Sunday, January 15, 2023

नववर्ष, नवनवे संकल्प आणि गणितातला एक फ़सलेला प्रयोग.

 नववर्ष सुरू झाले की अनेक मंडळी नवनव्या उत्साहाने नवनवे संकल्प करीत असतात. बरीच मंडळी ते संकल्प मस्तपैकी तडीला नेतातही. 1989 मध्ये मी दररोज डायरी लिखाणाचा संकल्प सोडला होता. तो चांगला 12 वर्षे चालला. तसाच रोजचा खर्च लिहून ठेवण्याचा संकल्पही माझी विद्यार्थी दशा होईपर्यंत नियमित टिकवला होता. आम्ही कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात हॉस्टेलला रहायचोत. वडील दर महिन्याला आपल्या पोटाला चिमटा घेऊन, आई संसारातल्या इतर गरजांमध्ये काटकसर करून पैसे पाठवायचेत. आई वडीलांनी रक्ताचे पाणी करून मिळवलेल्या पैशाचे आपण फ़क्त ट्रस्टी आहोत. त्याचा हिशेब त्यांनी कधीही मागितला नाही तरी आपल्या खर्चावर आपलेच नियंत्रण रहावे हा हेतू या खर्च लिखाणामागे होता. त्यामुळे शिक्षण पूर्ण होऊन चांगली नोकरी लागेपर्यंत हा हिशेब लिखाणाचा संकल्प टिकला.


2014 मध्ये जानेवारीत असाच एक संकल्प मी सोडला होता. तेव्हा मी सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य विभागप्रमुख म्हणून कार्यरत होतो. ही जबाबदारी पर्यवेक्षकीय स्वरूपाची होती. महाविद्यालय आणि आमचा विभाग नवीनच अस्तित्वात आल्याने खूप कामांचे नियोजन करणे, आणि त्यांची अंमलबजावणी करणे या स्वरूपाची ही जबाबदारी होती. 2012 पासूनच डायरीची पाने नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यात गुंतलेली होती. रोज आखलेली सगळीच कामे पूर्णत्वास जातात असे नाहीच. रोज आखलेल्या कामांपैकी कधी 50 % कामे, कधी 100 % कामे तर कधी 0 % सुद्धा कामे व्हायचीत. पण अशा कामांचे सगळे पुनर्नियोजन पुन्हा दुस-या दिवशी  करावेच लागते हे शहाणपण तोपर्यंत आलेले होते. त्यामुळे 0 % कामे झालीत तरी खचून न जाता पुन्हा नवी मांडणी करायची हा निर्धार होता. एकंदर मोठी मौजच होती. जबाबदारी मनापासून एंजॉय करणे सुरू होते.


1 जानेवारी 2014 पासून मी डायरीत रोज नियोजन केलेल्या कामांपैकी किती टक्के कामे झालीत याचा आढावा घ्यायला आणि रोज त्यांची टक्केवारी काढायला सुरूवात केली. सहज चाळा म्हणून एक्सेलमध्ये रोजच्या कामांची टक्केवारी लिहायला सुरूवात केली आणि त्यांची रोज बदलत जाणारी सरासरी रेषा काढायला सुरूवात केली. महिन्यातले जास्तीत जास्त दिवस आपण त्या सरासरी रेषेच्या वर काम करायचे की आपण यशस्वी झालो असा गणिती निष्कर्ष आपण काढू असा माझा प्रयोग होता.


पहिल्या दिवशी उत्साहात आपण नियोजन केलेल्यापैकी 100 % कामे करतोच हा सगळ्यांचाच अनुभव आहे. तशी ती पहिल्या दिवशी झालीही. दुस-या दिवशी काही अनाकलनीय कारणाने नियोजन केलेल्यापैकी 0 % कामे झालीत. सरासरी एकदम 50 % वर आली. मग 2 जानेवारीला सरासरीपेक्षा 1 दिवस वर आणि 1 दिवस खाली अशी कार्यक्षमता आली.


तिस-या दिवशी 80 % कामे पार पाडलीत. मग सरासरी 60 % आली. 2 दिवस सरासरीपेक्षा जास्त आणि 1 दिवस कमी. चौथ्या दिवशी 70 % कामे पार पाडलीत मग 4 दिवसांची सरासरी 62.5 % म्हणजे मग 1 जानेवारी, 3 जानेवारी आणि 4 जानेवारी असे तीन दिवस सरासरीपेक्षा जास्त काम आणि 2 जानेवारी रोजी सरासरीपेक्षा कमी काम असे चित्र झाले.

मी हा उपक्रम जानेवारी 2014 ते एप्रिल 2014 असा चार महिने चालवला. त्यातली गणितीय गंमत लक्षात आल्यानंतर मात्र हा उपक्रम थांबवला. गणितीय गंमत अशी की जितक्या जास्त कार्यक्षमतेने रोज आपण कामे करू तितकी ती सरासरी रेषाही वाढत जाते आणि काही दिवसांपूर्वी एखाद्या दिवसाची सरासरी त्या रेषेवर असेल ती काही दिवसांनी सरासरी रेषा वर गेल्याने सरासरीपेक्षा खाली जाते. 120 दिवसांनंतर 60 दिवस सरासरीपेक्षा जास्त आणि 60 दिवस सरासरीपेक्षा कमी असे चित्र निर्माण झाले. आणि नंतर हिशेब मांडल्यानंतर लक्षात आले की कितीही दिवसांनंतर 50 % दिवस सरासरी रेषेवर आणि उरलेले 50 % सरासरी रेषेखाली हेच चित्र कायम राहणार. रोज अगदी 100 % कामे केलीत तर सरासरी 100 % राहील आणि रोजच्या कामांएव्हढी सरासरी गाठली जाईल. रोज 100 % कामे करणे म्हणजे निव्वळ आदर्श व्यवस्था.

मग त्या निष्कर्षानंतर हा प्रयोग थांबवला. संशोधनातून आपण मांडलेले प्रमेय सिद्ध करण्याचा अट्टाहास नसावा कधीकधी आपला hypothesis सिद्ध झाला नाही तरी alternate hypothesis सिद्ध होतोच हे ज्ञान पी. एच. डी. पूर्वीच मिळाले. हे ही नसे थोडके.

- प्रत्येक फ़सलेल्या प्रयोगांमधून नवनवीन शिकवण घेणारा विद्यार्थी, कुमार राम प्रकाश किन्हीकर, इयत्ता बिगरी. (हे असे कायम शिकत राहिल्याने आपली गणना बिगार भरतीत होत नाही याचा आनंद मानणारा एक चांगला विद्यार्थी.)

No comments:

Post a Comment