Friday, August 27, 2021

मला जाणवलेले पांडुरंग आणि रुक्मिणी

आज पुत्रदा एकादशी. आमचे सांगोल्यातले दिवस आठवलेत. पंढरपूर फक्त २५ किमी होते. अर्ध्या तासात इथून तिथे पोहोचणे व्हायचे. अनेकदा विठूरायाचे आणि रूक्मिणीमातेचे मनसोक्त दर्शन व्हायचे.

पंढरपूरात रूक्मिणीमाता विठूरायापासून थोडी अलग आहे. विठूरायाच्या डावीकडल्या थोड्या मागल्या बाजूला. असं वाटतं की हे दोघे सोबत फिरायला निघाले आणि आपल्या पत्नीशी गप्पा मारता मारता अचानक भक्ताची आर्त हाक त्यांच्या कानावर आली. पत्नीला तसेच ठेऊन त्यांनी भराभर पावले उचलत भक्ताला गाठले. आणि भक्ताने वाट बघायला सांगितल्यावर हे राहिले आपले उभे कमरेवर हात ठेऊन. बिचार्या रूक्मिणीलाही तसेच कमरेवर हात ठेऊन आपल्या नवरोजींची वाट बघत उभे रहावे लागले. युगानुयुगे.
पांडुरंगाला मी अनंत वेळा बघितले. रूक्मिणीबाईंनाही तितक्याच वेळा. सत्ययुगातले आपले चतुर, ठकवणारे थोडे बनेल रूप टाकून देऊन भगवंत इथे भक्ताधीन झालेले आहेत. इथे भगवंतांच्या चेहेर्यावर अत्यंत भोळे, प्रेमळ, भक्तांविषयीच्या वात्सल्याचे, तो भवसागर कसा तरेल ? याविषयीच्या काळजीचे भाव आहेत. कारूण्य आहे.



पण रूक्मिणीमातेचे इथले स्वरूप मात्र प्रेमळ पण करारी असे आहे.आपला नवरा असा आपल्या भक्तांच्या गराड्यात अडकलेला पाहून, आता त्याचे इतर संपूर्ण विश्वाकडे लक्षच नाही आणि विश्वाचा हा सगळा पसारा आपल्यालाच चालवायचा आहे या सांसारिक जबाबदारीतून रूक्मिणीमाता करारी झाल्या असाव्यात. त्या सुध्दा भक्तवत्सल आहेत पण आपल्याला आता आपल्या नवर्याची (तो भक्ताच्या वचनात अडकल्याने) जगन्नियंत्याची जबाबदारी पार पाडायची आहे हा भाव त्यांच्याकडे बघितल्यावर जाणवतो.
भगवंत हा खर्या भावाचा भुकेला असतो असे म्हणतात तसेच भगवंताला भक्त ज्या भावाने बघतो त्या भावातच तो दिसत जातो, हे ही तेव्हढेच खरे. माझ्यासारख्या, रोजच्या रामरगाड्यातून, धकाधकीच्या धबडग्यातून बाजूला राहून फक्त विद्यार्थ्यांमध्ये रमणार्या एका प्राध्यापकाला त्याचा देवही त्याच भावनेतून दिसला तर ते नैसर्गिकच नाही का ?
- पांडुरंगाच्या या लोभस रूपाचा एक भक्त, रामोबा किन्हीकर.
(आमच्या रखुमाईचा आणि आमचा या विषयावरचा एक जुनाच संवाद इथे.)

No comments:

Post a Comment