Thursday, November 19, 2020

चंद्रपूर बसस्थानकाची एक भेट.

चंद्रपूरचा जन्म असल्यामुळे आणि बालपणापासून सगळी प्रेमाची मंडळी तिथेच असल्याने चंद्रपूरशी माझे खूप घट्ट नाते आहे. आता सासुरवाडीही चंद्रपूरचीच असल्याने तर लग्नानंतरही चंद्रपूरशी हे प्रेमबंध टिकून राहिलेत, नव्हे अधिक दृढ झालेले आहेत.

चंद्रपूरला जायचे म्हटले की एस. टी. ला पर्याय नव्हता. पण साधारण १९९२ - ९३ च्या आसपास चकचकीत, वातानुकुलीत खाजगी गाड्या आल्यात आणि या स्पर्धेसाठी सज्ज नसणारी एस. टी. माघारली. मग चंद्रपूरला गेलो तरी एस. टी. स्टॅण्डवर जाणे होईना. कधीमधी बस फ़ॅनिंगसाठी गेलो, तेव्हढेच.

यंदा जवळपास एका तपाने दिवाळीत चंद्रपूरला होतो. आणि दरवेळी चंद्रपूरची सकाळ ते संध्याकाळ अशी एकदिवसीय सहलभेट होते तशी यावेळी नव्हती. चक्क तीन दिवसांचा मुक्काम ठोकायला चंद्रपूर गाठलेले होते. मग काय विचारता ? एका शुभदिनी सकाळी एस. टी. स्टॅण्डवर भेटीचा बेत पक्का केला.

माझ्यापेक्षा एकाच दिवसांनी मोठा आणि अगदी माझ्या जन्मापासून माझा सोबती असलेला माझा मामेभाऊ, सचिन सगदेव, सोबत होताच. आमच्या सवयी, आवडीनिवडी सारख्याच. तो ही बसफ़ॅन. मग आमच्या दोघांचा कट शिजला. सकाळी उठून ६.०० वाजताची चंद्रपूर सुपर नागपूर बस बसफ़ॅनिंगसाठी गाठायची असा नामी बेत ठरला. आमच्या चंद्रपूर - नागपूर प्रवासापैकी ३३.३३ % प्रवास या सुपर बसने आम्ही केलाय. त्यामुळे या बसशी आमचे दोघांचेही प्रेयसीचे नाते. मग त्या ओढीनेच बसस्टॅण्ड गाठायचे ठरले.

दि. १७/११/२०२० : काल रात्रीच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमामुळे आणि नंतर रंगलेल्या गप्पांमुळे झोपायला उशीरच झाला होता. पण प्रेयसीला भेटायचय. शब्द म्हणजे शब्द. अवघे ५ तास झोपून मी पहाटे ५ ला सचिन ला फ़ोन केला. तो पठ्ठा माझ्या अगोदर उठून मला माझ्या डिस्चार्जड असले्ल्या नंबरवर फ़ोन लावत होता. बरोबर पहाटे साडेपाचला आम्ही प्रस्थान ठेवले.

पावणेसहाच्या सुमारास आम्ही बसस्टॅण्डवर पोहोचलोत. चंद्रपूर बसस्थानकाचे गेल्या वर्षा दीड वर्षापासून नविनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बसेस पार्किंगला थोडी अडचणच येते आहे आणि तात्पुरते ५ - ६ फ़लाट बांधून तिथूनच हा सगळा कारभार सध्या सुरू आहे. 

डेपोच्या बाहेर पण फ़लाटाला न लागलेली एक बस असा आपला स्वॅग दाखवत उभी होती.


 MH 40 / N 9457. 

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेली टाटा १५१२ कमिन्स बस. 

चंद्रपूर डेपोची ही बस आता थोड्याच दिवसांमध्ये एम एस बॉडीत किंवा मालट्रकमध्ये बदलली जाणार हे तिच्या रूपरंगावरून दिसत होते. जुनी असली तरी या बसचा दिमाख प्रेक्षणीय होता.

साधारणतः २००९ - १० मध्ये एस. टी. च्या तिन्ही मध्यवर्ती कार्यशाळांनी (दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर) शहर बस वाहतुकीसाठी नवीन चेसीसवर फ़ंट लॉन्ग ओव्हरहॅंगच्या (ड्रायव्हर केबीनमधून प्रवेश आणि निकास असलेल्या आणि ड्रायव्हरचे आसन पुढल्या चाकापुढे असलेल्या) टाटा आणि लेलॅण्ड बसेस बांधल्या होत्या. त्यातल्या नागपूर कार्यशाळेने बांधलेल्या ब-याच गाड्या चंद्रपूर शहर बस वाहतुकीसाठी दिल्या होत्या. त्या अजूनही कार्यरत आहेत. बल्लारपूर - अंचलेश्वर गेट - गांधीचौक - जटपुरा गेट - चंद्रपूर मध्यवर्ती बस स्थानक किंवा चंद्रपूर - उर्जानगर किंवा चंद्रपूर - घुग्घुस या मार्गावर या शहर बस सेवा चालयच्यात. त्यातलीच एक बस पुढचे दार बंद करून, चंद्रपूर - घुग्घुस - वणी या ५० किमी लांबच्या मार्गावर सध्या पाठवण्यात येत असल्याचे दिसले. दिवसभर प्रवाशांची उस्तवार करून दमलेली बस सकाळचे ६ वाजले तरी चक्क झोपलेलीच होती. पुन्हा दिवसभराच्या उसाभरीच्या कल्पनांनी मानसिकरित्याच ती थकली असेल. तसेही तिचे आयुष्य आता शेवटाकडे आलेले आहे.




MH 40 / N 9423.

TATA 1512 Cummins



Typical Chandrapur division route board


मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेली चंद्रपूर डेपोची ही बस.  मागले दार सील करून, पुढल्या मोकळ्या दाराला उघडबंद करणारे दार बसवून थोड्या लांब अंतरासाठी सज्ज केलेली बस.

सहाची चंद्रपूर सुपर नागपूर बस कुठली आहे ? या उत्सुकतेपोटी ५. ५५ ला एक चक्कर डेपोच्या दाराशी टाकली. तिथे दोन तीन नवीन एम एस बॉडीच्या बसेस उभ्या होत्या पण त्यातली नागपूरला जाणारी कुठली ? हेच कळेना. तशी मार्गफ़लक वगैरे लावण्याची हालचालही डेपोत दिसेना. आमच्या बालपणी पहाटे ५.३० ची चंद्रपूर जलद नागपूर (मार्गे डिफ़ेन्स - भद्रावती - वरोरा - जांब) ही बस गेली की फ़लाट ३ वर चंद्रपूर जलद शेगाव आणि फ़लाट ४ वर चंद्रपूर सुपर नागपूर या दोन नवीन गाड्या लागायच्यात. दोन्ही चंद्रपूरवरून ६.०० वाजता सुटायच्यात आणि वरो-यापर्यंत एकमेकींशी चढाओढ खेळत जायच्यात. वरो-याला शेगाव गाडी आपल्या वरोरा - वणी - मारेगाव - करंजी - जोडमोहा - यवतमाळ - दारव्हा - कारंजा - मूर्तिजापूर - अकोला  मार्गाकडे वळायची तर नागपूर सुपर गाडी वरो-याला न थांबता जांबचा थांबा घेत नागपूर रस्त्याला लागायची. पण आज दोघींचाही पत्ता नव्हता. न जाणो, एखादेवेळी सहाची सुपर फ़लाटावर लागलेली असेल म्हणून आम्ही दोघांनीही डेपोकडून आमचा मोर्चा फ़लाटांकडे वळवला.

वाशिम डेपोची, पार ३२५ किमी लांबून आलेली रात्र मुक्कामाची (हॉल्टिंग) गाडी. सकाळी पुन्हा लांबच्या पल्ल्यासाठी रवाना होणार. सध्या मात्र फ़लाटासमोरच्या जागेत पथारी पसरून निवांत झोपलीय.

MH 40 / Y 5738.

TATA 1512 Cummins

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेली ही बस. थोड्याच दिवसात मध्यवर्ती कार्यशाळेत एम. एस. बॉडी बांधण्यासाठी येणार हे नक्की. कारण हिच्या आसपासच्या नंबरच्या बसेस आता नविनीकरणासाठी कार्यशाळेत येत आहेत. 

आणि तिच्याच पुढे पार्क केलेली ही बस म्हणजे संपूर्ण दिवसभरातला एक धक्काच होता. ठाणे विभागीय कार्यालयाची, मालवाहू बसमध्ये बदललेली एक बस तिथे होती. 



लॉकडाऊनच्या काळात सुरक्षित मालवाहतुकीची व्यापा-यांची गरज आणि प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने महसूल तूट भरून काढण्याची एस. टी. ची गरज या दोन्हींमधून एस. टी. ची मालवाहतूक पुन्हा एका नव्या जोमाने सुरू झाली आणि इतर वेळी कधीही दिसल्या नसत्या अशा बसेस सर्व महाराष्ट्राच्या आगारांमध्ये दिसायला लागल्यात. ठाणे डेपोची बस चंद्रपूरला येण्याचा एस. टी. च्या इतिहासातला एक अत्यंत अपूर्व असा प्रसंग.


MH 14 / BT 3933. 

Ashok Leyland CHEETAH model.

मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडीने बांधलेली ही बस. एरवी कधीही चंद्रपूरची धूळ तिला चिकटली नसती. पण लॉकडाऊनमध्ये ज्या काही जगावेगळ्या गोष्टी घडल्यात, त्यातली ही एक.


बाजुलाच ही बस उभी होती. आम्हाला सुरूवातीला वाटले की ही बस पण मालवाहतुकीसाठी परिवर्तित केल्या गेलेली असावी कारण ह्या सिरीजच्याच नव्हे तर ह्याच्या खूप नंतरच्या सिरीजमधल्या गाड्या एकतर मालवाहतुकीसाठी परिवर्तित झाल्या आहेत किंवा भंगारात निघाल्या आहेत. पण ही बस अजूनही प्रवासी सेवेतच आहे. मागे डब्बल रेडीयम वगैरे लावून वणी डेपोने ह्या बसविषयी आपली आस्था दाखवूनच दिलेली आहे आणि इतकी जुनी बस असूनही वणी डेपोने हिला छान ठेवले आहे. 

चंद्रपूर जलद वणी (मार्गे भद्रावती - वरोरा) जाणारी ही त्या दिवसातली पहिली बस असावी.

MH 40 / N 8020

TATA 1512 Cummins

य. वणी आगार (यवतमाळ विभाग, वणी आगार)

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेली वणी डेपोची ही बस. जुनी असूनही रंगरूपाने छान दिसत होती.

सकाळचे ६.०० वाजत होते. आम्ही तात्पुरत्या बनविलेल्या पाच फ़लाटांकडे धाव घेतली. फ़लाटांवर कधीकाळी चंद्रपूर विभागात असलेल्या पण आता गडचिरोली विभागात गेलेल्या ह्या दोन भगिनी उभ्या होत्या. सकाळची पहिली चंद्रपूर - ब्रम्हपुरी फ़ेरी आणि सकाळची पहिली चंद्रपूर - गडचिरोली (मार्गे मूल - सावली) साधारण सेवेची फ़ेरी. (काळ्या फ़लकावर पांढरी अक्षरे) 


त्यातल्या ब्रम्हपुरी आगाराने चंद्रपूर विभागातून गडचिरोली विभागात गेल्यानंतरही डेपो लिहीण्याची आपली चंद्रपूर विभागाची स्टाईल कायम ठेवली होती. पण गडचिरोली आगाराने मात्र चंद्रपूर विभागाच्या डेपो लिहीण्याच्या स्टाईलचा पूर्णपणे त्याग केल्याचे जाणवले.

MH -07 / C 9168.

Originally built as Semi Luxury (निम आराम, ब्रॅण्ड नेम हिरकणी) by Automobile Corporation of Goa Limited (ACGL)

TATA 1512 Cummins

Rebuilt by : Central Workshop, Nagpur as Mild Steel Body Parivartan (परिवर्तन) bus.

गड. गडचिरोली आगार 

आणि

MH 40 / Y 5414

Originally built by Central Workshop, Nagpur as Parivartan (परिवर्तन) bus.

TATA 1512 Cummins

Rebuilt by : Central Workshop, Nagpur as Mild Steel Body Parivartan (परिवर्तन) bus.

गड. ब्रम्हपुरी आगार 


बाजुच्याच फ़लाटावर चंद्रपूर ते नागपूर मार्गावरची ही बस उभी होती. चंद्रपूर जलद तिरोडा. (मार्गे भद्रावती - वरोरा - जांब - नागपूर - भंडारा - मोहाडी - तुमसर) आमच्या बालपणी चंद्रपूर जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यासाठी दिवसातून तीनच फ़े-या असायच्यात. 

सकाळी ८.०० ची चंद्रपूर सुपर गोंदिया. (मार्गे जांब - नागपूर - भंडारा) ही गाडी खरोखर सुपर होती. गोंदिया डेपो आपली क्रीम गाडी या मार्गावर देत असे. सकाळी ६.०० च्या सुपरचे आरक्षण मिळाले नाही तर आमची दुसरी पसंती गोंदिया बसला असे.

सकाळी ९.३० ची चंद्रपूर जलद तुमसर. (मार्गे भद्रावती - वरोरा - जांब - नागपूर - भंडारा - मोहाडी). ही गाडी चंद्रपूर ते नागपूर प्रवासाला ४ ते ५ तास घेत असे. एकतर भद्रावती गावात असलेल्या बसस्टॅण्डपर्यंत जाणे आणि तिथे थांबून पुन्हा हायवेवर येणे, वरोरा गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जाण्यासाठी आणि येण्यासाठीही रेल्वे फ़ाटक ओलांडावे लागणे, आणि इतर चार रेल्वे फ़ाटकांचा (ताडाळी, बोरखेडी, बुटीबोरी, खापरी) सामना करावा लागणे यात नशीब असले आणि सहाही फ़ाटके मोकळी मिळालीत तर ४ तास आणि सहाही फ़ाटकांनी अडवणूक केली तर ५ तास असा हिशेब होता.

दुपारी कधीतरी निघणारी चंद्रपूर जलद तुमसर. (मार्गे मूल - नागभीड - निलज - पवनी - भंडारा - मोहाडी)

आता मात्र या दोन जिल्ह्यांना जोडणा-या भरपूर बसेस आहेत. चंद्रपूर - तिरोडा बस सकाळी ६. १० च्या वेळेवर आहे. आता भद्रावतीला बस स्थानक अगदी हमरस्त्याला लागून आहे. वरो-याला आत जायला रेल्वे फ़ाटकावर ओव्हरब्रिज आहे. तशाही चंद्रपूर - नागपूर मार्गावरच्या फ़ार कमी गाड्या वरोरा गावातल्या स्थानकापर्यंत जातात. चंद्रपूर - नागपूर महामार्गावरच्या सगळ्या रेल्वे फ़ाटकांवर ओव्हरब्रिज आलेत. त्यामुळे सुपर आणि जलद गाड्यातला फ़रक उरलेला नाही. बसेसच्या बोर्डांवरून "सुपर" हा शब्दही गायब झालाय.

MH 40 / N 8899 

Special numbered TATA 1512 Cummins

भं. तिरोडा आगार (भंडारा विभाग, तिरोडा आगार)

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेली तिरोडा डेपोची ही बस. 



बाजूच्याच फ़लाटावर चंद्रपूर ते गोंदिया (मार्गे मूल - गडचिरोली - वडसा - लाखांदूर - साकोली - गोरेगाव) ही जलद बस उभी होती. 

MH 40 / AQ 6393.

TATA 1512 Cummins

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेली चंद्रपूर डेपोची ही बस. निळ्या रंगातले ग्रील आणि बफ़र. आता रंग फ़िके होत चाललेत. 


चंद्रपूर डेपोची डेपो लिहीण्याची ही खास शैली.


बसस्थानकाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाला लागूनच हा चंद्रपूर डेपोचा वैशिष्ट्यपूर्ण मालवाहक उभा होता. लाल रंगासोबत पिवळ्या रंगाचे अस्तित्व खरेच खूप छान दिसतेय. आणि या मालवाहतूक गाडीला या रंगसंगतीमुळे एक वेगळाच लूक आलेला होता. मालवाहक असला तरी त्याची उभी राहण्याचे शैली तर बघा.


MH 14 / BT 0816

TATA 1512 Cummins

मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडीने बांधलेली चंद्रपूर डेपोची बस. (आता मालवाहकात बदललेली)


शेजारीच वर्धा विभागातल्या पुलगाव आगाराचा देखणा मालवाहतूक ट्र्क उभा होता.



MH 40 / N 8991

TATA 1512 Cummins

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेली पुलगाव डेपोची बस. (आता मालवाहकात बदललेली)


त्या शेजारीच भंडारा विभागातल्या पवनी आगारात असलेली पण आता चंद्रपूर आगारात आलेली आणि मालवाहतूक करणारी बस उभी होती. विभागीय कार्यशाळेने या बसला ट्रकमध्ये बदलताना, एम. एस. बॉडी बसला लावतात तसे टेल लाईटस लावले होते.


MH 07 / C 7161

Originally built as Semi Luxury (निम आराम, ब्रॅण्ड नेम हिरकणी) by Automobile Corporation of Goa Limited (ACGL)

TATA 1512 Cummins

Rebuilt by : Central Workshop, Nagpur as Mild Steel Body Parivartan (परिवर्तन) bus.

भं. पवनी आगारातून चंद्रपूर आगारात बदली झालेली बस / ट्रक.


६ वाजून ०५ मिनीटे होत आलेली होती. सकाळी ५. ५० पासून आमच्या समोर नागपूरसाठी एकही बस सुटलेली नव्हती. ६ ची चंद्रपूर - नागपूर बस तर अजून फ़लाटावर लागलेलीही नव्हती. फ़लाटावर फ़क्त चंद्रपूर - तिरोडा बसच उभी होती. मग आम्ही आमचा मोर्चा उत्तरव्दाराकडे वळवला.

डेपोचा पत्ता नसलेली एक लेलॅण्ड बस / ट्रक उत्तरव्दाराजवळ उभी होती.


MH 20 / D 9763

Ashok Leyland CHEETAH model

मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबादने बांधलेली बस.  



उत्तरव्दाराजवळच डेपोकडे जाणा-या मार्गावर चंद्रपूर डेपोचे आणखीही दोन मालवाहक उभे होते.

सकाळचे ६. १३. आता मात्र फ़लाटांकडे बसच्या एंजिनांचा आवाज येऊ लागला होता. चंद्रपूर - तिरोडा बस फ़लाटावरून मागे येत निघण्याच्या तयारीत होती. मग आम्ही लगेच दक्षिणव्दाराजवळ एक मोक्याची जागा पटकावून व्हिडीओ काढण्यास सज्ज झालो.

तिरोडा बसनंतर २ मिनिटांनी घाईघाईतच ६.०० वाजताची चंद्रपूर - नागपूर बस डेपोतून स्थानकावर आली. आणि जणू निघायला झालेला वेळ भरून काढण्यासाठीच फ़लाटावर पूर्णपणे न लागता लगोलग रवाना झाली.


MH 14 / HG 8227

TATA 1515 Cummins

Front Long Overhang

मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडीने बांधलेली नवी कोरी टाटा बस. एम. एस. बॉडी. प्रवेशाचा दरवाजा ड्रायव्हर केबिनमधून. ड्रायव्हर बसण्याची जागा पुढल्या चाकांसमोर. 

या गाडीचा डिजीटल स्वरूपातला मार्गफ़लक अजूनही छान आहे आणि या गाडीचा क्रू तो नियमित वापरात आणतातही.

या सिरीजच्या भरपूर गाड्या चंद्रपूर आगारात आलेल्या आहेत. बहुतेक यातलीच एक गाडी ६.०० ची चंद्रपूर - नागपूर म्हणून जाते. 

आता मात्र बास झाले असे आम्ही दोघांनीही ठरवले. तशीही आमच्या प्रेयसीची भेट झाली होती त्यामुळे आता फ़ार वेळ घालवण्यात आम्हा दोघांनाही स्वारस्य नव्हते. ही आजची चंद्रपूर स्थानकातली भेट आमच्या बसफ़ॅन मनाला पुढले ६ महिने तरी उर्जा देत राहणार हे निश्चित होते.

- बसफ़ॅन राम

No comments:

Post a Comment