Friday, December 15, 2023

माझ्या ब्लॉगपोस्टसचे सलग चौथे शतक

मी थोडा आकडेवारी, स्टॅटिस्टिक यात रमणारा अभियंता आहे. आमच्या बालपणी मोहम्मद अझरूद्दीनने पदार्पणाच्या तीन कसोटींमध्येच सलग तीन शतके झळकावून एक विश्वविक्रम केल्याचे कौतुक आम्हाला होते. मी ब्लॉग लिहायला डिसेंबर 2008 मध्ये सुरूवात केली असली तरी मी एक शतक ब्लॉगपोस्टस वगैरे लिहीन असे मला कधीही वाटले नव्हते. आणि माझ्या ब्लॉगपोस्टसची सुरूवातही तशी संथच झाली होती.


2008 मध्ये 3, 2009 मध्ये 4, 2010 मध्ये 4 अशा गतीने ती सुरूवात झाली होती. माझा रेल्वे आणि बसफ़ॅनिंगवर असा ब्लॉग सुरू करण्यामागे माझे रेल्वेफ़ॅन मित्र श्री. बिनाई शंकर यांच्या ब्लॉगचा प्रचंड प्रभाव होता हे मला कबूल केलेच पाहिजे. रेल्वेफ़ॅनिंगवर असलेला त्यांचा ब्लॉग माझे प्रेरणास्थान होता. आपणही बस आणि रेल्वेफ़ॅनिंगवर असा ब्लॉग सुरू करू शकतो हा आत्मविश्वास मला आला आणि माझ्या भारतभर भ्रमंतीवर मी हा ब्लॉग सुरू केला.




सुरूवातीची दोन वर्षे हा ब्लॉग बस फ़ॅनिंग आणि रेल्वे फ़ॅनिंग या विषयाला फ़ारच धरून होता. पण ब्लॉग लिहायला सुरूवत केल्यापासून दोनेक वर्षातच मला संगणकावर मराठी लेखन कसे करावे ? याचा शोध लागला आणि मग माझे सगळ्याच विषयांवरचे लिखाण मी माझ्या ब्लॉगवर सादर करू लागलो. 


2016 मध्ये एकूण 38 ब्लॉगपोस्टस लिहील्या गेल्यात. पण समर्थांच्या "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" या उक्तीनुसार वर्षातल्या दर महिन्यात काहीतरी लिखाण झाले होते. त्यामुळे एक हुरूप आला.


2020 मध्ये लॉकडाऊन लागला आणि आमचे बाहेर फ़िरणे जवळपास थांबले. ऑनलाईन शिकवायचे असल्याने रोज कामावर जाण्यायेण्याचे तास वाचले होते. त्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण होऊ लागले. घरातल्या घरीच असल्याने लिखाणासाठी विषय सुचणे आणि तो ब्लॉगवर व्यक्त करता येणे यातले अंतर खूप कमी झाले. नाहीतर एरव्ही विषय खूप सुचत असत. कधी कामात असायचो, कधी प्रवासात गाडी वगैरे चालवत असायचो. हाताशी कॉम्प्युटरची गाठभेट होईपर्यंत तो विषय हवेत विरून गेलेला असायची किंवा आठवणीत असला तरी लिखाणाचा उरक तेव्हढा नसायचा. पण लॉकडाऊनने या दोन्हीही अडथळ्यांना दूर केले आणि 2020 मध्ये ब्लॉगपोस्टसचे पहिले शतक झळकावले. 153 पोस्टस त्यावर्षी लिहील्यात. एखाद्या फ़लंदाजाने 12 व्या कसोटीत पहिले शतक झळकावत 153 धावा काढाव्यात तशी माझी भावना त्यावर्षी झालेली होती.





2021 मध्ये मग तो लिखाणाचा ओघ कायम राहिला. फ़क्त 2021 मध्ये लॉकडाऊन संपून नित्य कार्यालयीन कामकाज सुरू झालेले होते. पण तरीही नरभक्षक वाघाला एकदा मानवी रक्ताची चटक लागली की तो कायम त्याच्याच शोधात असतो तसे माझे ब्लॉग लिखाणाबाबत झाले. लागोपाठ दुसरे शतक मारायचेच या हेतूने 2021 मध्ये लिखाण खाले. माझ्या कारकीर्दीच्या 13 व्या कसोटीत मी 101 धावा काढल्यात.


2022 मध्ये मग कार्यस्थळ आणि ब्लॉगलिखाण यात समन्वय कसा साधायचा. ब्लॉगलिखाणासाठी वेळ कसा काढायचा याची युक्ती जमायला लागली. नोव्हेंबर 2022 पर्यंतच मी 175 ब्लॉगपोस्टस लिहील्यात. यावर्षी पहिले द्विशतक आपण गाठू याची मला खात्री पटत चालली होती आणि माझ्यावर वज्राघात झाला. मला कायम लेखनप्रेरणा देणारी, माझ्या लेखनावर प्रेम करणारी माझी खरीखुरी जीवनसाथी, माझी प्रिय पत्नी हे जग सोडून गेली. त्या औदासिन्यातच यापुढे मी काही लिहू शके्न असे माझे मलाच वाटेना. मग ब्लॉगलेखनाचा प्रवास थांबला. पण पुन्हा तिचीच प्रेरणा मिळाली. मी ब्लॉग्ज लिहीलेत तर ते तिला आवडेल या विचारीने पुन्हा लिखाण सुरू झाले. पण द्विशतक हुकलेच. माझा प्रवास 183 ब्लॉगपोस्टसवरच थांबला.


2023 मध्ये तर घरातली माझी जबाबदारी अजूनच वाढली. घरचे स्वयंपाकपाणी, साफ़सफ़ाई आटोपून, महाविद्यालयीन काम आटोपून ब्लॉग्ज लिखाणासाठी उत्साह जमवावा लागे. पण यावर्षीही चिकाटीने ब्लॉग्जचे शतक झळकावले. म्हणूनच हे शतक विशेष आहे. 


आपल्यासारख्या मायबाप वाचकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आहे म्हणून मी आजपर्यंत इथवर आलेलो आहे ही माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे. अशीच लेखनसेवा माझ्याकडून नित्य व्हावी हेच मागणे मागतो आणि या लिखाणाला लेखनसीमा घालतो. 


माझ्या ब्लॉगपोस्टसमधील काही निवडक लिखाण इथे आपल्यासाठी पुन्हा सादर.


1. मला खूप मनापासून आवडलेला आणि अत्यंत लोकप्रिय असलेला माझा एक लेख. "विदर्भतून विदर्भ"


2. यावर्षी माझ्या प्रिय पत्नीच्या विरहात जागवलेली आमच्या साक्षगंध - साखरपुड्याची आठवण. "मर्मबंधातली ठेव ही"


3. ठाणे ते नागपूर हा दिवाळीनिमित्त केलेला दगदगीचा आणि कायम आठवणीत राहणारा बसप्रवास. "काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३"


4. रेल्वेतल्या विविध प्रवासांचा एक कोलाज. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव."


5. महाराष्ट्र एस. टी. शिवशाही बसेस सुरू करणार हे वाचल्यावर मी वर्तवलेले भविष्य. "शिवशाही : एक चिंतन"


6. कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना भाग घेतलेल्या एका अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतल्या सहभागाची गोष्ट. "फ़लाटदादा...फ़लाटदादा ची जन्मकथा"


7. धावतपळत आणि वेगळ्या मार्गाने केलेल्या एका कराड ते नागपूर प्रवासाची मजेशीर गोष्ट. "काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र. १"


8. प्रवासात मध्येच पैसे संपल्यानंतर झालेल्या फ़जितीची आणि शिकलेल्या धड्याची गोष्ट. "काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५"


9. आमचे लग्न जुळले कसे आणि त्यानंतरचा आमचा प्रवास. "एका लग्नाच्या जमण्याची पुढची गोष्ट."


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


No comments:

Post a Comment