आजकाल आंब्याच्या रसासोबत "फजिता" उर्फ पाण्यातला रस होत नाही का ? विदर्भात तरी आमच्या बालपणी ही प्रथा होती.
४० - ५० माणसांच्या पंक्तीला आमरसाचा बेत असल्यावर आंबे माचवायला आणि रस काढायला बसलेली मंडळी रस काढून झाल्यावर आंब्याच्या कोयी आणि सालं शेजारच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात टाकत असत. मग कोयींना, सालींना लागलेला आमरस त्या भांड्यातल्या पाण्यात मिसळल्यावर त्याचा पातळसर, अगोड आमरस तयार होत असे. फ्रुटी, माझा वगैरे पेय आमच्या आयुष्यात फार उशीरा आलीत त्यापूर्वी तत्सम "फजिता" च आला.
काही कुटुंबांमध्ये याला तूप जिर्याची फोडणीही दिली जात असे. त्यात चवीपुरते मीठही घातले जात असे.
पुरवठ्याला यावा म्हणून केला गेलेला हा पदार्थ बर्याचदा इतका फक्कड जमून जात असे की पंक्तीत मूळ आमरसापेक्षा या "फजित्या"चीच मागणी जास्त रहात असे.
त्याकाळी आमरस केलेल्या मोठ्ठ्या पातेल्यात मुद्दाम एखादी आंब्याची कोय तशीच ठेवली जाई. मोठ्या वाढण्याने वाढताना ज्याच्या वाटीत ती कोय आली त्याच्या घरी सगळ्या पंक्तीसाठी त्या उन्हाळ्यातला पुढला आमरसाचा बेत होणार हा एक टिपीकल वैदर्भी मालगुजारी मनोवृत्तीचा अलिखित संकेत असे. अशा पंक्तींमध्ये अर्धा पुरूष उंचीच्या आणि तेवढ्याच रूंदीच्या मोठाल्या गंजांमध्ये आमरस केल्या जात असे आणि पंक्तीत वाढण्यासाठी तो बादल्या बादल्यांमध्ये भरून आणला जात असे. साधारण तीस एक वर्षांपूर्वी मी अशा पंक्तीत जेवलेलो आहे.
आज तशा ताटापाटावरच्या पंक्तीही नाहीत, ४० - ५० माणसांना पुरेल असा आमरस करणेही नाही आणि तो फजिताही नाही.
बाय द वे, गुजराती किंवा राजस्थानी थाळी हाॅटेल्समध्ये मिळणारा आमरस म्हणजे भोपळ्यासारख्या स्वतःची चव नसलेल्या पदार्थाच्या रसात आंब्याची चव व साखर घातलेला रस असतो हा माझा चांदा ते बांदा अनुभव आहे.
- मिक्सरमधून काढून सपक, गिळगिळीत केलेल्या आमरसापेक्षा आमरसातल्या गुठळ्या गुठळ्या अती आवडीने खाणारा, आमरस खायला चमच्यापेक्षा उजव्या हाताची चारही बोटे वापरून ओरपून खाणारा अस्सल देशी वाणाचा आणि हल्ली विस्मृतीत गेलेला फजिता मनापासून आवडणारा, एकेकाळचा मालगुजार (आमचे पणजोबा अकोला {सध्या वाशिम} जिल्ह्यातल्या कारंजा (लाड) जवळील किन्हीराजा गावचे वतनदार होते म्हटलं. काय समजलेत ?) वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment