Tuesday, February 6, 2024

Decoding म.का.दा., म.का.ना., म.का.चि. वगैरे

माझ्या बालपणी आमच्या कुटुंबासह 1977 सालच्या नागपूर ते चंद्रपूर प्रवासादरम्यान माझ्या वडिलांनी मला एस. टी. बस गाड्यांवर लिहीत असलेल्या विविध शॉर्टफ़ॉर्म्सबद्दल सविस्तर सांगितलेले होते. एस. टी. बसच्या पुढल्या बाजूला ती कुठल्या कार्यशाळेत बनली ?, कुठल्या वर्षी बनली ? आणि त्या वर्षी बनलेली ती कितवी बस ? ही सगळी माहिती लिहीलेली असते. ती सगळी माझ्या वडिलांनी मला समजावून सांगितली आणि ती पक्की लक्षात राहिली. त्यानंतर जितके प्रवास घडले त्या त्या प्रवासांमध्ये बसस्टॅण्डवर उभ्या असलेल्या सगळ्या गाड्यांची ही माहिती नोंदवून घेण्याचा छंदच मला लागला.


महाराष्ट्र एस. टी. च्या स्वतःच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. तिथे बसगाड्यांची टाटा किंवा लेलॅण्ड चेसिसवर बांधणी होते. मधल्या काळात काही आयशर बसगाड्यांचीही बांधणी या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये झालेली होती. म. का. दा. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी (पुणे), म. का. ना. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर (हिंगणा) आणि म. का. चि. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (औरंगाबाद, सध्याचे छत्रपती संभाजीनगर). 1980 पर्यंत तरी या कार्यशाळेत बनलेल्या गाड्यांवर म. का. चि. असे लिहीलेले असायचे त्यानंतर म. का. चि. ऐवजी म. का. औ. असे लिहीले जायचे. 


नागपूर कार्यशाळेत प्रामुख्याने टाटा बसगाड्या बांधल्या जातात. अगदी अपवाद म्हणून काही लेलॅण्ड गाड्याही नागपूर कार्यशाळेने बांधल्या आहेत आणि एकमेव आयशर बस (MH - 40 / AQ 6454) नागपूर कार्यशाळेने बांधलेली आहे. नागपूर कार्यशाळा सर्वसाधारणपणे 300 ते 350 बसगाड्या वर्षभरात बांधते. या कार्यशाळेने बांधलेल्या बसेस विदर्भात आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या आगारांमध्ये पाठवल्या जातात.


छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेत प्रामुख्याने लेलॅण्ड गाड्या बांधल्या जातात. अपवाद म्हणून काही टाटा गाड्याही छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यशाळेने बांधल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेत वर्षभरात साधारण 600 ते 650 बसगाड्या बांधते. या बसेस मराठवाडा, खान्देश आणि कोकणातल्या काही आगारांमध्ये पाठवल्या जातात.


दापोडी कार्यशाळेत मात्र टाटा आणि लेलॅण्ड दोन्हीही गाड्या बांधल्या जातात. ही कार्यशाळा वर्षभरात साधारण 600 टाटा आणि 400 लेलॅण्ड गाड्या बांधते. या कार्यशाळेत बांधलेल्या गाड्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाडा अशा सर्वत्र दिल्या जातात. 



मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे 2012 - 13 या वर्षात बांधलेली 387 वी नवी लेलॅण्ड असे इथले डिकोडिंग.



मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर इथे 2011 -12 या वर्षात बांधलेली 225 वी नवी टाटा असे इथले डिकोडिंग.


या कार्यशाळा एखादे वेळी अपघातात सापडलेल्या पण चेसिस चांगली असलेल्या बसच्या जुन्या चेसिसवरची जुनी बॉडी बदलून तिला नवीन बॉडी बसवण्याचेही काम करतात. त्यावेळी न. टा. (नवी टाटा) किंवा न. ले. (नवी लेलॅण्ड) ऐवजी पु. टा. (पुनर्स्थापित टाटा) किंवा पु. ले. (पुनर्स्थापित लेलॅण्ड) असे लिहीले जाते. पण अशा वेळा कमी येतात.


आता मधल्या काळात सगळ्या जुन्या ॲल्युमिनीयम बसबॉडीज बदलून माइल्ड स्टील (पोलादी) बसबॉडीज (Mild Steel एम. एस.) बसविण्याचे काम महामंडळाने सगळ्या कार्यशाळांमध्ये हाती घेतले होते. पण त्या गाड्यांवर असा कुठलाच छाप कुठल्याही कार्यशाळेने उठवला नव्हता. आता नवीन बी. एस. 6 टाईपच्या बसगाड्या बांधायला घेतल्यावर फ़क्त छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेने असे छाप पुन्हा उठवने सुरू केल्याचे मी बघतोय पण नागपूर आणि दापोडी कार्यशाळांच्या बसेसवर असे छाप मलातरी दिसले नाहीत.


- एस. टी. प्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

2 comments: