Sunday, November 1, 2020

काही श्रेष्ठ भागवत (सुदाम देव)

 सुदाम देवांचे चरित्र आपण सगळ्यांनीच आपापल्या बालपणी ऐकलेले आहे. पण श्रीमदभागवताचा विचार केला असता आपण ते फ़ारच त्रोटक ऐकलेले आहे आणि आपण आपल्या सांसारिक दृष्टीकोनातून ते ऐकलेले आहे हे आपल्या लक्षात येईल.

भगवान श्रीकृष्णांचा बालपणीचा वर्गमित्र. सांदिपनी ऋषींच्या आश्रमात दोघेही विद्याध्ययनासाठी एकत्र होते. विद्याध्ययन झाल्यानंतर एक आपल्या क्षात्र धर्माप्रमाणे वागतोय तर एक ब्राम्हण्य जपतोय. श्रीमदभागवताने ब्राम्हण्यावर थेट भाष्य केले नसले तरी अप्रत्यक्ष उदाहरणे देऊन ब्राम्हण्य म्हणजे काय ? याचे उत्तम विवेचन केलेले आहे. ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण. ब्रम्ह म्हणजे शाश्वत वस्तू. श्रीगजाननविजय ग्रंथात लिहील्याप्रमाणे श्री गजानन महाराज आपल्या बंकटलाल नामक भक्ताला त्यांच्या पहिल्याच भेटीत "एक ब्रम्ह जगताप्रत ओतप्रोत भरले असे." असा उपदेश करतात. या जगात नेमके काय शाश्वत आणि काय अशाश्वत ? याचा विवेक जागृत राहून जो आचरण करतो तो ब्राम्हण. जो निव्वळ स्वतःच्याच चरितार्थाचा विचार न करता विचारपूर्वक वागून समस्त मनुष्यमात्रांच्या कल्याणाचा विचार करतो तो ब्राम्हण. मग अशा विचाराच्या व्यक्तीचा आधार उरलेल्या तीनही वर्णांना सहाय्यभूत होतो. त्याच्या विचारानुसार कृती करणे आणि समष्टीचे भले साधणे हा सर्वांचाच परम धर्म होतो. ब्राम्हण हा स्वतःच्याच चरितार्थाचा स्वार्थी विचार करीत नसल्याने त्याचा चरितार्थाचा विचार समाजाने करणे आणि त्याला त्याच्या जीवनकार्यात उदरभरणादि कार्यात अडचणी येऊ नयेत याचा विचार तत्कालीन समाज करीत असे. (नंतर त्यात ब-याच विकृती आल्यात आणि संपूर्ण समाजपुरूषाचे अकल्याण झाले हा विषय एका निराळ्या लेखाचा आहे. याठिकाणी त्याचे प्रयोजन नाही.)

सुदामदेव त्या अर्थाने खरे ब्राम्हण होते. स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीचा बनवून त्यादृषटीने आचरण न केल्याने, तत्कालीन समाजाच्या यदृच्छेने मिळेल यावर त्यांचा उदरनिर्वाह चाललेला होता. अर्थात सततचे पूर, दुष्काळ, नापिकी, युद्धे येत राहिल्याने त्या प्रांतातल्या समाजपुरूषाच्याही काही मर्यादा असाव्यात. त्यामुळे तत्कालीन समाजव्यवस्थेतही सुदाम देव आर्थिक दृष्ट्या गरीब होते. पैसा मिळविणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट नसल्याने पैशांचा अभाव हे त्यांच्या चिंतेचे कारण नव्हते.

मात्र संसार चालवणा-या त्यांच्या पत्नीची मात्र फ़ार इच्छा होती की सुदामदेवांनी एकेकाळच्या आपल्या मित्राला, व्दारकाधीश श्रीकृष्णाला भेटून लौकिक धन मिळवावे. पत्नीच्या फ़ार आग्रहामुळे सुदामदेव व्दारकाधीश श्रीकृष्णाला भेटायला निघाले. मित्राच्या भेटीसाठी रिकाम्या भेटीने कसे जावे ? हा विचार करून त्यांनी पत्नीला सांगून आसपासच्या घरातून कसेबसे चार मूठ पोहे (पोहे कसले, पोह्यांचे बारीक बारीक तुकडेच) गोळा केले आणि त्याची पुरचुंडी बांधून मोठ्या आनंदाने आपल्या मित्राला, व्दारकाधीशाला भेटायला निघालेत. आनंद पैसे मिळणार असल्याचा नव्हता तर खूप वर्षांनी होणा-या मित्रभेटीच्या कल्पनेचा होता.


त्या कल्पनेतच सुदामदेव व्दारकेत पोहोचले. व्दारकानगरीची भव्यता, सुंदरता पाहून त्यांचे डोळे दीपून गेले आणि अशा या नगरीचा राजा असलेल्या आपल्या मित्राची भेट होतेय की नाही या शंकेने ते व्याकूळ झाले. पण ज्याक्षणी भगवंताला आपल्या मित्राचे दर्शन झाले, भगवंत आपले राजेपण विसरले आणि सुदामदेवांना आपल्या अंतःपुरात घेऊन गेलेत आणि त्यांची पाय धुवून, पाय चेपून देऊन सेवा केली. सुदामदेवांनी त्यांच्यासाठी आणलेल्या भेटीबद्दल भगवंतांनी सुदामदेवांना विचारणा केली. मनात खूप लाज उत्पन्न होऊन सुरूवातीला सुदामदेवांनी पहिल्यांदा खूप आढेवेढे घेतले पण भगवंतांनी त्यांच्या जवळची पुरचुंडी शोधून काढली आणि पळवली. आवडीने चाटूनपुसून फ़स्त केली.

भगवंत भावाचा भुकेला आहे हो. ज्या भावाने आपण एखादा पदार्थ त्याला देतो तो भाव महत्वाचा. सुदामदेवांचा शुद्ध भाव भगवंतांनी ओळखला होता आणि म्हणूनच त्यांनी आणलेले पोहे त्यांनी स्वतःहून ग्रहण केलेत.

भगवंताकडे काही मागण्यासाठी सुदामदेव आलेच नव्हते. म्हणून त्यांनी भगवंताला काही मागण्याचा प्रश्नच नव्हता. परतताना त्यांच्या मनात स्वतःच्या परमभाग्याचेच विचार चालले होते. भगवंतांनी त्यांना प्रथमभेटीत कडकडून मारलेली मिठी, भगवंतांनी त्यांची केलेली सेवा, एव्हढ्या वर्षांनंतरही भगवंताच्या मनात आपल्या मित्राविषयी असलेले अकृत्रिम प्रेम यामुळे त्यांचे डोळे वारंवार भरून येत होते.  अत्यंत भावपूर्ण अवस्थेत ते घरी परतले. सर्वसामान्य भक्तांच्याही हृदयातला भाव जाणून घेणा-या भगवंताला सुदामदेवांची सांपत्तिक परिस्थिती न कळणे शक्यच नव्हते. त्यामुळे सुदामदेव घरी परतेपर्यंत त्यांनी त्यांच्या सांपत्तिक परिस्थितीत सुधारणेसाठी एक राजा म्हणून काही प्रयत्न केले असण्याची शक्यता आहे.

सुदामदेव घरी पोहोचले आणि त्यांना आपल्या बदललेल्या सांपत्तिक स्थितीची जाणीव झाली. मुळातच विरक्त विचारांचे असल्याने त्या परिस्थितीचे त्यांनी फ़ारसे कौतुक केले नाही. उलट "भगवंता, या संपत्ती, ऐश्वर्यामुळे तुझ्याप्रती माझी भक्ती कमी होऊ देऊ नकोस" अशी प्रार्थना कळकळीने त्यांनी केलेली आहे. ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात, "भगवंताचा एक दागिना समाधान म्हणून आहे, तो त्याच्या खास भक्तांनाच तो देतो. इतरांना तो संपत्ती ऐश्वर्य वगैरे तो देतो."




शाश्वत सुखावर कायम लक्ष देऊन अशाश्वताचे फ़ार कौतुक न करणारा हा श्रेष्ठ भागवत. आपण सगळीच मंडळी भगवंतावर प्रेम करतो पण भगवंतांनी आपल्यावर प्रेम करावे, आपली दखल घ्यावी असे आपल्याला वाटत असल्यास आपणही सुदामदेवांसारखे शाश्वत अशाश्वत भेद समजून भगवंतावर अकृत्रिम आणि निरपेक्ष प्रेम करूयात का ?

 सुदामदेवांच्या प्रसंगाविषयी आमचे पंतकवी म्हणतात

ऋणतरी मूठभर पोहे, त्याच्या व्याजात हेमनगरी ही

मुद्दलात मुक्ती देणे, ही कोण्या साहुकारीची रिती ?

 

प्रत्यक्ष भगवंतालाही आपल्या निरपेक्ष भक्तीने ऋणी करणारे सुदाम देव म्हणजेच श्रेष्ठ भागवत. 

 - प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन वद्य प्रतिपदा, ०१/११/२०२०)


या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांची माझ्या मेंदूने केलेली फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम)

आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.

तुझेच देणे तुलाच अर्पण.

No comments:

Post a Comment