपण योग्य रीतीने फ़िरायला लावूही शकू म्हणून हा लेखप्रपंच.

आजकाल सगळ्या धार्मिक, सामाजिक समारंभामध्ये मी बघतोय की जमिनीवर मांडी घालून बसणे हे कमीपणाचे लक्षण मानले जायला लागलेय. आजकाल सर्व मुलांना त्यांच्या बालपणापासूनच घरी आणि शाळेतही टेबल-खुर्ची वर बसण्याची सवय असल्याने असेल कदाचित आणि आपण सर्वांनीच जेवणासाठी डायनिंग टेबल चा स्वीकार बिनबोभाट केलाय त्यामुळेही असेल कदाचित पण मांडी घालून, पालखट मारून बसणे आपल्याला जमत नाही आणि कमी दर्जाचे वाटते. बहुतांश सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना हे माहिती असते त्यामुळे बैठक व्यवस्था तशी असतेच पण धार्मिक कार्यक्रमांमध्ये कधी खाली सतरंज्या, गाद्यांवर बसण्याची वेळ आलीच तर जनता नाखुष असते हा माझा आजकालचा अनुभव.

बर ज्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे जमत नाही किंवा काही तरूण, मध्यमवयीन मंडळींना काही वैद्यकीय कारणांमुळे जमत नाही त्यांच समजू शकतो पण या प्रकाराचे सरसकटीकरण झालेय हा माझा स्पष्ट आरोप आहे. ज्यांना सहज खाली (सतरंजी , गाद्यांवर वगैरे) बसून कार्यक्रम ऐकणे शक्य आहे ती मंडळी मग अशा शारिरीक व्याधींनी ग्रस्त वृद्ध व तरूण मंडळींसाठी राखीव खुर्च्यांवर पहिल्यांदा बसून जातात आणि ज्याला खरच गरज आहे त्या श्रोत्यांसाठी धावत पळत निराळी व्यवस्था करावी लागण्याचे प्रसंग येतात.

मांडी घालून बसून अभ्यास, जेवण करण्याचे, काही मनन करण्याचे काय फ़ायदे आहेत ? यावर भारतीय आणि पाश्च्यात्यांनी विपुल संशोधन केले आहे पण तरीही खुर्ची आम्हाला इतकी प्रिय का ? या बुचकळ्यात मी पडतो. बहुतेक सर्वपक्षीय राजकारण्यांचा प्रभाव असावा.

जी गोष्ट साध्या बसण्याची तीच संडासची ही. अगदी १० % वृद्ध आणि आजारी मंडळी भारतीय पद्धतीचा संडास वापरू शकत नाहीत हे वास्तव आहे. पण मग सगळ्याच भारतीयांना कमोड सिस्टीमचा संडास सोयीस्कर का वाटायला लागला ? हे मला न उलगडलेले कोडे आहे. भारतीय पद्धतीने उकीडवे बसून मलनि:सारण करण्याच्या पद्धतीमुळे पोटावर व्यवस्थित दाब पडून मलनि:सारण अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि ज्याचा कोठा साफ़ त्याला विविध प्रकारचे आजार जडण्याचा धोका फ़ार कमी असतो हे आयुर्वेदाने सांगितलेले आहे आणि आधुनिक वैद्यकशास्त्रानेही सिद्ध केले आहे आहे. मग हा पाश्चात्यांच्या अंधानुकरणाचा हव्यास का ? नवीन बांधणा-या घरांमधून तर आपण भारतीय बैठकीचा संडास हद्दपार केलेला आहेच पण जुन्या घरांचीही तोडफ़ोड करून कमोड बसवून घेण्याचा हव्यास म्हणजे मला मौज वाटते.

साधारण ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घरोघरी एक टूम आली होती. एकेकाळी आपल्या घरी असलेली तांब्या पितळेची जुनी मोठमोठाली भांडी मोडीत काढण्याची फ़ॅशनच आली होती म्हणाना. त्या भांड्यांमधे तो तांब्या / पितळेचा पाणी तापविण्याचा बंबही सामील होता. त्या बदल्यात स्वयंपाकासाठी आणि वापरासाठी स्टेनलेस स्टीलची चकचकीत भांडी आपण वापरात आणली. आज ३० वर्षांनी पुन्हा एकदा तांब्याच्या भांड्यांतून पाणी पिण्याचे, काश्याच्या ताट वाटीतून जेवण करण्याचे फ़ायदे आपल्या लक्षात यायला लागलेत आणि आपण पुन्हा तेच तांबे / पितळ अत्यंत महागड्या भावाने विकत घेऊन घरी ठेवायला लागलो. तीच मौज मला आज या कमोडच्या हव्यासाची वाटते. त्यात गरज किती ? आणि अंधानुकरण किती ? हा भाग आपण विचारातच घेत नाही. उद्या अमेरिकेतून भारतीय बैठकीच्या संडासाची फ़ॅशन आली की आपण आपले कमोड हद्दपार करून पुन्हा भारतीय बैठकीकडे वळायला मोकळे.

पाश्चात्य पद्धतीच्या आणि आपल्या आहारामध्ये खूप फ़रक आहे रे बाबांनो. आपला आहार वेगळा मग आपली मलनि:सारण करण्याची बैठकही वेगळीच हवी. बर पाश्चात्य देशांमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेला किती महत्व देतात ? त्यातल एक शंभरांश तरी आपण इथे देतो का ? मग त्यांचे या बाबतीत अंधानुकरण का ? 

आणि मला खटकलेली तिसरी गोष्ट म्हणजे गेल्या १० वर्षातले लग्न समारंभातले अफ़ाट आणि निरर्थक खर्चाचे प्रमाण आणि लग्न समारंभ सादर करण्याची बदललेली पद्धती. हा एक आप्त स्वकीयांचा आनंद सोहळा, दोन कुटुंबियांच्या जिव्हाळ्याचा सोहळा, संस्कारांचा सोहळा हे सगळे स्वरूप आता आपणच कालबाह्य ठरवीत चाललोय. पंजाबी संस्कृतीच्या आक्रमणाखाली (आज कुठलाही हिंदी सिनेमा घ्या. "तुस्सी, मैनू, गल, पैरी पौना, कुडी, मुंडा" अशा शब्दांशिवाय एकही गाणे नसते.) आपण अगदी कोरिओग्राफ़र आणून, डीजे लावून नाच बसवून, सीमांतपूजनाऐवजी मेहेंदी व नाच समारंभ करायला लागलोय. अरे, पंजाबी लोकांच्या अंगातच ती नाचाची लय असते रे. साधा ढोल जरी वाजायला लागला तरी त्यांच्यातला एकेक उठून नाचायला लागतो आणि ते छान दिसतही. इथे अगदी साठी सत्तरीला आलेल्या वरमाय, वधूमाय आणि त्यांचे नवरेही (जे जन्मात कधी नाचले नाहीत) त्या कोरिओग्राफ़र ने बसवलेल्या तालावर नाचावर नाचताना अतिशय कृत्रिम आणि हास्यास्पद दिसतात हे आपल्या लक्षातच येत नाही. (लग्नाचा व्हीडीओ बघताना लक्षात आले तरी पैसे अक्कलखाती जमा करून गप्प बसत असावेत.) बर हे सगळ त्या सीमांत पूजनाच्या जीवावर. "आम्ही सीमांतपूजनाला फ़ाटा दिलाय" हे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. आपल्याच संस्कृतीला न ओळखता पुरून टाकून, वर मोठ्या अभिमानाने त्याचा उच्चार करणारी एकमेव जमात आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांची असावी. इतर कुठल्याही प्रांतात आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या लग्न समारंभाशी अशी तडजोड खपवून घेतली जात नाही. 


लग्नाच्या वरातीत तर मग काय मज्जाच असते. "खरतर बॉलीवूडमध्येच सरोज खान, वैभवी मर्चंट, शामक दावर च्या हाताखाली नाच शिकायला जायच होत पण आईवडीलांच्या विरोधामुळे इथे खितपत पडलोय." अशा मनोवृत्तीची मुले, मुली, माणसे, बायका, बाप्ये, धगुरड्या बायका सगळे वरातीतल्या मुलासमोर आणि भर रस्त्यातल्या गर्दीसमोर आपली जन्मभराची हौस भागवून घेत असतात. वरात भर उन्हात जातेय, त्या टेरीकॉटसदृश शेरवानीच्या कापडात आणि ४५ अंश तापमानात तो नवरदेव घामाघूम होतोय आणि हा सगळा हिडीसपणा संपण्याची वाट बघतोय, मुहूर्ताची वेळ टळून चाललीय, रस्त्यातली इतर गर्दी त्रासतेय, कुचेष्टेने आपल्याकडे बघतेय इत्यादी काहीही विचार कुणाच्याच मनात नसतात. बस माझा परफ़ॉर्मन्स आणि मी. अरे आपला आनंद हा इतरांच्या दु:खाला कारण ठरतोय याच थोड तरी भान ? 

बर या समारंभात आनंद, आप्तांसोबत सुखदु:खाच्या गप्पा, मनमोकळेपणा इत्यादी लोप पावत चाललाय. आपल्या श्रीमंतीचे हिडीस प्रदर्शन हे एव्हढेच यातून होत आहे. त्यातून मत्सर, हेवेदावे, शिव्याश्राप आणि लग्नमंडपातच कटकारस्थाने (मराठी सिरीयल्सची ही देणगी) हे सगळे दिवसेंदिवस वाढीला लागतेय. बाबांनो, विचार करा. आपण जो अफ़ाट खर्च आजकाल लग्नसमारंभात करतोय त्यातला आवश्यक किती ? आणि केवळ प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी केलेला किती ? आजकाल होणा-या साक्षगंधाच्या खर्चामध्ये दोन गरीब कुटुंबातल्या मुलींची लग्ने सहज पार पडतील. जुन्या काळी मुलांची मुंज लावताना "एका मुलाचीच मुंज लावू नये" हा दंडक होता. मग एखाद्या कुटुंबात दोन मुले असतील तर दोघांची मिळून मुंज लावली जाई. आणि एखाद्या सधन कुटुंबातल्या एकुलत्या एक मुलाची मुंज लावताना सोबतच एखाद्या गरीब घरच्या मुलावरही त्याच खर्चात हा मुंजीचा संस्कार होई. किती चांगला दंडक होता नाही ? तोच दंडक आपण आपल्या मुला मुलींच्या लग्नातही वापरायला काय हरकत आहे ? तेव्हढ्याच खर्चात एखाद्या गरीब घरच्या मुला मुलीचे लग्न त्याच मांडवात होऊ शकत असेल तर तो पुढाकार आपण घ्यायला काय हरकत आहे ?

"नव्या मनूतील नव्या युगाचा शूर शिपाई आहे" म्हणणारे केशवसुत आपण जुने करून टाकलेत. त्यांचे नवीन विचार अंगीकारायला काय हरकत आहे ? आपली संस्कृती, परंपरा न सोडता नवीन मानवतावादी विचार अंगीकारायला अडचण ती कुठली ?

असो, गेल्या ४ - ५ वर्षातल्या अस्वस्थ करणा-या या काही गोष्टी आज इथे मांडल्यात. त्यावर साधक बाधक विचार व्हावा ही नम्र विनंती.


1 comment:

  1. अगदी खरं. नेमक्या शब्दांत आणि परखंड पणे लिहिलंय. पुष्कळांना कळतंय पण वळत नाहीये. ते वळांव अशी अपेक्षा.
    अभिनंदन सर.

    ReplyDelete