Sunday, June 30, 2024

घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते

घर थकलेले संन्यासी,  हळूहळू भिंतही खचते. नागपुरातल्या प्रताप नगर, रविंद्र नगर, टेलिकाॅम नगर परिसरातून रोज जाणेयेणे करताना ग्रेसच्या या ओळी मनात येतात. नागपूर म्हणजे तसे ऐसपैस अघळपघळ शहर होते. ४० - ५० वर्षांपूर्वी तत्कालीन नोकरदारांनी थोडे शहराच्या बाहेर मोकळ्या हवेत घर बांधूयात म्हणत दक्षिण, नैऋत्य नागपुरात मौजा जयताळा, मौजा भामटी, मौजा परसोडी शिवारात प्रशस्त प्लाॅटस घेतलेत. त्यावर खूप नियोजन करून सुंदर टुमदार घरे बांधलीत. त्यात आपल्या कुटुंबाचा, मुला नातवंडांचा विचार करून छान ३००० ते ५००० चौरस फुटी प्लाॅटसवर प्रशस्त वास्तू उभारल्यात. तळमजला आणि पहिला मजला.

त्या प्लाॅटसवर तेव्हाच्या मालकांनी छान छान झाडे लावलीत. जांभूळ., पेरू,आंब्यासारखी फळझाडे, पारिजातक, सदाफुली, चाफ्यासारखी फुलझाडे, मोगरा, मधुमालती, गुलमोहराचे वेल. आपण लावलेले आंब्याचे झाड आपल्या नातवाला फळे देईल, फुलझाडांची फुले रोज देवपूजेला कामाला येतील, मोकळी हवा मिळेल, मस्त जगू हे साधे सोपे, कुणालाही न दुखावणारे स्वप्न.
सुरूवातीच्या काळात मुख्य शहराबाहेर वाटणारी आणि "कुठच्याकुठे रहायला गेलात हो !" अशी पृच्छा सगळ्यांकडून होणारी ही वस्ती शहर वाढल्याने अगदी शहराचा भाग झाली. सगळ्या सोयीसुविधा इथे मुख्य शहरासारख्याच किंबहुना त्यापेक्षा वरचढ उपलब्ध होऊ लागल्यात. घरमालक सुखावलेत. तोपर्यंत ते त्यांच्या निवृत्तीच्या आसपास पोहोचले होते. मुले हाताशी आलेली होती. मुलींची लग्ने झालेली होती, ठरलेली होती. सगळं छान चित्र.
पण १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या संगणक क्रांतीने जग बदलून गेले मग नागपूर तरी त्याला कसे अपवाद असणार ? संगणक क्रांती नागपूरच्या आधी पुणे, हैद्राबाद, बंगलोर ला आली. होतकरू, हुशार तरूणांचे नोकरीनिमित्त फार मोठे स्थलांतर सुरू झाले. काही काहींचे तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेत स्थलांतर झाले.
सुरूवातीला "माझा मुलगा बे एरियात आहे, डाॅलर्समध्ये कमावतोय. गेल्या वर्षी आम्ही दोघेही जाऊन आलो अमेरिकेत. म्हातारा म्हातारीला मुला - सुनेने पूर्ण अमेरिका दाखवून आणली हो. अगदी लास वेगासला नेऊन कॅसिनोत कधी नव्हेतो जुगारही खेळलो." असे कौतुक झाले.
पण नंतर अमेरिकेत गेलेले, पुणे बंगलोरला गेलेले मुलगा - सून नागपूरला परतण्याची चिन्हे दिसेनात. तिथली प्रगती, तिथल्या संधी इथे नव्हत्या. नातवंडांचा जन्म जरी नागपुरात झाला असला तरी त्यांची वाढ, शाळा या सगळ्या घाईगर्दीच्या महानगरांमध्ये झाल्याने त्यांना नागपूर हे संथ शहर वाटू लागले. इथे फक्त आपले आजी - आजोबा राहतात, हे आपले शहर नाही हे त्यांच्या मनात बिंबले गेले. त्यात त्यांचाही काही दोष नव्हता. करियरला संधी, उभारी मिळणारी ठिकाणे कुणालाही आपलीशी वाटणारच. घरमालक आजी आजोबा नागपूरला अगदी एकटे पडलेत. तरूणपणी एकत्र कुटुंबात वाढावे लागल्याने राजाराणीच्या संसारासाठी आसुसलेल्या या पिढीला आता हा राजाराणीचा संसार अक्षरशः बोचू लागला. भरलेले, हसते खेळते असावे म्हणून बांधलेले घर आता फक्त झोपाळ्याच्या करकरणार्या कड्यांच्या आवाजात आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यासोबत अंगणातल्या झाडांच्या लांब सावल्यांमध्ये बुडून जायला लागले. मुला - नातवंडांच्या संसाराची वाढ लक्षात घेऊन बांधलेले चांगले ८०० - ८५० फुटांचे प्रशस्त स्वयंपाकघर सकाळी साध्या भातासोबत फोडणीचे वरण आणि संध्याकाळी त्याच उरलेल्या भाताला फोडणी दिलेली बघू लागली. स्वयंपाकघरातल्या ताटाळात असलेल्या ३० - ४० ताटांवर धूळ जमू लागली. सकाळ संध्याकाळ एक कुकर, दोनतीन भांडी, एक कढई आणि दोन ताटल्या एवढ्यातच भांड्यांचा संसार आटोपू लागला.
मालकांची मुलेही पुण्यात, बंगलोरला स्थाइक झालीत. ही दुसरी पिढीही आता निवृत्तीच्या आसपास आली होती. त्यांची मुलेही तिथेच रमली होती, पोटापाण्याच्या उद्योगाला लागली होती. नागपूरच्या त्यांच्या फेर्या वर्षातून सणांसाठी एकदोन वेळा किंवा ते ही जमेनासे झाले तर म्हातारा - म्हातारीला पुणे बंगलोरला बोलावून तिथेच महालक्ष्म्या गणपती हे सण साजरे होऊ लागलेत. "आमच्या घरच्या महालक्ष्म्या या वर्षी म्हैसूरला बसल्या होत्या हं" हे अभिमानाने सांगण्यातल्या सुरांत "कधीकाळी महालक्ष्म्यांसाठी लागतील म्हणून खूप फुलझाडे, केळीच्या पानांसाठी केळी नागपूरच्या घरात लावलेली होती त्यांचा या वर्षी उपयोगच झाला नाही. सगळी तशीच सुकून गेलीत." हा सूर मनातल्या मनातच खंतावू लागला.
म्हातारा - म्हातारी आजारी पडू लागलेत. हाॅस्पिटलायझेशन साठी मुले येऊ लागलीत. ती पिढी तर यांच्यापेक्षा जास्त थकलेली. "बाबा / आई, तुम्ही तिकडेच चला ना आमच्यासोबत. सगळ्यांनाच सोईचे होईल." असा व्यावहारिक मार्ग निघू लागला. म्हातारा - म्हातारी सहा महिने, वर्ष आपल्या वास्तूपासून, जीवनस्वप्नापासून दूर राहू लागलेत.
जीवनक्रमात अपरिहार्य म्हणून दोघांपैकी एक देवाघरी गेल्यावर तर राहिलेल्या एकट्यांचे जिणे अधिकच बिकट होऊ लागले. छोटीछोटी दुखणीखुपणी, अपघात अगदीच असह्य होऊ लागले. नागपुरात रूजलेले, वाढलेले हे वृक्ष आपल्या मुळांपासून तुटून दूरवर कुठेतरी रूजण्यासाठी नेल्या जाऊ लागलेत. नाईलाज असला तरी ही मंडळी मुला नातवंडांमध्ये रमू लागलीत. नागपुरातली घरे मात्र यांच्या जाण्याने यांच्यापेक्षा जास्त थकलीत.
अशा विस्तीर्ण प्लाॅटसवर आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचे लक्ष गेले नसते तरच नवल. एवढ्या मोठ्या प्लाॅटवर फक्त २ माणसे राहतात ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाला पटण्यासारखी नव्हती. अशा टुमदार घरांचे करोडोंचे व्यवहार होऊ लागलेत. त्याजागी ५ - ६ मजली लक्झरीयस फ्लॅटस बांधले जाऊ लागलेत. थकलेली घरे जमीनदोस्त झालीत. सोबतच घर मालक मालकिणींची स्वप्नेही नव्या फ्लॅटस्कीमच्या खोल पायव्यात गाडली जाऊ लागलीत. एक दीड कोटी रूपये मिळालेत तरी ते घर, त्याच्याशी निगडीत स्वप्ने, त्याचा टुमदारपणा, ऐसपैसपणा याची किंमत कितीही कोटी रूपयांमध्ये होऊ शकत नाही ही जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी काळीज पोखरत राहिली.
थकलेल्या संन्यासी घराची भिंत अशीच हळूहळू खचत राहिली.
- नागपुरातल्या घरांची ही स्पंदने अचूक टिपणारा, स्वतः नागपूरबाहेर अनेक वर्षे काढूनही मनाने नागपूरकरच राहिलेला आणि माझ्या वडिलांच्या वयाच्या पिढीची स्पंदने संवेदनशीलपणाने जाणणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

3 comments:

  1. रामराया अगदी अचूकपणे टिपली आहेत तुम्ही ही स्पंदने. प्रत्येक छोट्या शहरांचे थोड्या फार फरकाने हेच आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय चपखल अशा शब्दांत मांडलेले ज्येष्ठांचे मनोगत. शहराच्या मध्यभागी असलेलं हिरवं गार धरमपेठ, खरेटाउन, लक्ष्मी नगर नुसतं कांक्रीट चं जंगल होतंय. खरंच घरं थकली इथली. कधी मधी आल्यावर ओळखता ही येऊ नये इतक्या निर्दयपणे खुणा पुसल्या जातात आहे. आणि मनःशांती ही.

    ReplyDelete