Showing posts with label Whatsapp Groups. Show all posts
Showing posts with label Whatsapp Groups. Show all posts

Wednesday, September 6, 2023

अरे व्हॉटसॲप वाल्या फ़ॉरवर्ड्सनो, महापुरूष आणि आपल्या संत सदगुरूंना तरी सोडा रे.

कुठल्यातरी इंग्रजी लेखकाचा "प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी बालपणी तुम्हाला फ़ुकट मिळते. तरूणपणी तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि म्हातारपणी त्यासाठी पैसे मोजावे लागतात." असा एक थोडीसा चावटपणाकडे झुकणारा सिद्धांत आहे. आज सकाळी सकाळी एका धार्मिक ग्रुपवर बघतोय तो काय ? हाच विचार एका थोर सदगुरूंच्या नावाने कुणीतरी खपवलेला आढळला. मनात अत्यंत चीड दाटून आली. अरे ! रोजच्या रोज व्हॉटसॲपवर काहीतरी फ़ॉरवर्ड केलेच पाहिजे अशा भावनेने काही काही मंडळी अत्यंत फ़ालतू काहीतरी पोस्ट ढकलत असतातच पण आता त्यांनी संत सदगुरूंनाही सोडले नाही हे बघितल्यावर खंत, राग, चीड यांचे मिश्रण दाटून आले.


यापूर्वी "म्हणून मी व्हॉटसॲपवर फ़ारसा रमत नाही" ही पोस्ट इथे. उसनी विद्वत्ता घेऊन बेधडक आपल्या नावाने खपविता येणारे हे माध्यम मला फ़ारसे भावतच नाही. आणि याचा सूक्ष्म अभ्यास केला असता असे लक्षात आले की व्हॉटसॲपी ढापाढापीत आणि ढकलाढकलीत आपल्या समाजातल्या वृद्धांचाच जास्त सहभाग आहे. त्यामानाने आजची तरूण पिढी हे माध्यम जरा जबाबदारीने वापरते.


काही वर्षांपूर्वीची गोष्ट. अशाच एका धार्मिक म्हणवल्या जाणा-या व्हॉटसॲप ग्रुपवर उत्तररात्री एका मध्यमवयीन भक्त जोडप्याने आपल्या आयुष्यातल्या अत्यंत खाजगी क्षणांचे लाइव्ह चित्रण प्रक्षेपित करायला सुरूवात केली. त्यांनाही त्या प्रक्षेपणाची माहिती नसावी. मग त्या ग्रुपमधल्या इतरांना त्यांना मेसेजेस पाठवून, फ़ोन करून चित्रीकरणाचे प्रक्षेपण थांबविण्याची कसरत करावी लागली. त्या जोडप्याने प्रसिद्धीसाठी असला प्रकार निश्चितच नव्हता केला पण एखादे साधन, माध्यम आपल्याला पुरते वापरता येत नसता ते वापरता येते हे तरूण पिढीसमोर बिंबविण्यासाठी अशा गोष्टी घडतात. 


आणखी एका ग्रुपवर स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घेणा-या (हे एक नवीनच फ़ॅड सध्या आलेय. श्रीगणपत्यथर्वशीर्ष, पुरूषसूक्त, श्रीसूक्त, एकादष्णी आणि पवमान येव्हढेच येत असले तरी स्वतःच स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घ्यायचे. एकेका वेदाचे भेद किती आहेत ? शाखा किती आहेत ? याची सुद्धा मोजणी येत नसलेल्या व्यक्ती "वेदमूर्ती" ? श्रीगुरूचरित्र नियमीतपणे वाचणा-यांनी तरी त्यातल्या छत्तीसाव्या अध्यायाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन स्वतःला वेद कळतात असा दावा करू नये.) एका गुरूजींनी एक अत्यंत अश्लील व्हिडीयो क्लीप ग्रुपवर पाठवली होती. याचा अर्थ ते गुरूजी बाहेर वेद उपनिषदे यांचा उपदेश करून फ़ावल्या वेळात हे असले पण उद्योग करतात हे शहाण्या व्यक्तींच्या लक्षात आले. खाजगी आयुष्यात कुणी काय करावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी असल्या अत्यंत कामी व्यक्तींना वेदमंत्र उच्चारणाचा तरी अधिकार आहे का ? हा सवाल सगळ्या भाविकांच्या मनात आला. त्याचबरोबर हे निव्वळ पोटार्थी विद्या शिकून वेद वगैरे म्हणताहेत हे ही सगळ्यांच्या लक्षात आले. आपल्या एका छोट्या चुकीमुळे एकूणच वेदविद्येला हानी पोहोचतेय हे त्या गुरूजींच्या अजूनही ध्यानी नाही. गुरूजींचे वय वर्षे पासष्ट फ़क्त.


आपल्या तरूणपणी आजच्याइतके मुक्त वातावरण नसल्याची मनात खंत असलेली ही पिढी. ते तरूणपण पुन्हा जगू बघतात. पण नवीन समाजमाध्यमे नीटसे वापरण्याचे भान नाही. खूप काही करण्याची इच्छा आहे पण नवीन पिढीची जुळवून घेऊन नवे नवे शिकण्याची जिद्द नाही. आहे ती समाजमाध्यमे अशा विकृतीने वापरायचीत. त्यात कुठे असे सापडल्या गेलोत की खजिल व्हायचे आणि काही दिवसांनी आपणच "हे फ़ेसबुक म्हणजे अगदी वाईट्ट." किंवा "अहो, ही आजकालची तरूण पिढी त्या इंन्स्टावर काय थेरं करतेय तिकडे बघा ! संस्कृती अगदी बुडवलीय." म्हणायला हेच निलाजरे मोकळे. 


अरे बाबांनो. तुम्हाला ही नवी समाजमाध्यमे वापरता येत नाहीत ना तर मग नीट शिका ना. प्रत्येक समाजमाध्यमाची ताकद काय ? त्यातले धोके कुठले ? हे नीट समजून मग वापराना. आणि सगळ्यात महत्वाचे. ही समाजमाध्यमे वापरताना आमच्या श्रद्धास्थानांना सोडा रे. अध्यात्माला त्याचे त्याचे काम करू द्या. तुमच्या रोजच्या निरर्थक ढकलाढकलीला कुणीही वाचत नाही हे लक्षात घेऊन सुधरा रे.


- व्हॉटसॲपवर असे निरर्थक मेसेजेस वाचून आणि चार वर्षांपूर्वी वाचलेला तोच तोच विनोद पाच हजाराव्यांदा वाचून कंटाळलेला पण संत सदगुरूंच्या तोंडी असली नकोनको ती वचने टाकून त्यांना अपवित्र करण्याचा प्रयत्न करणा-यांवर संतापणारा, रामभाऊ सात्विकसंतापे.

Monday, May 3, 2021

म्हणून मी व्हॉटसऍपवर फ़ारसा रमत नाही.

 घरच्यांचे, मित्रांचे वगैरे कायकाय गोंडस नावाने ग्रूप्स निघतात. "अमुकामुक कुटुंब अड्डा", "अमक्यातमक्याचे भाचे आणि जावईमंडळी", "अमकीतमकी शाळा अमुकढमुक वर्ष १० वीची बॅच", "अमक्यातमक्या महाराजांचे शिष्यमंडळ" सुरूवातीला सगळे उत्साहाने सामील होतात. ग्रूपचा ऍडमिन मोठ्ठी पोस्ट टाकतो, ग्रूपच्या उद्देशाबद्दल, आपण एकत्र का यायला हवय याबद्दल. सगळे उत्साहाने सामील होतात. आपल्या आपल्या संबंधातल्या आणि त्या ग्रूपच्या विषयाला अनुसरून असणा-या मित्र / नातेवाईक इत्यादींना त्यात सहभागी करून वगैरे घेतात. सगळे मनात सुखावतात. चला, आपल्याला एक समूह मिळाला. (कळप लिहीणार होतो पण खूप मने दुखावतील, इतकं स्पष्ट लिहीलं तर) तसाही मनुष्यप्राणी हा समूहप्रियच आहे. 


मग एखादी (बहुतेक फ़ॉरवर्डच) पोस्ट येते की "नातेवाईक, मित्रमंडळींजवळ मन मोकळं करा म्हणजे हृदयाच्या डॉक्टरांकडे खिसा मोकळे करण्याची गरज पडणार नाही" वगैरे. पण खरच अशा ग्रूप्स मधून लोक मन मोकळं वगैरे करतात का हो ? एव्हढं सगळ सगळ्या ग्रूपवर टाईप करून मांडण्यापेक्षा, सरळ फ़ोन उचलून ती व्यक्ती आपल्या जवळच्या मित्र / मैत्रिणीशी बोलून मोकळी होईल की नाही ? तसही आता बहुतांशी फ़ोन फ़ुकटच लागताहेत. रात्री ९ नंतर फ़ोन बुथ समोर नंबर लावून प्रत्येक मिनीटांचे १० रू प्रमाणे दर ज्यांनी भरलाय त्यांना या फ़ुकट फ़ोनचे महत्व कळेल, कळायला हवे. पण नाही हो. जे सहज उपलब्ध असते त्याची किंमत नाही म्हणतात ते असे. त्याकाळी सणासुदीला चढया दराने असले तरीही शुभेच्छा संदेश पाठवणारी मंडळी आज फ़ुकट असले तरी स्वतः मनापासून शुभेच्छा देत नाहीत. सगळे व्हॉटसऍप फ़ॉरवर्डस. आला इकडून की पाठव तिकडे, आला तिकडून की पाठव इकडे. मी मात्र मधल्यामधे निराकार, निर्विकल्प.


जुन्याकाळी लग्न, हळदीकुंकू समारंभात "निमंत्रितांना रिकाम्या हाताने कसे परत पाठवायचे ?" या उद्देशाने निमंत्रित भगिनीमंडळाच्या हातात केवळ अशा प्रसंगासाठीच असलेले, कुणाच्याही ख-या उपयोगाचे नसलेले एक ब्लाऊजपीस नामक लहानसा कपडा दिला जायचा. ते ब्लाऊजपीस कुणाच्याही उपयोगाचे नसल्याकारणाने, इकडून घेतलेले तिकडे आणि तिकडून घेतलेले इकडे अशी देवाणघेवाण व्हायची. व्हॉटसऍपवरच्या संदेशांची तशीच देवाणघेवाण होत असते. आपले अस्तित्व, आपली (नसलेली) बुद्धीमत्ता, आपला (नसलेला) हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी ग्रूपवर सगळ्यांना कळला म्हणजे झाले या हेतूने सगळे फ़ॉरवर्डस होतात. पण "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी" तो विनोद, तो संदेश सगळ्यांनी कुठे ना कुठे तरी वाचला असतो किंवा आज ना उद्या तोच संदेश दुस-या कुठल्या तरी नावाने सगळ्यांनाच येणार असतो. त्यामुळे पोस्टकर्त्याचा शहाणपणा / विनोदबुद्धी / हजरजबाबीपणा दाखवण्याचा हेतू सफ़ल होत नाही. पण आजकाल त्याचेही कुणालाच काहीच वाटत नाही.


काही दिवसांनी ग्रूपचे नाव, त्याचा मूळ उद्देश ऍडमिनपासून सगळ्यांच्याच विस्मृतीत जातो आणि मग सुरू होतात फ़ॉरवर्डस. मग "अमुकामुक सदगुरूंच्या शिष्यांचे भजनी मंडळ" या नावाने काढल्या गेलेल्या ग्रूपवर एखादा अश्लील विनोद टाकला जातो. मग त्यावर खूप निर्लज्ज सारवासारवही केली जाते. मित्रमंडळींच्या ग्रूप्सवर शिळोप्याच्या गप्पा (पहिला आठवडाभरातच) संपल्यात की शिळे शिळे फ़ॉरवर्डस केले जातात. कुटुंब कट्ट्यावर सुरूवातीला वाढदिवस वगैरे साजरे होतात मग त्यातही राजकारण सुरू होते. ज्या एकत्र असण्याच्या उद्देशाने कुटुंब कट्टा सुरू होतो तो मागे पडून त्यातही अंतर्गत गट पडतात. मग ठरवून याने मला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या नाहीत तर अमक्यातमक्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या नाहीत असे कट रंगतात. म्हणजे ज्या एकत्र येण्याच्या, एकमेकांना घट्ट धरून राहण्याच्या उद्देशाने ग्रूप काढला त्याचा अक्षरशः सत्यानाश.


बरे ग्रूप काही महिने जुना झाल्यावर मग जी काही मंडळी कुठल्याही ग्रूपवर सामील होतात, त्यांचा "स्वॅग" काही वेगळाच असतो. नवीन ग्रूप आहे, नवीन माणसांवर छाप पाडायची आहे असे म्हणत ही नवीन मंडळी ग्रूपवर फ़ॉरवर्डसचा उच्छाद मांडतात. त्यातले बहुतांशी संदेश, विनोद हे आधीपासून असलेल्या मंडळींनी फ़ार पूर्वीच वाचलेले असतात. त्यात हसू येत नाही तर अशा नवीन सामील झालेल्या मंडळींचे हसू होते हे त्या मंडळींना कधीच कळत नसेल का ?


बरे काहीकाही मंडळी तर ग्रूपवर फ़क्त संदेश टाकण्यासाठीच असतात. पंधरा मिनीटांपूर्वी कुठल्यातरी सदस्याने तो संदेश (फ़ॉरवर्डच. मूळ काहीतरी लिहीण्याची प्रतिभा या सगळ्यांकडे कुठे ?) आपल्याच ग्रूपवर टाकलाय हे पाहण्याची तसदी न घेता ही मंडळी तोच संदेश त्याच ग्रूपवर टाकतात. अशी मंडळी ग्रूपवरचा कुठलाच संदेश वाचत नाहीत. आणि अशीच मंडळी ग्रूप्सवर भरपूर असतात. जर संदेश वाचायचाच नसेल तर संदेशवहनाच्या या माध्यमाच्या कळपात आपण सामील तरी का झालोय ? हा प्रश्नही न पडण्याइतकी ही सगळी मंडळी निगरगट्ट होऊन जातात.


बरे आणखी एक पैलू. धार्मिक वगैरे ग्रूप्समध्ये दुस-याचे लिखाण स्वतःच्या नावाने खपवता येते आणि लोकांकडून वाहवा मिळवता येते. फ़ेसबुकवर असे काही केले तर ती चोरी लगेच उघडकीला येते. पण व्हॉटसऍप ग्रूप्सवर असलेल्या सभासदांची वाचनक्षमता आणि आवडनिवड पुरेपूर ओळखलेला एखादा "चत्रा मेंबर" त्यांच्या वाचनापलिकडील एखादे लिखाण शोधून काढून, त्यातले मूळ लेखकाचे नाव बदलून ते लिखाण आपल्या नावाने खपवतो. भगवंताशी आपली जवळीक दाखवून ज्याला लोकांकडूनच वाहवा मिळवायची असते अशा थोर "अध्यात्मिक" व्यक्तींबद्दल आपण काय बोलणार ?  अशांचाच आजकाल सुकाळू आहे.


बरे, हे तरी फ़ार बरे म्हणायचे. मध्यमवयीन स्त्री पुरूषांच्या मित्र मैत्रिणींचे "खास" अड्डे आजकाल व्हॉटसऍअपवर असतात. विषयवासनांचे आणि त्यासंबंधित व्हिडीओंचे त्यावर थैमान असते. आमच्या महाविद्यालयीन मित्रांच्याही अ्शाच् एक ग्रूपचे मला निमंत्रण आले. "अमुकामुक कॉलेज, अमुकामुक बॅच" वाचून मी त्यात सामील झालो. पण दोन दिवसातच बघतो तो, त्यात सगळे असलेच अश्लील संदेश आणि व्हिडीओज. मी काही मित्रांना त्याबद्दल खडसावले असता माझ्यावरच मागासलेपणाचा शिक्का बसला. वयाच्या २५ व्या वर्षी असलेली विषयवासनांविषयीची उत्सुकता जर सगळे विषय उपभोगून झाल्यावर वयाच्या ५० व्या वर्षीही कायम राहणार असेल तर तर ती उत्सुकता नसून वखवख असते,  हे ५० - ५५ च काय पण अगदी ६० - ६५ वर्षे वय असलेल्या घोडम्यांनाही कळत नसेल तर असा समाज पुढल्या एका शतकात रसातळाला जाणार याचे भाकित करायला कुठल्याही ज्योतिष्याची गरज नाही. आज ९९ % स्त्री पुरूषांचे मोबाइल फ़ोन्स लॉक्ड का असतात ? याचे कारण आपल्या सगळ्यांना कळेल. एका ग्रूपवर अत्यंत धार्मिक असणारी (किमान तसा आव आणणारी व्यक्ती) रात्री दुस-या ग्रूपवर काय नक्की चाळे करीत असेल ? हे फ़क्त त्या ईश्वराला आणि झुकेरबर्गलाच माहिती. व्हॉटसऍपने या ढोंगाला हातभार लावलाय. 


फ़क्त कार्यालयीन कामांसाठीचे व्हॉटसऍप ग्रूप वगळता मी बहुतेक सगळ्या व्हॉटसऍप ग्रूप्सला फ़ार लवकर कंटाळतो. सगळीकडे तेच नमुने. तोच अनुभव. म्हणून मी फ़ेसबुकवर जास्त रमतो. इथे सगळा मोकळा कारभार, कमी प्रमाणात ढापाढापी आणि मोकळा संवाद. प्रत्येकाशी संवादाची एक लक्ष्मणरेखा आखलेली. त्यात गडबड झाल्यास सार्वजनिक चारित्र्यहनन ठरलेले. म्हणून हे माध्यम त्या व्हॉटसऍपी उसन्या विद्वत्तेच्या उदो उदो करणा-या माध्यमापेक्षा अधिक जवळचे वाटते. मित्रमंडळींच्या सोबत संवाद करायचा असेल तर आपले वैयक्तिक व्हॉटसऍप असतेच की ? तो ग्रूप कशाला ? त्यातले निरर्थक फ़ॉरवर्डस कशाला ?


- स्वतःचा किंवा कुटुंबातील कुणाचाही कुठलाही फ़ोन कधीच लॉक्ड नसणारा, (लॉक करायला त्यात कुठली एव्हढी आंतरराष्ट्रीय गुपिते आहेत म्हणा ? बरे बॅंकाच्या व्यवहाराबद्द्ल म्हणाल तर माफ़कच रकमेचे आहेत आणि त्यांनाही बॅंकेकडून आलेला पासवर्ड / कोड असतोच की.) 

सार्वजनिक आणि वैयक्तिकही वागायला मनमोकळा, 

मित्रांचा चाहता पण व्हॉटसऍप ग्रूप्सचा तीव्र तिटकारा असणारा, 

अत्यंत प्रतिगामी, रामभाऊ