Friday, January 27, 2023

शिक्षक, गुंडगिरी आणि कृतज्ञता : एक असाही गंमतीशीर अनुभव.

इसवी सन 2000. नवी मुंबईच्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीला लागून चांगली 5 वर्षे झालेली होती. मुंबईत स्थिरावलो वगैरे होतो. सगळे सुरळीत चाललेले होते. अचानक तुळजापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांच्या भरतीची जाहिरात वर्तमानपत्रात आली. हे महाविद्यालय आमच्या महाविद्यालयासारखे खाजगी होते हे माहिती होते पण त्या जाहिरातीत खाली  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांची सही होती. तुळजाभवानी मंदीर ट्रस्टने चालविलेले हे महाविद्यालय होते. त्याकाळात त्या ट्रस्टवर  शासनातर्फ़े प्रशासकाची नेमणूक झालेली होती हे माहिती होते. हे महाविद्यालय पण शासनाने ताब्यात घेतले की काय ? अशी शंका मनात आली. शासनाने हे महाविद्यालय ताब्यात घेतले असेल तर महाराष्ट्रातल्या एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करण्याची संधी कशाला घालवा ? या विचाराने अर्ज केला. वेतन आयोग शासकीय महाविद्यालयात लवकर लागतात. वेतन आयोगाची थकबाकी वगैरे मिळते हा माझा अनुभव होता. म्हणून मग शासकीय महाविद्यालयाचे आकर्षण. जूनमध्ये अर्जाला उत्तर आले. 29 जून रोजी तुळजापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे असे मुलाखतपत्र सुद्धा माझ्या पवईच्या घरी आले.

28 जून रोजी पवईवरून ठाणे गाठले आणि ठाणे - पुणे (स्टेशन) व तिथून स्वारगेट तिथून सोलापूर आणि रात्री उशीरा तुळजापूर गाठले. ठाण्यावरून तुळजापूरला जाणा-या खाजगी लक्झरी बसेस होत्या. त्याकाळी स्लीपर कोचेसचे एव्हढे पेव फ़ुटलेले नव्हते. बहुतांशी सगळ्या लक्झरी बसेस आसनीच असायच्यात. रात्रभर बसून प्रवास करून पहाटे थेट तुळजापूर गाठणे आणि अर्धवट झालेल्या झोपेने डोळे तारवटून त्याचदिवशी मुलाखतीला हजर राहणे हे मला कधीच रूचले नाही आणि रूचणारही नाही. म्हणून दिवसभर असा टप्प्याटप्प्याचा प्रवास करून मी रात्री तुळजापूरला मुक्काम करणे पसंत केले होते.




29 तारीख उजाडली. पहाटे उठून अगदी सकाळी सकाळीच आई भवानीचे दर्शन घेतले. त्याकाळी आज असते एव्हढी गर्दी आणि ती लांबच लांब दर्शनबारी तुळजापूरला नव्हती. थेट दर्शन व्हायचे. उत्सवात वगैरे गर्दी राहत असेलही पण एरव्ही फ़क्त 10 -15 दर्शनार्थींची रांग असायची. कोल्हापूरला सुद्धा आम्ही 1989 ते 1993 पर्यंत अनंत वेळा दर्शन घेतलेले आहे. अजिबात रांग नसायची. 

मुलाखतीसाठी छान तयार होऊन वगैरे गेलो. मंदीर परिसराजवळूनच रिक्षा मिळाली आणि महाविद्यालयात पोहोचलो. खरेतर हे अंतर पायी चालत जाण्याइतके होते पण ही बाब तिथे पोहोचल्यानंतर कळली. मग परतताना पायीच जाण्याचा निश्चय केला. मुलाखतीसाठी साधारण 15 जणांना बोलावलेले होते. सहायक प्राध्यापकांच्या एकूण 3 जागा होत्या. एका जागेला 5 उमेदवार या प्रमाणात उमेदवार बोलावले होते हे सुद्धा चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण होते. त्यापूर्वी 1995 मध्ये लोणी इथे विखे पाटलांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 6 जागांसाठी 125 जणांना बोलावून व्यवस्थापनाने अक्षरशः खेळखंडोबा केलेला स्मरणात होता. त्यामुळे इथल्या व्यवस्थापनाचे कौतुक वाटले.

मुलाखतींना सुरूवात झाली. मुलाखतीच्या पॅनेलमधले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी अत्यंत कर्तव्यदक्षपणे वेळेवर हजर झालेत. तुळजापूरचे तहसिलदार सुद्धा मुलाखतीच्या पॅनेलमध्ये होते. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. देशपांडे आणि त्याकाळचे एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकरपंत परिचारक हे सुद्धा मुलाखतीच्या पॅनेलवर होते.

माझी मुलाखत छान झाली. प्राचार्य श्री देशपांडे सरांनी जे तांत्रिक प्रश्न विचारले त्यांची मी अचूक उत्तरे दिलीत. माझ्या बायो डेटा मधील "एस. टी. आणि रेल्वेची आवड" हे वाचून सुधाकरपंत परिचारकांनी मुलाखतीची पुढील सूत्रे आपल्या हाती घेतलीत आणि एस. टी. या माझ्या फ़ेव्हरीट पीचवर मला एकापाठोपाठ एक प्रश्नांचे फ़ुलटॉस मिळत गेलेत. सगळ्यांना अगदी आत्मविश्वासाने मी सीमेबाहेर तडकावले. एका बसफ़ॅनला भेटून एस. टी. च्या अध्यक्षांना आणि ज्या माणसाला आपण बोलत असलेली एस. टी. विषयीच्या संज्ञा कळतात अशा माणसाला भेटून मलाही खूप आनंद झाला होता. जिल्हाधिका-यांच्या चेहे-यावरचे हास्य आणि समाधान इथे माझी निवड झालीय हा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवून गेले.

महाविद्यालय परिसर थोडा उदासच वाटत होता. महाविद्यालयातल्या किंवा कुठल्याही संस्थेतल्या कर्मचारी वर्गाच्या दीर्घकालीन सुखदुःखांचे प्रतिबिंब त्या महाविद्यालयाच्या वातावरणावर पडत असते हा माझा अनुभव आहे. ज्या संस्थेत कर्मचारी वर्गाला सन्मानाने वागवले जाते, त्यांच्या इच्छा आकांक्षांचा आदर होतो तिथले एकूणच वातावरण आल्हाददायक असते. अन्यथा जिथे कर्मचारी वर्गाची मानसिक पिळवणूक होते तिथे पगार वगैरे उत्तम असलेत तरीही कर्मचारी वर्गाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब त्या इमारतीत पडून ती इमारत कळानष्ट दिसते. तशी त्या महाविद्यालयावर अवकळा पसरलेली मला जाणवली. आई भवानीचे नाव जरी त्या महाविद्यालयाला असले तरी तिची कृपा त्या महाविद्यालयावर नव्हती हे जाणवत होते. अनेक प्रकरणे कोर्टात प्रलंबित होती. महाविद्यालय आणि संस्थानाचाही कारभार ठप्प पडलेला होता. एकटे देशपांडे सरांसारखे अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्व त्या वातावरणात फ़ार काही करू शकणार नव्हते. मुंबईत चांगले स्थिरस्थावर झालेले सोडून इथे यायचे नाही हा माझा निर्धार महाविद्यालय सोडून परत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतानाच पक्का झाला होता. 


मुलाखत संपवून बाहेर आलो. दुपारचे 4 च वाजले होते. परतताना मी सोलापूरवरून रात्री 8.30 च्या सिद्धेश्वर एक्सप्रेसचे रिझर्वेशन केलेले होते. तुळजापूर ते सोलापूर एक तास प्रवास. सोलापूर बस स्थानक ते सोलापूर रेल्वे स्टेशन अर्धा तास प्रवास गृहीत धरूनही मी तुळजापूरवरून संध्याकाळी 6.30 ला निघालेले चालणार होते. मग मुक्कामाच्या ठिकाणी रमतगमत आलो आणि थोडी विश्रांती घेतली. 

संध्याकाळी 6.15 च्या सुमारास तुळजापूर बस स्थानकावर आलो आणि तुळजापूर - सोलापूर विनावाहक विनाथांबा बसमध्ये तिकीट काढून 1 नंबरच्या आसनावर बसलो. माझ्यासमोरच्या 54 नंबरच्या आसनावर (त्याकाळी ड्रायव्हर केबिनमागे प्रवासाचे उलट्या दिशेला तोंड करून बसण्याचे एक बाकडे असायचे. त्यात आसन क्रमांक 49 ते 54 अशी 6 आसने असायचीत.) माझ्यासोबत मुलाखतीला उपस्थित असलेला एक उमेदवार बसलेला होता. त्याच्या शेजारी 53 नंबरवर बाउन्सर सारखी शरीरयष्टी आणि चेहे-यावर प्रचंड मग्रूरी असणारा त्याचा एक गुंड / पहेलवान छाप मित्र बसलेला होता. माझ्याशी बोलायचे म्हणूनच दोघांनीही मुद्दाम ही जागा निवडली होती हे मला नंतर कळले.

मला वाटलं की ते दोघेही सोलापूरला आणि पुढे त्यांच्या त्यांच्या गावाला निघाले असतील. पण थोड्या वेळातच कळले की ते दोघेही तुळजापूरचेच होते. माझ्याशी बोलायला म्हणून माझ्याबरोबर बसने सोलापूरपर्यंत येणार होते. मघाशी मुलाखतीआधी इतर उमेदवारांशी सहज गप्पा मारताना मी माझा यापुढील परतीच्या प्रवासाचा बेत सांगितलेला असणार. तो नेमका लक्षात ठेऊन तो मुलगा आपल्या मित्रासोबत माझ्यासोबत प्रवासाला निघाला असणार.

बस सुरू होण्याआधीपासूनच त्या समोरच्या मुलाने, (तसा तो माझ्यापेक्षा 4 - 5 वर्षांनी मोठा होता.) प्रस्तावना सुरू केली. तो त्याच महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागात गेली 3 वर्षे कंत्राटी प्राध्यापक (अस्थायी) म्हणून काम करत होता. तिथलाच रहिवाशी असल्याने ते महाविद्यालय त्याला नोकरी करायला सोयीचे होते. आज ना उद्या या महाविद्यालयात कायमस्वरूपी जागा निघतील आणि तिथे आपण कायम होऊ या अपेक्षेने तो तिथे दरवर्षी 11 महिन्यांच्या कंत्राटावर काम करीत होता. 2000 मध्ये कायमस्वरूपी जागा निघाल्या पण यावेळी तिथे माझी आणि इतर 3 जणांची निवड झाली होती. त्या मुलाचा प्रतिक्षा यादीत पहिलाच क्रमांक होता. मी जर ही नोकरी विशिष्ट कालावधीत नाकारली तर त्याला ही नोकरी मिळाली असती. या नोकरीत कायम होऊ या आशेवर त्याने लग्न वगैरे केलेले होते आणि मुल वगैरे जन्माला घालून आपला कुटुंबविस्तार केला होता. आता जर या जागेवर त्याला नोकरी मिळाली नाही तर आजवरच्या त्याच्या आयु्ष्याचे नियोजन साफ़ कोलमडणार होते. मी तसे पत्र द्यावे म्हणून विनवणी करण्यासाठी आणि सामोपचाराने मी ऐकलेच नाही तर दंडमार्ग अवलंबता येईल या हेतूने त्याने आपल्या त्या गुंड मित्राला दबावासाठी सोबत घेतले होते.

मी त्याला स्पष्ट सांगितले की बाबारे, मुंबईची इतकी चांगली नोकरी सोडून मी इथे तसाही येणार नाही. तू निश्चिंत अस. आणि मी मुंबईला गेल्यागेल्या महाविद्यालयाला ही नोकरी नाकारल्याचे पत्र पाठवीन. मला पहिल्यांदा निवड झाल्याचे पत्र तर येऊ देत. त्याला मी बरोबर आणि नियत अवधीत उत्तर पाठवीन. त्याचा इतक्या चांगुलपणावर विश्वास बसेना. त्याला वाटले की सोबतच्या गुंडाला घाबरून मी तोंडावर असे बोलतोय. तो पुन्हा म्हणाला की बघ हा, जर तू इथे आलास तर इथे तुझे जगणे नकोसे करणारे असे अनेक गुंड माझे मित्र आहेत. तू इथे राहू शकणारच नाहीस. मी त्याला पुन्हा पुन्हा सांगत होतो की असा प्रश्नच उदभवत नाही. मी इथे नोकरीला येणारच नाही. मला वाटले की हे महाविद्यालय शासकीय होतेय की काय ? म्हणून मी इथे अर्ज केलेला होता. इथली परिस्थिती मला कळल्यावर स्वतःचा सुखाचा जीव दुःखात टाकायला मी इथे कशाला येऊ ?

सोलापूर येईपर्यंत आमचा हाच संवाद चालू होता. माझ्या बोलण्यावर त्या मुलाचा विश्वास बसत नव्हता पण त्याला माझा इलाज नव्हता. साध्या सरळ हेतूला पुन्हा कसे पटवून द्यावे हा कायम माझ्यापुढचा प्रश्न राहिला आहे. लोक स्वतःवरून जगाची पारख करीत असतात त्यामुळे कुणी इतका प्रांजळ, प्रामाणिक कसे काय असू शकते ? असा त्यांना कायम प्रश्न पडतो आणि इथे माझा प्रामाणिकपणा, प्रांजळ हेतू मांडायला मी कमी पडतो. जवळपास 20 वर्षांनी आमच्या सध्याच्या महाविद्यालयात आमच्या डायरेक्टर सरांचे एक बौद्धिक ऐकले तेव्हा समाधान झाले. ते म्हणाले होते, "Honest intentions should not need clarifications." मग माझे समाधान झाले होते. पण तेव्हा माझी बाजू त्याला पटत नव्हती हे त्याच्या वारंवार विनवण्यावरून आणि मधेमधे देत असलेल्या धमक्यांवरून उघड होते.

तो, त्याचा तो गुंड मित्र आणि मी आम्ही तिघांनीही मिळून एकाच रिक्षाने सोलापूर बस स्टॅण्ड ते सोलापूर रेल्वे स्थानक प्रवास केला. गाडी फ़लाटाला लागली. मी माझ्या आसनावर बसलो. गाडी हलेपर्यंत तो मुलगा खिडकीबाहेर थांबून विनवणी करीत होताच. मी त्याला माझ्यापरीने समजावत होतो.




मुंबईला आलो. दोन तीन दिवसांनी तुळजापूरच्या महाविद्यालयाकडून निवड झाल्याचे पत्र मिळाले. त्यातल्या अटींप्रमाणे मी ती नोकरी नाकारल्याचे पत्र नियत कालावधीत मिळावे म्हणून स्पीड पोस्टाने पाठवले. मला तशीही त्या नोकरीची गरज नव्हतीच पण तरीही कुणाच्या तरी तोंडचा घास आपण हिरावला नाही याचे समाधान माझ्या मनात होतेच.

साधारण महिनाभराने माझा मुंबईतला पत्ता मिळवून तो मुलगा माझ्या पवईच्या घरी आला. यावेळी तो एकटाच आलेला होता. सोबत तो गुंड मित्र नव्हता. येताना आई तुळजाभवानीची एक मोठ्ठी आणि अतिशय सुंदर अशी फ़्रेम त्याने भेट म्हणून माझ्यासाठी त्याने तुळजापुरावरून आणलेली होती. मी वेळेत नोकरी नाकारल्याने त्याला ती जागा मिळाली होती, त्याचे जीवन मार्गी लागलेले होते म्हणून कृतज्ञता म्हणून त्याने तुळजापूर ते मूंबई हा प्रवास केलेला होता आणि ही भेट आणली होती. उशीरा का होईना पण  त्याचा माझ्या चांगुलपणावर विश्वास बसला होता.

आज ही घटना आठवली की हसूही येते आणि मन विषण्णही होते. शिक्षकी पेशातल्या एका माणसाला आपल्या अनिश्चिततेपासून बाहेर पडण्यासाठी एका गुंडाची मदत घ्यावी लागली होती. या सगळ्या परिस्थितीसाठी जबाबदार कोण ? याचा मी गेले 22 वर्षे विचार करतो आहे पण एकंदर परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की कुणा एकावर जबाबदारी निश्चित करता येत नाही. यावर माझ्या हयातीत तरी मार्ग निघेल अशी आशा मी मात्र कायमच बाळगलेली आहे.

- माऊलीच्या "दुरिताचे तिमीर जावो" या स्वप्नावर दृढ विश्वास ठेवणारा, भाबडा, साधा, सरळ आणि प्रांजळ प्राध्यापक, वैभवीराम.

      

1 comment:

  1. छानच लिहिता.अनेकांच्या जीवनात विविध प्रसंग येतात, पण आपण ते लक्षात ठेवून रोचकपणे छान सादर करता.

    ReplyDelete