Showing posts with label चंद्रपूर. Show all posts
Showing posts with label चंद्रपूर. Show all posts

Monday, June 2, 2025

निरोप: एक देणे, एक घेणे.

मध्यंतरी एक मराठी सिनेमा बघण्यात आला. खूप गाजलेला. सहा बहिणींच्या एकमेकींशी असलेल्या नात्यांवर आधारलेला. त्यात एक दृष्य होते. मोठ्या बहिणीच्या घरी रहायला आलेली तिची धाकटी बहीण तिथला तिचा मुक्काम आटोपल्यानंतर परत आपल्या घरी जायला निघते. मोठी बहीण स्वतःच्या घराच्या दारापर्यंतच जाऊन "सांभाळून जा गं" असे बोलून तिला निरोप देते. मला हे फ़ार तोंडदेखले वाटले. अरे, किमान बिल्डींगमधली लिफ़्ट उतरून बाहेर तिच्या टॅक्सीपर्यंत तरी तिला सोडता आले असते. मनात काही काळजी नाही आणि नुसते तोंडदेखले "सांभाळून जा गं" हे मला दरवेळी खटकते.


आमच्या बालपणी आमच्या घरी कुणी पाहुणी मंडळी मुक्कामाला आलीत तर त्यांना बसस्टॅण्ड नाहीतर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांची बस, रेल्वे सुटेपर्यंत तिथे उभे राहून निरोप देत असू. बस, रेल्वे हलण्याच्या अत्यंत कातर क्षणांमध्ये हात हातात घेऊन "पत्र टाक रे, फ़ोन कर गं" वगैरे निरोपांची देवाणघेवाण होत असे. तो निरोप त्या पाहुण्याच्या आपल्या घरी पुढल्या मुक्कामाला येण्याची नांदी असे. त्याला आपल्याकडे पुन्हा यावेसे वाटले पाहिजे, तशी ओढ लागली पाहिजे आणि अशा भेटीगाठी वारंवार होत राहिल्या पाहिजेत ही त्यामागची अत्यंत प्रामाणिक आणि भाबडी भावना असे.


अर्थात आम्हालाही त्या त्या पाहुण्यांच्या गावी गेल्यानंतर तसेच निरोप मिळत असत. मला आठवतय बालपणी उन्हाळ्याच्या सुट्याच्या सुट्या आजोळी, चंद्रपूरला घालवल्यानंतर शाळा सुरू होण्याच्या सुमाराला आम्ही जेव्हा नागपूरला परतत असू तेव्हा आमचे ऐंशीपार वृद्ध आजोबा हळूहळू चालत आम्हाला निरोप द्यायला आजोळच्या गल्लीच्या तोंडापर्यंत येत असत. त्यांच्यापेक्षाही जास्त थकलेली, मान हलत असलेली आमची आजी पण गल्लीच्या तोंडाशी आलेल्या ऑटोरिक्षापर्यंत आम्हाला निरोप द्यायला यायची. ऑटोत बसल्यानंतर मागे वळून वळून आम्ही, तिचा आमच्या दिशेने हलणारा हात बघत असू. बसस्टॅण्डपर्यंत सोडायला समवयस्क मामेभावंडे येत असत. बसमध्ये बसल्यानंतर बस सुटेपर्यंत त्यांचे आणि आमचे सुकलेले चेहरे आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट करीत असत. त्यांचा आणि आमचा न बोलता होणारा हा मूक संवाद अंतरीचे नाते अधिक दृढ करीत जात असे. बस बसस्टॅण्डवरून निघून पाण्याच्या टाकीजवळून नागपूरकडे भरधाव निघत असे. ती तशी निघाल्यावर चंद्रपूर शहर दिसेनासे होईपर्यंत आम्ही त्या दिशेकडे बघत असू. आणि संपूर्ण प्रवासात चंद्रपूरला घालवलेल्या मजेमजेच्या दिवसांच्या गप्पा अखंड चालत असत किंवा एकटेच असलोत तर त्या दिवसांची मनात उजळणी होत असे. पुन्हा कधी आपल्याला चंद्रपूरला यायला मिळेल ? याचे हिशेब मनातल्या मनात होत असत. हा सगळ्या त्या भावपूर्ण निरोपांचा परिणाम. आपली कुणीतरी वाट बघणारे या गावात आहे ही भावनाच त्या गावाशी आपले नाते अधिक दृढ करणारी ठरते, हो ना ?


मी शिक्षणासाठी पहिल्यांदा घरापासून दूर कराडला जायला निघालो होतो तेव्हा मला महाराष्ट्र एक्सप्रेसवर निरोप द्यायला माझे आई दादा आणि माझी भावंडं आलेली होती. पोटचा गोळा इतक्या दूर जायला निघतोय म्हणून माझ्या आईचा बांध तर दोन तीन दिवसांपासून फ़ुटला होता पण माझ्या दादांना तसे करून चालणार नव्हते. मुलाच्या शिक्षणासाठीची सगळी तरतूद करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. पण महाराष्ट्र एक्सप्रेस हलली आणि नागपूर स्टेशनच्या हद्दीबाहेर एक मोठे वळण घेऊन अजनीकडे निघेपर्यंत मी गाडीच्या दारात आणि माझे दादा प्लॅटफ़ॉर्मवर उभे राहून एकमेकांना हात दाखवत होतो. दादांच्या त्या हलणा-या हाताने मला त्यांच्या हृदयातली तगमग, पैशांची ओढाताण सगळी समजत होती. आपण त्यांचे पांग नक्की फ़ेडले पाहिजेत, शिक्षणासाठी चाललोय - मौजमजेसाठी नाही तेव्हा उत्तम शिक्षणच घ्यायचे, आपला बेस्ट परफ़ॉर्मन्स द्यायचा हा मनातला निश्चय त्या निरोपाच्या देवाणघेवाणीत माझ्या मनात दृढ होत होता. त्यामुळे त्यानंतर विद्यार्थीदशेत येणा-या अनेक प्रलोभनांना मी बळी पडलो नाही. नेमस्त जीवन जगत शिक्षण उत्तम रितीने पूर्ण करणे याला प्रथम प्राधान्य देत गेलो.


कालांतराने नोकरी लागली. पुन्हा नागपूरपासून दूर मुंबईला. आता दादा तर नव्हते. पण धाकट्या भावाने त्यांची जागा घेतली होती. गाडी बदलली. महाराष्ट्र एक्सप्रेस ऐवजी विदर्भ एक्सप्रेसने प्रवास व्हायला लागला. धाकटा भाऊ, त्याच्या कामधंद्यात कितीही बिझी असला तरी निरोप द्यायला स्टेशनवर यायचाच. गाडी सुटल्यानंतर त्याचा आणि माझा हात तसाच एकमेकांना दिसेनासे होईपर्यंत हलत रहायचा. वडील "पोहोचल्यावर पत्र टाक रे" म्हणायचेत. हा "फ़ोन कर रे" म्हणतो एव्हढाच काय तो फ़रक पण या निरोपाच्या देवाणघेवाणीत या हृदयीचे प्रेम त्या हृदयी सहज संक्रमित होत जायचे.


काळाच्या ओघात वडीलांना अखेरचा निरोप द्यावा लागला. त्याक्षणी त्यांचा हात हलत नव्हता म्हणून फ़क्त आमचे हृदय हललेले होते. मग लक्षात आले की अरे शेवटी आपली सगळ्यांचाच प्रवास तिथपर्यंत असणार, नाही का ? आपल्याला निरोप द्यायला मंडळी जमावीत. आपल्या आप्तेष्टांची, दोस्तमित्रांची, सहका-यांची सगळ्यांची मने, हृदये हललेली असावीत आपण मात्र आपल्या जीवनभर कधीही न जमलेले, शिष्टासारखे वागून, कुणाचीही दखल न घेता सगळ्यांच्या हृदयात घर करून आपल्या नियत प्रवासाला निघून जावे. कारण त्या जगन्नियंत्याचा आपल्याला जो निरोप आलेला असतो त्याला होकार देणे आपल्याला भाग असते.  


- गेल्या काही वर्षात अनेक जवळच्या व्यक्तींना असा कायमचा निरोप द्यावा लागण्याने व्यथित होऊन "त्या"च्या अखेरच्या निरोपाची आतुरतेने वाट बघणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


सोमवार, २ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५

Saturday, May 24, 2025

अनुबंध: सजीव आणि निर्जीवांशी सुद्धा

 प्रत्येक जागेच्या काहीकाही vibesअसतात. आठवडी बाजाराच्या तर विशेषच.


जन्मापासून तारूण्यापर्यंत नागपूरच्या महाल भागात आयुष्य घालवल्याने महालच्या बुधवार बाजाराविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यातही कांदे बटाटे एका विशिष्ट विक्रेत्याकडून, फळभाज्या एक दोन विशिष्ट जणांकडूनच, पालेभाजी एका विशिष्ट माणसाकडूनच, भाजीच्या accessories (सांबार, आले, लिंबू, मिरच्या गोडलिंब वगैरे) एका विशिष्ट जागेहूनच अशी बरीच वर्षांची सवय होती.

शिक्षणासाठी, नोकरीसाठी मधली १७ - १८ वर्षे बाहेरगावी घालवल्यानंतर पश्चिम नागपूरमधल्या घरी स्थलांतरित झालो तरी दर रविवारी भाजी घ्यायला महालातच जात होतो. तिथे गेल्याशिवाय भाजी घेतल्यासारखे वाटतच नव्हते. तिथे मोठी इमारत उभी करण्यासाठी तिथला जुना बाजार पाडला तेव्हा घरातली कुणीतरी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यासारखा मी शोकाकूल झालो होतो. आता महालात गेलो तरी त्या नवीन चाललेल्या बांधकामाकडे हल्ली एक नजरसुध्दा टाकावीशी वाटत नाही.

नागपूरच्या महाल बाजारासारखाच चंद्रपूरचा गोल बाजार मला अत्यंत प्रिय आहे. बालपणी सुट्यांमध्ये उन्हाळेच्या उन्हाळे आणि सगळ्या दिवाळी सुट्या आजोळी, चंद्रपूरला घालवल्यामुळे माझा आणि गोल बाजाराचा हा ऋणानुबंध दृढ झालेला आहे. आजही मी चंद्रपूरला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा काम असो नसो, गोलबाजारातून एक चक्कर मारून येतो, माझे हरवलेले बालपणाचे दिवस जगून घेतो.

सांगोल्यातल्या बैल बाजाराच्या मैदानावर भरणारा रविवारचा आठवडी भाजीबाजारही तसाच माझ्या मनात घर करून आहे. सांगोल्यात आमचे वास्तव्य उणेपुरे ३० च महिने होते पण तो बाजार मनात अजूनही तिथे मिळणार्या भाजीसारखाच ताजा आहे.

मनात तसाच ताजेपणा सोलापूरच्या नवी पेठेतल्या बाजाराचा आहे.

१० वर्षांपूर्वी नागपुरात परतलो आणि मग सोनेगावच्या गुरूवारच्या आठवडी भाजी बाजारात जाणे होऊ लागले. गेली ३ - ४ महिने नेमके गुरूवारी संध्याकाळी असे काही काम निघायचे की त्या बाजारात जाऊन भाजी आणणे व्हायचेच नाही. काल खूप दिवसांनी भाजी आणायला तिथे गेलो तेव्हा जाणवले की बर्याच कालावधीनंतर भेटणार्या जिवलग बालमित्रासारखा हा बाजार नव्याने मला भेटतो आहे. त्याला भेटून मला आणि मला भेटून त्यालाही खूप खूप आनंद झालेला आहे. काल परतताना पिशवीत नुसती भाजीच नाही तर मनात एक नवा ताजेपणा घेऊन परतलो होतो.

- एकदा आपले म्हटले की कितीही वर्षांनी भेटलोत तरी मधली काही वर्षे नसल्यासारखीच, तो अनुभव पुसून टाकत, नव्याने पण जुन्याच संदर्भांसह भेटणारा,

व्यावहारिक जगाच्या दृष्टीने असला अव्यवहारी वागणारा

आणि

सजीव व निर्जीव सृष्टीच्याही vibes शी स्वतःच्या vibes कायम जुळवत असणारा एक अत्यंत संवेदनशील माणूस

प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, January 11, 2011

पहिला वीकएण्ड २०११.

दि. ०८/०१/२०११.
कॊलेज संपवून मी दीड वाजता घरी आलो. लगेच थोडस खाऊन आम्ही आमच्या कारने श्री. देवईकर सरांच्या घरी शंकरनगर ला गेलो. तिथून दुपारी १४.४० ला चंद्रपूर साठी निघालो. मध्ये रिलायन्स पेट्रोल पंपात गाडीत गॆस भरून चंद्रपूर च्या दिशेने निघालो. आम्ही सर्व जण यंदा हुरडा खायला चंद्रपूरला निघालो होतो. मी सुद्धा जवळपास ५ वर्षांनंतर असा हुरडा वगैरे खायला निघालो होतो.
नागपूर ते चंद्रपूर रस्ता लहानपणापासून फ़ार परिचयाचा. आत्ता गाडी घेतल्यानंतर तर फ़ारच आवडतोय हा रस्ता.भलेही जांब ते वरोरा हा रस्ता फ़ार खराब असेल पण त्या माहेरच्या वैद्यासारखे ह्या रस्त्याचे अवगुणही द्रुष्टीआड होतात.
जांब ला पोहोचायला जवळपास एक तास दहा मिनीटे लागतात. हॊटेल अशोका मध्ये थांबल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होत नसल्याप्रमाणे आम्ही तिथे थांबलो. थोडी पोटपूजा आणि चहा. १६.१९ ला चंद्रपूर साठी प्रस्थान.
जांब ते वरोरा हा रस्ता दिवाळी पेक्षाही जास्त खराब झालेला दिसतोय. तरीही संध्याकाळी १८.१५ ला आम्ही घरी आलोय. गेल्या दोन वर्षांमध्ये चंद्रपूरात वाहनांची (विशेषतः चारचाकींची) संख्या खूपच वाढल्याचे जाणवतेय. प्रदुषण तर गेल्या १० वर्षात कमालीचे वाढलेय. पडोली मध्ये आलो की धुराचे आणि धुळींचे लोट्च्या लोट गाडीवर चाल करून येताना दिसतात. हे कुठेतरी थांबायला हवे आहे.
नेहेमीप्रमाणे दादामामांकडे स्वागत आणि तिथेच रात्री गप्पा मारत मारत झोप.



डॊ. देवईकर व सौ. देवईकर


दि. ०९/०१/२०११

सकाळी लवकर उठून आम्ही आवरतोय. साधारण सव्वा दहा च्या सुमाराला आम्ही निघतोय.अंचलेश्वर मंदीर आणि महाकाली मंदीरात दर्शन घेउन आमचे बल्लारशहाच्या दिशेने प्रस्थान. हा रस्ता तर दुपदरीच पण फ़ार वर्दळीचा. वाहनांना ओव्हरटेक करण खूप कठीण. एखाद्या ट्रक च्या मागे दहा दहा, पंधरा पंधरा मिनीटे हळू हळू जाण भाग आहे.
सकाळी अकरा च्या सुमाराला आम्ही दहेली च्या शेतावर पोहोचतोय.

सोबत सचीन व सौ.सानिका सचीन. दोन गाड्या घेऊन आमचा ताफ़ा अगदी शेतात घुसला. मुलांच्या आनंदाला उधाण आलय.


मृण्मयी किन्हीकर,शर्वरी सगदेव आणि सोहम सगदेव

आमच्या सोबत सध्याचे मालक (सचीन सगदेव) आणि भावी मालक (सोहम सगदेव) दोघेही आहेत. आम्ही सर्वांनी प्रथम बोराच्या झाडाकडे मोर्चा वळवला. मनसोक्त बोरे वेचून खुल्या आणि मोकळ्या निसर्गाचा मुक्त आस्वाद घेतला.
"दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ची आठवण होइल असे शेत. त्यात पिकत असलेला भाजीपाला आणि फुले. मस्त हवा. आम्ही आमची फुफुसे भरून घेतलीत. मुलांच्या मस्तीला तर उधाण आले होते.

डॊ. देवईकर व सचीन सगदेव




जेवण बनवण्यात थोड्या अडचणी येणार होत्या त्यामुळे आम्ही न्याहारीवरच समाधान मानले. आणि तृप्त मनाने निघालो.
चंद्रपूरला पुन्हा पाहूणचार घेऊन दुपारी १६.४७ ला निघालो. नागपूर च्या अगदी जवळ खापरी उड्डाण पुलावर अपघातामुळे वाहतूक खोळंबा झालेला होता. जवळ्पास पाऊण तास त्यात वाया गेला. रात्री २१.३१ ला आम्ही सर्व घरी आलो. वाटेत श्री देवईकर सरांना त्यांच्या घरी सोडले.
मस्त वीकेण्ड. त्याच्या आठवणी मनात घेऊन परततोय.




Wednesday, January 5, 2011

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१

१३/२/१९९२.
य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची "अर्थ-अनर्थ" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा, गप्पा रंगलेल्या आहेत. मध्येच कुणीतरी मित्र आठवण करून देतो की राम्या लेका तुला उद्या सकाळी लवकर उठून नागपूर ला जायचय ना? मग पळत पळत होस्टेल गाठतोय आणि रात्री दीड च्या आसपास झोपतोय. पार्टनर ला सकाळी ६ ला उठवण्याची आठवण कम तंबी.

१४/२/१९९२.
सकाळचे ७ वाजलेत. चिंच्या (पार्टनर) गाढ झोपलाय. मी उठतोय आणि घड्याळात पाहून सरळ अंगात शर्ट पॆण्ट चढवून तयार. दात घासायला, अंघोळी बिंघोळी साठी वेळच नाहीये. एव्ह्ढेच काय तर भांग पाडायला सुद्धा वेळ नाही. सकाळी सव्वा नऊ वाजताची गोवा-दिल्ली ए़क्सप्रेस सातारा स्टेशनावरून पकडायची आहे. कराड ते सातारा कमीत कमी १ तास व सातारा ते सातारा स्टेशन अर्धा तास. हॊस्टेल वरुन कराड बस स्टॆण्ड पर्यंत १५ मिनिटे. सातारा ते नागपूर टिकीट पण काढायचेय. टेन्शन... टेन्शन..... टेन्शन.......
कराड बस स्टॆण्ड. सकाळचे सव्वा सात. नेहमी असतो तसा बस निवडत वगॆरॆ बसायला वेळ नाही. पहिली बस आलीय.



इस्लामपूर जलद पुणे.
MH-12 /F 2898.

म.का.दा. न.टा. ६१७, १९९०-९१.
TATA 1510,
चेसिस नंबर ५२४७१०,
सां. इस्लामपूर आगार. ३*२, एकूण ५५ आसने. माझा आसन क्र. १.
बस लगेच निघतेय. फ़क्त उंब्रज ला थांबून सातारा ला सकाळी साडे आठ ला पोहोचतेय. पंचावन किलोमीटर सव्वा तासात. Average speed ४४ किमी प्रतितास. Thats OK.
माझ मलाच हसायला येतय. किती घाईत निघालोय!
सातारा बस स्थानकावर रिक्शा शी हुज्जत घालत शेवटी थोड्या चढ्या भावानेच सातारा स्टेशन गाठ्तोय. नऊ वाजायला आलेत. तिकीट खिडकी वर फ़ार रांग नसावी ही माझी इच्छा.
अजिबात गर्दी नाही. कारण गाडी चक्क १ तास लेट आहे. सुट्केचा निश्वाःस टाकत तिकीट काढून प्लॆट्फ़ॊर्म वर पोहोचतोय. टुमदार छोटेसे सातारा स्टेशन.
छोटीताई (माझी मोठी मामेबहीण) च्या लग्नाला चंद्रपूर ला जायचय. सगळ्यांच आग्रहाच निमंत्रण. जायला हवच आहे. पण एकांकिका स्पर्धा होत्याच आणि त्यात एन्ट्री फ़ार आधीच गेली होती म्हणून मग ही पळापळ. नागपूर ला थेट जायला महाराष्ट्र एक्सप्रेस आहे पण ती उशीरा पोहोचेल म्हणून हा वेगळाच प्रवास.
सकाळचे साडे दहा वाजताहेत. कोरेगाव कडल्या दिशेला सिग्नल पडलाय. वळणावर दूरवर धूर दिसतोय. एंजिनाच धूड लांबच लांब गाडीला घेऊन १ नंबर प्लॆटफॊर्म वर येतय.



२७०१ डाऊन मिरज ह.निझामुद्दीन गोवा सुपर एक्सप्रेस.
(त्या वेळी मिरज ते वास्को द गामा हा मार्ग मीटर गेज होता. २७०१/२७०२ फक्त मिरज पर्यंतच जायची व मिरज पासूनच सुटायची. मिरजेच्या पुढे हीच गाडी मीटर गेज ने वास्को द गामा पर्यंत जायची. पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गावर धावलेली ही पहिली सुपरफास्ट गाडी. तिच बरच कौतिक आम्हाला होत. आणि गाडी होतिच तशी कवतिक करण्यासारखी. मिरजे वरुन थेट सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर,मनमाड, भुसावळ करीत दिल्ली ला जायची.)
(या गाडी च्या आकर्षणाचा आणखी एक भाग म्हणजे आमची नेहेमीची महाराष्ट्र एक्सप्रेस जाताना आणी येतानाच्या प्रवासातही मनमाड ते पुणे हा प्रवास किट्ट काळोखात करायची. त्यामुळे आमच्या नागपूर ते कराड या प्रवासात अहमदनगर, दौंड ही स्टेशन्स लागतात ही खबर आमच्या काही दोस्तांना २ वर्षांनंतर लागली. २७०१/२७०२ हा प्रवास दिवसा ढवळ्या करायची त्यामुळे हा भाग कधी नव्हे तो बघायला मिळायचा.)
एन्जिन क्र. : 17148 , WDM 2, C.R. Diesesl Shed इटारसी,
Manufactured by: Diesesl Locomotive Works, Varanasi, in May 1969.

गाडी ची पोझिशन खालील प्रमाणे:
एस-४, एस-१, एस-२, एस-३, ए-१, ए-२, एफ़-१, एस-५, एस-६ ,एस-७, एस-८, जनरल, जनरल, जनरल + रेल्वे डाक सेवा, जनरल, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).
(त्यावेळी ही गाडी आपला रेक ७०२१/७०२२ हैद्राबाद-ह.निझामुद्दीन दक्षीण एक्सप्रेस शी शेअर करायची. त्यामुळे ए.सी. कोचेस च्या आधी चे एस-१ ते एस-४ कोचेस ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस चे व उरलेला रेक ह.निझामुद्दीन-हैद्राबाद असा असायचा. गाडी च्या बोर्डांवरही असेच ड्युएल मार्किंग असायचे. एकाच बोर्डावर वर हैद्राबाद-ह.निझामुद्दीन किंवा ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम आणि खाली मिरज ह.निझामुद्दीन असे मार्किंग असायचे.)
मी आपला एस-२ मध्ये गेलो. गर्दी अजिबातच नव्हती. थोड्या वेळाने टी.टी.इ. आला की रिझर्वेशन चार्ज भरायचा आणि आरामात या डब्यातून प्रवास करायचा हा माझा मनसूबा होता. (तेव्हा स्लीपर हा वेगळा वर्ग नव्हता. सेकण्ड क्लास चे तिकीट घेऊन रिझर्वेशन चार्ज भरुन स्लीपर मध्ये बसता यायचे.)
कोच नं. 6712, द.म., एस-२ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by: Rail Coach Factory, Kapoorthala,
Shell No. : WGSCN 352,
Date: September 1990.
एकूण आसने व शायिका: ७२.
त्यामानाने हा नवीन च कोच होता. महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आम्हाला १९७० च्या दशकातले जुने पुराणे कोचेस मिळायचेत.
गाडी लगेचच हलली. सातार वरून बसणारे आम्ही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच पासिंजर होतो. गाडीतही गर्दी नाहीच.
मजेत प्रवास सुरु झाला. काल रात्री च्या एकांकिके ची धुंदी होतीच. मस्त वातावरण. ढगाळ वातावरण होते. ट्रेन प्रवासात माझी सुखाची व्याख्या अशी साधी सोपी आहे की गाडी जरा रिकामी असावी, समोर कुणी सहप्रवासी जागा अड्वून नसावा, आपल्याला साइड लोअर बर्थ मिळाला असावा, मस्त पैकी पाय पसरून बसता यावे, वाटलच तर लवंडता यावे, ड्रायव्हर जरा जोसात असावा आणि मोठी मोठी स्टेशन न घेता गाडी तुफ़ान धावावी. हा सगळा योग आज जुळून आला होता.
गाडी आदर्की वाठार च्या घाटांतून धावतेय. उशीर झाल्यामुळे जरा मेक अप करण्यासाठी वेगही आहे आणि आता पुढचा थांबा पुणे. जरी सिंगल लाईन असली तरी या गाडीला थांबवणार नाहीत हा अनुभव. उलट ह्या गाडी साठी इतर गाड्या थांबवल्याचा आमचा अनुभव. आता एक तास गाडी लेट धावतेय पण सहज हा वेळ भरून काढेल. भुसावळ स्टेशन वरून पुढे दादर-नागपूर जर मिळालीच तर ठीकच नाहीतर तिच्या मागची अहमदाबाद-हावडा तर नककी मिळेलच.
अपेक्षेप्रमाणे घोरपडी साडे बारा च्या सुमारास आलय पण इथे मात्र गाडी जरा जास्तच वेळ थांबतेय. अर्धा तास झाला तरी हलण्याची चिन्हे नाहीत. बाजुलाच पुण्याच डिझेल शेड. त्यात डिझेल इंजिनांची ये जा चाललीय पण आता पुढल्या प्रवासाचे वेध आणी काळजी लागलीय.
आता ढगाळ वातावरण जास्तच जाणवू लागलेय.पाऊस कधीही सुरू होइल ही अवस्था.थोडी चौकशी केल्यावर कळतय की काल मुंबई ला फ़ार पाऊस झालाय. गाड्या सगळ्या अडकल्यात. पुणे स्टेशन वर प्लॆट्फ़ॊर्म च रिकामा नाही. इथे वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नाहीय.
पेन्ट्री कार वाल्या पोरांची वाट बघणे सुरू आहे. भुकेची जाणीव तीव्रतेने होतेय. काही तरी पोटात ढकलून पुन्हा गाडी हलण्याची वाट सगळेच बघत आहेत. सगळ्यांच्या काळजी युक्त चर्चा वगैरे वगैरे.

अखेर दुपारी अडीच वाजता गाडी हलतेय.हळू हळू पुण्यात आलीय. प्लॆट्फ़ॊर्म ५ वर गाडी घेतलीय. नॊर्मली २ नं किंवा ३ नं च्या प्लॆट्फ़ॊर्म वर ही गाडी घेतात. आज प्लॆट्फ़ॊर्म मिळाला हे ही नसे थोडके.
पुणे स्टेशन वरही चांगला तासभर मुक्काम होतोय. पण इथे आजुबाजूला खुप नवनवीन गाड्या. वेळापत्रक कोलमडल्यामुळे ज्या गाड्या नेहेमी दिसत नाहीत त्या दिसताहेत.वेळ कसा गेला कळत नाहीय.
साडेतीन ला एंजीन उलट बाजूला लावून गाडी हललीय. पुन्हा वेग. पण आता भुसावळ वरुन पुढे जायला कुठली गाडी मिळणार याची चिंता.
दौंड येइ पर्यंत संध्याकाळ चे सव्वा पाच वाजलेत. दौंड ला पुन्हा एंजीन उलट बाजूला लावण्याची कसरत सुरू झालीय आणि एवढ्या वेळात मला लागलेला शोध म्हणजे बाजूचाच एस-३ हा नवीन डबा आहे आणि तो जास्त रिकामा आहे. लगेचच त्या डब्यात मी शिफ़्ट झालोय.
कोच नं. 8399, द.पू. एस-३ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by Rail Coach Factory, Kapoorthala,
Shell No. WGSCN 1104,
Date: September 1991
एकूण आसने व शायिका: ७२.
दौंड वरून गाडी संध्याकाळी पावणे सहा ला हललीय आता मात्र सगळा बॆकलॊग भरुन काढण्यासाठीच जणू ड्रायव्हर काकांनी जोसात हाणलीय.सगळ्यात तीव्र जाणीव होतेय ती झोपेची.माझ्या नकळत मी डुलक्या घेता घेता कधी झोपी गेलोय ते मलाच कळत नाही. नाटकाच्या तालमींची जागरण, प्रत्यक्ष नाटकाच्या दिवशी रात्री उशीरा पर्यंत झालेला प्रयोग यामुळे अपुरी झोप आता ओसंडून वाहतेय.वैदर्भिय भाषेत सांगायच तर झोप अंगाच्या बाहेर झालीय.
जाग आल्यावर जाणीव की गाडी कुठल्या तरी मोठ्या स्टेशनावर थांबलीय. हळू हळू कळतय की हे तर मनमाड स्टेशन. पूर्ण पणे जाग आलेली नसतानाही मी भराभर आवरासावर करतोय. काय करायच? कुठे जातोय? काहीच कळत नसतानाही मी प्लॆट्फ़ॊर्म वर उतरलोय आणी भराभर जिना चढून ओव्हरब्रिज वर पोहोचतोय.
तिथे पोहोचल्यावर ब्रेक जर्नी साठी टी.टी.इ. समोर तिकीट सादर केल्यावर तो सल्ला देतोय की काल मुंबईतही बराच पाऊस झाल्याने गाड्यांचा गोंधळच आहे. खूप गाड्या भुसावळ पर्यंतच आहेत. त्यामुळे तुम्ही गोवा-दिल्ली गाडीने भुसावळ पर्यंत जा तिथून तुम्हाला चांगला ऒप्शन मिळेल.मी परततोय न परततोय तोच गाडी हलतेय.थोडा धावूनच गाडी पकडावी लागतेय. तोच डबा. तोच बर्थ. आणि......
तिथे परतल्यावर लक्षात येतय की मघाशी उतरताना अर्धवट झोपेत आणि कसल्यातरी अनामिक घाईत मी माझी सूट्केस जी बर्थ ला बांधून ठेवली होती ती तशीच होती. गडबडीत ती घ्यायलाच मी विसरलो. मग हळूहळू झोप उडाली आणि विचार केला की मी नक्की काय घेऊन उतरलो होतो? लिटरली काहीच नाही. सूट्केस नाही. पाण्याची बॊटल नाही. फ़क्त चप्पल घालून मी उतरलो आणि वेड्या सारखा धावलो होतो.जर ही गाडी निघून गेल्यावर टी.टी.ई. भेटला असता तर काहीच खर नव्हत. स्वतःची एकाच वेळी खूप चीड येत होती आणि हसायलाही येत होत. असा कसा मी वागलो? कळण्याच्या पलिकडले होते. मग घड्याळाकडे लक्ष गेले. रात्रीचे सव्वा नऊ वाजले होते. झोप तर पुरती उडालेली होती. गाडी वेगात धावत होती. डिझेल एंजिन काढून आता इलेक्ट्रिक एंजिन लावलेले होते त्यामुळे आणि आता दुहेरी मार्ग होता त्यामुळेही.
रात्री साडे अकरा वाजता भुसावळ येतय. आता मात्र पूर्णपणे जागा होऊन सगळ्या वस्तुंसकट मी खाली उतरतोय.फ़लाटावर तुफ़ान गर्दी. सातारा ते भुसावळ ७२५ किमी अंतर १३ तासात. सरासरी वेग ५६ किमी प्रतितास. गाडीने बराच वेळ भरून काढलाय.
भुसावळ स्थानकात गोंधळाचे वातावरण. पुष्कळ गाड्या थांबलेल्या. बहुतांशी मुंबई कडे जायला तयार असलेल्या.हळूहळू एकेक गाडी मुंबई कडे रवाना होतेय. काही मुंबई कडून इटारसी कडे प्रस्थान करताहेत. नागपूर कडे एकही नाही. आता मात्र काळजी वाढलीय.
भुसावळ ला थोडस काहीतरी खाऊन वाट बघणे सुरू आहे. रात्री चे साडे बारा वाजताहेत.
अचानक घोषणा होतेय. २८५९ गीतांजली एक्सप्रेस तब्बल १३ तास उशीरा धावतेय. म्हणजे रात्री अडीच पर्यंत येइल. जीव भांड्यात पडलाय पण आता नवीनच काळजी.गाडीत जागा असणार का? बंगाली लोकांचा यापूर्वी चा जागा शेअर करण्याबाबतचा अनुभव फ़ार चांगला नाही. ते जागा द्यायला कमालीचे नाखुश असतात.
१५/२/१९९२

रात्री दीड ला गाडी येतेय.
२८५९ डाऊन मुंबई-हावडा गीतांजली सुपर एक्सप्रेस.
एन्जिन क्र. 21343 , C.R. भुसावळ
Manufactured by: Chittaranjan Locomotive Works


गाडी ची पोझिशन खालील प्रमाणे:
गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन, एस-१, एस-२, एस-३, एस-४, एस-५, एस-६, एस-७, पेन्ट्री कार, एस-८, एस-९, एस-१०, एस-११, एस-१२, ए-१, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).
आणी आनंदाची बाब म्हणजे गाडी चक्क रिकामी आहे. ही गाडी काल मुंबई पर्यन्त गेलीच नाही. पावसामुळे नाशिक वरूनच परत पाठवलीय. मी तर टुणकन उडीच मारतोय. एस-२ कोच चांगला दिसतोय. मी आत शिरलो.
कोच नं. 8076, द.पू .एस-२ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by: Integral Coach Factory,Madras
Shell No. : BGSCN 3464,
Date: 23-3-1990.
एकूण आसने व शायिका: ७२.
हा डब्बा सुद्धा नवीन, छान आहे. नवीन डब्यांमध्ये बसण्यासाठी आम्ही किती व्याकुळ असतो ते महाराष्ट्र एक्सप्रेस मधून लांबवरचा प्रवास केल्याशिवाय कळणार कसे?
खुप वेळ थांबून गाडी पहाटे ३ वाजता निघतेय. आता मस्तपैकी ताणून द्यायचा विचार पक्का झालेला.अकोला व बडनेरा हे दोनच थांबे घेऊन गाडी बरोबर सहा तासांनी सकाळी नऊ वाजता नागपुरात प्रवेशते. ३९१ किमी सहा तासात.सरासरी खूपच चांगली. ६५ कि.मी.प्रतितास.
चला पोहोचलो एकदाचे. आता नागपूर ते चंद्रपूर प्रवास म्हणजे घर आंगण.
घरी पोहोचतोय तो घराला कुलूप. मी येणार असल्याच पत्र घरी मिळालेल दिसत नाही. मी येणार नाही अस समजून घरचे सगळे कालच चंद्रपूरला गेल्याचे शेजारांकडून कळले. त्यांचा थांबण्याचा, फ़्रेश वगैरे होण्याचा आग्रह टाळून मी चंद्रपूरच्या ओढीने नागपूर बस स्थानकात.
एव्हाना सकाळ्चे ११ वाजत आलेले. किती युगांपासून आपण प्रवास करतोय ! अशी मनःस्थिती झालेली. कालचा दिवसभर आंघोळ झालेली नाही. ११०० किमी चा प्रवास झालेला आणखी १५० किमी बाकी. पण आता तोच खूप जड वाटू लागलेला.
नागपूर स्थानकात बस उभीच आहे. जरा नवीनच आहे.
नागपूर सुपर राजुरा
MH-31/8570,

म.का.ना. न.टा. ३०४, १९९०-९१.
TATA 1510,
चं. राजुरा आगार. ३*२, एकूण ५५ आसने. माझा आसन क्र. ६.
चांगली साडे अकरा वाजता बस निघालीय. मी मात्र दोन दिवसांची अपुरी झोप डोळ्यात साठ्वून जागा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय.नागपूर चंद्रपूर प्रवासात झोपायच म्हणजे काय? छे! काहीतरीच! पण झोप अनिवार झालेली आहे.
जाग येतेय तेव्हा बस जांब ला थांबलीय.खाली उतरण्याची इच्छा नाहीय. पण शरीर धर्माच्या सादेला ओ देण्यासाठी उतरतोय.
बस जांब वरुन निघता निघता पुन्हा झोपेच्या आधिन झालोय.बराच वेळ झालाय, बस चा आवाज येत नाहीय.थोडा थोडा जागा झालोय आणि कळतय की बस थांबलीय.थोडी जाणिव झालीय की घोडपेठ आलय.इथून चंद्रपूर फक्त २० किमी वर. दुपारचे दीड वाजताहेत. बस चा टायर पंक्चर झालाय.त्या दुरूस्ती साठी बस खोळंबलीय.कंडक्टर ला मदत करायला खाली उतरलेली इतर माणसे थोड्या कुचेष्टेने, थोड्या सहानुभूतीने, गंमत म्हणून बघताहेत.(हा कदाचित माझा भास ही असू शकेल).मी मात्र आता या प्रवासाला जाम वैतागलोय.कधी येणार चंद्रपूर? तिथे मंगल कार्यालयात जाण्याची तयारी सुरूही झाली असेल. इतक्या ऐनवेळेवर जाऊन मी काय करणार?(अर्थात आधी जाऊनही काय असे दिवे लावणार होतो म्हणा?) इ.इ. विचारमाला मनात सुरू झालेल्या आहेत.
तासाभरानंतर बस हललीय. चंद्रपूर ला पोहोचायला दुपारचे ३.१० झालेत. १५३ किमी ३ तास चाळीस मिनीटांत.
एकूण १२६० किमी प्रवास ३२ तासात. वैताग,वैताग,वैताग. पण चंद्रपूर आलय. आता आनंदी आनंद.
माझ्या सर्व प्रवासांमध्ये माझे काही आराखडे असतात. रेल्वे प्रवास जर ६० किमी प्रतितास किंवा जास्त वेगात झाला तर सुपर फास्ट. ५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास - जलद. आणि त्यापेक्षा हळू असेल तर ऒर्डिनरी.
बस प्रवासात जर ५० किमी प्रतितास किंवा जास्त वेगात झाला तर सुपर फास्ट. ४५ किमी प्रतितास ते ५० किमी प्रतितास - जलद. आणि त्यापेक्षा हळू असेल तर ऒर्डिनरी.

Photo courtesy: www.irfca.org