Friday, January 12, 2024

डी टी सी, शहर बस सेवा, नागपूर शहर बस, खाजगी वाहतूक इत्यादि इत्यादि...



या प्रकाशचित्रात दिसते आहे ती आहे दिल्ली ट्रान्सपोर्ट कंपनीची नवी दिल्लीतली शहर बस. टाटा मार्कोपोलो मॉडेलची, मागे एंजिन असलेली, सेमी लो फ़्लोर शहर बस. नवी दिल्लीतल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या बसेस डीटीसीच्या सेवेत आल्यात. नवनव्या, चकचकीत, दिव्यांगांसाठी चढ उतार करण्यासाठी विशेष सोय असलेल्या. शहर बस सेवेच्या बसेस विशेष बांधून घ्यावा लागतात ही कल्पना साधारण 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या एस. टी. त आली. त्यापूर्वी आपली एस. टी. आपल्या बाहेरगावच्या बसताफ़्यातल्या बसेसचेच रूपांतर समोरून दुस-या रांगेतली डावीकडली एक आसनांची रांग काढत पुढच्या एका खिडकीचे रूपांतर दारात करून तिचे रूपांतर शहर बस सेवेच्या बसमध्ये करायची. 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात नागपूर शहर बस सेवेत "मधोमध मोठे दार असलेली बस" (सध्याच्या बी आर टी सेवेतल्या बसेसना असतात तितके रूंद दार पण एकच दार बसच्या मधोमध. मागे दुसरे दार नाही.) आल्याचे आठवते. पण त्या बसने प्रवाशांचे खूप अपघात होतात अशी खरीखोटी ओरड सुरू झाली आणि त्या बसेस फ़ारशा सेवेत दिसू शकल्या नाहीत.

आम्ही सोलापूर, पुणे, मुंबई इथे गेलोत की तिथल्या तिथल्या महापालिकांच्या सेवेत असलेल्या विशेष रूपाने बांधून घेतलेल्या शहर बस सेवेच्या बसेस बघायचोत आणि त्यांच्या प्रेमात पडायचोत. नागपूर शहर बस सेवेत 1983 -84 च्या आसपास ड्रायव्हर केबीनमधून उतरण्यासाठी एक आणि मागच्या बाजूला प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी एक अशी दोन दारे असलेल्या बसेसचा ताफ़ा आल्याचे आणि त्यातून भरपूर प्रवास घडल्याचे स्मरते. MTD 9584, MTD 9585 असे त्या बसेसचे नंबर्सदेखील स्मरतात. 

त्यानंतर 1992-1993 मध्ये अशा ड्रायव्हर केबिनमधून दार असलेल्या विशेष बसेस पुन्हा एस. टी. ने सेवेत आणल्यात. यावेळी या बसेस रूबी कोच, मुंबई, ऑटे बॉडी पुणे आणि इरॉस नागपूर अशा खाजगी कंपन्यांनी बांधलेल्या होत्या. MH - 12 / F 3375, MH - 12 / F 3403 अशा काही बसेस नागपुरात आलेल्या आठवतात. वर्षभरातच एस. टी. च्या स्वतःच्या कार्यशाळांनी बांधलेल्या तशाच धर्तीच्या बसेस सेवेत आणल्यात. MH - 12 / F 49XX सिरीजमधल्या या बसेस ब-याच काळ शहर बस सेवेत धावत होत्या. 

नागपूरची शहर बस सेवा 2008 -09 च्या आसपास खाजगी कडे गेली. तेव्हाही नवीन बसेसचा छान ताफ़ा या खाजगी ऑपरेटर्सकडे महापालिकेने दिला होता. पण "गा. गु. च. का." या म्हणीला जागून या गाढवांनी त्या बसेसचे थोड्याच अवधीत मातेरे केले. त्या बसेस घेतल्यापासून कधी धुतल्या तरी गेल्यात की नाही अशी त्यांची आज अवस्था आहे. या खाजगी ऑपरेटर्सकडे ना धड डेपोची जागा आहे, ना धड महापलिकेकडून डेपोसाठी मिळालेल्या जागेवर छान छत वगैरे बांधून बसेसचा मेण्टेनन्स करण्याची इच्छा आहे. ना तसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे आणि मुख्य म्हणजे नागपूरकरांना बससेवा देण्याची इच्छाशक्तीच यांच्यात नाही. त्यामुळे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था नागपूर शहर बस सेवेची सध्या आहे.

विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाची V. R. S. T. C. अशा खाजगी ऑपरेटर्सकडे गेली तर काय ? या भितीनेच विदर्भ वेगळा नको असे वाटायला लागते. कारण जुन्या मध्य प्रदेशातली "लंदफ़ंद सर्व्हिस" पुन्हा V. R. S. T. C. च्या रूपाने अवतरेल अशी सार्थ भिती माझ्यासारख्या सगळ्या बसप्रेमींना वाटते. आपल्या एस. टी. त अजूनही सुधारणेला भरपूर वाव असला तरी अशा खाजगी बस सेवेपेक्षा आपली एस. टी. बरीच चांगली आहे.


- दिल्लीपासून गल्लीपर्यंत बस दिसली की आपले नागपूरच आठवणारा, आणि कुठलाही विषय कुठेही नेऊन ठेवणारा, अस्सल पाल्हाळ, गोष्टीवेल्हाळ नागपूरकर प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment