Tuesday, November 10, 2020

दुर्मिळ ते काही ... (२)

१९९० च्या दशकापर्यंत भारतीय रेल्वेत कोचेसचे नम्बर्स चार आकडी असायचेत. कुठला कोच नवीन आणि कुठला जुना, याबाबत कोचमध्ये गेल्यावर त्यात लिहीलेली माहिती वाचूनच उलगडा व्हायचा. त्यातून ८० च्या दशकाच्या शेवटी आणि ९० च्या दशकाच्या सुरूवातीला आम्ही जवळपास दर महिन्याला ज्या महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करायचोत त्या गाडीला नवे कोच मिळणे ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. (अजूनही ती गोष्ट तेव्हढीच अशक्यप्राय आहे असे निरीक्षणांअंती दिसते.) आम्हाला कायम १५ वर्षे जुने कोचेस असलेला कळकट रेक मिळायचा.)



पूर्वी रेल्वेच्या कोचेसचे भारतात दोन ठिकाणी उत्पादन केले जायचे. Intergral Coach Factory, Madras (ICF) आणि Bharat Earth Movers Limited, Banglore (BEML). १९९२ च्या सुमारास Rail Coach Facory, Kapoorthala (RCF) चे कोचेस भारतीय रेल्वेत यायला सुरूवात झाली आणि चार आकडी कोच नंबर्सचे पाच आकडी कोच नंबर्स झालेत.


मग साधारण वर्षा दोन वर्षात सगळ्याच कोच फ़ॅक्ट-या पाच आकडी नंबर असलेले कोचेस आणू लागल्यात पण ते नंबर पूर्वीप्रमाणे कुठल्याही एका सिरीजपासून सुरू होणारे सिरीयल नंबर्स नव्हते तर आता राष्ट्रीय स्तरावर त्या नंबरांमध्ये एक सुसूत्रता आणण्यात आलेली होती.

"X X X X X"  या पाच आकड्यांमधले पहिले दोन आकडे त्या कोचचे जन्मवर्ष दर्शवितात. उदाहरणार्थ 97105 हा कोच १९९७ या वर्षात बांधला गेला आहे तर 10316 हा कोच २०१० मध्ये बांधला गेला आहे.

आणि

"X X X X X "  यातले नंतरचे तीन आकडे त्या कोचचा प्रकार दर्शवायचेत.

001 ते 025 -  प्रथम श्रेणी वातानुकूल. (Popular Name : FIRST AC). एका रेल्वे झोन मध्ये या श्रेणीचे एका वर्षात २५ पेक्षा जास्त डबे लागत नाहीत. बहुतांशी गाड्यांना हा श्रीमंत वर्ग नसतोच. आणि असलाच तरी २४ डब्यांमध्ये एखादाच डबा असतो. मुंबई राजधानी आणि हावडा / सियालदा राजधान्यांना या वर्गाचे अख्खे दोन डबे असतात. पण हा प्रकार एकूणातच दुर्मिळ.


026 ते 050 -  प्रथम श्रेणी वातानुलीत + व्दिस्तरीय वातानुकूल शयनयानाचा हा डबा. (Popular Name : FIRST AC cum Second AC). हा डबाही २४ डब्यांच्या गाडीला एखादादुसराच असतो. म्हणून एका झोन कडून एका वर्षासाठी २५ डब्यांच्यावर मागणी येत नाही.


051 ते 100 -  व्दिस्तरीय वातानुकूल शयनयान. (Popular Name : Second AC). या वर्गाचे डबे मात्र बहुतेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना असतातच. पण संख्या कमी. २४ डब्ब्यांच्या गाडीत एक किंवा दोन. आझाद हिंद एक्सप्रेससारख्या पुणे हावडा असे खंडप्राय अंतर धावणा-या गाडीलाही या वर्गाचा एकच डबा असतो. म्ह्णून एका रेल्वे झोनकडून एका वर्षात ५० च्या वर मागणी येत नाही.



101 ते 150 -  त्रिस्तरीय वातानुकूल शयनयान. (Popular Name : Third AC). आजकाल लोकप्रिय होत चाललेला हा वर्ग. याचेही डबे साधारण एक्सप्रेस गाडीला ४ ते ५ असतात. आजकाल अपवादात्मक परिस्थितीत ७ ते ९ पण डबे या वर्गाचे लावताहेत. पण तरीही एका झोन कडून एका वर्षाला ५० डब्यांच्या वर मागणी जात नसेल. जास्त मागणी झाली आणि त्या वर्षातले हे आकडे संपले तर काय याचा उहापोह लेखाअखेर केलेला आहे.



151 ते 200 -  वातानुकूल खुर्ची यान. (Popular Name : AC Chair Car). हे डबे प्रामुख्याने दिवसाचा प्रवास करणा-या गाड्यांनाच लागतात. उदाहरणार्थ डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस. त्यामुळे एका झोन चे एका वर्षात ५० डब्ब्य़ांनी भागत असावे.


201 ते 400 -  बिगरवातानुकूल शयनयान. (Popular Name : Sleeper Class). भारतीय रेल्वेत धावणा-या बहुतांशी एक्सप्रेस गाड्यांमध्ये हे डबे प्रत्येक रेकमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असतात. २४ डब्ब्यांच्या एका रेकमध्ये यांची संख्या १० ते १२ असतेच असते. त्यामुळे एका झोन कडून एका वर्षाला या प्रकारचे २०० डबे मागवण्यात येऊ शकतात या नियोजनाने २०१ ते ४०० हे आकडे या प्रकारच्या डब्ब्यांसाठी राखीव ठेवले आहेत.


401 ते 600 -  सर्वसाधारण वर्ग. (Popular Name : General Second Class). हे डबेही एक्सप्रेस गाड्यांमध्ये भरपूर असतात. २४ डब्यांच्या एक्सप्रेसमध्ये ४ ते ६ असतातच. शिवाय भारतीय रेल्वेवर ज्या काही पॅसेंजर गाड्या धावतात त्यांना पूर्णच्या पूर्ण ह्याच वर्गाचे डबे असतात. त्यामुळे एका झोनकडून एका वर्षाला २०० डब्ब्यांची मागणी होत असणार हे नक्की.


601 ते 700 -  व्दितीय श्रेणी खुर्ची यान आणि जनशताब्दी व्दितीय श्रेणी खुर्ची यान. दिवसा धावणा-या इंटरसिटी गाड्यांना (उदाहरणार्थः डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस) जरा वेगळ्या आसन व्यवस्थेचे व्दितीय श्रेणी बैठकीचे डबे लागतात त्या श्रेणीसाठी हे १०० आकडे राखून ठेवलेले आहेत.




701  ते 800 - प्रत्येक प्रवासी गाडीला एंजिनाच्या मागे आणि सगळ्यात शेवटी जो गार्ड आणि सामानाचा डबा लागतो त्या डब्ब्यांसाठी ही १०० आकड्यांची व्यवस्था आहे.


801  ते 900 - खानपान सेवा यान, पार्सल यान, रेल्वेच्या पोस्टाचा डबा, जनरेटर डबा यासारख्या विशेष प्रकारच्या डब्यांसाठी राखीव १०० आकडे.


901 ते 999 - वरीलपैकी कुठल्याही श्रेणीत जर दिलेल्या नंबर्सपेक्षा जास्त डबे त्या वर्षी आलेत तर त्यांना द्यायला हे आकडे राखीव ठेवले होते.

१२ मे २०१२. आमच्या पहिल्याच नागपूर ते सांगोला प्रवासासाठी आम्ही ११४०३ नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस ने निघालो.  गाडीत बसण्यापूर्वी नागपूर स्टेशनवर नेहेमीप्रमाणे फ़लाटावर उभ्या असलेल्या गाडीची एक पाहणी झाली. त्यात हा एक अत्यंत दुर्मिळ क्रमांकाचा डबा गाडीला लागलेला दिसला. हा क्रमांक एका पूर्ण शतकात एकाच डब्याला मिळू शकेल म्हणून दुर्मिळ ते काही...



आता बहुतेक सगळ्या रेल्वे विभागांनी नव्या कोचेसना ६ आकडी कोच क्रमांक द्यायला सुरूवात केलेली आहे. त्यात काही मेथड आहे असे वाटत नाही. आणि मेथड असलीच तरी ती प्रत्येक विभागवार वेगळी आहे हे नक्की.

- सांख्यशास्त्र आणि रेल्वेप्रवास यात सारखाच रस घेणारा, प्रवासी पक्षी, राम किन्हीकर.

ता. क. आता खाली दिलेल्या काही कोचेसचे वर्गीकरण करा बघू. आणि मला कॉमेंटमध्येच उत्तर द्या.

- शिकवल्यावर माझ्या विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ द्यायला कधीही विसरत नसलेला एक पंतोजी, प्रा. राम किन्हीकर.










 

No comments:

Post a Comment