Saturday, April 30, 2022

ती आई होती म्हणूनी...

इसवी सन १९५०. साधारण ४ - ५ वर्षांची मुलगी. घरचे धनकनकसंपन्न. त्याकाळचा २१ दिवसांचा टाइफाइड तिला झाला. २१ दिवस संपत आले न आले तोच टाइफाइड उलटला. पुन्हा २१ दिवस. अंगातली शक्ती क्षीण झालेली. सर्वांनी तिच्या जगण्याची आशा सोडलेली होती. त्याकाळच्या डझन, दीड डझन भाऊबहिणींमध्ये असे एखाद्याचे कमी होणे सगळ्यांनीच गृहीत धरले असायचे.

पण ४२ व्या दिवशी ह्या मुलीने पहाटे पहाटे आपल्या वडिलांना क्षीण आवाजात हाक मारून पाणी मागितले. ही जगल्याचा आनंद झाला. त्यानंतर ही मुलगी आयुष्यभर तिच्या वडिलांची लाडकी होऊन राहिली.
२००५ च्या डिसेंबरमध्ये नागपूर मुक्कामी तिला अचानक कर्करोग झाल्याचे निदान झाले. ते सुध्दा दुसर्या टप्प्यात पोहोचलेल्या. बातमी ऐकताच हादरलेली तिची मुले मुंबई, सिंगापूर वरून नागपूरला धावली. मुलांनी त्यांचे वडील अकाली गमावलेले असल्याने आपल्या आईचे आजारपण त्यांच्यावर अचानक आघात करणारे होते.
कर्करोगावरील शस्त्रक्रिया आणि त्यानंतरची गुंतागुंतीची औषधयोजना यात आशानिराशेच्या हिंदोळ्यावरचे खूप क्षण आलेत. पण तिच्या आंतरिक शक्तीनी आणि जन्मजात लढाऊ बाण्याने ती यातून सुखरूप झाली. अगदी १०० % ठणठणीत.
११ मार्च २०२२ ला तिला यकृताचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. इस्पितळात दाखल करणे, घरी येणे हे चक्र सुरू झाले. तरीही तिचा लढाऊ स्वभाव माहिती असल्याने तिच्या मुलांना तिच्या सुखरूप परत येण्याची खात्री होती.
पण नियतीपुढे सगळे हतबल आहेत याची नियतीने पुन्हा एकदा जाणीव करून दिली. अक्षरशः हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शून्यातून निर्माण करणारी ती स्वतःच शून्यात विलीन झाली.


श्रीमती वैशाली प्रकाश किन्हीकर
जन्मः १४/०२/१९४५ मृत्यूः २७/०४/२०२२

आपली भारतीय संस्कृती ही फार उदात्त तत्वांनी आणि विचारपूर्वक विकसित झालेली आहे. पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह पंचमहाभूतातच विलीन होताना पाहून स्वतःच्या मूळ स्वरूपाची जाणीव पुन्हा जागृत होते. संसाराच्या रगाड्यात या मूळ स्वरूपाच्या जाणीवेवर अहंकाराची, देहाभिमानाची जी राख जमलेली असते ती या जळजळीत वास्तवाने झटकली जाते.
भरपूर पैसे कमावले, स्वतःसाठी खूप आलिशान घरे बांधलीत तरीही
"दौलत अजमत महल खजाना,
सबही थाट रह जाएगा"
असेच होते.
आणि इतर अनेक जिवांनी वापरलेल्या ३ फूट x ४ फूट आकाराच्या अंतिम विश्रामस्थळावरच आपल्या देहाचा अंतिम पत्ता असणार हे निश्चित होत जाते तसे मन परमतत्वाच्या जवळिकेच्या जाणिवेने आश्वस्त होत जाते. महादेव शंकरांचा वास म्हणूनच स्मशानात असावा. सर्व चर आणि अचर सृष्टीचाच विलय ज्यांच्या ठायी होणार आहे असे देवांचे देव, महादेव त्या स्मशानातच वास करून आपण सगळ्या जिवांना महादेवांच्या शाश्वततेची आणि समस्त सृष्टीच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव अखंड करून देत असतात.
मृत देहाला चितेवरच्या अग्नीचे चटके जाणवतही नसतील पण तिथल्या संवेदनशील मनांना ही आत्माभिमानाची, देहाच्या शाश्वत असण्याची वृथा राख झाडली गेल्याने आत्म्याचे जे स्फुल्लिंग चेतल्या जाते त्याचे चटके नक्कीच जाणवतात.
यालाच स्मशानवैराग्य म्हणत असावेत. हे स्मशानवैराग्य फार काळ टिकत नाही असेही जाणकार सांगत असतात. एकदा संसाराच्या मोहात, रोजच्या रामरगाड्यात माणूस रमला की तो हे सगळे विसरतोच. बरोबरच आहे. मनुष्यमात्रांनी हे स्मशानवैराग्य विसरायलाही हवे. त्याशिवाय जगाचे रहाटगाडगे चालणारच नाही. निवृत्त मनाची वाटचाल प्रवृत्ती कडे करायलाच हवी तरच जगात मनुष्य कार्यप्रवण राहील.
पण जगात वावरताना सतत इतर कार्यात गुंतल्यासारखे दाखवून मनात हे वैराग्याचे स्फुल्लिंग जागृत ठेवणार्या आणि इतर कशाचीही नसली तरी देहाच्या क्षणभंगुरत्वाची खात्री असणार्या आणि तसे वर्तन करणार्या व्यक्तींनाच संतत्व प्राप्त होत असावे, नाही ?
समर्थांनी तर लिहूनच ठेवलेय,
"मरणाचे स्मरण असावे
हरीभक्तीस सादर व्हावे."
- वडिलांचा आकस्मिक मृत्यूनंतर २५ वर्षांनी आईच्याही देवाघरी जाण्यामुळे या जगात खर्या अर्थाने पोरका झालेला राम.


No comments:

Post a Comment