Wednesday, July 19, 2023

अध्यात्म: Two is Company and Three is Crowd

 वास्तविक अध्यात्म ही आपण स्वतः आणि परमेश्वर / सदगुरू या दोघांमधलीच गोष्ट आहे. ही एक अत्यंत आत्मिक अनुभव घेत पुढे जाण्याची गोष्ट आहे. प्रार्थना ही सामूहिक झाली तर तिचे फ़ायदे नक्कीच आहे पण प्रार्थना म्हणजेही अध्यात्माचेच एक साधन आहे. प्रार्थनेतून आपल्या अंतरंगात होत जाणारे बदल, आपल्याला येणारे अत्यंत तरल अनुभव हा स्वतः स्वतःच्याच अनुभवाचा भाग होत जातो. इंग्रजीत म्हटल्याप्रमाणे Two is Company and Three is Crowd सारखेच आपल्या अध्यात्मात आपण स्वतः आणि आपले आराध्य (दैवत / सदगुरू) याहून कुणी तिसरा आला तर त्याची किंमत कमी होत जाईल.


आज हे लिहीण्याचे कारण म्हणजे कालपासून सुरू झालेला पुरूषोत्तम मास. या मासात अधिकाधिक अध्यात्मसाधना घडली पाहिजे असे अनेक संत, अधिकारी पुरूष सांगून गेलेले आहेत. पण आजकाल स्वतःच्या अत्यंत गुह्य अध्यात्माविषयी इतर दहा लोकांना सांगून त्यांच्याकडून प्रशंसा मिळवण्यातच आपला वेळ खर्च पडतो आहे हे माझे निरीक्षण आहे. अध्यात्म आणि सामूहिक प्रार्थना यातला कार्यकारणभाव आपण विसरत चाललेलो आहे. श्रीमदभागवत कथा, श्रीरामायण, श्रीमदभगवतगीतापाठ हे जरूर करावेत. अगदी सामूहिक करावेत. आपल्या नंतरच्या पिढीला आपली ही धर्मपरंपरा देण्याची व्यवस्था आपण अगदी प्राणपणाने करायला हवी. पण श्रीमदभागवतकथेतून परत आल्यानंतर आपल्या अंतरंगात, त्या परमेश्वरी शक्तीबाबत आपल्या हृदयात काय नक्की बदल झालाय ? याचा धांडोळाही अगदी जरूर घेतला गेला पाहिजे. आणि तो धांडोळा आपला आपणच घेणार असतो. आपण आपल्यालाच जबाबदार असतो. त्यात तुम्ही आणि तो परमात्मा या व्यतिरिक्त कुणीही असण्याचे कारणच नाही. 


आपल्यात जर अत्यंत सूक्ष्म (Infinitesimally small) बदल घडले असतील तर त्या परमेश्वरी शक्तीचे आभार मानावेत आणि असाच अनुभव सतत येत जावा म्हणून मनोमन प्रार्थना करावी. आणि जर काहीच बदल अनुभवाला आला नसेल तरीही त्या शक्तीची प्रार्थना करावी आणि बदल घडू दे म्हणून विनवणी व्हावी. शेवटी हा सगळा खटाटोप आपल्या स्वतःची वाटचाल अधिक उन्नत, अधिक चांगल्या मार्गाने व्हावी हे अंतिम धेय आहे हे लक्षातच ठेवावे. 


विंदा करंदीकर म्हणतात 

"देणा-याने देत जावे

घेणा-याने घेत जावे, 

घेता घेता घेणा-याने

देणा-याचे हात घ्यावे." 


तसेच असे रोज सूक्ष्म बदल अनुभवत अनुभवत आपण सर्वांनी स्वतःच देवत्व प्राप्त करून घ्यायचे आहे आणि हेच आपले सर्व जीवांचे अंतिम ध्येय आहे.


यात आपले अत्यंत आत्मिक अनुभव इतरांना सांगून इतरांकडून वाहवा मिळवणे, आपण किती अध्यात्मिक आहोत हे इतरांच्या मनावर ठसवणे हा आपला हेतू असेल तर परमेश्वर आपल्यापासून अजून खूप दूर आहे असे नक्की समजावे. 


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर, प्रभातचिंतन अधिक श्रावण शुद्ध द्वितीया, १९/७/२३. 

No comments:

Post a Comment