Tuesday, November 24, 2020

एका (टाळलेल्या) फ़सवणुकीची गोष्ट.

२००२ चा ऑक्टोबर महिना. धाकट्या भावाचे लग्न ठरले होते. त्यानिमित्त लग्नाचा बस्ता खरेदीसाठी आम्ही उभयता आणि आमचे ५ महिन्यांचे पिल्लू मुंबईवरून नागपूरला आलेलो होतो. धाकटा भाऊही एक दोन दिवसात मुंबईवरून येणारच होता. सगळ्यात धाकटा भाऊ तर नागपूरलाच स्थायिक होता.

घरी आल्या आल्या आईने एकदम उत्साहात बातमी दिली. "राम, अरे काल एका कंपनीकडून फोन आला होता. आपल्याला एका हॉलिडे पॅकेजचे गिफ़्ट व्हाऊचर लागले आहे. त्यासाठी आपल्या घरातल्या कुठल्याही जोडप्याला त्यांनी बर्डीवरच्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी बोलावले आहे. व्हाऊचर देण्याआधी त्यांचा एक सेमिनार आपल्याला ऐकावा लागेल, बस. तुम्ही दोघे जाता का ?"

आता मुंबईत अशा प्रकारच्या खूप MLM (Multi Level Marketing) कंपन्यांच्या उच्छादापासून मी स्वतःला वाचवले होते. उंची हॉटेलांमधले त्यांचे ते चकचकीत सेमिनार्स. तिथे आपली यशेगाथा सांगायला बोलावलेले भाडोत्री एजंटस, कमी श्रमात, कमी वेळात खूप काही मिळवण्याच्या लोकांच्या मानसिकतेचा अचूक अभ्यास करून त्यांचे ते गळ लावणे आणि त्याला बळी पडणारी सरळमार्गी माणसे यांना मी जवळून पाहिले होते. एका दोघा मित्रांनी मला जबरदस्ती अशा सेमिनार्सना नेऊन मला त्यांच्या त्या स्कीम्समध्ये भागीदार करण्याचे निष्फ़ळ प्रयत्नही केलेले होते. पण दरवेळी कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता मी ती स्कीम नाकारून, एकही पैसा न गुंतवता, बाहेर पडलो होतो. काल आईला घरी आलेला फ़ोन त्याच एखाद्या स्कीमपैकी असावा हे मी ताडले आणि आईला समजविण्याचा प्रयत्न केला. पण "जाऊन नुसता सेमीनार तर ऐकायचाय आणि व्हाऊचर घेऊन घरी यायचय. त्यात काय श्रम आहेत का ? त्यानिमित्ताने तुम्हा दोघांचे बाहेर फ़िरणे होईल. त्या हॉटेलात चहा, नाश्ता वगैरे होईल." या युक्तीवादावर मी गप्प बसलो. त्या हॉटेलात चहा नाश्ता सोडाच, तिथली पायरी चढण्याचाही मी कधी विचार केलेला नव्हता. म्हटले चला, या निमित्ताने ते हॉटेल आतून कसे आहे ? ते तरी बघून घेऊयात.

संध्याकाळी आम्ही उभयता, आमच्या पिल्लासकट हॉटेलवर पोहोचलो. रिसेप्शनला आमच्या नावाची नोंदणी वगैरे करून आम्हाला रीतसर आत निमंत्रण वगैरे आले. आत गेल्यागेल्या मंद प्रकाशात हॉटेलच्या त्या हॉलमध्ये खूप छोटी छोटी टेबले मांडलेली दिसलीत. काही काही टेबले भरली होती पण बरीचशी रिकामी होती. प्रत्येक टेबलाभोवती आमच्यासारखेच एक जोडपे आणि कंपनीचा एक विक्रेता बसून चर्चा करत होते. आम्ही आम्हाला दिलेल्या टेबलच्या बाजूला बसलोत. एकंदर प्रकार माझ्या चांगलाच लक्षात आलेला होता. सौभाग्यवतींनी माझे आजवरचे अनुभव ऐकल्याने आणि माझ्या मुंबईतल्या काहीकाही मित्रांना काही हजार रूपये गमावताना पाहून तिलाही अंदाज आलाच होता.

आमच्यासमोर त्या कंपनीची विक्रेती येऊन बसली, परिचय वगैरे झाला आणि तिने पहिला बॉल टाकला. कंपनीकडून सावजाला पकडण्याची पूर्ण तयारी केल्या गेलेली होती. पण सावजही बेफ़िकीर आहोत असे दाखवून त्या गळाला न लागता, आमिषाला न बधता, जाळे तोडून बाहेर जाण्यासाठी तय्यार होते याची त्यांना जाणीवच नव्हती.

विक्रेती : सर आपल्याला प्रवासाची आवड आहे ?

मी : हो तर. खूप आवड आहे.

विक्रेती : वर्षातून किती प्रवास होतो सर तुमचा ?

(आता ह्यांना भरपूर ढील देऊन मग एकदम खिचातान करून "रपके बराबर साफ़" करण्याचे आम्ही ठरवले होतेच. त्यामुळे बावळटपणाचे सोंग आणून त्यांना ढील द्यायचे आम्ही ठरवले होतेच.)

मी : भरपूर होतो. वर्षात दोन ते तीन वेळा आम्ही व्हॅकेशन घेऊन बाहेर फ़िरून येतोच.

विक्रेती : मग सर तुम्ही बाहेर गेल्यावर मुक्काम कुठे करता ?

मी : अर्थातच हॉटेल्समध्ये किंवा रिसॉर्टमध्ये.

विक्रेती : मग सर तुमचे फ़िरण्याचे वार्षिक बजेट साधारण कितीपर्यंत जात असेल ?

मी : होतात कधी कधी लाख रूपयांपर्यंत, कधी कधी दीड लाखही होतात. (बोलाचीच कढी...)

मग त्या विक्रेतीने आपल्या कंपनीचे पॅकेज समजावून सांगायला सुरूवात केली. त्या पॅकेजमध्ये ग्राहकाने जवळपास एक ते सव्वा लाख सुरूवातीला गुंतवायचेत. त्याच्या बदल्यात त्या कंपनीच्या भारतभर विविध ठिकाणी असलेल्या रिसॉर्टसमध्ये पुढली तीन वर्षे कुटुंबासह वास्तव्यासाठी प्रत्येकी चार दिवस तीन रात्रींची बारा पॅकेजेस मिळणार होती. (वर्षाला चार याप्रमाणे)

मी : पण मी तर ऐनवेळी कुठे जायचेय ते ठरवतो आणि बोरिया बिस्तर घेऊन फ़िरायला घराबाहेर पडतो. असे फ़ारसे आखीव रेखीव प्रवास मी करतच नाही कारण अशा अनपेक्षित प्रवासांनी मला खूप छान जीवनानुभव दिलाय. मला तुमची ही ऑफ़र नकोय. मला माझे ते व्हाऊचर द्या मी निघतो.

आता मात्र सावज हातातून निसटून चालल्याची जाणीव त्या विक्रेत्या मुलीला झाली. तिने मला पाचच मिनिटे बसायला सांगून तिथे उपस्थित असलेल्या आपल्या बॉसकडे धाव घेतली. आणि पुढील पटवापटवीची सूत्रे बॉसच्या हाती देऊन ती बाजूला झाली.

दरम्यान मध्ये मध्ये आजूबाजूच्या एखाद्या टेबलावरून त्या टेबलवरचा विक्रेता अचानक उठायचा आणि हातात माईक घेऊन " Ladies and Gentlemen, please pay attention. Mr. XXX has taken a decision to gift to his wife a wonderful gift of holiday package worth amount फ़लाना फ़लाना." आणि त्यानंतर त्या सगळ्या टीम मेंबर्सचे एका विशिष्ट लयीत टाळ्या वाजविणे. सगळा अगदी आखीव्रेखीव मामला होता. आता ती जोडपी खरीच नवराबायको होती की फ़क्त बोलावलेल्या जोडप्यांमधील स्त्री वर्गाला भुरळ पाडून स्त्रीसुलभ मत्सराने, " ते बघा. आपल्या बायकोसाठी काय काय करताहेत ? नाहीतर तुम्ही ! तुमचे माझ्यावर तर मुळीच प्रेम नाही." म्हणत लाडिक हट्ट करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन होते हे कळणे न लगे. अर्थात आमची सौभाग्यवतीही आमच्यासारखीच तयार असल्याने तिला या नाटकी जोडप्यांमधल्या प्रेमाची भूल पडणे शक्य नव्हते. तिथे ते गिफ़्ट घेण्यासाठी फ़क्त जोडप्याने यावे (आणि त्यातही नवरा बायकोनेच) या मागणीमागची गोम आम्हाला कळली होती.

त्या मुलीच्या बॉसने आमच्या टेबलावर येऊन त्याचा मोर्चा आमच्या सौभाग्यवतींकडे वळवला. त्याचा मुख्य रोख सौभाग्यवतींच्या सांगण्यावरून का होईना मी ते पॅकेज विकत घ्यावे असा होता. पण ती ही पक्की होती. कुटुंबातल्या वेगवेगळ्या व्यक्तिंच्या मानसिकतेवर हल्ला करून आपल्याला हवे ते त्यांच्याकडून काढून घेताना अपयश आहे की कसा चेहरा होतो हे "दृश्यम" सिनेमातल्या तब्बूच्या चेह-यावरून आपल्याला लक्षात येईल. अगदी तशीच अवस्था आम्ही नवराबायकोने त्यांची केली होती. कुणीच बधेना. त्यांच्यादृष्टीने चर्चा पुढे सरकेना. आमचे पालुपद एकच ’आम्ही आमचे गिफ़्ट व्हाऊचर घ्यायला आलोय. तेव्हढे द्या म्हणजे झाले. आम्ही निघतो."

आता त्या माणसाने त्याच्या बॉसला बोलावले. एव्हाना जवळपास २ तास उलटून गेले होते. तो हॉल बराचसा रिकामा झाला होता. त्यातली बहुतांशी ग्राहक मंडळी म्हणजे त्यांचीच भाडोत्री मंडळी असावीत याची आम्हाला खात्री होत चालली होती. एव्हाना फ़क्त एक एक कप कोमट आणि बेचव कॉफ़ी आमच्या पुढ्यात आलेली होती. रात्री ८, ८.३० म्हणजे आमच्या भुकेची वेळ होत आलेली होती.

त्या टॉप बॉसने पुन्हा पहिल्यापासून ती रेकॉर्ड लावल्यानंतर मात्र आमचा संयम सुटला. त्याला आम्ही सुनवायला सुरूवात केली. आता आम्हाला काहीच नकोय. तुमचे ते गिफ़्ट व्हाऊचर पण नकोय. गेले दोन अडीच तास आम्ही तुमचे च-हाट ऐकतोय. आम्हाला त्या पॅकेजमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही तरीही तुम्ही आपले मार्केटिंग सोडत नाही. आता खूप उशीर झालाय. घरी जायला रिक्षा वगैरे मिळण्याची वेळ टळण्याआधी आम्हाला निघायचय. (२००२ मध्ये हिवाळा दिवसात नागपूर रात्री ९, ९.३० ला सामसूम होत असे. २०२० मध्ये रात्री ९.३० , १० वाजता होत, एव्हढाच फ़रक आहे. गोव्यासारखे सुशेगाद शहर आहे, नागपूर म्हणजे.)

मग मात्र जाळ्यातून मासा सुटल्याची त्या सर्व टीमला खात्री झाली. हताशा त्यांच्या चेह-यावरून झळकत होती. आमचे दोन अडीच तास वाया गेले होते पण त्या तिघांचेही प्रत्येकी अडीच तास वाया गेल्याचे दुःख त्यांना जास्त होते. त्याहीपेक्षा त्यांना जास्त दुःख झाले होते की आपण चुकीच्या माणसाला टारगेट करत होतो आणि त्याने शेवटपर्यंत आपल्याला कळूही दिले नाही. ढील देता देता एकदम रपरप ओढून दुस-याचा पतंग कापण्याची कला आम्ही बालपणीच शिकलो होतो ते त्यांना माहिती नव्हते.

जाताजाता आम्ही पुन्हा आमच्या गिफ़्ट व्हाऊचरची मागणी केली. जणू काय कंपनीतले ५१ % शेअर्स आम्हाला देतोय या आविर्भावात त्यांनी ते व्हाऊचर्स आम्हाला दिले आणि विजयी मुद्रेत आम्ही बाहेर पडलो. आमचे दोन अडीच तास वाया गेले होते खरे पण एका मोठ्या कंपनीला धडा शिकवण्याचा आनंद त्याहून मोठा होता. 

घरी येऊन ते व्हाऊचर उघडले आणि त्या कंपनीच्या बोगसपणावर शिक्कामोर्तबच झाले. त्यात चार दिवस तीन रात्रींचे भारतातल्या कुठल्याही एका रिसॉर्टचे पॅकेज दिले होते खरे पण खाली एकापेक्षा एक अटी घातल्या होत्या. उदा.

१. हे पॅकेज एका वर्षासाठीच उपलब्ध राहील.

२. हे पॅकेज नाताळ, दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीला लागून घेता येणार नाही.

३. यात फ़क्त रूमचे भाडे माफ़ केलेले आहे. तिथले खाणेपिणे, लॉंड्री इत्यादींचा वेगळा आकार द्यावा लागेल.

४. हे पॅकेज मिळवण्यापूर्वी महिनाभर आगाऊ बुकिंग करावे लागेल. बुकिंगमध्ये उपलब्ध असल्यासच हे पॅकेज मिळेल. (तेव्हा इंटरनेट वगैरे नव्हते. त्यामुळे आपण मागितलेल्या दिवसांसाठी आपले रिसॉर्ट "उपलब्ध नाही" हे सांगण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा होता.)

ह्या आणि अशा इतक्या अटी घालून ते पॅकेज आम्हाला देण्यात आले होते. जाण्याची इच्छा नव्हतीच. 

आज ही टळलेली फ़सवणूक आठवण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात जागोजागी दिसणा-या आणि इंटरनेटवरच्या चांगल्या संभावित गृप्समध्ये येणा-या असल्या पॉंझी स्कीम्सच्या ( Multi Level Marketing) जाहिराती. " There are NO Free Lunches in this world "  हे तत्व विसरलेल्या, थोड्या श्रमात आणि लवकर श्रीमंत होऊ इच्छिणा-या अनेक मासोळ्या गळाला लागाव्या म्हणून भरपूर संभावितांनी जाळे पसरले आहे. 

सावधान मनुजा सावधान रे.

- अनेक Multi Level Companies च्या प्रलोभनांच्या जाळ्यांमधून सहजपणे निसटलेला शाणा कौव्वा, रामबाबू ऐरोलीवाले. 

No comments:

Post a Comment