जुन्या काळी दुकानांच्या पाट्यांवर पत्ता पिनकोडसकट सगळे लिहीले असे.
उदाहरणार्थ :
"बापुजी बालाजी बुरडकर,
सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या रंगांचे ठोक व किरकोळ विक्रेते,
मेन रोड, चंद्रपूर ४४२४०१"
पूर्वी एस. टी. बसने एखाद्या गावी जाताना मध्येच एखादी डुलकी लागली, की जाग आल्यानंतर कुठवर आलोय ? याचा अंदाज घ्यायला या पाट्या अतिशय उपयुक्त पडायच्या.
झोप उघडल्यावर रस्त्यावरची "अमुक अमुक टेलर्स, नागपूर रोड, भद्रावती" अशी पाटी किलकिल्या डोळ्यांनी वाचली "झोपा अजून. भांदकावरी त आलो बाप्पा. अजून अर्धा घंटा आहे चांद्यास" असे मनाशी बोलून माणसे उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करायला मोकळी व्हायचीत.
बाकी तो एस. टी. च्या खिडक्यांचा खडखडाट, एखाद्या बोल्ट निखळलेल्या अल्युमिनीयम पट्टीचा, एंजिनच्या व्हायब्रेशनमुळे बसबाॅडीवर होणारा लयबध्द आवाज मानवी झोपेच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीशी खूपच पूरक असावा. एसी वगैरे कशाचीही गरज नसायची. नागपूरला स्टॅण्डवर तिकीट काढून बसमध्ये बसल्यावर पेंगणारी काही काही माणसे अगदी रहाटे काॅलनीच्या स्टाॅपपर्यंत पार झोपेत हरवलेली असायचीत.
पण आता नवीन दुकानांवरच्या फक्त नाव लिहीण्याच्या पध्दतीत गाडी कुठल्या गावात आलीय हे कळेनासे झालेय हो. आता एखाद्या गावात फक्त "केशव स्टोअर्स" ही पाटी वाचून काय बोध होणार ? मुळात हे किराण्याचे दुकान आहे ? की कपड्यांचे आहे ? हेच कळतच नाही तर इतर बोध कुठला व्हायचा ?
पूर्वीच्या सर्वमाहिती समावेशक पाट्यांवरून त्या त्या गावची संस्कृती ढोबळमानाने कळायला मदत व्हायची. आता या शब्दांच्या कंजुसीमुळे ती सोय नाहीशी झाली हो. शिवाय आजकाल प्रवासात कुठपर्यंत आलोय ? हे बघायला फोनमधल्या गुगल मॅप्सची मदत घ्यावी लागते ती निराळीच कटकट.
आणि आजकाल नवीन दुकानांमधे नक्की काय मिळतय याचा त्यांच्या पाटीवरून पत्ता लागत नाही. बरीच वर्षे Boutique वाचून आत स्रियांसाठीचे beauty parlour असावे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण बुटिक म्हणजे स्त्रियांचे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे मिळण्याचे दुकान ही नवीन माहितीची भर सुपत्नीने घातली आणि मी अवाकच झालो. मग स्वच्छ तसे लिहीत का नाही बोर्डवर ?
नवीन दुकानदारांचा स्पष्टपणाला विरोध असावा. नाहीतर "पब, रेस्टो लाऊंज" असे लिहीण्यापेक्षा स्वच्छ "विदेशी दारूचा गुत्ता आणि देशी हुक्क्याचा ठेका" असे लिहीले असते तरी चालले असते.
आणि नुसते Apparels लिहीलेल्या दुकानात मला काॅटन किंगची फुलपँट (हल्लीच्या भाषेत trousers) आणि एखाद्या अशाच ब्रँडची बनियान मिळेल की नाही ? याची खात्री नाही.
थोडक्यात काय ? काळ बदलला. माणसांच्या सवयी बदलल्यात. अनेक प्रसंगांमध्ये भेटीदाखल मिळणारी शर्टपिसेस, पँटपिसेस महालमधल्या जाने टेलर्स, मारवडकर टेलर्स मधून वर्षभर शिवून घेणारा कुणी एक राम आता Allan Solly, Parx च्या शोरूममध्ये जाऊन अंगानेटकी ट्राऊझर वगैरे विकत घेतो. नरसिंग टाॅकीज जवळचे नेहेमीचे साधे चपलांचे दुकान आता त्याच्या नजरेच्या टप्प्यातही नसते. कारण त्याची सँडल्स, शूज वगैरेंची खरेदी मॉल्समधल्या Woodlands, Dawood, BATA च्या चकचकीत शोरूम्समधूनच होते.
जवळपास पाऊण शतकापासून तसेच असलेले आणि महालमधली बरीच ऐतिहासिक धुळीची पुटे काऊंटरवर अभिमानाने बाळगणारे "मे. गोविंद दिनकर गोखले फर्म" आता गणेशपेठमधे माॅलसारखे सजलेले दिसले आणि नागपुरातल्या अनेकांचा त्यांच्या त्यांच्या बालपणाशी असलेला आणखी एक धागा उसवला.
असो, गिर्हाईकांचा दृष्टीकोन बदलला मग दुकानांचे सादरीकरण का बदलू नये ?
- आपला जुन्या दुकानांमधून माल घेणारा जुनाट गिर्हाईक आणि प्रवासात झोपेशी वैर असणारा जागरूक प्रवासी, राम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment