दिवाळीची, किंवा उन्हाळ्याची किंवा कुठलीही मोठी सुट्टी संपताना पुन्हा सेवा सुरू करण्याचा दिवस शनिवार असावा. त्यासारखे दुसरे भाग्य नाही.
अगोदरच या सुट्ट्यांमध्ये मन, शरीर आळसावलेले असते. शनिवार म्हणजे थोडा सेट व्हायला वेळ मिळतो. आणि शनिवारचे अर्ध्याच दिवसाचे काम असल्याने शनिवार "अंगावर येत" नाही. मग पुढल्या सोमवार पासून कामाला पूर्णपणे जुंपले जाण्याची मानसिकता आपसूकच तयार होते.
तसाही दर आठवड्यातला सोमवार "अंगावर येतो". रविवारी दुपार टळल्यानंतरच सोमवारची चाहूल लागून नोकरदार थोडे आतून अस्वस्थ होतात. आणि त्यात अशा मोठ्ठ्या सुट्ट्यांनंतर एकदम सोमवारी रूजू व्हायचय म्हटल्यावर आधला रविवार संपूर्णच बेचैनीचा जातो.
सुरेश भटांची
"मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते !" ही ओळ आठवून सुटीवर जाण्याआधीचे आपलेच बेत आपल्याला आठवतात. त्यातले अपूर्ण बेत पुढल्या सुट्टीपर्यंत मनातल्या माळ्यावर पुन्हा टाकावे लागणार या भीतीने मन कसेनुसे होते. फराळ रूचकर लागत नाही. टी. व्ही. वर लागलेला आवडता सिनेमा, शो तेव्हढा आवडत नाही.
अमेरिकेतल्या एका संशोधनानुसार, हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण हे रविवार — सोमवारच्या पहाटे सर्वाधिक असते. दोन दिवसाच्या विकेंड नंतर सोमवारच्या कामाचे दडपण मनावर असते म्हणून.
हा नियम भारतातही लागू असणारच. कारण इथलीही माणसेच आहेत आणि वर्क कल्चरच्या बाबतीत आपण अमेरिकेचे अंधानुकरण करायला सुरूवात केलीच आहे.
मग भारतातही कर्मचार्यांना सुटी संपवताना असा शनिवार थोडा स्थिरावायला देता आला तर ? किती छान होईल. खूप दीर्घ सुट्टीनंतर शनिवारी अर्धा दिवस कामांचे "seasoning" करून रविवारी सुट्टी उपभोगून सोमवारपासून पूर्णपणे कामावर रूजू होता येईल.
म्हणजे "(सोमवारका) जोरका धक्का (शनिचरको) धीरे से लगे" साध्य होईल ना.
काही काही स्कँडेनेव्हियन देशांमध्ये तर पाच ऐवजी चारच दिवसांचा कार्यालयीन कामांचा आठवडा सुरु झाल्याचे ऐकलेय.
भारतातून नाॅर्वे, स्वीडन, फिनलँड चे साधारण तिकीट किती बसेल हो ?
— अगदीच Workoholic नसलो तरी कार्यालयीन कामात अगदीच अकर्मण्यही नसणारा, सुट्टी मनापासून आवडणारा आणि जगणारा आपला मध्यममार्गी रामभाऊ.
No comments:
Post a Comment