Thursday, November 5, 2020

रंगभूमी, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून....

 गेल्यावर्षी जागतिक रंगभूमीदिनानिमित्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील आमच्या समृद्ध नाट्यमुशाफ़िरीवर मी एक ब्लॉगपोस्ट टाकलेली होती. त्यानिमित्ताने दुस-या वर्षात आम्ही असताना आमच्या "प्रेमाच्या गावा जावे" नाट्यप्रयोगाच्या वेळेची एक धमाल आठवली.


साधारण फ़ेब्रुवारीच्या तिस-या किंवा शेवटल्या आठवड्यात आमच्या महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन होत असे. पहिल्या दिवशी संध्याकाळी उदघाटन सोहळा व रात्री तीन अंकी नाटक, दुस-या दिवशी दिवसभर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आणि रात्री चार एकांकिका व्ह्यायच्यात. ज्या गुणी अभिनेत्यांना तीन अंकीत संधी मिळाली नाही ती सगळी मंडळी एकापेक्षा एक सरस एकांकिका सादर करायचीत आणि आपल्या अभिनयाचे प्रदर्शन घडवायचीत. तिस-या आणि शेवटच्या दिवशी सकाळी फ़ॅन्सी ड्रेस कॉम्पीटिशन, फ़िशपॉंडस आणि रात्री व्हेरायटी एंटरटेनमेंटचा कार्यक्रम व्हायचा. त्यात कॉलेजमधल्या सगळ्या कलाकारांचे विविध गुणदर्शन व्हायचेत. एकापेक्षा एक सरस गाणी, नकला, मूक नाट्य, सोलो डान्स, ग्रूप डान्स, एकपात्री अशी खरोखर विविधता त्या मनोरंजनात असायची. तीनही दिवशी विद्यार्थ्यांचा भरगच्च प्रतिसाद मिळत असे. आणि सगळे कार्यक्रम खरोखर चांगले होत असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसादही गांभीर्यपूर्ण असे. एखाद्या खराब गायलेल्या गाण्याची, किंवा फ़सलेल्या नाचाची हुर्यो उडायची पण ते सगळे तात्पुरते असे. वैयक्तिक हेवेदावे, खुन्नस ठेऊन एखादा कार्यक्रम पाडल्याची घटना विरळा. सगळीकडे अतिशय सुदृढ स्पर्धा आणि मोकळे वातावरण असे.


जानेवारीच्या दुस-या आठवड्यात तीन अंकी नाटकासाठी निवड व्हायची. निवड होण्यासाठी साधारण ५० च्या आसपास विद्यार्थी ऑडिशन द्यायचेत. नाटकाच्या गरजेनुसार त्यातली १० ते १२ मंडळी तीन अंकी नाटकासाठी निवडली जायचीत. उरलेली अभिनेता, अभिनेत्री मंडळी वर उल्लेख केल्याप्रमाणे सशक्त एकांकिकेच्या शोधात निघायचीत आणि एकांकिकेच्या सादरीकरणातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवू पहायचीत. जानेवारी १९९१ मध्ये आम्ही व्दितीय वर्ष अभियांत्रिकीला असताना वसंत कानेटकरांचे "प्रेमाच्या गावा जावे" हे सदाबहार नाटक करण्याचे ठरले. तीन पिढ्यांमधला वैचारिक संघर्ष हा कानेटकरांनी मोठ्या खुमासदार विनोदातून मांडला होता. प्रख्यात इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित प्रमुख भूमिका होती. आजचा मराठीतला आघाडीचा अभिनेता / दिग्दर्शक संदेश कुळकर्णी १९९१ मध्ये कराडला मेकॅनिकल इंजीनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याने ती भूमिका साकारली होती. त्याच्या क्रिकेटर नातवाची "टिटू" ही भूमिका मला साकारायला मिळाली होती.





जानेवारीपासून तालमींना सुरूवात झाली. स्थापत्य अभियांत्रिकी विभागातले ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जयकुमार मुळे सर दिग्दर्शक होते. सोबत विद्युत अभियांत्रिकी विभागातले ज्येष्ठ पण तरीही विद्यार्थीप्रिय असे प्रा. बी. ए. पाटील सर सहाय्यक दिग्दर्शक होते. मुळे सर आम्हाला त्या सत्रात इंजीनीअरींग जिऑलॉजी शिकवत असत. मी पाहिलेल्या अत्यंत उत्तम शिक्षकांपैकी एक. खूप सुंदर शिकवायचेत. माझ्या शिक्षक म्हणून शिकवण्यावरच नव्हे तर संपूर्ण जीवनावर ज्यांचा प्रभाव आहे असे आमचे मुळे सर. वरून कठोर पण आतून तितकेच मायाळू असे त्यांचे रूप आम्हाला अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षापर्यंत बघायला मिळाले. पण व्दितीय वर्षात असताना मला सरांची आदरयुक्त भितीच वाटत असे. तालमी रात्री ९., ९.३० च्या आसपास सुरू व्हायच्या त्या थेट रात्री १.३०, २.०० पर्यंत चालायच्यात. मुळे सर हे गर्ल्स हॉस्टेलचे रेक्टर होते त्यामुळे नाटकात सामील असलेल्या मुली त्यांच्यासोबतच तालमींना यायच्या आणि त्यांच्यासोबतच आपल्या हॉस्टेलला परतायच्यात. तालमी छान व्हायच्यात. तालमी दरम्यान मजेमजेचे प्रसंग घडायचेत. आम्ही सगळेच विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचा आनंद लुटत असू. माझ्या वडीलांच्या भूमिका करणा-या मोहन लंगर ने "कार्टे, लोक शेण घालतील आमच्या तोंडात" या संवादाऐवजी एक दिवस घाईघाईत, तोंड आणि शेण या जागांची उलटापालट करून संवाद म्हटला. त्यानंतर भयंकर हास्यस्फ़ोट झाला. त्यानंतर पुढले ८ दिवस तरी तो नेमका संवाद यायच्यावेळी तालमींमध्ये हास्यस्फ़ोट व्हायचा आणि तेव्हढा भाग वगळून मग तालीम पुढे सुरू ठेवावी लागायची. शेवटी एक दिवस मुळे सर आम्हा सर्वांना तालमीतच खूप रागावले आणि मग आमचे तालमीदरम्यान या संवादावरील हसू थांबले. तालमी सुरळीत सुरू झाल्या.




कराडला असताना मी माझ्या मिशांवरील प्रयोगांबाबत प्रसिद्ध होतो. कधी सफ़ाचट, कधी चार्ली चॅप्लीन स्टाइल, कधी नेमकी मधलीच मिशी उडवून इतर सगळी ठेव, कधी कुलदीप पवार, अरूण सरनाईक स्टाइल तलवार कट मिशीच ठेव असे माझे खूपसे प्रयोग चालायचेत. नेमके आमच्या तीन अंकी नाटकाच्या दिवशी अगदी सकाळी सकाळीच असले काही प्रयोग करून पाहण्याची मला दुर्बुद्धी झाली. त्याकाळी आजसारखे ट्रिमर वगैरे नव्हते. (असतील तरी आम्हाला परवडण्याजोगे नव्हते आणि आजसारखे सर्वत्र उपलब्धही नव्हते.) सगळा कारभार छोट्या कात्रीनेच चालायचा. मिशी अर्धवट कापल्यानंतर माझ्या लक्षात आले की आज एका बाजूने मिशी जास्त कापल्या गेलीय. आता ती माझी चूक मी दुरूस्त करायला जाणार तेव्हढ्यात आमच्या हॉस्टेलच्या दारावर थाप वाजली. माझे दोन्हीही पार्टनर्स गाढ झोपलेले असल्याने दार उघडणे मलाच क्रमप्राप्त होते. मिशीवरील प्रयोग तसाच अर्धवट ठेऊन मी दार उघडले तर समोर मला मुळे सरांनी काहीतरी कामासाठी तत्काळ बोलावल्याचा निरोप घेऊन प्रथम वर्षाचा एक मुलगा उभा.

हाताशी असलेल्या थोड्या वेळात मिशीवरील प्रयोग पूर्णत्वास नेणे शक्य नव्हते आणि मिशी तशीच ठेवून मुळे सरांसमोर जाणे म्हणजे तोफ़ेच्या तोंडी जाण्याइतकेच जीवघेणे होते. तात्पुरता उपाय म्हणून माझ्या सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली. दोघेही रूम पार्टनर्स गाढ झोपले होते. मी लगेच कात्री घेऊन केसांची एक छोटी बट कापली. डिंकाच्या बाटलीतून थोडा डिंक टेबलावर घेतला आणि बटेतले कापलेले केस घेऊन त्यांना डिंकाच्या सहाय्याने कृत्रिम मिशीसारखे चिटकवायला लागलो.

रूममधून जोरदार हसण्याचा आवाज आला म्हणून मागे वळून पाहिले तर माझे दोन्ही रूम पार्टनर्स झोपेचे सोंग घेऊन, पांघरूणाआडून माझा हा प्रयोग बघत असल्याचे उघड झाले. आम्ही तिघेही हास्यात बुडून गेलोत. ती तशीच चिकटवलेली मिशी घेऊन मी मुळे सरांना भेटायला गेलो. त्यांनी कराड शहरातून काही नाटकाला लागणारी प्रॉपर्टी आणायला सांगितली होती. तसाच बसने कराड शहरात गेलो. पहिल्यांदा सलूनमध्ये जाऊन मिशी पूर्णपणे उडवली. केसांची नीट कटिंग वगैरे केली आणि तदनंतर नाटकाला लागणारी प्रॉपर्टी घेऊन परतलो.

संध्याकाळी प्रयोगाचे वेळी माझा प्रवेश पहिल्या अंकाच्या शेवटी असतानाही मेकपसाठी सगळ्यात आधी बसलो आणि पहिल्यांदा सफ़ाचट झालेल्या ओठांवर मिशी चिकटवून द्यायला मेकपमनला सांगितले. हा सगळा खटाटोप मुळे सरांकडून "नाटकाच्या दिवशी मिशांवर प्रयोग का केलेत ?" म्हणून बोलणी बसायला नकोत म्हणून केला होता आणि तो सफ़लही झाला. नाटकानंतर दुस-या दिवशी सरांना मीच ही बातमी कळवली. सरही कृतककोपाने रागावलेत पण नंतर आमच्या हास्यात सामील झालेत.

रंगमंचावर घडणा-या नाटकाआधी इतरही बरीच नाटके घडत असतात याचा पहिला धडा मिळाला.


- नकलाकार घराण्यात जन्म घेतलेला अभिनेता, नट रामकुमार.


No comments:

Post a Comment