Thursday, November 5, 2020

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड. १९८९ - १९९३.

सौजन्याची ऐशीतैशी १९८९.
आम्ही प्रथम वर्गात होतो. अभियांत्रिकी महाविद्यालयातही व्यावसायिक नाटकांच्या तोडीची नाटके होऊ शकतात याचा पहिलाच धडा आम्हाला मिळाला होता.
सुधीर मुतालिकने रंगवलेला "नाना बेरके", अनुपमा देशपांडेने रंगवलेली "नानी बेरके", हेरंब अभ्यंकरने रंगवलेला "देसाई" , श्रीराम कुलकर्णीचा "मंडलेकर" आणि पराग लपालीकरने रंगवलेला "पक्या" अजूनही विसरल्या जात नाही.
प्रेमाच्या गावा जावे १९९०.
संदेश कुलकर्णीसोबत काम करण्याचा अतिशय छान अनुभव मिळाला. संदेश किती ग्रेट आहे हे जाणवलेले सत्य १५ वर्षांनंतर महाराष्ट्राला पटल्याचे पाहून स्वतःच्याच क्षमतेवरचा विश्वास दृढ झाला.




लग्नाची बेडी १९९१.
प्रवीण काळोखे नावाचा एक हिरा आजवर आपल्यातच दडला होता पण आपल्याला कळले कसे नाही ? असे आश्चर्य वाटण्याचे हे वर्ष.
तीन चोक तेरा १९९२.
पहिल्यांदा "तुझे आहे तुजपाशी" करण्याचे ठरले होते. तालमीही जोमात चालू झाल्या होत्या. आचार्यांची मुख्य भूमिका मी करत होतो. पण मग विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव विनोदी म्हणून "तीन चोक तेरा" नाटक निवडले गेले. त्यातली प्रमुख भूमिका "अण्णा" तन्मयतेने साकारली.




आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे नाटकांचे हे सेटस आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या कर्मशाळा विभागातली शिक्षकेतर मंडळी तयार करायचीत. दिग्दर्शन आमची प्राध्यापक मंडळी करायचीत. रोज रात्री ९ ते दीड, दोन किंवा उत्तररात्री ३ पर्यंत तालमी चालायच्यात. महिनाभर. तीन अंकी नाटकांमध्ये काम करायला मिळणे म्हणजे पुढले वर्षभर काॅलर अगदी टाईट असायची.
नाटकाच्या दिवशी नाटक संपल्यानंतर काॅलेजकडून काॅलेज कॅण्टीनमध्ये सगळ्यांना विशेष जेवण असे. त्यादिवशी कॅण्टीनवाले अबू अंकल ही अगदी मेहेनतीने खूप सुंदर जेवणाचा बेत करायचेत. ते स्वतः नाट्यप्रेमी होते, त्यातले जाणकार होते. प्रत्येक नाटकातले एक दोन फोटोही त्यांच्या संग्रही असत. मी २००६ मध्ये कुटुंबासोबत कराडला गेलो असताना त्यांनी नुसते मला ओळखलेच नाही तर नाटकातला त्यांच्या संग्रहातला माझा एक फोटोही मला काढून दाखवला.
नाटक संपल्यानंतर मेकप उतरवून, रात्री तब्बल दीड — दोन वाजता जेवण आटपत असत. अगदी लग्नातल्या "विहीणीच्या पंक्ती"चा थाट असे. आमचे प्राचार्य आणि इतर ज्येष्ठ प्राध्यापक मंडळीही पंक्तीला असत. प्रयोगातल्या, तालमीतल्या गंमतीजमती आठवत, मोकळ्या गप्पागोष्टींमध्ये पंगत रंगत असे. आणि त्या तालमींचा, नाटकांचा हँगओव्हर पुढले १५ दिवस आम्हाला पुरत असे.

No comments:

Post a Comment