Sunday, November 1, 2020

टुटुमाईच्या शेंगा अर्थात Oroxylum indicum : एक दुर्मिळ आणि गुणकारी वनभाजी

 मागील एका पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे चारं, एरोण्या, टेंभरं यांच्याइतकेच चंद्रपूर जिल्ह्यात मिळणारे एवंगुणविशिष्ट फळ म्हणजे टुटुमाईच्या शेंगा.

बालपणी चंद्रपूरला, आजोळी या शेंगांचे लोणचे भरपूर वेळा खाल्ल्याचे आठवते. मधल्या काळात नागपूरबाहेर वास्तव्य झाल्याने हा पदार्थ जवळपास विस्मृतीत गेला होता.
आताच्या चंद्रपूरच्या भेटीत सुकन्येला घेऊन मुद्दाम गोलबाजारात गेलो. तिला तिचा व्लाॅग बनवायचा होता आणि मला टुटुमाईच्या शेंगेचा शोध घ्यायचा होता.
बाजारात एका ठिकाणी या शेंगा दिसल्यावर झालेला आनंद अवर्णनीय होता. लगेच आधाशीपणाने या शेंगा बॅगेत घातल्यात.



चंद्रपूरस्थित मावशीला या शेंगांचे लोणचे घालण्याची पध्दत विचारली आणि त्याचदिवशी नागपूरला परतल्यावर तो बेत तडीस नेला.



चंद्रपूर जिल्हा आणि उत्तर तेलंगणचा काही भाग इथेच मिळणार्या या शेंगांच्या आयुर्वेदिक गुणांविषयी अधिक संशोधन व्हायला हवेय. रक्तवाहिन्या अरूंद होण्याच्या (atherosclerosis) आजारात ही शेंग औषधाचे काम करते असे एकदा मागे वाचनात आले होते पण त्याला अधिक आणि अधिकृत संशोधनाची गरज आहे असे प्रामाणिकपणे वाटते.
हृदयरोगावरील इलाजातले औषधी गुणधर्म लक्षात आल्यामुळे शेताच्या बांधाबांधावर असेच वाढणार्या, श्रावण सोमवारच्या भाजीची, काटवलांची (काटोले) किंमत २०० ₹ प्रतिकिलो झाल्याचे गेल्या चार वर्षात बघितले.
शेताच्या बांधाबांधावर वाढणार्या, आजवर दुर्लक्षित असलेल्या इडिलिंबांचा जठर आणि आतड्यांच्या विकारांवर होणारा औषधी उपयोग लक्षात घेता त्याकडे शेतकर्यांचे आता जाणीवपूर्वक लक्ष जातेय ही आनंदाची बाब आहे.
टुटुमाईवरही असेच संशोधन होऊन हा ठेवा सगळ्यांपर्यंत पोहोचावा ही मनःपूर्वक इच्छा.
- वैद्य होऊन नवनवीन संशोधनाद्वारे मानवी जीवनाच्या उपयोगी पडण्याचे स्वप्न असणारा, पण अभियंता झालेला सिन्सिअर विद्यार्थी रामकुमार.

No comments:

Post a Comment