Tuesday, November 3, 2020

भारतीय रेल्वेचा "रंग माझा वेगळा".

 भारतीय रेल्वे ने ७० - ८० च्या दशकात वेगवेगळ्या सर्वसामान्य गाड्यांसाठीही वेगवेगळ्या रंगसंगतीचे डबे आणले होते.

वाराणसी - चेन्नई गंगा कावेरी एक्सप्रेस साठी जांभळा + केशरी.
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक एक्सप्रेससाठी लाल / केशरी + क्रीम.
काही काळ सेवाग्राम एक्सप्रेसला सुध्दा निळ्या + क्रीम रंगांचे डबे बालपणी बघितल्याचे आठवते.
नंतर नंतर ही कल्पना बारगळली. सर्वसामान्य गाड्यांना मातकट लाल (rust Red), मग निळा + आकाशी आणि आता LHB कोचेसना लाल + क्रीम अशी एकसारखी रंगसंगती असते.
विशेष रंगसंगती ही विशेष गाड्यांची मक्तेदारी झाली आहे.
दुरांतो एक्सप्रेस गाड्यांना ममता बॅनर्जींच्या abstract चित्रांसारखीच abstract रंगसंगती. एखाद्या लहान मुलाने रंगपेटी हातात आल्यावर मुक्तपणे उधळलेले हिरवा पिवळा निळा रंग जसे दिसतील तसे.
हमसफर गाड्यांना निळसर झाक असलेली रंगसंगती.
शताब्दी गाड्यांना निळ्या आणि क्रीम रंगातली रंगसंगती.
त्यात लालूप्रसाद यादवांनी सुरू केलेल्या गरीब रथ गाड्यांची रंगसंगती हिरवा आणि मधे खिडक्यांजवळ पिवळा पट्टा अशी होती. (आपल्या पक्षाच्या झेंड्यांचे रंग आपल्या कल्पनेतल्या गाडीला देण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगेच आहे.)
दि. १८/०२/२००९ रोजी नागपूरवरून गणपतीपुळ्याला जाण्यासाठी विदर्भ एक्सप्रेसमधे बसताना हे एक सुंदर दृश्य दिसले आणि कॅमेर्यात कैद केले.



नागपूर यार्डात उभा असलेला नागपूर - पुणे गरीब रथचा डबा आणि त्या डब्याच्या बरोबर विरूध्द रंगसंगतीतले इटारसी शेडचे शंटिंग एंजिन. दुर्मिळ दृश्य.
नुकतेच नागपूर यार्डाचे संपूर्ण विद्युतीकरण झालेय. आता शंटिंगसाठीही डिझेल एंजिनांची गरज लागणार नाही. हे एंजिन त्याच्या मूळगावी, इटारसीला, परत गेलेसुध्दा असेल.
बाकी एंजिनांची विविध रंगसंगती हा पॅसेंजर कोचेसच्या निरनिराळ्या रंगसंगतींइतकाच आकर्षणाचा विषय आहे. जुन्याकाळच्या कोळसा एंजिनांपासून ते आजकालच्या गुंटकल / गुट्टी शेडच्या किंगफिशर पक्षासारख्या रंगसंगतीपर्यंत ते तेजस एक्सप्रेस गाड्यांसाठीच्या विशेष एंजिनांच्या रंगसंगतीपर्यंत. तो एका वेगळ्या लेखाचाच विषय आहे.
एका रंगतीचा डबा आणि त्याच्या अगदी विरूध्द रंगसंगतीचे एंजिन हा एक दुर्मिळ योग कॅमेर्यात कैद झाला आणि १२ वर्षांनी का होईना आपणा सगळ्यांसमोर सादर झाला.
- रेल्वेच्या अगणित रंगांमधे रंगून गेलेला रेल्वेफॅन राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment