Monday, November 2, 2020

रेल्वेच्या एका दुर्मिळ वर्गातून प्रवास.

 ००८.

कुटुंबासह दक्षिण भारताचा दौरा आखला होता. सगळा दौरा स्वतःच आखणी केलेला होता.
नागपूर - चेन्नई - मदुरै - रामेश्वरम - मदुरै - कन्याकुमारी - थिरूवनंतपुरम - तिरूपती - चेन्नई - नागपूर. असा १० दिवसीय दौरा होता.
बाकी आखणी व नियोजन छान झालेले होते. फक्त मदुरै ते कन्याकुमारी हा प्रवास कसा करायचा ? हा छोटासा पण महत्वाचा प्रश्न होता.
एक रात्रीचा हाॅटेल खर्च वाचवण्यासाठी मदुरै ते कन्याकुमारी हा रात्रीचा प्रवास करायचे ठरले. पण त्यासाठी सुयोग्य रेल्वेच सापडेना.
मदुरै ते नागरकोईल (कन्याकुमारी आधी १६ किमी वर असलेले महत्वाचे रेल्वे जंक्शन. बहुतांशी तामिळनाडूवरून केरळात जाणार्या गाड्या नागरकोईलवरूनच केरळकडे वळतात. कन्याकुमारी टर्मिनसपर्यंत फार थोड्या गाड्या जातात.) हे अंतर साधारण २३० किमी आहे. रेल्वेचा साधारण ४ ते ५ तासांचा प्रवास.
मदुरैवरून रात्री ९, ९.३० ला निघणार्या गाड्या नागरकोईलला रात्री २, २.३० ला पोहोचणार. म्हणजे अनोळखी गावी अडनिड्या वेळेत पोहोचणार.
बरे नागरकोईलला सकाळी चांगल्या वेळेत पोहोचणार्या गाड्या मदुरैवरून रात्री १, १.३० ला अडनिड्या वेळेत निघणार्या होत्या. म्हणजे झोपेचे खोबरे नक्की होणार.
आमच्या Indian Railways Fans Club च्या Yahoo mail लिस्टवर मी हा माझा प्राॅब्लेम सहज मांडला आणि काय आश्चर्य !
आमच्या ग्रुपवर Time Table Man of India म्हणून प्रसिध्द असलेले Srinivasa Prasad Viswanadha sir यांचा उत्तम सल्ला आला.
रात्री ११.०० वाजता मदुरैवरूनच मदुरै - कोल्लम पॅसेंजर गाडी निघते. आरामात, धिकीडधिकीड प्रवास करून पहाटे ५.३० ला ही गाडी नागरकोईलला जाते. (आम्हालाही तेच हवे होते. जलद पोहोचून अडनिड्या वेळेत अनोळखी गावात पोहोचून करायचेय काय ? छान रात्रभर गाडीत झोप व्हायला हवी होती.)
सुदैवाने या पॅसेंजर गाडीला विना वातानुकूल प्रथम वर्गाचा डबा लागत होता. पॅसेंजरचे विना वातानुकूल प्रथम वर्गाचे तिकीट म्हणजे एक्सप्रेस गाड्यांचे Third AC चे तिकीट. परवडण्याजोगे.
भारतीय रेल्वेने हे विना वातानुकूल प्रथम वर्गाचे डबे हळूहळू काढून टाकलेत. तेव्हाही खूप कमी असे डबे सेवेत होते.





अशा या दुर्मिळ डब्यांमधला एक आरामदायक आणि संस्मरणीय प्रवास.
१डिसेंबर २००८. मदुरै.
गाडीत शिरल्याशिरल्या पुलंच्या "पेस्तनकाकां"मधल्या "सी कम्पार्टमेंट" ची आठवण आली नसती तरच नवल.
- विरूदुनगर - वांछी मनियेच्छी - तिरूनेलवेल्लई मार्गे भारताचे दक्षिण टोक गाठणारा आपला प्रवासी पक्षी, के. पी. रामास्वामी अय्यंगार.

No comments:

Post a Comment