Sunday, May 31, 2020

एस. टी. च पण महाराष्ट्रातली नव्हे : एक भन्नाट आणि अविस्मरणीय अनुभव.

इसवी सन २००६. माझे मामा, मामी, माझ्या दोन मामे बहिणी, जावई, माझी भाचेमंडळी, माझा मामेभाऊ, मी, माझी पत्नी, माझी आई आणि मुलगी असे १४ जण आम्ही उत्तर भारताच्या प्रवासाला निघालो. नागपूर ते दिल्ली आणि मग दिल्ली ते जम्मूतावी करून आम्ही माता वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायला कटराला जायला जम्मूतावी स्टेशनवर उतरलो.
हा सगळा प्रवास आमचा आम्हीच आखलेला असल्याने आणि आमच्यापैकी सर्वच जण याठिकाणी पहिल्यांदाच आलेले असल्याने पुढे जायची काय व्यवस्था आहे ? याची कुणालाही कल्पना नव्हती. फ़क्त जम्मू ते कटरा हे साधारण २ तासांचे अंतर आहे आणि जम्मू स्टेशनबाहेरून तिथे जायला बसेस, टॅक्सीज वगैरे मिळतील अशी ऐकीव माहिती आम्हाला होती. मग एव्हढ्या १४ मा्णसांनी त्यांच्या सामानसुमानासह इकडे तिकडे शोध करण्यापेक्षा सगळ्यांना स्टेशनवरच थांबवून मी आणि माझा मामेभाऊ बस / टॅक्सी शोधायला स्टेशनबाहेर पडलोत. माझा हा मामेभाऊ सुद्धा माझ्यासारखाच बसफ़ॅन. वयात केवळ एकाच दिवसाचा फ़रक असल्याने आणि बालपणापासून एकत्रच वाढल्याने आम्ही दोघेही एकमेकांची कंपनी खूप ऍन्जॉय करत आलोय.
भर दुपारची वेळ. बाहेर पडल्यावर स्टेशनला लागूनच जम्मू काश्मीर राज्य परिवहनचे शासकीय बसस्थानक, थोड्या दूर अंतरावर खाजगी बसेसचे बस स्थानक आणि त्याला लागूनच टॅक्सी स्टॅण्ड. १४ जणांसाठी जवळपास ३ टॅक्सीज आम्हाला लागल्या असत्या आणि एकेक टॅक्सीचे तत्कालीन दर ऐकता आम्ही काढता पाय घेतला. खाजगी बस स्थानकावर पण फ़ारसा उत्साहवर्धक प्रतिसाद नव्हता. खरेतर जम्मू ते कटरा हा अतिशय व्यस्त मार्ग, त्यात एकदम १४ पॅसेंजर्स मिळताहेत म्हटल्यावर प्रतिसाद उत्साहवर्धक असायला हवा होता. पण "अभी कोई बस नही. उधरसे आयेगी तो जायेगी." वगैरे टोलवा टालवी सुरू होती. कदाचित टॅक्सीवाल्यांशी त्यांचे साटेलोटे असावेत कारण दोन तीन रिकाम्या बसेस समोर उभ्या असूनही ते आम्हाला टॅक्सी घ्यायला सुचवीत होते.
थोड्या काळजीतच आम्ही दोघेही शासकीय बसस्थानकाकडे वळलोत. एक दोन मिनी बसेस उभ्या होत्या पण त्या भलत्याच ठिकाणी जाणा-या होत्या. "क्यो, कटरा जानेवाली कोई बस अभी नही है क्या ?" अशी पृच्छा आम्ही तिथल्याच एका मिनी बसच्या ड्रायव्हरला केली. मग त्यांनी आम्ही किती प्रवासी आहोत ? कधी निघणार ? वगैरे साग्रसंगीत चौकशी वगैरे केली आणि लगेच त्याच्या गाडीत बसलेल्या दोन तीन प्रवाशांना "अभी ये बस अलग जगह जायेगी" म्हणून उतरवून दिले. लगोलग बसचा बोर्डही काढून टाकला.


जम्मू ते कटरा मार्गावर एका शुद्ध शाकाहारी धाब्यावर थांबलेलो असताना काढलेला फ़ोटो.

आम्ही पळतपळतच स्टेशनवर आलोत. सगळ्यांना घेऊन लागूनच असलेल्या बसस्टॅण्डवर पोहोचलोत. ड्रायव्हरसाहेबांनी तोपर्यंत दोन तीन क्लीनर मुले जमवून ठेवली होती. आम्हाला पाहिल्यावर आमच्या हातातले प्रवासी सामान त्यांनी अक्षरश: दस-याचे सोने लुटल्यासारखे लुटायला सुरूवात केली. सुरूवातीला भिती वाटली पण आपल्या हातातली बॅग बसच्या टपावरच जातेय हे बघून समाधान वाटत होते. प्रवासी डाग वर टपावर ठेवण्याचे प्रत्येकी दोन रूपये घेऊन ती क्लीनर मुले निघून गेलीत.
मग आमची जम्मू काश्मीर एस टी निघाली. वाटेत क्षुधाशांती करायला एक छानसा ढाबाही आमच्या ड्रायव्हरसाहेबांनी सुचवला आणि बस तिथे थांबवली. संपूर्ण शाकाहारी जेवण देणारा तो ढाबा आणि तिथले जेवण छान होते. साधारण दोन अडीच तासांनंतर आम्ही कटरा मुक्कामी पोहोचलोत. आमच्या मुक्कामाची व्यवस्था आम्ही ऐनवेळी करणार असल्याचे ड्रायव्हरसाहेबांना कळले होते. त्यामुळे दोनतीन ठिकाणे त्यांनीच सुचवलीत आणि नुसती सुचवलीच नाहीत तर त्या ठिकाणापर्यंत बस नेऊन आमच्यासोबत ते पण त्या लॉजच्या मालकाशी वाटाघाटी करू लागायचेत. शेवटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आमच्या मुक्कामाच्या वाटाघाटी सफ़ल झाल्यात.
पुन्हा त्यांनी दोन तीन क्लीनर मंडळी जमवून आमचे सामानसुमान उतरवून दिले. आणि जाताना विचारले, "साब कल कितने बजे निकलना है जम्मू के लिए ? वैसे मै बस लगा दूंगा."
या सर्व प्रवासाचे भाडे म्हणाल तर राज्य शासन एका प्रवाशाकडून जम्मू ते कटरा प्रवासासाठी आकारेल तेव्हढेच प्रत्येकी भाडे त्यांनी घेतले होते. विशेष बसचे भाडे वगैरे त्यांनी घेतले नाही. परतीचा प्रवासही आम्ही त्यांच्याच बसने केला.
महाराष्ट्र एस टी च्या व्यवस्थित कारभारात ऐनवेळी बसचा मार्गफ़लक बदलून प्रवाशांच्या सोयीनुसार दुस-या ठिकाणी जाण्याचा आणि प्रवाशांसाठी एव्हढे खपण्याचा उपाय कधीही बसला नसता. शेवटी प्रवासात वेगवेगळी संस्कृती अनुभवायला मिळते आणि हा जम्मू काश्मीर एस. टी. चा महाराष्ट्र एस. टी. पेक्षा खूप वेगळ्या संस्कृतीचा अनुभव आम्ही खूप ऍन्जॉय केला.

- राम प्रकाश किन्हीकर (21052020)




No comments:

Post a Comment