Wednesday, June 26, 2024

राजमलाईः बालपणीच्या हरवलेल्या चवीचा धांडोळा आणि त्याला मिळालेले यश.

आमच्या बालपणी तत्कालीन मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शाळकरी मुलांसाठी खाऊसाठी खालीलप्रमाणे पर्याय होते.

१. पारले किस्मीचे छोटे चाॅकलेटस (मला वाटतं १० पैशांना एक असे ते मिळायचेत). ते छोटे चाॅकलेटस आणि त्यावरील लाल काळे रॅपर्स इतक्या वर्षांनंतर अजूनही तसेच आहेत.
२. १० पैशांना १० या दराने मिळणार्या, काचेच्या बरणीत भरलेल्या गोडमिट्ट गोळ्या. यांना "दुधाच्या गोळ्या" असे नाव का पडले ? हा आजतागायत मला पडलेला प्रश्न आहे. या प्युअर साखरेच्याच गोळ्या असायच्यात. त्यांचा रंग दुधासारखा असायचा म्हणून दुधाच्या गोळ्या म्हणण्याची पध्दत पडली असावी. त्यांच्या काही बहिणीही हिरवा, निळा, पिवळा, तांबडा रंग लेवून त्यांच्या आजुबाजूच्या बरण्यांमध्ये असायच्यात. पण त्या सुध्दा "दुधाच्याच गोळ्या"च. "ओ काका, ती निळी दुधाची गोळी द्या" असे आम्ही आणि आमचे टिंगेटांगे मित्र पायाच्या टाचा उंचावून दुकानाच्या काऊंटरपर्यंत कसेबसे पोहोचून त्या दुकानदार काकांना सांगत असल्याचे चित्र आत्ताही डोळ्यासमोर तरळतेय.
३. १० पैशांना ५ या दराने वगैरे मिळणार्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या, थोड्या भडक केशरी रंगाच्या आणि संत्र्याच्याच चवीच्या संत्रागोळ्या. या गोळ्या जास्त करून प्रवासी मंडळींमध्ये लोकप्रिय होत्या. बिस्लेरी, पाणी पाऊच वगैरेंचा शोध लागण्यापूर्वीचा तो काळ. प्रवासातली तहान या संत्रा गोळ्या चघळल्याने भागत असते. मध्येच कुठे स्थानकावर बस, रेल्वे वगैरे थांबली तर खाली उतरून आपापल्या फिरकीच्या तांब्यात, वाॅटरबॅगमध्ये नळावरचे पाणी भरून घ्यायचे किंवा तिथल्या नळाला ओंजळ लावून तसेच पाणी पिऊन घ्यायचे. स्टँडवर हे संत्रागोळीवाले भरपूर जण यायचेत.
४. ऐंशीच्या दशकात कॅडबरीच्या फाइव्ह स्टार चाॅकलेटचे दर्शन टी व्ही वरल्या जाहिरातींमुळे झाले होते खरे. पण टी व्ही वर ते माॅडेल हे चाॅकलेट त्यातले ते तार तार ओढून खाताना बघितले की घरच्या मोठ्यांच्या तोंडून "छी बाबा, काय तार तार घाणेरडे खातात !" असे निषेधात्मक उदगार दरवेळी निघायचे. आमच्या मनात "आम्हाला तुम्ही हे चाॅकलेट घेऊन तर द्या आधी. आम्ही तसे तार तार न ओढता गुपचुप तोंड मिटून खाऊन टाकू. त्याची चव तर कळू द्या आधी." असे विचार यायचेही. पण हे विचार प्रगट करण्याची आमच्यापैकी कुणाचीच प्राज्ञा, बिशाद नव्हती. हे मनातले मांडे (फाइव्ह स्टार) आम्ही मनातच खाल्लेत. तत्कालीन मध्यमवर्गीय घरे, घरातल्या स्वतःच्या आणि इतर आसपास असणार्या मुलांची संख्या आणि केवळ "मी माझा" करण्याची नसलेली वृत्ती यामुळे हे फाइव्ह स्टार चाॅकलेट मध्यमवर्गीयांसाठी न परवडणारी चैन होती.
जागतिकीकरण बरेच स्थिरावल्यानंतर बर्याच उशीरा हे फाइव्ह स्टार स्वकमाईने खाल्ले. पण तोवर कॅडबरीच्यच डेअरी मिल्क ची चव तोंडात बसलेली असल्याने फाइव्ह स्टार ची चव तितकिशी भावली नाही. लहानपणी आपल्याला हे चाॅकलेट न देऊन परिस्थितीने आपल्यावर फार मोठा अन्याय केला होता ही भावना मनात येण्यापूर्वीच विरून गेली.
५. साधारणतः १९७९ - ८० च्या सुमारास नागपुरातल्या महाल भागात असलेल्या मेसर्स गोविंद दिनकर गोखले अॅण्ड सन्स या किराणा दुकानात "राजमलाई" चे आगमन झाले. आमचे दादा खूप हौशी होते. त्यामुळे आम्ही न मागता सुध्दा आमच्याकडे "राजमलाई" आली आणि तिच्या चवीमुळे त्याकाळच्या नागपूर आणि विदर्भातल्या सगळ्या लहान मुलांच्या मनात तिने आपले सर्वोच्च आणि अढळ स्थान निर्माण केले. वर्धेजवळील दहेगाव इथे असलेल्या "केळकर गृह उद्योगा"चे उत्पादन असलेली, खव्याच्या - दुधाच्या मिश्र चवीची राजमलाई त्याकाळच्या अनेकांच्या हृदयात, मनात आणि जिभेवर जाऊन बसली. तिने आपल्या चवीचे प्रिंट त्याकाळच्या प्रत्येक लहान मुलाच्या मेंदूवर छापले. खूप उत्तम चवीचा अमीट ठसा राजमलाईने नागपूर आणि विदर्भात उमटवला.
राजमलाईचे यश पाहून केळकरांनी मधल्या काळात "काजूमलाई" पण आणली होती. पण थोरलीची सर धाकलीला कधी आलीच नाही.
केळकर गृह उद्योग विस्तारू लागला. केळकरांची बोरकूट (अजूनही नागपूरवरून मुंबईला रेल्वेन निघालो की वर्धा स्टेशन सोडल्यानंतर माझी नजर डावीकडल्या खिडकीतून दहेगावकडे झेपावत असते, दहेगाव स्टेशनला लागूनच असलेला केळकर गृह उद्योग, त्यांच्या बोरकूट वाळवणासाठीच्या विशाल टाक्या, त्यात वाळत असलेला टनभर बोरकूट पाहून मन आजही आनंदून जाते, मी बालपण पुन्हा जगतो.) विविध लोणची वगैरे अनेक उत्पादने येऊ लागलीत. मधल्या काळात आम्हीही शिक्षणासाठी, नोकरीसाठी नागपूर सोडले. राजमलाई इतरत्र कुठेच मिळाली नाही.
जवळपास एक दीड तपाने नागपुरात परतलो. राजमलाइचा अनेकवेळा शोध घेतला. बर्याचदा राजमलाई मिळाली सुध्दा. पण बालपणीची चव हरवली होती. आज केळकरांकडला त्या चवीचा फाॅर्म्युलाच हरवला होता की आमच्या जिभेवरच्या टेस्टबडसची संरचना बदलली होती हे ठरवणे अवघड झाले होते. खूप शोध घ्यायचो. दरवेळी राजमलाई मिळाली की आवर्जून घ्यायचो आणि खालल्यानंतर मूळ चवीच्या अभावाने निराश व्हायचो.
ती परिसाच्या शोधात असलेल्या माणसाची गोष्ट नाही का ? एका हातात लोखंडी कांब घेऊन जंगलातला प्रत्येक दगड त्या लोखंडाला लावत तो बघत असतो. ज्या दगडाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले तो परिस. आणि तो परिस आपण आपल्याकडे जपून ठेवायचा असे तो ठरवतो. पण हजारो लाखो दगड हातातल्या लोखंडाला लावूनही लोखंड जसेच्या तसेच असलेले पाहून तो निराश होतो. तसे आम्ही या राजमलाईच्या मूळ चवीच्या शोधात निराश झालो होतो.
पण परवा मात्र कमालच झाली. आमच्या कुंडलीत काही ग्रह अचानक उच्चीचे झाले म्हणा, अचानक चांगल्या स्थानांच्या, उत्तम ग्रहांच्या लाभी महादशा सुरू झाल्या म्हणा. आम्हाला आमच्या घराजवळच्या दुकानात ही राजमलाई दिसली. थोड्या निराशेनेच खरेदी करून घरी आणली आणि एक तुकडा तोडून तोंडात टाकला आणि...
मेंदूतले ४४ वर्षांपूर्वीचे टेस्टबडस न्युराॅन्स सक्रिय झालेत. मेंदूत नोंदल्या गेलेल्या चवीने "तीच ही चव. अगदी तीच." असे व्हेरीफीकेशन दिले आणि प्रा. राम प्रकाश किन्हीकर इयत्ता चौथीतले कुमार राम प्रकाश किन्हीकर झालेत.
गेलेल्या बालपणाशी, तारूण्याशी जोडून ठेवणारे मनावर कोरून ठेवलेले हे दुवे. कितीही विसरतो म्हटलं तरी आपल्याला विसरू थोडीच देणार आहेत ? आपल्या या भूतलावरच्या अस्तित्वाबरोबरच आपल्या आतले यांचे अस्तित्व संपणार, खरंय ना ?
- या जगातल्या भरपूर लौकिक गोष्टींमध्ये न रमलेला पण काहीकाही गोष्टीत प्राचार्य राम शेवाळकरांच्या कवितेप्रमाणे "येथल्या खेळात पाची प्राण माझे गुंतलेले" या भावनेने खूप अटॅच्ड असलेला एक मनस्वी मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



No comments:

Post a Comment