जीहाल मस्किन मै कुन ब रंजिस,
बेहाल हिजरा बेचारा दिल है.
सुनाई देती है जिस की धडकन,
तुम्हारा दिल या हमारा दिल है.
इ. स. १९८५ मध्ये आलेल्या गुलामी ( लिहीताना Ghulami. बाकी हे हिंदी फ़िल्लमवाले कुठल्याकुठल्या कुडमुड्या ज्योतिष्यांचे ऐकून स्वतःच्या आणि सिनेमांच्या स्पेलिंगमध्येही जो घोळ घालतात तो एका निराळ्या लेखाचा विषय आहे.) सिनेमातले हे गीत. तेव्हा आम्ही चांगले ८ व्या ९ व्या वर्गात होतो. ब-यापैकी हिंदी - संस्कृत शिकलेले होतो. पण तरीही यातले फ़क्त "सुनाई" , "तुम्हारा" , "हमारा" आणि "दिल" या चार शब्दांचे अर्थ आम्हाला त्याकाळी उमजत होते. बाकी शब्दांच्या बाबतीत आम्ही अक्षरशः अडाणी होतो. आणि या बाकी शब्दांचे अर्थ, ३५ वर्षांनंतर, आजही कळत नाहीत. मग कसे आमच्या हृदयात बॉलीवूडमध्ये हिरो वगैरे बनण्याची स्वप्ने उमटणार ? एक स्वप्न उमलण्यापूर्वीच त्याची अशी हत्या झाली तर काय त्या भयंकर शब्दांना ओवाळायचय ?
बाकी बॉलीवूडमध्ये जा्वे असे वाटणारी आमची शरीरयष्टी नव्हती आणि घरचे वातावरणही नव्हते. आमचे वजन वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत ४० किलोग्रॅमचा आकडा ओलांडू शकले नव्हते. त्यामुळे हिरो सारखी पर्सनॅलिटी वगैरे करणे हे आमचे दूरदूरपर्यंत स्वप्नही नव्हते. आमच्या बालपणी सगळेच हिरो विपुल केशसंभार बाळगीत पण आमच्या घरी आमच्या केसांविषयी "कटिंग करायची तर लोकांनी विचारले पाहिजे काय रे परवाच मुंज झाली का ? इतके बारीक केस हवेत, असे धोरण. "केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा, ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा" हा उपदेश नुसता आमच्या शाळेच्या भिंतींवर टांगला होता असे नव्हे तर आमच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या अगदी मनावर कोरला गेला होता. त्यामुळे होईवरचे केस कान झाकेपर्यंत वाढवणे वगैरे थेर आम्हाला करायला मिळणे शक्यच नव्हते. (बाकी ते असे कान झाकणारे केस, तो बेलबॉटम पॅंट वगैरे घालून ते बच्चन, विनोद खन्नादि महानायकही त्याकाळी अगदी बेंगरूळ दिसायचेत हं. त्यांच्यापेक्षा घट्ट पांढरी पॅंट, चमचमणारा पांढरा शर्ट आणि त्यावर चकचकीत पांढरे शूज घालणारा जितेंद्र किंवा मिथून थोडेतरी सुसह्य व्हायचेत.)
आमच्या बालपणी "मायापुरी" नामक बॉलीवुडला वाहिलेले आणि फ़क्त हेअर कटिंग सलूनमध्येच वाचायला मिळणारे एक नियतकालिक होते. मी कुणाच्याही घरी मोठ्या हौसेने "मायापुरी" चे सबस्क्रीप्शन घेतलेले पाहिले नाही. त्याकाळी कुठले नियतकालिक कुठे वाचल्या गेले पाहिजे याबद्दल लोकांच्या भूमिका अगदी स्पष्ट होत्या. जसे आज "नवाकाळ, पुण्यनगरी, संध्यानंद" (शेवटचा "द" पूर्ण म्हणायचा नाही बरका, नुसते आपले "संध्यानं") वगैरे दैनिके मुंबईच्या लोकलच्या प्रवासातच आणि शेजारच्याच्या पेपरात डोके खुपसून सामूहिक वाचली गेली तरच मजा येते. मुंबईतल्या कुठल्याही मल्टिनॅशनल कंपनीच्या ऑफ़िसमध्ये ही दैनिके वाचत बसलेले साहेब पहायला मिळणे अती विरळा.
त्या मायापुरीत ब-याचदा बॉलीवुडचा हिरो होण्यासाठीच्या Basic Qualifications (आपल्याच मनाने) छापलेल्या असत. त्यात त्या हिरो / हिरॉईनला वाहन चालवता येणे, घोड्यावर बसता येणे वगैरे आवश्यक आहे असे वर्णन असायचे. आमच्या बालपणी एकमेव वाहन म्हणजे आमची सायकल. स्कूटर वगैरे आयुष्यात बरीच उशीरा आली आणि कार चालवता येऊ लागली तोवर आमच्या अपत्यांची बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याची वेळ येऊन ठेपली होती. बरे घोड्यावर बसणे म्हणजे काय संकट आहे हे घोड्यावर बसल्याशिवाय कळत नाही. आमच्या बालपणी, एका लग्नात, असेच एक नाठाळ घोडे उधळल्यामुळे, वरातीतल्या नवरदेवाची काय बिकट अवस्था झाली होती याचे आम्ही साक्षीदार होतो. (तो नवरदेव बिचारा लग्नापूर्वी मारूतीरायाच्या दर्शनाला जाताना असे घोडे अचानक उधळल्यामुळे घोड्याच्या मानेला घट्ट मिठी मारून बसला होता. ती वरात मंगल कार्यालयात परत येईपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. म्हणून आमच्या लग्नातही आम्ही घोड्याऐवजी मित्राच्या गाडीत बसून मारूतीरायाच्या दर्शनाला जाणे निवडले होते. लग्नानंतर ब-याच वर्षांनी बायकोमुलीसोबत चिखलद-याला फ़िरायला गेलो असताना घोड्यावर बसण्याचा योग आला खरा. घोडेही बिचारे गरीब होते पण १५ मिनिटांच्या छोट्याशा स्वारीतही "हे प्रकरण आपल्याला झेपणारे नाही" याची कल्पना आली होती. थोडक्यात काय ? कार चालवणे आणि घोडेस्वारी करणे या दोन्ही गोष्टी अजिबातच येत नसल्याने (मायापुरी निकषांनुसार) आम्हाला बॉलीवुड प्रवेश मिळणार नव्हताच.
पण तरीही आमच्या घरी नाट्य, नकलांची परंपरा होती. माझे आजोबा कै. श्री. राजाभाऊ किन्हीकर विदर्भातले प्रख्यात नकलाकार होते. त्याबद्दल त्यांना शासकीय पेन्शनही मिळत असे. गणेशोत्सवात, दुर्गोत्सवात संपूर्ण दिवसचे दिवस ते "बुक्ड" असत. संपूर्ण विदर्भभर त्यांचा नकलांचा दौरा असे. त्यामुळे त्या परंपरेत आम्हीही अगदी पहिल्या वर्गापासून नाटके, नकला या क्षेत्रात पदार्पणकर्ते झालो होतो. त्याची पुढली पायरी म्हणजे बॉलीवुडमध्ये पदार्पण असे कदाचित झाले असते पण या भयानक उर्दूमिश्रित हिंदी शब्दांनी आमच्या स्वप्नांना बालपणीच सुरूंग लावला. "मकसद" हे सिनेमाचे नाव म्हणजे सिनेमा कशावर आहे ? याचा अंदाज लागेना हो. मराठीत "अबकडई" नावाचे एक नियतकालीक निघे. तसेच हे (एकमेकांशी अजिबात संबंध नसलेले) शब्द जोडून काहीतरी वेगळेपणा करण्याची त्या निर्मात्याची इच्छा असेल असे समजून आम्ही तो सिनेमा बघायला गेलो होतो. तसेच आणखीही सिनेमे म्हणजे "दीदार - ए - यार", "अफ़साना" वगैरे. उर्दू शब्द कळायची सोयच आमच्या बालपणी सोय नव्हती हो. आणि घरचे वातावरण काय विचारता ? "आप जैसा कोई मेरी जिंदगीमें आये, तो बाप बन जाये" हे गाणे आमच्या बालपणी आम्ही निरागसपणे म्हणत असताना आईने कानाखाली जाळ काढल्याचे अजूनही स्मरते. (तरी हे इतके उघड उघड अश्लील गाणे सिनेमात कसे ? हा प्रश्न आमच्या पौगंडावस्थेत आम्हाला पडल्याचेही बारीकसे स्मरते हो.) त्यात "बाप" नही "बात" शब्द आहे या सत्याचे आम्हाला फ़ार उशीरा आकलन झाले. त्याकाळी टेपरेकॉर्डर, रेडिओ सर्रास सगळीकडे नसल्याने कानावर पडलेली गाणी साठवून ठेवावी लागत. त्यातल्या शब्दांची उठाठेव, चिरफ़ाड करण्याइतपत ते गाणे ऐकायला मिळतच नसे.
बरे ते शब्द मनापर्यंत पोहोचायला त्या शब्दांचा अनुभव तर यायला हवा ना ? कधीही पंजाबात न गेलेल्या आणि तिथल्या ग्रामीण जीवनाशी मनापासून समरस न झालेल्या जीवाला, "औनी-पौनी यारियाँ तेरी बौनी-बौनी बेरियोँ तले, चप्पा चप्पा चरखा चले" या ओळींचा अर्थ कसा कळायचा ? शब्दांचा अनुभव यायला हवा. श्रावणातल्या अशाच एका पावसाळी सकाळी, डेक्कन एक्सप्रेसने, मुंबईवरून पुण्याला येताना घाटात एका बोगद्यातून बाहेर आल्यानंतर अचानक दिसलेल्या दृश्याने पाडगावकरांच्या "पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले" या ओळींची प्रतीती देणारा देखावा काही मिनीटेच का होईना बघायला मिळाला होता. तशी शब्दांची अनुभूती यायला हवी तर त्यांच्यावर प्रेम जडेल. नाहीतर "शब्द बापुडे केवळ वारा..." अशी अवस्था व्हायची. शब्द लिहीणा-याने ते ग्रेटच लिहीलेत पण ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची अनुभूती तर यायला हवी ना ?
गुलझार वगैरे सारख्यांची गीते ऐकायची आणि समजावून घ्यायची म्हणजे "उर्दू - मराठी शब्दकोश" च जवळ घेऊन त्यातल्या संदर्भानुसार चालण्यासारखे होते. पुल म्हणतात तसे "धर शब्द की कर त्याची चिरफ़ाड". या गदारोळात त्यातल्या संगीताचे रसग्रहण कधी करायचे ? चाल कधी गुणगुणायची ? एकंदर कठीणच मामला होता. मग गायकाचा टीपेचा हिंदकळणारा सूर कानात साठवायचा ? की "बादलो में सतरंगिया बोंवे, भोर तलक बरसावे" चा अर्थ शोधायचा ? या दुविधेत आम्ही सापडायचोत. आधीच मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या चार भाषा शिकत असल्याने केवळ बॉलीवूड प्रवेशासाठी हे ऊर्दू वगैरे शिकायला आमची अजिबातच तयारी नव्हती. त्यामुळे आम्ही बॉलीवुड प्रवेशाच्या (कधीही न केलेल्या) विचारांचा त्याग केला आणि (कधीही न पाहिलेल्या) एका स्वप्नाचा शेवट झाला.
- स्वप्नवेडा प्रा. राम प्रकाश किन्हीकर
उत्तम. 👌👌
ReplyDeleteखूप सुंदर लिखाण सर, अगदी जुन्या दिवसांची आठवण आली
ReplyDelete