आम्हा सगळ्या बसफ़ॅन्सचे पहिले प्रेम बस आणि सगळ्या रेल्वेफ़ॅन्सचे पहिले प्रेम रेल्वे असल्याने बसेस किंवा रेल्वे आम्हाला आमच्या प्रेयसीसारख्या (ओह, आता नवीन पिढीच्या शब्दरचनेनुसार Girl Friend) वाटतात. बस किंवा रेल्वे ह्या आम्हाला निर्जीव वस्तू वाटतच नाहीत. तर त्या अगदी आपल्यासारख्याच सजीव वस्तू वाटतात. आम्ही बसफ़ॅन एखाद्या वेळेला सुंदर तरूणी शेजारून गेली तर तिच्याकडे बघू न बघू पण जर एखादी नवीन बस शेजारून गेली तर तिच्याकडे मान वेळावून वेळावून नक्कीच बघू.
आमच्यासाठी 3780 या नंबरच्या बसची धाकटी बहीण 3781 असते आणि तिची धाकटी बहीण 3782 असते. अगदी जुनी बस म्हणजे आजी किंवा पणजी असते. तिचा काळ तिने तिच्या आपल्या देखणेपणामुळे गाजवलेला असतो पण आजकाल तिच्या नातींचे राज्य असते. कदाचित एखादी छान मेण्टेन केलेली बस म्हातारपणातही देखणे दिसणा-या एखाद्या आजी / काकू सारखी आम्हाला दिसते.
एस. टी. डेपोतही आमच्यासारखे कवी मनाचे रसिक असतातच. मग ते रसिक एस. टी. कर्मचारी एखाद्या अशा नवीन बसवर "माणदेश कन्या" असे स्टीकर वगैरे लावतात आणि आम्हा बसफ़ॅन्सना "माझिया जातीचा मज मिळो कोणी" अशी अनुभूती येते.
दिनांक 28/01/2014
आमच्या फ़ॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगोला येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल लोणावळ्याला निघालेली होती. सांगोला डेपोने त्यांची तत्कालीन नवी कोरी बस त्या सहलीसाठी पाठवलेली होती. मग काय ! आमच्यातले बसफ़ॅन शिक्षक सुखावले. या बसचे भरपूर फ़ोटोही काढलेत.
या सहलीनंतर ही बस सोलापूर - पणजी या प्रतिष्ठेच्या आंतरराज्य मार्गावर बरीच वर्षे धावताना दिसली. हा मार्ग ब-याच जुन्या काळापासून सांगोला डेपो चालवतो. सोलापूर - मंगळवेढा - सांगोला - शिरढोण - मिरज - सांगली - जयसिंगपूर - कोल्हापूर - सावंतवाडी - म्हापसा - पणजी असा जवळपास 450 किमीचा हा आंतरराज्य महामार्ग आहे.
- बसगाड्यांविषयी अगदी आसक्त प्रेम बाळगणारा, बसेसचा Boy Friend प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment