Wednesday, October 13, 2021

"बारा गावचे पाणी" आणि फजिती.

माझा जन्म चंद्रपूरचा. शिक्षण नागपुरात झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पश्चिम महाराष्ट्रात कराडला गेलो. भटक्या स्वभावामुळे आणि विद्यार्थी परिषदेच्या कामांसाठी (वर्षभर सातारा जिल्ह्याच्या अभ्यास मंडळाची जबाबदारी होती. आमचे mentor प्रकाश जावडेकर सर होते.) तिथल्या ४ वर्षांच्या वास्तव्यात  सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अगदी तालुका स्तरांपर्यंत फिरलो.

शिक्षणानंतर १२ वर्षे मुंबईत नोकरी केली. यादरम्यान कोकण पालथा घातला. नातेवाईक मंडळी मराठवाड्यात असल्याने आणि नंतर सांगोल्यात नोकरी करत असताना मराठवाडा पालथा घातला गेला. शिरपूर जि. धुळे इथल्या नोकरीच्या निमित्ताने पार  रावेर - यावल ते खापर पर्यंत खान्देश जवळिकीचा झाला. थोडक्यात काय तर बारा गावचे पाणी प्यायलेला माणूस म्हणून स्वतःसाठी कुठेही मिरवायला अस्मादिकांना हरकत नव्हती. 

पण काही काही माणसांनी जरा कुठे एखादी गोष्ट मिरवायची म्हटली की नियती आपली टाचणी घेऊन त्याच्या वृथा मिरवण्याचा फ़ुगा फ़ाटकन फ़ोडून टाकते. कुंडलीत कुठल्या ग्रहांमुळे असला योग येतो याचा मी शोध घेतो आहे. "बारा गावचे पाणी पिलोय म्हटलं" या आपल्या बायकोमुली समोरच उच्चारलेल्या वाक्याचा असा उलटा परिणाम झाला आणि जी भयंकर फ़टफ़जिती झाली की विचारता सोय नाही.

दिनांक २९ / ११ / २००९ : कन्येचे ऍबॅकस ऑलिम्पियाड कोल्हापूरला होते. नागपूर केंद्रातून निवड झालेल्या फ़क्त काही जणांमध्ये तिचा नंबर लागलेला होता. आम्ही नागपूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर प्रवास करून तिथे पोहोचलो. २९ / ११ / २००९ रोजी सकाळी परीक्षा वगैरे झाली आणि आम्ही दुपारी ३.३० ला सुटणा-या कोल्हापूर - नागपूर या सैनी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोचने नागपूरसाठी प्रस्थान ठेवले. बरोबर दुपारी ३.३० वाजताच कोल्हापूरवरून नागपूरसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस पण पर्याय होता. पण महाराष्ट्र एक्सप्रेसने आम्ही दुस-या दिवशी संध्याकाळी ४.३० ला नागपूरला पोहोचलो असतो आणि ही बस आम्हाला सकाळी ८.३० ला पोहोचवत होती. त्यामुळे बसने जाऊन दुस-या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये उपस्थित राहणे हा माझा मुख्य हेतू होता.
आजकाल सगळ्या स्लीपर कोच बसेस २ बाय १ अशा येतात. (काहीकाही श्रीमंती थाटाच्या १ बाय १ पण येतात.) त्याकाळी २ बाय २ स्लीपर बसेसना RTO ची परवानगी होती. (आता नाही. कमीत कमी २ बाय १ स्लीपर असेल तरच बसेसचे RTO passing होते.) आमची सैनीची बस अशीच २ बाय २ होती. खालील दोन बर्थ आणि वरचा एक बर्थ आम्हाला मिळाले होते. वरच्या बर्थवर त्यादिवशी इतर कुणीही बुकिंग केलेले नसल्याने तो बर्थ रिकामाच मिळाला. कन्या आणि तिची आई खालील बर्थसवर आणि मी वरच्या बर्थवर अशी झोपण्याची व्यवस्था ठरली.कोल्हापूरवरून बस १० मिनीटे उशीराच निघाली. सुरूवातीचा काळ बर्थवर असलेल्या टी व्ही वर लागलेला सिनेमा पाहण्यात गेला. आजतरी स्लीपर कोचेसच्या बर्थना १७ इंची टीव्ही स्क्रीन्स असतात. त्याकाळच्या जेमतेम ७ इंची स्क्रीन्सवर अक्षय कुमार आणि सैफ़ अली खान एकसारखेच दिसत असताना, सतत हलत्या बसमध्ये मन लावून तो सिनेमा पाहणे म्हणजे डोळ्यांना भयंकर त्रास देणे होते. तरीही आम्ही त्या सिनेमाची थट्टा मस्करी करीत तो सिनेमा बघत बघत वेळ काढला.मध्येच सांगलीला थांबून आम्ही सोलापूरला रात्री ९ च्या सुमारास आलो. सोलापूर शहरात न थांबता सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर, सोलापूर शहराबाहेर (सध्याच्या ऑर्किड इंजिनीअरींग कॉलेजजवळ) असलेल्या ढाबा कम हॉटेल असलेल्या हॉटेल अशोकाला रात्री ९.३० ला जेवणासाठी थांबलो. सकाळचे जेवण परीक्षेच्या गडबडीत आणि खूप लवकर झाले असल्याने सगळ्यांनाच खूप भुका लागलेल्या होत्या. तो ढाबा बाहेरून चांगला वाटत होता पण आतली साफ़सफ़ाई, बसण्याची व्यवस्था, टॉयलेटस वगैरे गचाळपणाकडे झुकणारा मामला होता. त्यातल्या त्यात ब-यापैकी टेबल बघून आम्ही क्षुधाशांतीसाठी बसलो. जेवण मागवले. जेवलोत. कुठेही बाहेर फ़िरताना आमच्याकडे भरपूर पाणी असतेच. आत्ताही कोल्हापूरवरून सौ. वैभवीने ४ - ५ बिस्लेरीच्या बाटल्या सोबत घेतलेल्या होत्या आणि त्या बाटल्या सोबत घेऊनच आम्ही जेवायला बसलो होतो.

मला काय हुक्की आली कोण जाणे ? टेबलावर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या मगमधले पाणी मी माझ्या पेल्यात ओतून घेतले. जवळच्या ४ - ५ बाटल्या उद्या सकाळी नागपूरपर्यंत पुरवायच्या आहेत त्यामुळे तुम्ही दोघी त्या बाटल्यांतून पाणी प्या. मी बारा गावचे पाणी प्यायलेला माणूस आहे, गं. मला सवय आहे असल्या विविध ठिकाणच्या पाण्याची. खरेतर माणसाला हे बिस्लेरी आणि घरच्या RO फ़िल्टर्सचे पांणी सतत प्यावे लागणे ही चुकीची सवय आहे. आपल्याला सगळ्या पाण्याची सवय हवी वगैरे माझे लेक्चरपण मी या दोघींना दिले. दोघीही निमूटपणे स्वतःसोबत आणलेल्या बिस्लेरीचे पाणी पीत असताना मी मात्र फ़ुशारकीने हॉटेलचे पाणी पीत होतो. पाणी चवीला गोड होते. विहीरीच्या किंवा बोअरींगच्या चवीचे खारट लागले असते तर मी पण बिस्लेरीचेच पाणी प्यायलो असतो.

जेवणं झालीत. रात्री १० च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. आता गाडीचा पुढचा टप्पा थेट यवतमाळच होता. सकाळपर्यंत निवांत झोप घेता येणार होती. गाडीतले व्हिडीयो वगैरे बंद झाले होते. या दोघींची खालच्या बर्थवर झोपण्याची व्यवस्था करून मी माझे अंथरूण पांघरूण घेऊन वरच्या बर्थवर गेलो आणि ४० किमी अंतरावरचे तुळजापूर येईपर्यंत पार झोपेच्या अधीन झालो होतो. नुकतेच पोटभर जेवण झालेले होते. जेवणानंतर पचनासाठी पुरेसा वेळ न देता लगेचच मी झोपलेलो होतो. त्यातच वरच्या बर्थवर बस खूप हलत असते. रात्री लातूर शहरातून बस जाताना शहराच्या दिव्यांमुळे थोडी झोपमोड झाली खरी पण सकाळी यवतमाळपर्यंत आम्हा सगळ्यांचीच छान झोप झालेली होती.

यवतमाळ नागपूर प्रवासही पटकन पार पडला. सकाळी पावणेनऊच्या सुमारास नागपूरला पोहोचलो आणि मग कॉलेजला जाण्याचे वेध लागले. घरी जाऊन, पटकन आवरून, कॉलेजला जाण्याचा बेत मनात हळूहळू पक्का होत होता. घरी पोहोचलो. थोडं थकल्यासारखं वाटत होतं पण एव्हढ्या मोठ्या प्रवासात थोड तर थकायला होणारच अशी मनाची समजूत घातल्या गेली.

घरी आलो आणि दहा पंधरा मिनीटांतच अचानक मळमळल्यासारखे झाले आणि लगेच खणाणून उलटी झाली. एकापाठोपाठ एक अशा दोन तीन उलट्या झाल्याचे आठवते आणि नंतर एका ग्लानीत घरच्या सोफ़्यावर अक्षरशः जवळपास बेशुद्धीत पडून राहिलो. घरी काय चाललय ? मला कुणी जेवणासाठी , औषधे घेण्यासाठी आवाज देऊन उठवले होते का ? मी पाणी प्यायलो होतो का ? काहीही आठवत नाही. विलक्षण ग्लानी. 

शुद्धीत आलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. मी कोण आहे ? कुठे आहे ? आता सकाळ आहे की संध्याकाळ ?  कॉलेजमध्ये कुणी माझ्या आजच्या अनुपस्थितीबद्दल कळवले तरी होते का ? असे एकेक प्रश्न पडत गेलेत आणि त्याची उत्तरे मिळत गेलीत. मला जबरदस्त अन्न विषबाधा (Food Poisoning) झालेली होती असा निष्कर्ष आमच्या डॉक्टरांनी काढला होता. आम्ही तिघांनीही जेवण तर एकच घेतलेले होते मग पाण्यातून ही विषबाधा झालेली असावी असा निष्कर्ष आमच्या घरी निघाला आणि मग माझ्या कालच्या "बारा गावचे पाणी पिण्याची सवय हवी..." वगैरे लेक्चरची घरी येथेच्छ खिल्ली उडवल्या गेली. मागे एकदा माझ्या आईने जादा डबा घेण्याचा केलेला आग्रह मोडून मी मुंबईला रवाना झालो होतो आणि सोळा तासांच्या प्रवासाला ३१ तास लागले आणि जादा डबा न पुरल्यामुळे खाण्याचे हाल झालेले होते हा अनुभव (ती कथा इथे) आणि यावेळी गृहस्वामिनीने केलेला उपदेश झुगारून उगाच फ़ुशारक्या मारल्यामुळे आलेला अनुभव. दोन्ही अनुभवांचे सार एकच. 

आपल्यावर निरपेक्ष प्रेम करण्या-यांचा सल्ला कायम ऐकावाच आणि त्यांच्यासमोर आपल्या कुठल्याही फ़ुशारक्या मारू नये.

- फ़ारसा हुशार नसलेला म्हणून फ़ारशा फ़ुशारक्या न मारणारा आपला साधारण माणूस, राम प्रकाश किन्हीकर. 

No comments:

Post a Comment