Friday, April 1, 2022

एप्रिल फूल.

 साधारण १९७५-७६ ची गोष्ट. माझ्या थोरल्या मावशीचे यजमान पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कोकणातील गोरेगाव ता. महाड जि. कुलाबा (तत्कालीन हं. आता माणगाव तालुका झालाय. आणि कुलाबा जिल्हा आता रायगड जिल्हा झालाय.) येथे काळ नदी प्रकल्पावर कार्यरत होते. काकांचे आईवडील, भाऊ वर्धेत तर मावशीचे माहेर (माझे आजोळ) चंद्रपूरचे. शिवाय जास्तीत जास्त नातेवाईक विदर्भातच. त्यामुळे दोघांच्याही विदर्भ फेर्‍या भरपूर वेळा होत असत. 


पत्राद्वारे एकमेकांशी संपर्काचा तो काळ. एकमेकांचा आवाज ऐकणे, प्रत्यक्ष भेटणे यासाठी माणसे आसुसलेली असत. साधारण २४ मार्चच्या आसपास माझ्या मावशीचे पत्र आमच्या घरी आले. पत्रातला मजकूर साधारण असा "आम्ही मार्च महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात, साधारण ३१ मार्च किंवा १ एप्रिल या तारखांना (रिझर्वेशन अजून नक्की झालेले नाही. झाल्यावर कळवतो.) मुंबईवरून कलकत्त्याला जाणार आहोत. १ डाऊन मेल ने (सध्याची 12809 Down) जाऊ. नागपूरला गाडी साधारण सकाळी ११ च्या सुमारास येईल. तरी स्टेशनवर भेटण्यास आलात तर अनायासे भेट होईल. कळावे." 


अशाच आशयाची पत्रे मावशीच्या वर्ध्याच्या दिर - भावजयांना आणि दुर्ग येथल्या माझ्या धाकट्या मावशीला गेलीत. 


प्रत्यक्ष भेटायला मिळणार म्हणून मंडळी हरखलीत. स्टेशनवर जाण्याचे बेत नक्की झालेत. वर्धेला मेल सकाळी ९ च्या आसपास येत असे त्यामुळे वर्धेकरांनी चहा - नाश्ता घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी रेल्वेत खानपान सेवा असली तरीही घरच्या जेवणाचा मावशी आणि काकांनाही लाभ मिळावा म्हणून आमच्या घरून जेवणाचा डबा जाणार हे ठरले. दुर्ग पर्यंत गाडी संध्याकाळी पोहोचत असे म्हणून संध्याकाळचा चहा + रात्रीचे जेवण तिथून पाठवण्याचे धाकट्या मावशीने ठरविले. 


झाले ३१ मार्च उजाडला. वर्धा, नागपूर आणि दुर्ग इथली मंडळी मोठ्या आशेने, भेटीसाठी आसूसून त्या त्या वेळी त्या त्या स्टेशन्सवर गेलीत. मावशी आणि काका नेहमी प्रथम वर्गाने प्रवास करीत म्हणून पहिल्यांदा प्रथम वर्ग आणि मग "न जाणो फर्स्ट क्लासचे रिझर्वेशन मिळाले नसेल तर..." या आशंकेने सेकंड क्लासचेही सर्व रिझर्वड डबे या मंडळींनी पालथे घातलेत. पण निराशा झाली. डबे तसेच घरी परतलेत. त्या काळी आजच्यासारख्या nuclear families नसल्याने घरी आल्यावर डबा फस्त होण्यात अडचण आली नाही पण प्रत्यक्ष भेट न झाल्याची चुटपुट प्रत्येकाच्या मनात राहिलीच. 


१ एप्रिल उजाडला. पत्रात "३१ मार्च किंवा १ एप्रिल" असा उल्लेख असल्याने नव्या आशेने सकाळी सकाळी डब्बे बनविण्याची घरात तयारी सुरू झाली. तेवढ्यात आमच्या दादांच्या (माझे वडिल) गोम लक्षात आली. ते आमच्या आईला म्हणाले, "आज डबा नको करूस. आपण नुसतेच भेटायला जाऊ. पण मला वाटतं की ते आजही येणार नाहीत." 


वर्धेची मंडळी चहा - नाश्ता घेऊन, दुर्गची मंडळी जेवण घेऊन तर आमचे आईदादा नुसतेच १ डाऊन मेलवर भेटायले गेलेत. कालसारखेच सगळे डबे पाहून, भेट न झाल्याने निराश होऊन घरी परतलेत. सगळ्यांकडे घरी दुपारच्या डाकेने "एप्रिल फूल" असे आणि एव्हढेच मोठ्या अक्षरांमध्ये लिहीलेले पोस्टकार्ड आले आणि सगळ्यांना स्वतःच्या फजितीवर हसायला आले. 


त्याकाळी नातेवाईकांना असे विविध प्रकारे एप्रिल फूल बनविण्याचे उद्योग सर्रास चालायचेत. महत्वाची वर्तमान पत्रेसुध्दा आपली हेडलाईन अशी काहीतरी सनसनाटी, अविश्वसनीय बातमी ,A. F. News या बारीक शीर्षटिपेसह, देत असत. हे A F News हा ANN वगैरेसारखा भाग असावा असे सर्वसामान्यांना वाटत असे आणि बर्‍याच लोकांना हे एप्रिल फूल आहे ही साधी शंकाही येत नसे. 


मावशीचे यजमान १९९६ मध्ये देवाघरी गेलेत. १९९७ मध्ये आमचे दादाही आम्हाला सोडून देवाघरी गेलेत. मावशीही गेल्यावर्षी वृध्दापकाळामुळे कालवश झाली. आता उरलेल्या आहेत त्या त्यांनी व्यवस्थित नियोजन करून सगळ्या नातेवाईकांच्या केलेल्या गंमतीच्या अवीट गोडीच्या आठवणी. 


- जुन्या काळच्या साधेपणाच्या ऐश्वर्यात मनाने रमलेला पण एप्रिल फूल नसलेला, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment