Monday, November 9, 2020

दुर्मिळ ते काही... (१)

 सांगोला ते नागपूर किंवा परत प्रवासासाठी आम्ही बरेच मार्ग वापरलेत.

१. नागपूर ते कोल्हापूर (११४०३ / ११४०४) अशी थेट एक्सप्रेस गाडी होती पण आठवड्यातून दोनच दिवस. म्हणजे अडी अडचणीला निघण्यासाठी उपयुक्त नव्हती.

 २. नागपूर ते कोल्हापूर जाणा-या खाजगी स्लीपर कोच बसेस नागपूर ते सांगोला हा ६८० किमीचा प्रवास १४ तासांमध्ये करायच्यात ख-या. पण त्यात सैनी ट्रॅव्हल्सची बस सोडली तर रॉयल / चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसणे ही एक शिक्षा वाटावी एव्हढा घाणपणा त्यात असायचा. आणि बसने रात्रभर प्रवास करून वेळ वाचतो यावर माझा विश्वास नाही. रात्रभर प्रवास करून आंबलेल्या अंगाने दुस-या दिवशीचे कामकाज योग्य त्या रितीने पार पडत नाही हा माझा अनुभव. रेल्वेत रात्रभर झोपेचा प्रवास वेगळा आणि बसमध्ये वेगळा.

 ३, स्वतःच्या गाडीने नागपूरून सांगोल्याला पहिल्यांदा जाताना सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून आम्ही नागपूर - वर्धा - यवतमाळ - आर्णी - महागाव - उमरखेड - हदगाव - वारंगा फ़ाटा - नांदेड - अहमदपूर - चाकूर -औसा - लातूर - उजनी - तुळजापूर - सोलापूर - मंगळवेढा - सांगोला मार्गे गेलो होतो. हा मार्ग ६८० किमी म्हणजे जवळचा खरा पण नांदेड ते लातूर रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे एक दिव्य असे. नागपूर ते उमरखेड हा २७० किमी चा रस्ता साडेपाच ते सहा तासात कापताना नांदेड ते लातूर या १४० किमी साठी साडेचार तास लागणे म्हणजे मनःशांतीची आणि त्याहीपेक्षा अधिक गाडीच्या टायर्स आणि शॉकप्स ची कसोटी होती. (अजूनही हा रस्ता तसाच आहे म्हणतात. बरोबर आहे. "आदर्शांकडे" अति लक्ष असल्यावर विकासासारख्या असल्या "चिल्लर" गोष्टीकडे कोण लक्ष देणार आहे म्हणा !)

 ४. सांगोल्यात आम्ही जाऊन तीन चार महिने होत नाहीत तर मध्ये एकदा आमचा एक मित्र नाशिक वरून सांगोल्याला काही कामानिमित्त आला होता. नाशिकवरून तो नगर - करमाळा - टेंभुर्णी - पंढरपूर मार्गे आलेला होता. त्याने नगर - करमाळा - टेंभुर्णी मार्गाची इतकी तारीफ़ केली की जणू तो रोड अमेरिकेनेच बांधून भारतीयांना वापरण्यासाठी हस्तांतरीत केलाय.

 मग पुढल्या नागपूर फ़ेरीत आम्ही सांगोला - पंढरपूर - टेंभुर्णी - जेऊर - करमाळा - मिरजगाव - नगर - औरंगाबाद - जालना - सिंदखेडराजा - मेहकर - मालेगाव (जहांगीर) - कारंजा (लाड) - खेर्डा - बडनेरा - कोंढाळी - नागपूर हा जवळपास ७९० किमी चा प्रवास केला. रस्ता छान होता. पण अंतर जवळपास १०० किमी ने वाढले होते. शिवाय जालना आणि औरंगाबाद शहरातून करण्याचा प्रवास म्हणजे पुन्हा मनःशांतीची कसोटी होतीच. या दोन्हीही शहरांचे बायपास म्हणजे गाडीच्या शॉकप्स आणि टायर्सची कसोटी होती.

 सांगोला ते औरंगाबादबाहेरील वाळुंजपर्यंत जवळपास ३४० किमी अंतर साडेसहा तासात आल्यानंतर औरंगाबाद शहरातून जालन्याकडे निघायला १५ किमीला तासभर लागणे म्हणजे दुःखदायक होते. अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदार वाहतूक.

 ५. मग औरंगाबाद टाळण्यासाठी आम्ही नागपूर - अमरावती - कारंजा (लाड) - शेलूबाजार - मालेगाव (जहांगीर) - मेहकर - सिंदखेडराजा - जालना - अंबड - वडीगोद्री - शहागड - गेवराई - बीड - मांजरसुंबा - वाशी - कुंथलगिरी - येरमाळा - बार्शी - कुर्डुवाडी - शेटफ़ळ - पंढरपूर - सांगोला असा ७५० किमीचा मार्ग घ्यायला लागलो. एकदा त्याच मार्गात कुतुहलापोटी थोडा बदल करून बार्शी - भूम - कुंथलगिरी असा मार्गही अवलंबिला होता.

 या मार्गात बीड शहरातून जाताना दिसलेल्या बीड महापलिकेच्या शहर बस सेवेचा हा फ़ोटो.

 

महाराष्ट्रात ज्या नगर परिषदांची स्वतःची बससेवा आहे अशा तीनच नगर परिषद. बीड, उदगीर आणि खोपोली. मोठमोठ्या महापालिकांना जे जमत नाही ते या नगरपरिषदांनी यशस्वी करून दाखविलेले आहे.

उदगीर शहरातल्या आमच्या सुंदर वास्तव्याविषयी आणि तिथल्या बससेवेविषयी पुढे कधीतरी लिहेन.

आज अचानक फ़ोटोज चाळताना बीड नगर परिषदच्या या बसचा फ़ोटो समोर आला आणि दुर्मिळ ते काही... या लेखमालेला चालना मिळाली.

- मुक्कामाचे ठिकाण गाठण्यापेक्षा प्रवासातच जास्त मजा असते या पक्क्या जाणीवेचा प्रवासी पक्षी, राम.

4 comments:

  1. नमस्कार
    मी उदगीर चा रहिवासी आहे,
    आपण या ब्लॉग मध्ये उदगीर मधील वस्तव्याविषयी नंतर लिहिणार आहात असं म्हणालात,ते आपण लिहलय का ?
    असेल तर मला ते वाचायला आवडेल.
    नसेल आत्तापर्यंत लिहाल तर आता लिहिण्यास शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही सर. अजून लिहीले नाही. पण नक्की लिहेन.

      Delete