Wednesday, January 8, 2014

१ जानेवारी: एक संकल्पदिवस

दरवर्षी १ जानेवारी ही तारीख जवळ आली की वेध लागतात नवीन दिनदर्शिकेचे, डायरीचे आणि नववर्षात करावयाच्या संकल्पांचे. तसं पहायला गेलं तर १ जानेवारी हा इतर ३६४ किंवा ३६५ दिवसांसारखाच एक दिवस. पण अचानक सुवर्णमय वाटायला लागतो हे खरं. संकल्पांची मजा सुरू होते. मला तर दरवर्षी नित्यनेमाने संकल्प करणा-या मंडळींचं खरच खूप कौतूक वाटतं. गतवर्षीचा संकल्प तडीस जावो अथवा न जावो, दरवर्षी नवीन किंवा गेल्या वर्षी अपूर्ण राहिलेला संकल्प करताना पाहून त्यांच्या इच्छाशक्तीचे कौ्तुक वाटल्यावाचून राहत नाही.

२०१३ चा नववर्षदिवस आमचा सांगोल्यातला पहिलाच नववर्षदिन होता. आमच्या महाविद्यालयीन परिसरात ३१ डिसेंबर फ़ार मोठ्या प्रमाणात साजरा झाला नाही. वसतीगृहातील सर्व विद्यार्थी सुट्ट्यांसाठी आपापल्या गावी परतलेले होते आणि शिक्षक वर्गाने फ़ार दंगा न करता शिस्तीत ३१ डिसेंबर साजरा केला. (असा माझा केवळ अंदाज. कारण दरवर्षी ३१ डिसेंबरला रात्री ९-९.३० लाच मोबाइल बंद करून आम्ही गाढ झोपी जातो. नववर्ष उत्साहात साजरं करायच असेल तर १ जानेवारीला अपु-या झोपीनिशी, तारवटलेल्या डोळ्यांनी दिवसाची सुरूवात करू नये हे माझे प्रामाणिक मत) परिसरातल्या सगळ्या प्राध्यापक मंडळींचा पहाटे फ़िरायला जाण्याचा सामूहिक संकल्प ठरला आणि अर्थातच २ जानेवारी पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.






महाविद्यालयीन परिसरातल्या रम्य सकाळीची ही क्षणचित्रे.

आणि मग काय ! सुरूवातीला मोठ्या उत्साहात सुरू झालेली आमची प्रभात फ़ेरी हळूहळू "एकेक पान लागले गळावया" यासारखी झाली. काही नेमस्त आणि उत्साही मंडळींनी हा उत्साह चांगला १९, २० तारखेपर्यंत टिकवला. नाही अस नाही. पण त्यानंतर मात्र कुणीही फ़िरायला जाताना दिसले नाही.








रम्य असा परिसर
मला या मानवी प्रवृत्तीचं पहिल्यापासून कौतुक वाटत आलेल आहे. दरवर्षी संकल्प फ़सूनही ३१ डिसेंबरला पुन्हा नव्याने संकल्प करावासा वाटणे यातच मनुष्याच्या विजीगीषु वृत्तीचा विजय आहे. "जुने जाउ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरूनी टाका" या केशवसुतांच्या ओळींनुसार भूतकाळाचे ओझे झटकून माणसे जेव्हा नवीन काम हाती घेतात तेव्हा ती आता तरी विजयी व्हावीत अशी प्रार्थना कराविशी वाटते.

मग हा नवीन नेम करताना मागला अनुभव लक्षात घेउन झेपेल एव्हढाच नेम करावा ? की पुन्हा एकदा परिस्थितीशी झुंज द्यायला सगळे बळ एकवटून गेल्या वर्षी अपूर्ण राहिलेले कार्य तडीस न्यावे ? झेपेल एव्हढाच नेम केला तर परिस्थितीला तुम्ही शरण गेलात ? की शहाणपणाचा निर्णय घेतलात ? बर गतवर्षीचाच नेम पुन्हा हट्टाने करायला घेतला तर तुम्ही परिस्थितीपासून काहीच शहाणपणा घेतला नाही ? की तुमची इच्छाशक्ती दुर्दम्य आहे ?

सुरेश भटांच्या ओळींनुसार
"एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे
हे खरे का ते खरे ? ते खरे का ते खरे ? "
अशी आज माझी अवस्था झालीय खरी.


No comments:

Post a Comment