आज रेल्वे गाड्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीबाबत लिहील्यानंतर आमचे ज्येष्ठ रेल्वेफॅन मित्र आणि सर्व रेल्वेफॅनचे स्वप्न असलेला लोको पायलटचा जाॅब प्रत्यक्षात करणारे श्री Bhushan Bhardwaj यांची विदर्भ एक्सप्रेसच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीबाबत कॉमेंट आली आणि मी २३ वर्षे मागे गेलो.
१ मे १९९७ रोजी महाराष्ट्र दिनी हा विदर्भ एक्सप्रेसचा वैशिष्ट्यपूर्ण रेक मध्य रेल्वेने आणला. फक्त बाह्य रंगसंगतीच नव्हे तर अंतर्गत रचनेतही भरपूर सोयी सुविधा असलेला हा रेक मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशाॅपने एका जर्मन कंपनीच्या मार्गदर्शनाखाली बांधलेला होता.
मला या रेकने लगेचच ५ मे रोजी प्रवास घडला होता. ठाण्यावरून विदर्भ एक्सप्रेस पकडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे लोकलने येत असतानाच, भायखळा कोचिंग डेपोतून हा रेक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे शंटिंग करून नेताना मी लोकल मधून बघत होतो. त्याची आकर्षक रंगसंगती पाहून त्याच्या प्रेमातच पडलो. त्या रेकवरून नजरच हटेना.
मनोमन देवाकडे प्रार्थना करीत होतो की देवा हाच रेक विदर्भ एक्सप्रेसचा असू देत. मनातून अजिबात खात्री नव्हती. कारण विदर्भ एक्सप्रेसच्या १५ मिनीटे आधीच मुंबई - फिरोजपूर पंजाब मेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघायची आणि ती मध्य रेल्वेची त्याकाळची लाडकी गाडी होती. मुंबई - फिरोजपूर पंजाब मेल (2137/2138) आणि दादर - मद्रास चेन्नई एक्सप्रेस (2163/2164) या गाड्या मध्य रेल्वेच्या लाडक्या गाड्या. मध्य रेल्वेला मिळालेले सगळे नवीन कोचेस, सगळे नवीन रेक्स पहिल्यांदा यांना मिळायचेत आणि यांनी वापरून थोडे जुने झालेत की इतरांना मिळायचेत. विदर्भ एक्सप्रेस या priority list मधे पहिल्या १० मध्ये पण बसत नव्हती.
पण त्यादिवशी परमेश्वर आमच्यावर प्रचंड म्हणजे तुडुंब प्रसन्न असावा. कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हाच रेक विदर्भ एक्सप्रेसचा म्हणून फलाटावर उभा असलेला पाहून अस्मादिकांचा आनंद गगनात मावत नव्हता. रेक नवीन कोचेसचा नव्हता. जुन्याच कोचेसना refurbish करून हा रेक बनविलेला असला तरी फलाटावरच्या इतर गाड्यांमधल्या प्रवाशांच्या औत्सुक्याच्या, असूयेच्या नजरा आम्हाला आतल्या आत कुठेतरी सुखावून जात होत्या.
त्या कोचेसविषयी माझ्या प्रवासविषयक टिपणांमध्ये त्याविषयी काय लिहू आणि काय नको असे झाले होते. त्याचे प्रतिबिंब लिखाणात उमटले.
प्रवासी हित लक्षात घेऊन डिझाईन केलेल्या रेकमधून प्रवासाचा एक अप्रतिम अनुभव. २३ वर्षांनीही मनात ताजा असणारा आणि आजही मनात खुषीची फुलपाखरे उडवणारा.
No comments:
Post a Comment